मधल्या वेळचे पदार्थ

शिरा

shira साहित्य – २ वाटया रवा, १ वाटी तूप, २ वाटया साखर, ४ वाटया पाणी, वेलची पूड एक लहान चमचा भरून.

कृती – तुपावर रवा मंदाग्नीवर भाजून घ्यावा. चांगला खतंग वास येईपर्यंत भाजावा. एकीकडे पाणी उकळत ठेवावे. नंतर उकळलेले पाणी भाजलेल्या रव्यात घालावे. ढवळून त्यावर झाकण ठेवावे. मंदाग्नीवर रव्वा शिजू द्यावा. शिजून थोडा घट्ट झाला की त्यात साखर व वेलची पूड घालावी व शिरा नीट शिजू द्यावा. शिजल्यावर तो गॅसवरून खाली उतरवावा. आवडत असल्यास त्यात केळीचे तुकडे (सोलून) टाकता येतात.

टीप – पाण्याऐवजी दूध आणि केळी घालून केलेला शिरा सत्यनारायणाच्या प्रसादासारखा लागतो.

पानगे

साहित्य – तांदळाचं पीठ, मीठ,गुळ,साखर, दुध, लोणी/तूप.

कृती – तांदळाचं पीठ घ्या. त्यात थोड मीठ व गुळ किंवा साखर घालून दुधाचा शिपकारा देऊन पीठ भिजवा. पिठाची पानावर पुरीएवढी चकती हाताने थापून त्या पानावर दुसरं पान घालून दोन्ही पानं तव्यावर टाकून ताटली ठेवावी. ही पानं केळीची किंवा कर्दळीची असावी. पानाचा जरा जळका वास आल्यावर ताटली काढून बाजू उलटायची. गरमागरम पानग्या बरोबर लोणी/तूप द्या. आजारातून उठलेल्या माणसाला पानग्यासारखा दुसरा पदार्थ नाही.

मुटकूळे

mutakule साहित्य – १ कोवळा लहान दुधीभोपळा किंवा मेथीच्या पाल्याची एक जुडी, २ वाटया गव्हाची जाडी कणीक, १ चहाचा चमचा तिखट, चवीनुसार मीठ, फोडणीसाठी ३ चमचे तेल, मोहरी, व हळद प्रत्येकी एक लहान चमचा, दोन-तीन चहाचे चमचे भरून धने-जिरे पावडर.

कृती – कणिक कढईत घालून गॅसवर चांगली भाजून घ्यावी. त्यात मेथीची पालेभाजी निवडून बारीक चिरून घालीवी किंवा दुधीभोपळयाची साल काढून तो किसून घालावा. धने-जिरे-पावडर, तिखट व मीठ टाकून सगळे पीठ नीट कालवावे. पाण्याचा हात लावून पिठाचे मुटकुळे करावेत. नंतर एका पातेल्यात फोडणी करून त्यामध्ये मुटकुळे टाकून त्यावर झाकण टाकावे. झाकणात पाणी घालावे म्हणजे पदार्थाला चांगली वाफ येते. मुटकूळे शिजले की शक्यतो गरमच खायला द्यावेत.

आवळा कॅन्डी

bitroute-uttappa साहित्य – १ किलो आवळे, ७५० ग्र. साखर, पीठी साखर.

कृती – चांगले निवडलेले आवळे स्वच्छ धुवून, पुसून, पाणी न घालता बंद डब्यात भरावे. आता हा डबा कुकरमध्ये ठेवून ३-४ शिटट्या होऊ द्याव्यात. पूर्णपणे गार झाल्यावर आता आवळ्याच्या पाकळ्या सहजपणे वेगळ्या करता येतील. बी काढून टाकून सर्व आवळ्यांच्या पाकळ्या वेगळ्या करुन घ्याव्या. हे आवळे भांडयात काढून त्यावर साखर पेरावी अश्या त-हेने आवळे पूर्णपणे साखरेने झाकले जातील. आता हे भांडे उन्हात ठेवावे. आठ तासांनी साखरेचा पूर्णपणे पाक झाला असेल. हे भांडे पुढील दोन दिवस उन्हातच राहू द्यावेत. तिस-या दिवशी आवळे पूर्णपणे पाकाच्या तळाशी जातील. आता चाळणीवर हा पाक गाळून घ्यावा. वर उरलेल्या कॅन्डी उन्हात अजून २-३ दिवस वाळवायला ठेवाव्यात. पूर्णपणे वाळल्यावर अधिक गोड हवी असल्यास कॅन्डीवर पिठी साखर चोळावी. वाळलेल्या कॅन्डी बंद डब्यात भराव्यात. उरलेला पाक हा आवळा सरबत म्हणून उपयोगात आणता येतो. पाक बाटलीत भरुन, फ्रीज मध्ये ठेवावा. सरबत प्यायच्या वेळेला एक ग्लास पाण्यात २-३ चम्मचे पाक मिसळल्यास आवळा सरबत तयार.