टीचर’ हे सिल्व्हिया वॉर्नर यांचे अनुवादित पुस्तक अलीकडेच ‘मनोविकास प्रकाशन’ ने प्रसिध्द केले आहे. त्याला शिक्षणतज्ज्ञ पु. ग. वैद्य यांची प्रदीर्घ प्रस्तावना लाभली आहे. आयुकाच्या ‘पुलत्सय’ या बालविज्ञान प्रसार केंद्राचे संचालक अरविंद गुप्ता यांनी सहज वाचायला दिलेले ‘टीचर’ हे पुस्तक मनात घरच करून बसले. नाशिकच्या ‘आनंद निकेतन’ ( http://anandniketan.ac.in ) या मराठी माध्यमाच्या प्रयोगशील शाळेतील शिक्षिकांशी बोलण्यातांना माझ्या बोलण्यात सतत ‘टीचर’ मधील संदर्भ येऊ लागले. तेव्हा सर्व शिक्षिकांनी या पुस्तकाचे भाषांतरच करण्याची सूचना केली.
एखादे पुस्तक आपल्याला जीवनातील प्रश्नांकडे पाहण्याचा एक वेगळाच दृष्टीकोन प्रदान करते, तेव्हा ते नुसते पुस्तक उरत नाही तर जिवंत मार्गदर्शक बनते. ‘समरहिल’, तोत्तोचान’ आणि ‘टीचर’ ही केवळ शालेय शिक्षण या विषयावरची पुस्तके नाहीतच, ती एक जीवनविषयक दृष्टीकोन घडवणारी एक जीवनविषयक दृष्टीकोन घडविणारी पुस्तके आहेत.
सिल्व्हिया वॉर्नर यांचे पुस्तक अगदी रसरशीत आहे. पण तिच्या उत्कटतेने कदाचित तिची शैली गुंतागुंतीची झालेली आहे. एरवी आठवणी साधारणपणे सरळ रेषेत उलगडत जातात. पण इथे मात्र तसे नाही. ही तिची भूतकाळातील स्वैर मुशाफिरी आहे. हा भूतकाळ मावरी या न्यूझीलंडमधील आदिवासी जमातीतील मुलांच्या शिक्षणाशी निगडीत आहे.
मावरी ही न्यूझीलंडमधील मूळची आदिवासी जमात. आज देशावर युरोपियनांचे राज्य आहे. मावरींच्या भाषेपेक्षा इंग्रजीचा बोलआला आहे. या दोन संस्कृतींच्या दरम्यान सुप्त व उघड संघर्ष सतत चालू असतो. या संस्कृती संघर्षामुळे मावरी मुले मागासलेली गणली गेलेली. त्यांच्यासाठी काहीतरी वेगळे प्रयत्न करणे आवश्यक असले तरी ते पठडीबाज असून उपयोगी नव्हते. त्यासाठी वेगळया वाटेचा शोध घेणारा व त्या वाटेने चालण्याचे धैर्य दाखवू शकणारा शिक्षक असणे गरजेचे होते. ‘शिक्षक’या पदावर पगार घेणे म्हणजे ‘शिक्षक असणे’ नव्हे. सिल्व्हिया वॉर्नरच्या शब्दात सांगायचे तर, ”शिकवणे म्हणजे विद्यार्थ्यांशी लग्नच करणे असते!” सिल्व्हियाचे असे लग्न लागलेले होते. त्यामुळेच तिने या कामात आपले सर्वस्व ओतले.
तिच्यापुढे अनेक प्रश्न होते. मावरी मुलांसाठी, त्यांच्या संस्कृतीतून आलेले शब्द वापरणारी पुस्तके का नसावीत? ही युरोपियन ‘जॉन आणि जेनेट’ची कृत्रिम दुनिया त्यांच्यावर का लादावी? पुस्तकातले शब्द त्यांचे होण्यापेक्षा त्यांचे शब्द पुस्तकाने का घेऊ नयेत? तिने मळलेल्या वाटेने जायचे नाकारले आणि सहज शिक्षणाच्या वाटेने ती आपल्या सावळया कान्हयांबरोबर चालू लागली. या पुस्तकात पदोपदी जाणवते ते तिचे मावरीविषयीचे प्रेम. इतर युरोपियन शिक्षकांपेक्षा ती इथे वेगळी होते. मावरींची जीवनशैली ही कनिष्ठ असल्याने, त्यांना मुख्य प्रवाहात सामील करायचे, तर ही जीवनशैली सोडायला लावली पाहिजे, हा गो-यांचा अट्टाहास तिला मावरींचे व्यक्तिमत्व दुभंगविणारा वाटतो. त्यांच्या सहज जीवनप्रेरणा न मारता ते नव्या जगाशी जोडले जावेत, यासाठी ती प्रयत्न करते. शिक्षण म्हणजे दोन भिन्न संस्कृतींना जोडणारा पूल आहे. दुर्देवाने तिच्या प्रयोगांना खुद्द न्यूझीलंडमध्ये मात्र फारशी मान्यता मिळाली नाही. याने ती इतकी त्रस्त होते की अनेकदा नोकरी सोडून निघून जायचा विचार करते. पण मावरींच्या प्रेमापोटी जात मात्र नाही. ‘प्रयोगशील शिक्षकाला बढती न मिळणे हेच मुळी व्यवस्थेने दिलेले प्रशस्तिपत्रक आहे, असे मानायला हवे’ असे तिची बहिण समजावते. हेच दृश्य आपल्या महाराष्ट्रातही आढळते.
शिक्षण क्षेत्रात हे द्वंद्व कायमच दिसते. व्यवस्थाच परिपूर्ण बनवली व शिक्षकांना प्रशिक्षण देऊन ती अंगी बाणायला लागली की मग व्यक्ती विशिष्टता संपून उत्तम दर्जाची खात्री देता येते, असा दृष्टीकोन आहे. हा तंत्रवादी दृष्टीकोन म्हणू या. याउलट उत्स्फूर्तता व स्वातंत्र्य याला अवकाशच ठेवला नाही तर शिक्षक यांत्रिक पध्दतीने जे काही करेल ते परिणामकारक होऊच शकणार नाही, असा एक दृष्टीकोन म्हणूया. ‘काय करायचे’ त्याचे सार्वत्रिकीकरण करता येईल, पण ‘कसे करायचे’ याचे एकसाचीकरण करणे योग्य नाही, असा त्याचा आग्रह आहे. काहीजण दुस-या दृष्टीकोनास उपहासाने ‘कलावादी दृष्टीकोन’ असेही म्हणतात. आय.एस.ओ.च्या जमान्यात परिपूर्ण व्यवस्था निर्माण करण्याचा आग्रह वाढल्याने हा उपहासही वाढला आहे. पंरतु ‘शाळा’ म्हणजे काही ‘प्रॉडक्शन लाइन’ नाहीत व विद्यार्थी म्हणजे काही एकसाची बनू शकणा-या वस्तू नाहीत.
शिक्षणातील वाढती स्पर्धा, औत्सुक्य जागविण्यापेक्ष पाठांतराकडे वळलेली पध्दती, मुलांमध्ये वर्गीय भावनेची जोपासना करणा-या शाळा, शिक्षणमंत्र्यांच्या लहरीनुसार वाढणारे विषय, शोध घेण्यापेक्षा अनुकरणातून वाटचाल करण्याची मनोवृत्ती हे आजच्या शिक्षणाचे सर्वसाधारण चित्र आहे. शिक्षण ही आनंदयात्रा बनावी, असे शिक्षणतज्ञांनी वारंवार सांगूनही ती एक यातायात बनली आहे. फारच झाले तर ‘हास्यक्लब’ सारखा एखादा आनंदाचा तास वेळापत्रकात समाविष्ट करायला पालक व संस्थाचालक तयार होतील आणि त्या तासालाही जोक लिहून देण्याचे कर्मकांडच पार पाडले जाईल! किंवा कार्यानुभवासारखा तो तास इग्रंजी वा गणितासाठी वापरला जाईल!!
सिल्व्हिया या सर्व साचेबध्दतेच्या विरूध्द आहे. आपण स्वत: निर्माण केलेले शिक्षण साहित्यही चाकोरीबध्द झाल्याने नव्या कल्पना सुचण्याच्या आड येते, म्हणून जाळून टाकण्याचे धैर्य तिच्या अंगी आहे. पाठयपुस्तकाबाहेरचे जग ती शिक्षणाशी जोडून घेते. “निसर्ग हा गणित आणि विज्ञान शिकविण्यासाठी सर्वात उपयुक्त आहे. तेव्हा बाहेर चला, केवळ शाळेत बसू नका”, असे ती आवर्जून सांगते. प्रयोगशील शाळांच्या अशा उपक्रमांबाबत इतर शाळांची प्रतिक्रिया, ‘काहीतरी फॅड आहे झालं,’ अशी असते. नाशिकच्या ‘आनंद निकेतन’ मधील शिक्षिका गेली १० वर्षे नित्य नवे कल्पक उपक्रम घेत सिल्व्हियाच्या वाटेने चालत आहेत. त्याचा त्यांना व विद्यार्थ्यांना होणारा फायदा अनुभवण्याजोगा आहे. यासाठी फार पैसे लागत नाहीत, लागते ते चाकोरी मोडण्याचे धैर्य.
मुलांचे स्वयंस्फूर्त जीवन पुस्तकाशी बांधून टाकायला सिल्व्हिया कडाडून विरोध करते. मावरींच्या जीवनशैलीविषयी तिला प्रेम आहे. त्यांच्या बेबंदपणाला शिस्तीच्या चाकोरीत न बांधता त्याचाच वापर करून त्यांना नव्या जगाशी, भाषेशी कसे जोडता येईल, हे ती पाहाते. भाषा शिकविण्याचे तिचे सहज, सोपे प्रयोग अनुकरणीय आहेत.
आपल्याकडेही वेगवेगळया स्तरांवरील मुले आहेत. त्यांचे जीवन नाकारून आपण त्यांना काय शिकविणार? आज नागरी समाजातील मूठभरांनी शिक्षणव्यवस्था व्यापली आहे. आपला इतिहासच आपण आदिवासींनाही ‘त्यांचा इतिहास’ म्हणून शिकवितो. जणू त्यांना काही इतिहासच नाही! त्यासाठी शिक्षकाने प्रथम पाठयपुस्तकाच्या कैदेतून स्वत:ची सुटका करून घ्यायला हवी. महाराष्ट्रात अनेक प्रयोगशील शाळा अशा नव्या वाटेने जाण्याची धडपड करीत आहेत. त्याचा उपहास थांबवून, त्यांची मुख्य शिक्षणप्रवाहाशी देवाणघेवाण कशी होईल, ते पहायला हवे.सिल्व्हियाची वाट सर्व शिक्षकांना चोखाळता येईल. ती काही दैवी शक्ती असलेल्या कुणा एकटया प्रतिभावानाची वाट नाही. थोडे परिघाच्या बाहेर पाऊल टाकण्याचे धैर्य सर्वांनी दाखवायला हवे. ते धैये हे पुस्तक वाचून आमच्या सर्व शिक्षकांच्या अंगी यावे यासाठीच ही अनुवादाची धडपड केली आहे.
पुस्तक – टीचर
प्रकाशक – अरुण ठाकूर
किंमत – रु.१३०/-
http://anandniketan.ac.in