‘मॅरिलीन मन्रो’ या अतिसुंदर अशा हॉलिवुडमधल्या अभिनेत्रीचे बेधडक व वादळी व्यक्तिमत्वावर भारंभार लिखाण झालेलं आहे.
आचार्य अत्रेकन्या मीना देशपांडे यांनी कादंबरीच्या स्वरूपात लिहिलेल्या ‘मॅरिलिन मन्रो’ पुस्तकात मात्र ‘मॅरिलिन मन्रो’ या व्यक्तिखेरीज नाटककार ऑर्थर मिलर, बेसबॉलपटू ज्यो डिमॅजिओ यांच्याही व्यक्तीरेखा साकार होतात.
हॉलिवुडसारख्या पुरूषी साम्राज्या विरूध्द या एकाकी स्त्रीने दिलेला झगडा लेखिकेला अपूर्व वाटला. या मदनिकेच्या जीवनाची, तिच्या असफल प्रेमाची ह्रदयद्रावक कहाणी म्हणजे ओसाड वाळवंटात जन्मलेल्या एकाकी फुलाने वादळवा-याला तोंड देण्याचा केलेला असफल प्रयत्न! मात्र हा प्रयत्न असफल असला, असहाय्य असला तरी जगण्यासाठी केलेली प्रयत्नांची शर्थ खरोखरच असामान्य असते. आयुष्यात यश मिळविण्यासाठी मॅरिलीनने यशस्वी व उत्तम अभिनेत्री होण्याच्या महत्वाकांक्षेच्या पूर्तीसाठी सोसलेल्या मानसिक यातना, शारीरिक तडजोडी, तिचे मातृत्वासाठीचे आसुसलेपण………घर आणि करिअर या दोन समांतर गोष्टी प्राप्त करण्यासाठी तिने केलेली जीवघेणी धडपड…..
सततची वंचना आणि त्याचं शोकांतिकेत झालेलं पर्यवसान ही मॅरिलीन मन्रोची शोकांत्य कहाणी सुविहितपणे कादंबरीच्या स्वरूपात लिहिण्याचं काम लेखिकेने कौशल्याने केलं आहे. मन्रोच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने तिच्या आयुष्याचा आढावा घेतलेली ही कथा उत्तम छायाचित्रे व उत्कृष्ट निर्मिती मूल्य यामुळे वाचकांना मॅरिलीन मन्रो इतकीच भुरळ घालू शकेल.
पुस्तक – मॅरिलीन मन्रो
लेखक – मीना देशपांडे
प्रकाशक – मॅजेस्टिक प्रकाशन
किंमत – रु. ३५० रुपये
टिप : ग्राहकांना कुरियरचा खर्च वेगळा द्यावा लागेल.
मराठी पत्रकारितेच्या जगात अठ्ठेचाळीस उन्हाळे-पावसाळे पाहिलेल्या, वादळ-वारे अंगावर घेतलेल्या, यशाचे मान-सन्मान आणि अपयशाचे तडाखे सोसलेल्या एका पत्रकार-संपादकाच्या जिंदादिल मुशाफिरीची ही कहाणी. जितकी साधी-सोपी सरळ-प्रवाही आणि चित्रात्मक, तितकीच वळणावळणाची आणि थक्क करणारी रसरशीत अनुभवांमध्ये गुंगवून टाकणारी.
दत्ता सराफांची पत्रकारिता स्वातंत्र्योत्तर काळातली. ध्येय-धोरण-उद्दीष्ट अशी त्यांच्या पिढीची वाटचाल. विचारसरणीतील सातत्य आणि पारदर्शकता कटाक्षाने सांभाळली जात होती. समाज हे दैवत आणि आपण त्याचे पाईक अशी धारणी होता. पत्रकारितेची दिंडी पोटार्थी नव्हती. अशा दिंडीतले दत्ता सराफ हे एक बुध्दीवादी वारकरी. त्यांनी जे पाहिले, अनुभवले, स्विकारले, निभावले, साजरे केले आणि सोसले तेच शब्दशब्द केले. जे नाकारले आणि त्या नकाराकरता लढले, त्यातील मोजकेच सांगीतले. मात्र जे जे लिहिले, ते ते सत्याचे आणि वास्तवतेचे भान राखूनच लिहिले.
तडजोड करणे, जमवून घेणे, काणाडोळा करणे अशा अवगुणांनी उभा दावा असलेल्या माणसांना ‘सत्य’ भेटले. ते आरपार…पारदर्शी…नग्नसुध्दा. सराफांनाही ते भेटले. प्रत्येकवेळी त्यांनी डोळयाला डोळा भिडवला. अशी नजरानजर होते; तेव्हा ठिणग्या पडतातच, पडल्याही. काही वेळा समोरची माणसे पोळली. कधी सराफांचेही हात भाजले. ताठपणाची, कणखर बाण्याची किंमत चुकवावी लागली.
तलवार उपसण्याचे प्रसंग अनेकदा आले. घाव घालण्याची सराफांना खुमखुमी नव्हती, तरीही आलेले घाव परतवताना त्यांना दोन हात करावेच लागले. मात्र ते कधीही घाव मोजत बसले नाहीत. जखमा कुरवाळल्या नाहीत.
सराफांनी जेव्हा पत्रकारितेत प्रवेश केला, तेव्हा झिजलेला टाईप, ओळखून न येणारे ब्लॉक्स आणि ताशी दोन-तीन हजारांच्या वेगाने (?) पळणारी खटारा मशिन्स होती. ‘प्रेस’मध्ये काम करणाऱ्यांच्या कपडयांना शाईचे काळे डाग हे एक आभूषण होते. तांत्रिक-यांत्रिकदृष्टया आताच्या तुलनेत ‘प्रेस’ मागास वर्गातच जमा होता. तो जमाना पालटला. संगणकाच्या युगात कपडयांवर डाग पडण्याचा प्रश्नच नाही खटारे गायब झाले. प्रचंड वेगाने पळणारी मशिन्स अस्तित्वात आली. इंटरनेट एडिशन्स सुरू झाल्या ई-पेपर जन्माला आला. ‘पेपरलेस पेपर’ अशी संकल्पना साकारली. दत्ता सराफ या दोन्ही जमान्यात सराईतपणे वावरले. त्याच्या पाऊलखुणा ‘ऐवजमध्ये’ उमटल्या आहेत.
सराफ म्हणतात, पत्रकारितेतल्या पूर्वसुरींनी घरचे खाऊन, अनेकदा उपाशी पोटीसुध्दा लष्कराच्या भाकरी भाजल्या. आता जमाना पालटला. श्रीमंती वाढली, पण मूल्यांचे काय? ‘धर्माचा’ व्यवसाय झाला. पण ‘व्यवसायाचा’ ‘धंदा’ का व्हावा? ही घसरण त्यांच्या नजरेसमोर झाली. व्यवसायात आलेल्या नव्या पिढीचे पाय दलदलीत रुतताना त्यांनी पाहिले. ध्येयवाद छाटला गेला. पंख कापले गेले. स्वार्थापायी अनेकांनी आपल्या कण्याच्या धनुकल्या बनवल्या. ठिकठिकाणी ‘दुकाने’ थाटली गेली. आताची पत्रकारिता आधुनिक कॅमेऱ्यांचे तीक्ष्ण डोळे लावून बंद खोलीतील बिछान्यात घुसलेली पाहताना सराफ विषण्ण होतात.
ऐवजमध्ये दुसरे जागतिक महायुध्द, बेचाळीसचा स्वातंत्र्यलढा, रेशनिंगचे तडाखे, येरवाडा सेंट्रल प्रिझनमधील अनोखे अनुभव, फाशीची थरारक रात्र, मराठीतील पहिली क्रिकेट कॉमेंटरी, लिंगवाद-स्फुल्लिंगवाद, तीन महिलांचा निषेध मोर्चा, गुजराथचा संघर्ष, बिहारचे आंदोलन, गोव्यातील ‘बजेट क्रिकेटचा’ प्रकरण एका खुनाला वाचा फोडण्यासाठी, लालबी नावाच्या वेश्येचा केलेला पाठलाग असे अनेक रोमांचकारी प्रसंग आणि घटना आहेत. थोडक्यात काय, तर पुस्तकाचा ‘स्पॅन’ विलक्षण आहे. आणि लेखकाचा आवाका जबरदस्त आहे. लेखनशैलीमध्ये गारूड आहे. ते वाचकाला झपाटूनच टाकते. या व्यावसायिक आत्मकथेमध्ये कादंबरीची पकड आहे. म्हणूनच पुस्तक हातात घेतल्यावर; एका बैठकीत ते संपवून खाली ठेवले जाते. लेखकाला आणि वाचकाला याहून आणखी काय हवे असते?
पुस्तक – ऐवज – एक व्यवसायिक आत्मकथा
लेखक – दत्ता सराफ
प्रकशक – राजहंस प्रकाशन, पुणे
किंमत – रु. १७५ रुपये
टिप : ग्राहकांना कुरियरचा खर्च वेगळा द्यावा लागेल.