देवता

devta सकाळी नऊचा सुमार, ऑफिसला जाणार्‍यांची एकच गर्दी. दिल्लीचा प्रमुख मार्ग गाडया भरधाव धावत होत्या. त्याच गर्दीत मीटिंगला जाण्याची घाई असलेल्या रमेश शर्मांनी आपल्या गाडीचा वेग वाढवला. एका चौकातून भरधाव गाडी धावत असताना एका मोटारवाल्याची धडक गाडीला बसली. शर्माजी दूर फेकले गेले. पायाला जबर दुखापत झालेली. प्रत्येक जण आपल्या कामाच्या गर्दीत होता त्यामुळे कुणालाच थांबायला वेळ नव्हता. हळूहळू शर्मांजींची शुध्द हरपली व ते रक्ताच्या थारोळया तसेच पडले.

अचानक तिथे एक गाडी थांबली व गाडीतून बाई खाली उतरल्या. त्यांनी शर्मांना त्या अवस्थेत पाहिले. ड्राव्हरला ताबडतोब त्यांना उचलुन गाडीत घालण्यास सांगितले. गाडी मोठया दवाखन्यापाशी येऊन थांबवली. ताबडतोब उपचार सुरू झाले. शर्मांजींचे प्राण वाचले. शर्माजी शुध्दीवर आले ‘माझ्या फाईल्स’ ते घाबरले होते. प्रेमळ आवाजात कुणीतरी म्हणाले तुमच्या फाईल्स सुरक्षित आहेत. मिटिंगच्या ठिकाणीही कळवायला हवं फोन नंबर सांगा. ‘माझी फारच महत्त्वाची मिटिंग होती. कागदपत्र वेळेवर पोचायला हवी होती. मी कुठे आहे ? मला काय झालंय ? आपण कोण आहात शर्माजी अडखळत कष्टाने बोलत होते. तत्परतेने बाईंनी सगळी व्यवथा केली. घरचा पत्ता विचारला नातेवाईकांना कळवले. आता शर्माजी बरेच सावरले होते. अपघाताची जाणीव झाली होती. वेदना होतच होत्या तशातच ते म्हणाले ‘देवासारखी मदत करणार्‍या आपण आहांत तरी कोण ? आपले उपकार मी विसरू शकणार नाही’.

‘त्यात काय माणसाने माणसाला मदत करायलाच हवी. मानवता हाच खरा धर्म’, पण हाच धर्म इतर पाळत नाहीत’, बाई उत्तरल्या. ‘पृथ्वीवर देखील देवता फिरतात ह्याची आज मला प्रचिती आली. सांगा तर तुमचं नांव’, काकुळतील येऊन शर्माजी बोलले. माझं नांव, ‘ललिता शास्त्री’ शांतपणे बाई उद्गारल्या. शर्माजी आश्चर्यचकीत होऊन म्हणाले, ‘काय ? ललिता देवी ? तुम्ही माझ्यासाठी एवढं केलंत’. (त्यावेळेच्या) भारताच्या पंतप्रधान श्री लालबहादूर शास्त्री ह्यांच्या पत्नी. शर्माजींना वाटले ह्या जणू, कणभरही अहंकार नसलेली शांत देवता.

– विनया साठे

सदशिष्य

एकदा गुरुजी यात्रेसाठी जायला निघाले. त्यांचे हर्षल व गौतम नावाचे दोन शिष्य होते. जातांना त्यांनी दोघांनाही पाच पाच चणे दिले व ते जपून ठेवण्यास सांगितले व गुरुजी यात्रेला निघून गेले. हर्षलने ते चणे व्यवस्थित कागदाच्या पुडीत बांधून डबीत ठेवले. गौतमने ते चणे घेतले व तुळशी वृंदावनात टाकुन दिले. हर्षल रोज गुरुजींनी दिलेले चणे नीट आहेत की नाहीत बघून त्यांची पुजा करत असे. गौतम मात्र जेथे चणे टाकले होते नित्य नियमाने पाणी देत असे. सात आठ दिवसांत तुळशी वृंदावनात चण्यांची छान रोपं झाली. दिवसागणीक रोपं वाढली व त्याल चणे लागले. गौतमने ते चणे काढले व दुसर्‍या मोठया कुंडीत टाकले. नित्य नियमाने तो रोपांना पाणी टाकत असे व त्यांची काळजी घेत असे. आता ह्या वेळेला चणे बरेच निघाले. गौतमने ते चणे काढून पुन्हा शेतात टाकले. हळूहळू करता करता पाच चण्यांचे पोतंभर चणे झाले. एक दोन वर्षाने गुरुजी परत आले. दिलेल्या चण्यांबद्दल विचारले. हर्षलने पुजेत ठेवलेली चण्याची डबी उघडली व चणे गुरुजींच्या हातावर ठेवले. गौतमने पोतं आणून गुरुजींच्या पुढे ठेवलं, गुरुजी खुष झाले. गुरूजी हर्षलला म्हणाले ‘जपून ठेवण्याचा खरा अर्थ गौतमला उमगला. तु मात्र नुसतीच पुजा करत राहिलास आतले चणे किड लागून खराब ही झाले असतील’.

तात्पर्य : बुध्दिचा वापर केला तर जीवनात यशस्वी होता येते.

– सुमती निगुडकर

कावळा – चिमणीची गोष्ट

एक होती चिमणी आणि एक होता कावळा. चिमणीचं घर होत मेणाच, छोटंस आणि खूप सुंदर. चिमणी सारखी कामात असे. आळशासारखं बसायला तिला मुळीच आवडत नसे. याउलट कावळयाचं घर शेणाचं होतं. घरात सगळीकडे पसाराच पसारा असे. कावळा दिवसभर इकडे तिकडे टिवल्याबावल्या करायचा, बडबड करायचा. हा खोडकर कावळा कोणालाच आवडायचा नाही. एक दिवस काय झालं आकाशात मोठे मोठे काळे ढग आले. सोसाटयाचा वारा सुटला. टप् टप् पाऊस पडू लागला. झाडे भिजली. जमिनीवरून धो धो पाणी वहायला लागलं. कावळयाच घर होत शेणाच. तेही पाण्यात वाहून गेल. हू…हू…हू…हू…! कावळा काकडला. आता कुठे जाव बर? एवढयात त्याला आठवल, चिमणीच घर आहे शेजारीच. मग कावळा आला चिमणीकडे. पण चिमणीच्या घराचे दार तर बंद होते. ‘चिऊताई, चिऊताई, दार उघड !’

चिमणी आतून म्हणाली ‘थांब माझ्या बाळाला काजळ-पावडर लावते’ थोडावेळ थांबून पुन्हा कावळयाने कडी वाजवली ‘चिऊताई, चिऊताई, दार उघड !’ चिमणी आतून म्हणाली ‘थांब माझ्या बाळाला झोपवते’ इकडे कावळयाला खूप भूक लागली होती. पण सगळीकडे पाणीच पाणी झाले होते. काय करतो बिचारा! एवढंस तोंड करून कुडकुडत उभा राहिला. चिऊताईचे बाळ झोपल्यावर तिने दार उघडले. कावळा घरात आला. भिजल्यामुळे त्याला खूप थंडी वाजत होती. चिमणी म्हणाली ‘तू बैस चुलीपाशी’. कावळा चुलीपाशी बसला. चुलीवर होती खीर ! कावळयाच्या तोंडाला पाणी सुटले.त्याने थोडी थोडी करत सगळी खीर संपवली. थोडया वेळाने पाऊस थांबला. कावळयाने घरटयाचे मागचे दार उघडले आणि तो भुर्रकन् उडून गेला. असा होता कावळा आळशी आणि लबाड.

कावळयाची शिक्षा आणि चिमणीचे बक्षीस

एक होता आळशी आणि लबाड कावळा. पहिल्या गोष्टीत पाहिला ना? तोच तो. तो लोळ लोळ लोळला, तर शेणाने भरला. त्याने वर पाहीले तर त्याचा डोळा फुटला. त्याने बिळात हात घातला तर त्याला विंचू चावला. तो देवळात गेला तर त्याला मार मिळाला. बिचारा रड रड रडला अन् घरी येऊन झोपी गेला.

एक होती कामसू चिमणी. पहिल्या गोष्टीत पाहिली ना घर स्वच्छ ठेवणारी? तीच ती. ती लोळ लोळ लोळली. तर मोत्याने भरली. तिने वर पाहिले तर तिला चंद्रहार मिळाला. तिने बिळात हात घातला तर तिला अंगठी मिळाली. ती देवळात गेली तर तिला साडी-चोळी मिळाली. ती साडी-चोळी नेसली, पालखीत बसली अन् घरी येऊन झोपी गेली.

– विनया साठे

← आजीच्या गोष्टी मुख्यपान