समज

आठवडयाभराने नीनाचा वाढदिवस होता. त्यामुळे वाढदिवसाला काय काय आणायचे ह्याची यादी ती तिच्या बाबांना समजावून सांगत होती. चॉकलेट केक, दहा मेणबत्त्या, पावभाजी आणि हो त्या दिवशी घालण्यासाठी खास सीमाचा निळा टिकल्यांचा फ्रॉक. सीमा नीनाची मावस बहीण होती. शाळेच्या स्नेहसम्मेलनात सीमाला परीची भूमिका करायची होती म्हणून तिच्या आईने खास निळा फ्रॉक आणला होता. नीनाला तो फ्रॉक खूपच आवडल्यामुळे वाढदिवसाच्या दिवशी तो घालायचा म्हणून हटट करत होती.

नीनाच्या आई-बाबांना तिला कसे समजवावे हेच समजेना. तिच्या अश्या स्वार्थी आणि अविचारी वागण्याचा त्यांना वाईटही वाटत होते. त्यांनी परोपरीने नीनाला समजावून सांगितले पण काही उपयोग झाला नाही. उलट तिचा हटट दिवसेंदिवस वाढतच चालला होता.

होता होता वाढदिवसाचा दिवस उजाडला. सकाळी झोपेतून उठल्यावर नीनाला आईबाबांनी जवळ घेऊन लाड केले. गिफ्ट देण्यासाठी दोघांनीही तिला डोळे बंद करायला सांगितले. नीना खूपच उत्सुक होती. हातात खोके ठेवल्यावर घाईने तिने ते उघडले आणि आत चक्क तिच्या आवडीचे चंदेरी रंगाचे, उंच टाचेचे बूट होते. तिला खूप दिवसांपासून ते घ्यायचे मनात होते.

“आई, आज मी निळ्या ड्रेसवर हे बूट घातल्यावर किती छान दिसतील नाही?” नीनाने आईला मीठी मारत विचारले.
“अगं, पण नीना आज हे बूट सीमा घालणार आहे. तिने तसे आम्हाला अधीच सांगून ठेवले आहे”, आईने शांतपणे नीनाला समजावले. “अगं आई पण आज माझा वाढदिवस आहे मग सीमा कशी काय माझे बूट घालणार?”, नीना रागात म्हणाली.
“नीना जर तू सीमाचा नाटकाचा फ्रॉक तिचे नाटक व्हायच्या आधीच घालू शकते तर सीमा तुझे बूट का घालू शकणार नाही?” आईने विचारले.

आईच्या ह्या प्रश्नाने नीनाला निरुत्तर केले. तिची चूक तिला उमगली. आपण सीमाच्या मनाचा विचार न करता आपण तिचा स्नेहसम्मेलनाचा ड्रेस घालायला मागितले ह्या बद्दल तिला वाईट वाटले. पण सीमाने मात्र समजूदारपणे तिचा फ्रॉक काहीही तक्रार न करता घालायला दिला. त्या क्षणी नीनाने कपाटातून फ्रॉक काढून सीमाला दिला आणि तिची माफी मागितली. आईबाबांनाही खूप आनंद झाला कारण त्यांची नीना आज खर्‍या अर्थाने मोठी झाली होती.

– भाग्यश्री केंगे

व्यायामाचे महत्त्व

विनित आणि अनिकेतची दाट मैत्री होती. त्यांच्या तिसरीच्या वर्गाची ट्रीप डोंगरावर जाणार आहे असे प्राची टिचरांनी सांगताच सर्व मुले आनंदाने ‘हुर्रे’ ओरडली. होता होता तो दिवस उजाडला आणि सारी मुले सकाळी ठीक सात वाजता शाळेत हजर झाली. बस लगेचच सुटल्यामुळे सगळी मुलं खूपच एक्साईट झाली होती. सगळ्यांनी खाऊची अगदी जय्यत तयारी करुन आणली होती. साडे आठला गाडीतच सगळयांनी ब्रेकफास्ट करायचा ठरला. सर्वांनी आपआपले डबे उघडले. विनितनेही डब्यात आणलेला शिरा आणि ऍपलचा चट्टामट्टा करायला सुरूवात केली. अनिकेत मात्र कोल्डड्रिंक्स आणि भलमोठं वेफर्सच पाकीट खात होता. होता होता बस डोंगराच्या पायथ्याशी पोहोचली.

सगळी मुले खाली उतरल्यावर टिचरांनी सांगितले ”मुलांनो उंचावरची लेणी पाहण्यासाठी आपल्याला डोगंर चढायचा आहे.” मुलं तर काय तयारच होतीच. सर्वांनी आपल्या बॅगपॅक पाठीवर टाकल्या, टोप्या घातल्या आणि चढायला सुरूवात केली. मधून मधून उत्साह वाढावा म्हणून टिचर त्यांना ” हर हर महादेव” म्हणायला सांगत होत्या. मुलांनाही आरोळया देतांना अगदी शिवाजीचे मावळे झाल्यासारखे वाटत होते.

जसे जसे हे मावळे वर जात होते तसा त्यांचा उत्साह कमी कमी होत होता. त्यांना दम लागत होता. बरेच जण थांबत थांबत चढत होते तर काहीजण सारखे पाणी पीत होते. डोंगर चढायचा उत्साह फारच थोडया मुलांमध्ये शिल्लक होता अपवाद फक्त विनितचा! तो सर्वात आधी डोंगरावर जाऊन पोहोचला. विनितच्या मागोमाग सगळे पोहोचल्यावर सार्‍यांनी फिरुन डोंगर आणि लेणी पाहिली.

संध्याकाळ होत आल्यामुळे खाली उतरणे आवश्यक होते. प्राची टिचरांनी सगळयांना जवळ बोलावले आणि त्या मुलांना समजावत म्हणाल्या, ”आज बहुतेक मुलांना डोंगर चढतांना दम लागला. अनिकेत तर सर्वात मागे राहिला होता. तुमच्यात न दमता जर कोणी डोंगर चढला असेल जर तो आहे विनित. असं का माहिती आहे का? ” मुलांनी नाहीच्या माना डोलावल्या.

टिचरांनी कारण समजावत सांगितले, “विनित अजिबात जंकफुड खात नाही. आईने केलेले पदार्थ कुरकूर न करता मनापासून जेवतो. त्यामुळे त्याच्या शरीराचे चांगले पोषण होऊन शक्ती वाढते. दररोज सकाळी व्यायाम केल्यामुळे त्याचा स्टॅमीना पण वाढला आहे. तुम्ही जर त्याच्या सारखे वागलात तर तुमचाही स्टॅमीना वाढून न दमता तुम्हीही डोंगर चढू शकाल”. “कधीतरी बदल म्हणून वेफर्स, बिस्किटे खायला हरकत नाही. पण संपूर्ण जेवण त्यावर नको. काय समजले ना? “मुलांनी मोठयाने हो म्हटले आणि उडया मारत डोंगर उतरायला सुरूवात केली.

– भाग्यश्री केंगे