प्रभा मनोहर, प्रा. मालती देसाई, तेजस्विनी शिरोडकर, सुवर्णा मर्चंट, डॉ. मीरा सुंदरराज, डॉ. रामचंद्र वि काळे, राहुल सुदामे, विनोद केंजळे, सविता यादव या नवकवींच्या काव्यसुमनांनी हा काव्यसंग्रह फुलला आहे.
शब्दवैभव साहित्यप्रेमी मंडळाच्या माध्यमातून ज्येष्ठ कवी डॉ. शंतनू चिधडे यांच्या सहकार्याने डॉ. स्नेहल तावरे यांच्या स्नेहवर्धन प्रकाशनातर्फे ‘कळीचे फूल होताना’ या सातव्या प्रातिनिधीक कविता संग्रहाचे जेष्ठ साहित्यिक मा. श्री. दीक्षित यांच्या हस्ते व ग. ना. जोगळेकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
शब्दवैभव साहित्यप्रेमी मंडळाच्या अथक वाटचालीतला हा सातवा प्रातिनिधीक काव्यसंग्रह. चांदण्यांची अक्षरे शोधत जाताना वाटेत कोवळे ऋतू भेटले, फुलांच्या गंध कोषातून शब्द वेचताना अनोखा बहर आला, मनाला रसरंगाचे आभास होऊ लागले. प्रवाहातल्या काही पक्ष्यांनी सुरेल गाऊन मन:पूर्वक साथ दिली.
आता थांबूच नये असे वाटले… रसिकहो, या वाटचालीत लक्षात आले की, अजूनही काही कळया पानाआड दडल्या आहेत… उमलू पाहत आहेत.. पूर्ण विकसित होण्यासाठी आसुसलेल्या आहेत..! अशाच उमलू पाहणाऱ्या नऊ कवींनी गुंफलेला हा शब्द बहर… समईतल्या शुभ्र ज्योतींप्रमाणे प्रसन्नचित्त शब्दकळा लाभलेली ही निर्मिती रसिकांचा ‘आंतर अग्नि’ क्षणभर नक्कीच फुलवील यात शंकाच नाही.
कळयांची फुले होताहेत… फार काळ थांबायला नकोच…!
या काव्य संग्रहातील कविंच्या भावना तीक्ष्ण आहेत. त्यात तरलता, कल्पना यासोबत व्यवहारात सामोऱ्या येणाऱ्या जीवनातील अनुभवांचे काव्यात्म दर्शन आहे. स्त्रियांचे प्रश्न, सामाजिक घटना व त्याची मिमंसा, व्यक्तीगत, सांसारिक अनुभव यांनी या कविता समृध्द आहेत.
पुस्तक – कळीचे फूल होताना
लेखक – डॉ. शंतनू चिंधडे
प्रकाशक – स्नेहवर्धन प्रकाशन
किंमत – रु. ८० रुपये
टिप : ग्राहकांना कुरियरचा खर्च वेगळा द्यावा लागेल.
अमेरिकेत ‘मराठी माणूस’ ही काही आता अप्रुपाची गोष्ट राहिलेली नाही. १८२० साली पहिल्या भारतीयानं अमेरिकेच्या भूमीत आपलं पाऊल रोवलं आणि आज, चोहोबाजूंनी फैलावलेला डेरेदार वृक्ष असावा, तसा भारतीय समाज अमेरिकेच्या भूमीत अंगोपांगी बहरुन उभा आहे. साधारण १९६० च्या दशकात मराठी माणसांचे अस्तित्त्व जाणवू लागले. तर १९९० मध्ये संगणक युग अवतरतांच हा ओघ प्रचंड वाढला आणि आता तर उच्चशिक्षित कुटुंबातला मुलगा किंवा मुलगी अमेरिकेत असल्याचे आश्चर्य वाटत नाही.
मराठी माणसाचे हे शारिरीक, मानसिक, भावनिक, सांस्कृतीक पातळीवरचे स्थलांतर ‘ही आपलीच माणसं !’ ह्या पुस्तकात सौ. मंगला खाडिलकर आणि श्री गजानन सबनीस ह्यांनी अत्यंत सूक्ष्म आणि रंजकपणे टिपले आहे. पुर्वेकडून पश्चिमेपर्यंत अमेरिकेतल्या अनेक शहरांना भेटी देऊन, मराठी मंडळांना संपर्क साधून अमेरिकन मराठी माणसांचे प्रश्न, आव्हान, मतमतांतर ह्या दोघांनी परिश्रम पूर्वक जाणून घेतली. पहिल्या पीढीतले विनायक गोखले आवर्जून कबूल करतात, ‘ आमच्या पीढीने मुलांना लहानपणापासून अक्षरओळख व्हावी, आकर्षित करणारा अभ्यासक्रम असावा किंवा घरी-दारी न लाजता अस्खलित मराठी बोलली जावी असे आवर्जून प्रयत्न फार कमी केले. आता पुढच्या पिढयांमध्ये मराठी टिकायला हवी असं वाटत असेल तर ठोस पावलं उचलावी लागतील’.
‘ही आपलीच माणसं !’ ह्या मध्ये तरुण पीढीलाही समाविष्ट करुन घेण्यात आले आले ‘ए. बी. सी. डी.’ (अमेरिकन. बॉर्न. कॉन्फीडन्ट. देसी.) म्हणून संबोधली जाणाऱ्या ह्या पीढीने अत्यंत व्यापक आणि मोकळा दृष्टीकोन मांडला आहे. मराठी संस्कृतीवर त्यांचे प्रेम आहेच पण म्हणून त्याच्या बेडया मात्र बहूतांशी मूलांना नको आहेत. आपलं इंडियन अमेरिकन असणं, काहीसं गोंधळलेलं बालपण, वर्तमान आणि स्वप्न, तसंच आईवडिल ह्यांच्या बरोबर असणारे संवाद – विसंवादचे मुद्दे, त्यांच्या आणि इतर अमेरिकन मुलांमधला फरक ह्या सगळया मुद्दयांवर तरुण पीढी मोकळेपणाने बोलली आहे.
जुन्या आणि नव्या पीढीचे विचार, मतं, त्यांना आलेले अनुभव अत्यंत रंजक आहेत. त्यामुळे हे पुस्तक अत्यंत वाचनीय झाले आहे.
पुस्तक – ही आपलीच माणसं !
लेखक – मंगला खाडिलकर, गजानन सबनीस
प्रकशक – ग्रंथाली मुद्रण सुविधा केंद्र, मुंबई
किंमत – रु. २५०
टिप : ग्राहकांना कुरियरचा खर्च वेगळा द्यावा लागेल.