हाफ कट् हाफ ड्राइव्ह

half-cut रोजचे दैनंदिन व्यवहार पार पाडतांना नकळत आपण हसणे विसरून जातो. अजू देशपांडे ह्यांचे ‘हाफ कट् हाफ ड्राइव्ह’ हे पुस्तक चेहऱ्यावर हास्य फुलवेल हे नक्की. देशपांडे ह्यांचे विनोद हे बिलो द बेल्ट नसून रोजच्या जीवनातले हलके फुलके विनोद आहेत. उदाहरणच द्यायचे झाले तर- मानव जातीत जन्मलेल्या मनुष्य प्राण्याचे सुदृढ जीवन दोन गोष्टींवर नितांत अवलंबून आहे.

ऑक्सिजन व हायड्रोजन नव्हे,
अन्न आणि वस्त्र नव्हे,
टिव्ही किंवा एफ एम नव्हे किंवा वीज आणि पाणी नव्हे,
थकलात? लास्ट चान्स!
पैसा आणि प्रसिध्दी म्हणाल तर हरलात!
वेडयांनो, सोपे उत्तर!
बायको आणि बॉस
(इन दॅट ऑर्डर ओन्ली)

आइस्क्रीम हा प्रकार,
बच्चनच्या ऍक्टिंगसारखा आणि बटाटयाच्या भाजीसारखा !
कितीही बिघडवायचा प्रयत्न केला तरी
बेचव न होणारा!
हे जगातले एकमेव ‘गोड’ सत्य आहे.

बाप जर नाणावलेला आणि पैसेवाला असता तर जॉनी लिवरसुध्दा हिरो बनला असता आणि तुम्ही-आम्ही त्याचे चित्रपट बघण्यासाठी रांगा लावल्या असत्या! त्यातल्या त्यात प्रेक्षकांचे सुदैव म्हणायचे तर भारत भूषण, प्रदीपकुमार वैगरेंचे पुत्र जवळपास कोठेही दिसत नाहीयेत!

चित्रपट आणि देशपांडे ह्यांचे क्रिकेटप्रेम त्यांच्या लेखांतून (शिर्षकासह) जाणवते. चित्रपट, जाहिराती, टेलीव्हिजन, खाद्यजीवन इ. माध्यमाच्या विषयांचे लेख तुम्हाला नक्कीच हसवतील. लेखकाचा ताजेपणा आणि वेगळी लेखन शैली आपल्याला सतत जाणवते. लेखनाबरोबर श्रीनिवास प्रभूदेसाईंची व्यंगचित्रे पुस्तकाची लज्जत वाढवतात.

‘माणसांनी हसावे व हसवावे’ हे अजू देशपांडे ह्यांच्या जगण्याचे आणि लेखनाचे सूत्र आहे. ‘हाफ कट् हाफ ड्राइव्ह’ हे वाचकांच्या चेह-यावर हसू फुलवेल ह्यात शंकाच नाही.

पुस्तकहाफ कट् हाफ ड्राइव्ह
लेखक – अजू देशपांडे
प्रकाशक – संकेत प्रकाशन
किंमत – रु. १०० रुपये
टिप : ग्राहकांना कुरियरचा खर्च वेगळा द्यावा लागेल.

॥ परिसा रामायण ॥

ramayan भारत देश प्राचीन कालापासून सांस्कृतिक दृष्टया एकात्म राष्ट्र आहे. हे स्पष्ट करणारे एक प्रमाण आहे. संपूर्ण भारतात शेकडो वर्षे प्रचलित असलेली रामकथा. वाल्मिकी ऋषींनी लिहिलेल्या रामायणाचे विविध भाषांमध्ये कथन झालेले आहे. हजारो वर्षांच्या या कालखंडात या मुळ कथेत त्यामुळे अनेक कल्पित भागही झालेले आहेत.

उदाहरणार्थ, मुळात वाल्मीकीने सीता स्वयंवरात रावणाच्या छाताडावर धनुष्य पडले व त्याची फजिती झाली असे सांगितलेले नाही किंवा सीतेचे रक्षण करणारी तथाकथित लक्ष्मणरेषा देखील वाल्मिकी रामायणात नाही. परंतू या अनेक प्रसंगांची लोकमानसातली प्रतिमा इतकी दृढ आहे की रामकथेचे कथन जेव्हा ज्या कोणत्या माध्यमातून केले जाते, तेव्हा यासारख्या अनेक प्रसंगांना तिथे स्थान मिळतेच.

अर्थात अशा प्रसंगांची इतिहासदृष्टया चिकित्सा करीत न बसता त्यातून व्यक्त होणारा नैतिक, सामाजिक व सांस्कृतिक आशय किती समर्थपणे व्यक्त होत आहे वाचक श्रोते वा प्रेक्षक यांच्या मनबुध्दीपर्यंत तो किती प्रमाणात पोहचतो आहे, हेच ही कथा सादर होताना पाहावयाचे असते.

रामायण कथा ही आजवर लोकांसमोर विविध प्रकारे सादर केलेली आहे. सौ. राधिका राजपाठक यांनी नृत्य, नाटय, संगीतिका हे अत्यंत मनोरंजक दृश्य माध्यम सादरीकरणासाठी निवडले आहे. या माध्यमाचे सामर्थ्य आहे ते प्रेक्षकांची दृष्टी, त्यांचे कान आणि त्याद्वारे त्यांची मने देखील या माध्यमाने सहज आकृष्ट होऊ शकतात. त्यामुळे रामकथा निवेदनाचा संस्कार अधिक काळ टिकणारा ठरतो. यातच राधिका राजपाठक यांच्या कलाकृतीचे यशही सामावलेले आहे. सुमारे पंचवीस वर्षापूर्वी त्यांनी या संगीतिकेचे लेखन केले, तिचे अनेक प्रयोगही झाले, आता ती मुद्रित स्वरूपात प्राप्त होत असल्याने अनेकांना दिर्घकाळ पर्यंत तिचा लाभ घेता येईल.

या लेखनाचे एक वैशिष्टय आहे की यातील प्रत्येक प्रसंग स्वतंत्रपणे प्रयोगक्षम आहे. त्यामुळे वेळेचे नियोजन करण्याच्या दृष्टीने विशेषत: शाळा-कॉलेजातील विद्यार्थ्यांना यातील काही प्रसंगांचेही रंगभूमीवर सुटे सुटें प्रयोग करता येतील. अर्थात संपूर्ण नृत्यनाटिका एकाचवेळी सादर करता आली तर उत्तमच…! रामकथेतले वेगळेच प्रसंग यात दिलेले आहेत, भले पात्र नाही, सीतास्वयंवर प्रसंगातून या कथानास प्रारंभ होतो. कैकेयीचा क्रोध, मंथरेचे तिला मार्गदर्शन, दशरथा जवळ कैकेयीची दोन वरांची मागणी-असा क्रम साधीत ही कथा शेवटी सीतात्यागा पाशीच नाटय मनाला भिडणारे आहे.

हे लेखन करीत असतांना श्रीमती. राजपाठकांनी काही नव्या कल्पना प्रसृत केल्या आहेत. त्याचा उल्लेख घ्यायला हवा. मूळ रामायण कथेत जटायूपक्षाला रावण घायाळ करतो, इथे या नाटिकेत जटायूच्या जागी एक मोर आहे आणि तो सीतेच्या अंगणात हिंडणारा, तिचा परिचित, तिच्याशी लपंडाव खेळणारा व तिला चिडवणारा! किंवा रावण सीतेला उचलून नेत असतांना त्याच्या मनातला जो विचार आहे तो स्वयंवराच्या वेळी फजितीला हसलेल्या सीतेचा सूड घेण्याचा! ही कल्पना मयसभेत फजिती पावणारा दुर्योधनाला हसणाऱ्या द्रौपदीवरून त्यांना सुचलेली दिसते… रामायणाच्या मूळ कथेत कवयत्रि आपल्या प्रतिभेने कशी नूतनता आणू शकली याचे एक उदाहरण आहे.

केवळ काव्य वा दृष्टीनेही एक उत्कृष्ट रचना म्हणून या संगीतिकेचे वर्णन करावे लागेल. तिचा प्रयोग नृत्यविशारद संगीतज्ज्ञांनी केला तर तो श्रुतिमधुर, दृष्टीसुख देणारा तर होईलच, पण त्यातील आशयामुळे मनोरंजकही ठरेल. असे प्रयोग या संगीतिकेचे झालेले आहेत, या पुढेही होवोत ही सदिच्छा!

– म. बा. कुलकर्णी

पुस्तक॥ परिसा रामायण ॥
लेखक – श्रीमती राधिका राजपाठक
प्रकशक – पंचम प्रकाशन, नाशिक
किंमत – रु. १००
टिप : ग्राहकांना कुरियरचा खर्च वेगळा द्यावा लागेल.