चाचा चौधरी

chacha chaudhary अट्टल चोर, पाकिटमार आणि गुन्हेगारांनो चाचा चौधरी पासून सावधान! लाल फेटा आणि हातात छडी घेऊन फिरणारे चाचा चौधरी १९७१ पासून भारतीय मुलांचे हिरो आहेत. व्यंगचित्रकार प्राण चाचा चौधरीचे निर्माते आहेत. त्यांनी ‘लोटपोट’ ह्या प्रसिध्द हिंदी पाक्षिकाकरिता हे पात्र उभे केले होते. चाचा चौधरी हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त एकूण दहा भारतिय भाषांमध्ये वाचले जाते. ह्या ‘कॉमिकच्या’ दहा लाखापेक्षाही अधिक प्रति खपतात.

चाचा चौधरीचे साथीदार आहेत त्यांचा कुत्रा रॉकेट, राक्षस साबू आणि त्यांची पत्नी बिनी. त्यांच्या पुढील काही गोष्टींमध्ये बिल्लू आणि पिंकी सुध्दा आहेत. साबू जरी राक्षस असला तरी संकटात सापडलेल्या चाचा चौधरींना तो कायम मदत करत असतो. चाचा चौधरींची बुध्दी संगणकापेक्षाही जास्त वेगाने चालते. चाचा चौधरींचे शत्रू आहेत राका, गोबर सिंग, धमाका सिंग. चाचा चौधरींना ताकदीची गरज पडल्यास साबू तातडीने मदत पाठवतो. चाचा चौधरींकडे ‘गांधी पध्दतीचे’ घडयाळ आहे. त्यांना कलिंगड खायलाही खूप आवडते. चाचा चौधरींवर टेलिव्हिजन सिरियलही तयार केली गेली होती. सध्या ती सिरियल चालू नसली तरी तुम्ही चाचा चौधरीची कॉमिक्स हॅरी पॉटरच्या जमान्यातही वाचू शकता. जरुर वाचा. चाचा चौधरीच्या साईट आहेत http://en.wikipedia.org/wiki/Chacha_Chaudhary
http://www.chachachaudhary.com

डोनाल्ड डक

Donald Duck Cartoonमिकी माऊसच्या जोडीने असणारा डोनाल्ड डक हा वॉल्ट डिस्ने कार्टून मध्ये अंकल डोनाल्ड म्हणून ओळखला जातो. डोनाल्डचे संपूर्ण नाव डोनाल्ड फॉन्टलरॉय डक. मोठी पिवळी चोच, फताडे पाय आणि थोडा घोगरा आवाज असणारा डोनाल्ड डक कायम ’सेलर’ शर्ट, टोपी आणि पॅंट न घालता असतो. इतर वेळेला खूश असणारा डोनाल्ड डक मिकी आणि त्याच्या भाच्यांवर कायम वैतागलेला असतो. ऍनिमेटर डिक लूंडीने ९ जून १९३४ रोजी डोनाल्ड डकला निर्माण केले. दुस-या महायुध्दाच्या काळात युरोप मध्ये डोनाल्ड डकला बंदी केली होती. पण डोनाल्ड डकची लोकप्रियता प्रत्येक पीढीत वाढतच गेली. डोनाल्ड डकवर सिरीयल्स, सिनेमा, व्हिडीओ गेम्स, कॉमिक्स, पुस्तके अश्या अनेक गोष्टी निघाल्या आहेत. काळानुसार आता साईट्स पण उपलब्ध आहेत. तुम्हीही डोनाल्ड डक अंकल बरोबर कार्टून नेटवर्कवर जरुर एंजॉय करा.

बॉब द बिल्डर

Bob the Builder cartoon बॉब द बिल्डर हा भाई हा ….

बॉब द बिल्डर हे कार्टून प्रथम युनायटेड किंगडम मध्ये दाखवले गेले. बॉब हा छोटया शहरातला बिल्डर आहे. पिवळी बिल्डरची टोपी, अनेक हत्यारे, आजूबाजूचे मित्र आणि त्याची ऑफिस सहकारी वेंडी अशी प्रत्येक भागात भेटणारी सारी मंडळी आपल्या सर्वांना खूप आवडतात. बॉबची सारी हत्यारे क्लेची बनवलेली आहेत तसेच ती चक्क बोलतात सुध्दा ! बॉब द बिल्डर ह्या पात्राचे निर्माते आहेत केथ चॅमपेन. बॉबचे ‘शो’ आधी लंडन आणि मग अमेरिकेत दाखवले गेले. बॉबच्या प्रत्येक भागात बॉब आणि त्याचे साथीदार बांधकाम, दुरुस्ती काम, नूतनीकरणाचे काम करुन प्रत्येकाला मद्त करत असतात. हयासाठी बॉब आणि त्याचे साथीदार सतत बाहेर असतात तर वेंडी ऑफिस संभाळते. बॉब द बिल्डरची साईट सुध्दा अप्रतिम आहे जरुर बघा – http://www.bobthebuilder.com ह्या साईट्चे वैशिष्टय काय माहितीये ? ही साईट फ्रांस, जपान, ऑस्ट्रिया, कॅनडा, इटली इत्यादी देशातल्या भाषांमध्येही बघता येते.तर मग इंग्लिश सोडून बाकीच्या भाषेतही साईट्स वाचायचा प्रयत्न तर करुन बघा.

बू sss

कार्टून नेटवर्कवर भेटणारा बू हा खरोखरच अजब प्राणी आहे. रुढ अर्थाने तो जंगलातल्या कुठल्याच प्राण्या सारखा तर मुळीच दिसत नाही.

बू हा एकमेव असाच आहे. त्याच्या बरोबर आहे त्याचे तीन खास मित्र – झोपाळू अस्वल, नाचणारे बदक आणि कुरकु-या वाघ. ही सगळी दोस्त मंडळी कधी बागेत, किल्ल्यावर, जंगलात… अश्या वेगवेगळ्या ठिकाणी साहस करायला जात असते. तेथे त्यांना आणखीन वेगवेगळे मित्र भेटतात. बू हे पात्र प्रसिध्द बीबीसी कंपनीने निर्माण केलेले आहे. बू चे शो थोडयाचवेळा करता असतात. पण खूप धमाल करतात. तुम्हीही जरुर बघा. आणि हो, बीबीसीच्या वेबसाईटला भेट द्यायला विसरु नका कारण तेथे तुम्हाला बू बरोबर खेळता येईल, चित्र रंगवता येईल आणि कोलाज सुध्दा करता येईल.

← कार्टून मुख्यपान