साहित्य : पाणीपुरीच्या पुर्या एक पाकिट (सुमारे ५० पुर्या) मीठ घालून उकडलेले पांढरे वाटाणे २ वाटया, ८-१० वाटया भरून चिंचेचे पाणी (कृती खाली दिली आहे.)
कृती : एका प्लेटमध्ये पुर्या घेऊन त्याला हाताने वरून फोडा. त्यात एक चमचाभर पांढरे वाटाणे घाला. पाणी एका वेगळया वाटीत घ्या. जो तो आपापल्या पुर्यांमध्ये पाणी घालून पुर्या खाईल.
साहित्य : अर्धी वाटी चिंच उकळून, कोळून त्याचा गर, ७-८ हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आले, १५ काडया पुदिना, एक वाटी धुवून चिरलेली कोथिंबीर, अर्धा चमचा जिरे, ५ लवंगा, ६-७ काळे मिरे, शेंदेलोण-पादेलोण यांची एकत्रित पूड, ३ चहाचे चमचे भरून, ४-५ चमचे गूळ, अर्धा चमचा लाल तिखट.
कृती : यासाठी तुम्हाला आई किंवा काकूची मदत लागणार आहे. तुम्ही आईकडून चिंच उकळून घेऊ शकता. मग ती गार झाली की हाताने चोळून तिचा सर्व गर काढायचा. नंतर आईकडून लवंगा तव्यावर किंवा कढईत भाजून घ्यायच्या. त्या भाजतांना धुर निघू लागतो व लवंगा फुगतात आणि काळया होतात. पुदिना धुवून घेऊन त्याची पाने बाजूला काढा व मिरच्यांचे बारीक तुकडे करा. आले किसून घ्या, एका ताटात कोथिंबीरख् पुदिन्याची पाने, मिरचीचे तुकडे, काळी मिरी, जिरे, भाजलेल्या लवंगा, २ चमचे शेंदेलोण-पादेंलोण पूड, आले हे सर्व घेऊन एकत्र कालवा व आईकडून मिक्सरमध्ये एकदम बारीक गुळगुळीत चटणी वाटून घ्या. आता ही चटणी साधारण मध्यम आकाराच्या पातेलीभर पाण्यात (सुमारे १ लिटर पाण्यात) मिसळा, त्यात गूळ घाला व हलवा. झाले पाणी तयार, चव घेऊन पहा, मीठ कमी वाटत असेल तर उरलेली एक चमचा शेंदेलोण-पादेलोण पूड या पाण्यात मिसळा. अजून तिखट पाणी हवे असेल तर अर्धा चमचा तिखट त्यात घालून सर्व नीट ढवळा.
साहित्य : पाणीपुरीच्या पुर्या एक पाकीट (सुमारे ५० पुर्या), ३ मोठे उकडलेले बटाटे, दीड वाटी बारीक शेव, दोन कप भरून गोड दही, लाल तिखट २ चहाचे चमचे, मीठ २ चहाचे चमचे, बारीक कापलेला कांदा १ वाटी, धुवून बारीक कापलेली कोथिंबीर, अर्धी वाटी चिंच आणि गूळ यांची गोड चटणी.
कृती : उकडलेले बटाटे सोलून एका ताटात ठेवून बारीक कुस्करा. त्यात १ चमचा मीठ व १ चमचा जिरे पूड घालून ते छान कालवून घ्या. दही घुसमळून त्यात थोडे लाल तिखट व १/२ चमचा मीठ घाला. आता एक प्लेट घेऊन त्यात पाच-सात पुर्या ठेवा. पुर्या वरून हाताने फोडा, त्यात उकडलेल्या बटाटयाचे तुकडे भरा. त्यावर चमच्याने घुसळलेले दही घाला. त्यावर चिंचेची चटणी थोडी थोडी घाला. त्यावर बारीक शेव घाला, त्यावर थोडा कांदा घाला. हवे असल्यास लाल तिखट व किंचित मीठ टाका. सर्वात शेवटी त्यावर कोथिंबीर घाला.
टीप : सगळया प्लेट्स एकदम भरून ठेवू नयेत. पुर्या मऊ पडतात.
साहित्य : साहित्य : दहा वाटया भरून चुरमूरे, तीन मध्यम आकाराचे कांदे, एक मोठा टोमॅटो, मूठभर धुवून चिरलेली कोथिंबीर, अर्धा चमचा मीठ, दोन मुठी खारे दाने, दोन वाटया भरून फरसाण, एक वाटी भरून शेव, अर्धा चमचा जिरेपूड, तिखट आवडत असेल तर हिरवीमिरची आणि पुदिना यांचा मीठ घालून केलेला ठेचा दोन चहाचे चमचे भरून.
कृती : एका स्टीलच्या पातेलीत चुरमूरे घ्या. सुरी वापरता येत नसेल तर कांदे, टोमॅटो, कोथिंबीर सर्व बारीक कापून घ्या नाहीतर आई किंवा ताईकडून कापून घ्या. मूठभर चिरलेला कांदा व थोडी कोथिंबीर बाजूला ठेवून बाकी सर्व चुरमूर्यात घाला. चुरमूर्यात फरसाण, मीठ, जिरेपूड, खारेदाणे, टोमॅटो घाला. हाताने सर्व छान कालवून घ्या. तिखट आवडत असेल तर मिरचीचा ठेचाही त्यात कालवा. प्लेट मध्ये ही कालवलेली भेळ घाला. साधारणत: चार प्लेट गच्च भरून ही भेळ होईल. आता त्यावर मुठीने शेव पेरा. वर थोडा कांदा घाला व शेवटी थोडी कोथिंबीर घाला. फर्मास कोरडी भेळ तयार झाली.
टीप : मिरचीचा ठेचा हाताने कालविल्यास हाताची आग होते. साबणाने हात धुवून टाका. शिवाय तो हात तसाच जर डोळयाला लागला तर डोळयांची खूपच आग होईल हे लक्षात असू द्या.
साहित्य : साहित्य : २ वाटया खमंग भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट, ६-७ चहाचे चमचे भरून पिठी साखर, पाव चमचा वेलदोडा पूङ
कृती : दाण्याचे कूट, साखर व वेलदोडा पूड एकत्र करून घ्या व नीट कालवून घ्या. मुठीने लाडू वळा. दाण्याचे कूट जर खूप भरभरीत असेल तर त्याला किचिंत ओले हात लावून मळा व मुठीने लाडू वळा.
टीप : काहीजणांना साखरेऐवजी गूळ आवडत असेल तर ४-५ चमचे बारीक चिरलेला गूळ घेऊन हाताने तो बारीक करून त्यातले सगळे खडे काढून टाकावेत.