गो डिगो गो हा डोराचा चुलत भाऊ. तिच्या सारखाच मस्ती करणारा आणि साहसी. गो डिगो गो आहे आठ वर्षांचाच पण तो कायम जंगलातल्या प्राण्यांना वाचवत असतो. जंगलातल्या प्रण्यांवर त्याचे प्रचंड प्रेम असते. त्यांना वाचवण्यासाठी तो अगदी जीवावर उदार व्हायलाही तयार असतो. त्याच्या साथीला क्लिक नावाचा कॅमेरा असतो जो गो डिगो गो ला संकटात सापडलेल्या प्राण्यांना सापडायला मदत करतो. गो डिगो गो ची मोठी बहिण ऍलिशीया अकरा वर्षांची असते. ऍलिशीयाला संगणक खूप आवडत असतो. तिने असा प्रोग्रॅम तयार केला असतो की संगणकाद्वारे तिला प्राण्यांचे आवाज, अडचणी समजून घेता येतात. त्यामुळे गो डिगो गो ला तिची खूपच मदत होते. तुम्ही गो डिगो गोला निक ज्यूनियरवर भेटायला विसरु नका कारण गो डिगो गो आणि ऍलिशीया एक प्रकारे पर्यावरणाचा समतोल राखायला मदत करतात. गो डिगो गोची वेबसाईटही धमाल आहे.
निकज्युनिअर वरचा बालवाडीच्या मुलांचा आवडता कार्यक्रम म्हणजे ‘ किपर ‘. किपर हा कुत्रा असून त्याचा मित्र आहे टायगर, स्कॉटी कुत्रा, पिग एक डुक्कर, आणि पिगचा भाचा अरनॉल्ड. किपरचे आवडते खेळणे आहे झेबरा. किपरच्या पुस्तकांत आणि टिव्ही मालिकांत रोज घडणारे छोटे छोटे प्रसंग चित्रित केले आहेत. किपरचे जनक आहेत माईक इंकपेन. त्यांनी २००५ साली किपरच्या ३४ गोष्टी लिहील्या. अल्पावधीतच पुस्तकांच्या ८ कोटी प्रती विकल्या गेल्या. पुस्तकावर आधारीत मालिकेला सुध्दा उत्फूर्त प्रतिसाद मिळाला. मालिकेला अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले गेले. त्यात ‘बाफटा’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कारही समाविष्ट आहे. किपरचे थीम सॉंग आहे ‘ किपर नामका डॉग, डॉगी जो पहेने स्लिपर, प्यारा डॉग, क्यूटी डॉग ‘ किपर बरोबर धमाल करायची असल्यास http://www.hitentertainment.com/kipper वेबसाईटला जरुर भेट द्या.
डोरा द एक्सप्लोर्र हे निक चॅनलवरचे बालवाडीतल्या मुलांसाठीचे लोकप्रिय तसेच शैक्षणिक कार्टून. अमेरिकेत प्रथम प्रसारित झालेले हे कार्टून नंतर सा-या जगभरात दाखवले गेले. डोराचे निर्माते आहेत क्रिस गिर्फोड, वॅलरी वॉल्श आणि एरिक वीनर. डोरा लवकरच अत्यंत लोकप्रिय झाले आणि अवघ्या काही दिवसात $3 अब्ज डॉलरचा व्यवसाय केला. स्पॅनिश मध्ये ‘ एक्सप्लोराडोरा ‘ चा अर्थ ‘ फिमेल एक्सप्लोर्र ‘ म्हणजे स्त्री संशोधक. ह्या शब्दावरुनच कार्टूनला नाव डोरा देण्यात आले. प्रत्येक भागात डोरा काहीतरी नवीन शोधात असते किंवा कोणाला मदत तरी करत असते. सर्वात प्रथम, मोहिमेवर जाण्याआधी ती आवश्यक वस्तू शोधते आणि प्रत्येक काम तीन टप्प्यांमध्ये पूर्ण करते. प्रत्येक वेळेला ती प्रेक्षकांना म्हणजेच बालदोस्तांना अनेक प्रश्न विचारते, त्यांची मदत मागते त्यामुळे बच्चे कंपनी अगदी तल्लीन होऊन हा कार्यक्रम बघतात.
डोराचा बेस्ट फ्रेंड आहे बुट्स माकड. त्या दोघांना बेसबॉल आणि सॉकर खेळायला खुप आवडते. डोरा बरोबर असतात तिचे आई-बाबा, आजी, आणि भावंड. ह्या कार्टून मधली महत्त्वाची पात्र आहेत बुट्स, डिगो, स्वायपर( कोल्हा). डोराच्या सर्व भागात निसर्ग, भाषा, गणित तुम्हाला शिकता येते. तर मग डोराचा एकही एपिसोड चुकवत जाऊ नका. डोराची वेबसाईट आहे – http://www.nickjr.com/shows/dora/index.jhtml जरुर पहा.
हंगामा चॅनलवर लोकप्रिय असणारा डोरेमॉन नोबेता बरोबर तुमचाही लाडका आहे नां ? नोबेता कोण ? अहो, नोबी नोबेता हा आळशी, ढेपाळलेला आणि (त्याच्या म्हण्यानुसार) कमनशिबी मुलगा आहे. डोरेमॉन हा रोबोट मांजर नोबेताला कायम मदत करतो. डोरेमॉनकडे अनेक प्रकारची गॅजेट असतात ज्याने तो नोबेताला शाळेत, मित्रांमध्ये, बागेत अगदी वाटेल तिथे मदत करत असतो. कधी तर माहिती आहे तो नोबेताला स्पेसशीप असणा-या भविष्यात घेऊन जातो तर कधी डायनासोर असणार-या भूतकाळात ! पण डोरेमॉनला सुध्दा कधीकधी काही गोष्टी जमत नाहीत त्यावेळेला नोबेता त्याला मदत करतो. मूळचे जपानचे असणारे हे कार्टून आता भारतातील मुलांनाही आवडायला लागले आहे. हंगामा चॅनलवर डोरेमॉनची ‘मायक्रो’ साईट आहे. http://www.thoiaotrang.com/kids/doremon.html ही तर जपानी भाषेतली साईट आहे. वाचता येतेय का बघा.