फार फार वर्षापूर्वीची गोष्ट.
त्यावेळी फुलपाखरे असत फक्त एकाच रंगाची.
म्हणजे गर्द हिरवी, निळीशार, पिवळीधमक, लालचुटूक, काळी कुळकुळीत, पांढरीशुभ्र, झगमगीत सोनेरी किंवा चकचकीत चंदेरी.
फुलपाखरांच्या पंखांवर रंगीबेरंगी ठिपकेच नसत.
किंवा वेगवेगळया रंगाच्या रेषा पण नसत.
फुलपाखरे उडायची.
फुलांवर बागडायची.
बागेत भिरभिरायची.
सगळीकडे ऊड-ऊड करायची.
पण एका जागी कधी स्थिर नसायची.
फुलांवर नाही बसायची.
पानांवर नाही बसायची.
झाडांवर नाही बसायची.
गवतावर नाही बसायची
दिवसभर ऊड-ऊड करायची.
रात्री काळोखाड लपून बसायची.
दिवसभर ऊड-ऊड करुन बिचारी फुलपाखरं दमून जायची. थकून जायची.
फुलांवर बसलं तर…..
कुणीतरी येऊन पकडणार.
पानांवर बसलं तर…..
कुणीतरी खाणार.
गवतावर बसलं तर…..
कुणीतरी येऊन मटकवणार.
झाडांवर बसलं तर….
कुणीतरी झडप घालणार.
फुलपाखरांना कळेना आता करावे काय?
सगळे प्राणी पक्षी बसतात आरामात.
मग आपणच का सारखे हलवावे पाय?
हलवायचे पंख?
उडायचं भूरभूर आणि जायचं दूरदूर?
आणि आपणच का असे एकरंगी?
आपणच असे एकरंगी असल्याने, आपल्याला फुलांच्या ताटव्यात दडता येत नाही.
इवल्या इवल्या गवत फुलांत मिसळता येत नाही.
पानांमागे लपता येत नाही.
झाडांवर शांतपणे टेकता येत नाही.
आपल्याला सुध्दा हवेत रंग. काय करावे यासाठी?
किती दिवस रहायचं असं, एकरंगी एकपाठी?
फुलपाखरे सतत हाच विचार करू लागली.
आणि अचानक एकेदिवशी त्यांना रंगसाक्षात्कार झाला.
फुलपाखरे सारखी ऊड-ऊड करायची. त्यामुळे ती रंग पाहायला विसरायची.
आता फुलपाखरे रंग पाहू लागली.
रंगांच्या जवळ जाऊ लागली.
रंगांभोवती घोटाळू लागली.
आकाशाचे रंग. ढगांचे रंग.
पानांचे रंग, फुलांचे रंग.
झाडाचे रंग, वेलीचे रंग.
किडयाचे रंग. माशांचे रंग.
प्राण्याचे रंग. पक्षांचे रंग.
आकाशामल्या इंद्रधनुष्याचे रंग.
फुलफुलपाखरे या सा-या रंगात दंग होऊ लागली.
पानांभोवती रुणझुणली.
फुलांमध्ये लपली.
झाडांवरती टेकली.
वेलीवरती विसावली.
प्राण्यांसोबत भूरभूरली.
पक्षांसोबत खेळली.
आकाशाच्या जवळ गेली.
ढगावर बसली.
आणि,
इंद्रधनुष्यावरून घसरत घसरत पुन्हा इथे आली!
दुस-या दिवशी पहाटे रंगीबेरंगी दव पडलं…
फुलपाखरांच्या पंखांवर.
रंगांची बरसात झाली…
फुलपाखरांच्या पंखांवर..
रंगांचा वर्षाव झाला…
फुलपाखरांच्या पंखांवर.
पानांचे, फुलांचे, वेलींचे, प्राण्यांचे, पक्षांचे, आकाशाचे, ढगांचे आणि इंद्रधनुष्याचे सारेच रंग पसरले फुलपाखरांच्या पंखांवर!!
फुलपाखरूतेव्हापासून…
सगळी फुलपाखरे रंगीबेरंगी झाली.
उडता उडता फुलांवर बसू लागली.
फुलांमध्ये मिसळून गेली.
– राजीव तांबे