‘ए वेन्सडे’ ते ‘ब्लॅक फ्रायडे’ ते ‘श्री ४२०’ ते ‘दीवार’
अजमल कसाबनं मोजक्याच सहकार्यांनिशी मुंबईवर हल्ला चढवला तो दिवस होता बुधवार आणि मुंबईत दहशतवाद्यांनी पहिल्यांदा बॉम्बस्फोट घडवून आणले तो दिवस होता शुक्रवार.
२६/११ च्या त्या दुर्देवी रात्रीपासून फ्लॅश बॅक पध्दतीनं केलेला हा मुंबईचा गेल्या तीन दशकांचा प्रवास….१९८२ सालातील त्या ऐतिहासिक गिरणीसंपापर्यंत घेऊन जाणारा…तर कधी ‘टाईम मशीन’ मध्ये बसवून थेट पोर्तुगीजांच्या राजकन्येचं इंग्रजांच्या राजाशी १६६१ मध्ये लग्न झालं, तिथपर्यंतची सैर घडवणारा.
गिरणी संपानंतरच्या तीन दशकांत सर्वपक्षीय राजकारण्यांनी साटंलोटं करून ही मुंबई विकायला काढली आणि एकेकाळच्या या देखण्या आणि टुमदार शहराची वाट लागली. आज इथं उभे राहणारे मॉल्स आणि टॉवर्स यांनी तर या महानगराच्या संस्कृतीवरच जीवघेणा हल्ला चढवला आहे. गेल्या तीन दशकात मुंबईत पत्रकार म्हणून वावरताना आलेल्या असंख्य अनुभवांची शिदोरी सोबत घेऊन प्रकाश अकोलकर यांनी केलेला हा प्रवास….
या महानगराच्या र्हासाची कहाणी जिवंतपणे साकार करणारा एक आत्मानुभव. मुंबई ऑन सेल.
कोणतंही शहर शिकायचं म्हणजे केवळ रस्ते आणि इमारतींची नावं माहिती करून घेणं बिलकूलच नसतं. त्या गावातल्या माणसांची नस ओळखता आली तरच ते गाव खर्या अर्थानं लक्षात आलं, असं म्हणावं लागतं. मुंबईतला बेरकी माणूस क्षणात भावविवशही होऊ शकतो आणि दुसर्याच क्षणी पुन्हा ‘गुंतुनी गुंत्यात सारा, पाय माझा मोकळा!’ या पध्दतीने पुढे चालू लागतो.
कोणत्याही नवीन गावात सेटल व्हायला वेळ लागतोच. तुम्ही तुमची सारी मूळं, नातीगोती आणि मुख्य म्हणजे जगण्याचे सारे संदर्भ दूर सारुन, नव्या गावात आलेले असता. मग ते गाव कितीही शांत आणि संथ प्रकृतीचं असो, तुम्हाला त्या जुन्या आठवणींतून बाहेर येऊन नव्या गावात, नवं रोप लावण्यास वेळ हा लागणारच. पण मुंबईचं एक मात्र बरं आहे ! या गावाचा वेग इतका अंगावर येणारा असतो की, तुम्हाला कालपरवाचा काय आजचाही विचार करायला वेळ नसतो. त्यात तुमच्या आवडीचं काम तुमच्या हातात आलं आणि चांगलीचुंगली माणसं तुम्हाला भेटत राहिली की, तुम्ही मनात दडून बसलेल्या त्या जुन्या गावाच्या आठवणींतून बाहेर आपोआपच येऊ लागता आणि नव्या गावाविषयी तुमच्या मनात आस्था आणि जिव्हाळा निर्माण होऊ लागतो.
मुंबई नावाची चीज नेमकी काय आहे आणि या महानगराला ही अशी अवकळा कशामुळे आली, या प्रश्नांची उत्तरं या तीन दशकांच्या प्रवासात मिळत गेली. त्यातूनच हे पुस्तक उभं राहिलं आहे. अर्थात, त्यासाठी झालेला मुंबईचा अभ्यास काही पुस्तकं वाचूनच केला जात असे, असं नाही. अनेकांशी होणार्या चर्चा, वृत्तपत्रांची कात्रणं आणि पाठीशी या महानगरात बातमीदारी करताना आलेले असंख्य अनुभव अशी शिदोरी सोबत घेऊन लिखाण केलं आहे.
– प्रकाश अकोलकर
डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा.
पुस्तक – मुंबई ऑन सेल
लेखक – प्रकाश अकोलकर
प्रकाशक – अमेय प्रकाशन
किंमत – रु.१९२/-