आमटीचे प्रकार

कैरीचे सार

kairi-saar साहित्य – १ मोठी उकडलेली कैरी, १ मध्यम नारळाचे दूध, २ चमचे तांदूळाचे पीठ, २ टेबलस्पून साखर, ४-५ हिरव्या मिरच्या, मीठ, कोथिंबीर, कडीलिंब.

कृती – उकडलेल्या कैरीत पाणी घालून सारखे करावे. थोडया पाण्यात तांदळाचे पीठ कालवून ते ओतावे. नंतर त्यात नारळाचे दूध, वाटलेल्या मिरच्या, मीठ व साखर घालावी. नंतर चांगली उकळी आणावी. पळीभर तेलाची हिंग-मोहरी घालून फोडणी करावी व साराला द्यावी.

पालक सूप

palak-soup साहित्य – १ पालक जुडी, १ मोठा कांदा, लसूण ५-६ पाकळया, तूप२ चमचे, कॉर्न फ्लॉवर २ छोटे चमचे, मीठ चवी पुरते, आर्धा कप पाणी.

कृती – पालक विनडून धुऊन ठेवावा. निथळल्यानंतर तो चिरून घ्यावा. ण्का पातेल्यात एक चमचा तूप टाकून ते गरम झाल्यावर त्यात चिरलेला कांदा व लसूण परतावे, यावर चिरलेला पालक टाकावा. थोडा परतून गॅस बंद करावा. थंड झाल्यावर सर्व मिक्सरमध्ये टाकून त्याची पातळ पेस्ट करावी. कडईत उरलेलं तूप गरम करून त्यात कॉर्न फ्लॉवर भाजून घ्यावं. नंतर त्यात आर्धा कप पाणी घालावे. त्याची आपोआप घट्टसर पेस्ट तयार होते. त्यात वरून पालकाची पेस्ट घालावी. दोन्ही व्यवस्थित एकत्र ढवळून चांगली उकळी येईपर्यंत शिजवावे व गरम गरमच प्यावे.

टोमॅटोचे सार

tomato-saar साहित्य – ५०० ग्रॅम टोमॅटो, १ मध्यम नारळ, ५-६ हिरव्या मिरच्या, १ इंच आले, मीठ, साखर, तुपाची हिंग व जिरे फोडणी.

कृती – टोमॅटो स्वच्छ धुऊन फोडी कराव्यात. नंतर टोमॅटो शिजवून घ्यावेत. ते शिजले की पुरणयंत्रात काढून घ्यावेत. नंतर टोमॅटोचा रस, नारळाचे दूध, वाटलेल्या मिरच्या व आले, मीठ, साखर सर्व एकत्र करावे. चांगली उकळी आणावी. वाटल्यास थोडे पाणी घालावे नंतर हिंग-जिरे घालून तुपाची फोडणी दयावी. नारळाच्या दुधाऐवजी ३ वाटया ताक घालूनही हे सारं चांगले लागते. ताक वापरल्यास ताकाला थोडे डाळीचे पीठ लावावे, म्हणजे ताक फुटत नाही.

मक्याचे सार

corn-soup साहित्य – मक्याचे कणीस ६, आमसुले ४-५, किसलेलं आलं पाव इंच, हिरव्या मिरच्या २, मीठ, जिरे, चवीपुरती साखर.

कृती – मक्याच्या कोवळया कणसाचे दाणे काढावे व वाफेवर शिजवून घ्यावे. मिक्सरवर वाटून चाळणीने गाळून घ्यावे. आमसुले अर्धातास भिजत घालावीत. नंतर हलक्या हाताने चोळून मग पाण्यातून बाहेर काढावीत. आमसुलाचे पाणी व मक्याचा रस, मीठ, साखर, किसलेलं आलं सर्व एकत्र करावे. तुपावर हिंग, जिरे मिरचीची फोडणी करून साराला द्यावी. भातावर किंवा नुसतं प्यायला चवदार लागतं.

कढी

साहित्य – ८-१० वाटया बेताचे आंबट ताक, लाल मिरच्या, आल्याचा तुकडा, २ टेबलस्पून डाळीचे पीठ, मीठ, सूपारी एवढा गूळ, २-३ लंवगा, १ दालचिनीचा तुकडा, १ चमचा मोहरी.

कृती – मिरच्या, आले, मोहरी, लवंग, दालचिनी हे पदार्थ वाटून घ्यावेत व ताकात घालावे. गूळ व मीठ घालून कढीला उकळी आणावी. थोडे कडिलिंब व कोथिंबीर घालावी. नंतर हिंग, जिरे व ५-६ लाल मिरच्या घालून तुपाची फोडणी द्यावी. हि कढी दाट असते.

सोलकढी

solkadhi साहित्य -१०-१५ आमसुले, १/२ नारळाचे दूध, मीठ, तिखट, साखर, थोडे वाटलेले जिरे.

कृती – ४ कप पाण्याला उकळी आणावी व त्यात आमसुले तासभर भिजत घालावीत. नारळाचे दूध काढावे. आमसुले भिजत घातलेले पाणी गार झाले की त्यातून आमसुले काढून टाकावीत, त्यात नारळाचे दुध, मीठ, साखर, अगदी थोडे तिखट व वाटलेले जिरे घालावीत, वरून हिंग-जिरे घालून तुपाची फोडणी द्यावी. हे सार पुन्हा गॅसवर ठेवून गरम करायचे नाही.

ओसामण

osaman साहित्य – १ वाटी तुरीच्या डाळीचे घट्ट वरण, ५-६ आमसुले, मीठ, गूळ, लवंग, दालचिनी, जिरे, कोथिंबीर, कडीलिंब, आल्याचा तुकडा, ३-४ हिरव्या मिरच्या.

कृती – वरणात पाणी घालून सारखे करावे. हिंग, जिरे, घालून तुपाची फोडणी करावी. फोडणीत मिरच्यांचे तुकडे व कडीलिंब घालावा. त्यावर वरील वरणाचे पाणी घालावे. मीठ व गूळ घालावा. लवंग, दालचिनी, जिरे व आले वाटून घालावे. थोडा काळा मसाला घालावा. चांगले उकळले की उतरवावे. वरून थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी.