शहाणी नीतू

नीतूकडे अनेक खेळणी होती.छोटया बाहुल्या,बार्बी डॉल्स,भातुकली,गाडया आणि मोठी लाल रंगाची कार ज्यात बसून नीतूला छानपैकी फिरता यायचे.नीतूच्या मैत्रिणींनाही तिचीही गाडी खूप आवडायची.गाडीत बसण्यासाठी अनेकदा भांडणेही व्हायची.काही दिवसांनी नीतूची मैत्रिण शामलीने लाल रंगाची नवीन स्कूटर आणली.एक पाय स्कूटरवर आणि एक जमिनीवर ठेऊन ही स्कूटर चालवली की काय वेगाने चालायची.सगळ्या मुली बघतच राहत.नीतूला ह्या स्कूटर समोर आपली कार अगदी साधी वाटत होती.आपल्याकडेही कार ऐवजी स्कूटर असती तर बरं झाले असते असे नीतूला वाटले.घरी आल्यावरही तिच्या डोक्यात तोच विचार होता.संध्याकाळी बागेत खेळण्याऐवजी नीतू आपल्या कारजवळच विचार करत बसली.तिच्या डोक्यातून स्कूटरचे भूत काही गेले नव्हते.रात्री जेवायच्यावेळी आईने नीतूच्या आवडीचा पुलाव आणि रायते केले होते तरी तिचे जेवणात अजिबात लक्ष नव्हते.”काय झाले नीतूली,तुझे जेवणात अजिबात लक्ष नाहीये?”,आईने प्रेमाने भरवत तिला विचारले.”आई,आज शामलीच्या बाबांनी तिच्यासाठी मोठी लाल स्कूटर आणली.आपल्या कारपेक्षाही खूप छान.मलाही तशीच स्कूटर हवी आहे.घेऊन दे ना”,नीताने हटट केला.आईने सजावले,”नीतू,अगं प्रत्येकाकडे प्रत्येक गोष्ट असेलच असे नाही.दुसर्‍याकडे असलेली प्रत्येक गोष्ट आपण विकत घेऊच शकू असेही नाही.”

“अगं पण मला ती स्कूटर खूपच आवडली आहे म्हणून हवी आहे”,नीताने हटट केला.”नीता हटट न करणार्‍या,व्यस्थित जेवणार्‍या मुलांची इच्छा सहज पूर्ण होते.तूही तशीच वागलीस तर लवकरात लवकर तुझीही इच्छा अशीच पूर्ण होईल.” आईने समजावून सांगितले.आईचे बोलणे नीतूने व्यवस्थित लक्षात ठेवले आणि त्याप्रमाणेच शहाण्या मुलीसारखी वागू लागली.

होताहोता नीतूचा सहावा वाढदिवस आला.वाढदिवसाला तिचे सगळे मित्र मंडळी,आत्या आणि काकाही आला होता.आईने तिच्या आवडीचा स्ट्रॉबेरी केक,इडली सांबार आणि शंकरपाळे केले होते.पार्टीत खूप मजा आली.नीतूला मात्र आश्चर्य वाटले की कुणीही तिला वाढदिवसाचे गिफ्ट दिले नाही.तिने हळूच जाऊन आईला विचारले.आई गालात हसत तिला गॅलरीत घेऊन आली.तिथे मोठया रंगीत कागदात काहीतरी गुंडाळले होते.”नीतू बघ,सगळ्यांनी मिळून तुझ्यासाठी काय गिफ्ट आणले आहे”,आई म्हणाली.नीतूने घाईने कागद बाजूला केला तर लाल स्कूटर!अगदी तिच्या मनात होती तशीच!

नीतूने आलेल्या सगळ्या मैत्रिणींना आणि मोठयांना धन्यवाद दिले.आज नीतू खूपच आनंदात होती कारण तिच्या शहाण्यासारख्या वागण्यामुळे तिला तिच्या आवडीचे गिफ्ट मिळाले होते.

चांदोमामा

फार फार वर्षांपूर्वी पृथ्वीची उत्पत्ती झाली तेंव्हा फक्त सूर्यच आकाशात होता, चंद्र अजिबातच नव्हता. फक्त सूर्यच असल्यामुळे पृथ्वीवर कधी अंधारच होत नसे नेहमीच उजेड रहात असे. त्यामुळे पृथ्वीवर राहणारी माणसे सतत कामात असत. त्यांना विश्रांती कधी घ्यावी हे समजत नसे. सतत काम करत रहायल्यामुळे त्यांना थकवा येत असे. चिडचिड होत असे.

एकदा देवबाप्पाने पृथ्वीवरच्या माणसांची भेट घ्यायचे ठरवले. तो पृथ्वीवर आला तेंव्हा माणसे काम करत होती. देवाने माणसाला विचारले, ” तू तुझे हे शेत कधी नांगरले ?” माणूस उत्तरला, “आज”. देवाने दुसर्‍या माणसाला विचारले,” झाड लावण्यासाठी तू हा खड्डा कधी खणलास?” माणूस म्हणाला , “आज”. देवाने परत तिसर्‍या माणसाला विचारले,” झाडावरची ही फळ कधी पिकली?” तिसरा माणूस हसून म्हणाला,”आजच”. देवाला आश्चर्य वाटले. आणखीन खात्री करुन घेण्यासाठी त्याने आपल्या मुलाला घेऊन जाणा-या बाईला विचारले,”ह्याचा जन्म कधी झाला”. बाई कौतूकाने म्हणाली,”आज”.

हे ऐकल्यावर देवाला समजून चुकले की पृथ्वीवरच्या माणसांना वेळेचे अजिबातच भान नाहीये. त्यांना कधी कुठले काम करावे, किती वेळ करावे हे समजत नाही. त्यावर उपाय म्हणून देवाने सूर्याला बारा तासांनंतर अस्त व्हायला सांगितले आणि बरोबर बारा तासांनी परत उदय व्हायला सांगितले. आता पृथ्वीवर बारा तासांनी अंधार व्हायला लागला.

अंधारात लोकांना काही दिसेनासे झाले. धडपडू लागले. काहीच काम होईना म्हणून नाईलाजाने झोपू लागले. काही दिवसांनी चौकशी केल्यावर देवाच्या लक्षात आले की माणसांना संपूर्ण अंधाराची खूपच गैरसोय होते आहे. त्यांना थोडातरी प्रकाश पाहीजे. त्यासाठी मग त्याने शांत आणि शितल असणार्‍या चन्द्रदेवाला पृथ्वीवर येण्याची विनंती केली. पांढराशुभ्र चन्द्रप्रकाशात पृथ्वीवरच्या माणसांनाही शांत वाटू लागले. झोप येऊ लागली. माणसांचा वेळ रात्र आणि दिवस ह्यात वाटला गेला. अश्या तर्‍हेने पृथ्वीवरचा प्रत्येक दिवस सूर्यासोबत कामात आणि रात्र चन्द्रासोबत आरामात जाऊ लागली.

मूळ कथा – स्वप्ना दत्ता, भावानूवाद – भाग्यश्री केंगे

अंकूर

शाळा संपतांना दीपाताईंनी मुलांना सुटटीसाठी एक काम सोपावले होते. मे महिन्यात सगळेजण आंब्याची मजा लुटतात आणि कोयी मात्र फेकून देतात. ताईंनी ह्या कोयींपासूनच मुलांना रोपे तयार करायला सांगितली होती. नम्रता तर, बाबांनी आंबे आणले की लगेचच त्याच्या कोयी आपल्याला कधी मिळतात ह्याची वाट बघायची. तिने त्यासाठी दुधाच्या पिशव्या साठवून त्यात माती आणि शेणखत घालूनच ठेवले होते. बाबांनी तिला हापूस, पायरी, लंगडा, तोतापुरी, लालबाग… अश्या आंब्यांच्या अनेक जाती ओळखायला शिकवल्या होत्या. त्यामुळे आंब्यांचा चटटा/मटटा झाला की नम्रता आंब्यांच्या जातीप्रमाणे त्यांची वर्गवारी करुन ठेवायची.

सकाळी उठल्यावर आंब्याच्या दोन किंवा तीन कोयी मिळून एका मातीच्या पिशवीत लावायच्या. नंतर सगळ्या पिशव्यांना पाणी घालायचे हे नम्रताचे रोजचे काम होते. पाणी घालतांना नम्रता विचार करायची, “आज ह्या कोयी मातीच्या कुशीत छान झोपल्या आहेत. काही दिवसांनी कोयीला कोंब फुटतील. त्यातून इवलेसे रोप येईल. होता होता झाड थोडे मोठे झाले की आपल्या वर्गातली सगळी मुले मिळून आपण त्याची रोपे डोंगरावर लावू यात. पावसामुळे रोपे डोंगरावर वाढतील. मोठे वृक्ष होतील. वसंत ऋतूत झाडांना छान मोहोर येईल. त्यावर कोकीळा, बुलबुल, मैना गाणी गातील. आपल्या सर्वांना मिळून त्या डोंगरावर ट्रीपलाही जाता येईल….” नम्रताची स्वप्न साखळी अशी वाढत जात असे.

तिने तिच्या सोसायटीतल्या मैत्रिणींनाही आपल्या मनातले गुपीत सांगितले होते. त्यामुळे त्याही कोयींना कोंब फुटण्याची वाट पहात होत्या. होता होता पंधरा दिवस झाले. सकाळी नम्रता झाडांना पाणी घालायला गेली तर तिला दोन पिशव्यांमध्ये चक्क कोंब फुटलेले दिसले. नम्रता आनंदाने घरभर नाचली. आई-बाबांना, मित्र-मैत्रिणींना सर्वांना ते कोंब दाखवून झाले. आता तिला खात्री पटली होती की शाळा सुरु होई पर्यंत तिची आंब्याची झाडे चांगली येणार होती. स्मार्ट कीड्स तुम्ही पण अश्या तर्‍हेने झाडांची रोपे करुन पावसाळयात जरुर झाडे लावा.

भाग्यश्री केंगे