भाताचे प्रकार


पुलाव

pulav साहित्य – ३ वाटया बासमती किंवा कुठलाही लांब तांदूळ, अर्धी वाटी मटारचे दाणे, १ मोठे गाजर, १ मूठ बेदाणा, १ मूठ काजू-तुकडा, २-३ लवंगा, २-३ दालचिनीचे तुकडे, चवीनुसार मीठ-साखर, साजूक तूप.

कृती – पुलाव करण्यापूर्वी १ तास आधी तांदूळ धुवून पाणी निथळून ठेवावेत. नंतर मोठया पातेल्यात थोडया तुपावर काजू व बेदाणे तळून घ्यावेत. नंतर त्याच तुपात लवंग व दालचिनीची फोडणी करून तांदूळ टाकावेत. तांदूळ जरा परतून घ्यावेत व नंतर तांदूळाच्या दुप्पट पाणी घालून, साखर-मीठ घालून भात करून घ्यावा. मटारचे दाणे उकळीच्या पाण्यात टाकून वाफवून घ्यावेत. त्यात चिमूटभर मीठ टाकावे.

गाजराचे लांब व बारीक तुकडे करावेत. नंतर हे तुकडे वाफवून घ्यावेत. पुलाव वाढायच्या वेळी मोठया बशीत भात काढून घ्यावा. त्यावर मटार, गाजर, काजू व बेदाणा पसरावा. हा पुलाव करण्यास अतिशय सोपा व चवीला छान लागतो.

मसूर पुलाव

masoor-pulao साहित्य – अर्धी वाटी अख्खे मसूर, एक वाटी बासमती तांदूळ, मसाला वेलची, दोन लवंग, अर्धा चमचा धने पावडर, अर्धे तमाल पत्र, एक मोठा चमचा साजूक तूप.

कृती – मसूर ४-५ भिजवा. तीन शिट्ट्या करून कमी पाणी घालून बासमती तांदूळ कुकरमध्ये शिजवून घ्या. थंड झाल्यावर ताटलीत पसरुन ठेवा. कढईत एक चमचा साजूक तूप घालून मसाला वेलची, लवंग, तमालपत्र,धने पावडर घालून व भिजवलेले मसूर झाकण ठेवून वाफ आणा. मसूर शिजले की मोकळा बासमती भात मिसळा, चवीपुरते एक चमचा मीठ घाला व झाकण ठेवून वाफ येऊ द्या. आवडत्या रायत्याबरोबर सर्व्ह करा.

नारळी भात

narali-bhaat साहित्य – २ भांडी जुने आंबेमोहर तांदूळ, ३ भांडी पिवळाधमक चिरलेला गूळ, २-३ लंवगा, ५-६ वेलदोडयांची पूड, ४ टेबलस्पून साजूक तूप, १ नारळ खवून.

कृती – भात करण्यापूर्वी तांदूळ निवडून स्वच्छ धुवून अर्धा तास निथळत ठेवावेत. खवलेला नारळ व गूळ मिसळून घ्यावा व भातात घालावा. पातेल्यात बुडाला १ टेबलस्पून साजूक तूप घालून त्यात लवंगा परतून घ्याव्यात नंतर त्यात भात गूळ व नारळ घालावे व पातेल्याखाली तवा ठेवून मंद आचेवर अधूनमधून हलक्या हाताने ढवळून २-३ वाफा द्याव्यात. नंतर वेलदोडा पूड व १ चमचा तूप सोडावे व झाकण ठेवून गॅस बेद करावा.