बाई कशाला पायजे?

बाई कशाला पायजे? (शासन महिलांसाठी राबवत असलेल्या विविध योजनांची माहिती देणारे नाटुकले)

टिप – या एकांकिकेचा प्रयोग ज्या कुणाला करायचा असेल त्यांनी मान्यवर लेखकांची लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे. इतर सर्व तपशीलांसाठी कृपया पुढील ई-मेलवर संपर्क साधावा. jadhavji@indiatimes.com
बाई कशाला पायजे?
(सूचना- दहा-पंधरा तरुणांचा गट असल्या उत्तम. नसल्यास किमान तीन तरुण आणि एक तरुणी असा चौघांचा गट हे पथनाटय सादर करु शकेल.)
(काही तरुण रांगेत उभे. त्यातला एक तरुण पुढे येतो. ढोलकी वाजवतो)
तरुण १ : (ढोलकी वाजवत) ऐका हो ऐका s s इकडे लक्ष द्या… याल तर हसाल न याल तर फसाल… भाई-यो और बहनो। सुनो सुनो सुनो… (पुन्हा ढोलकी वाजवतो पुन्हा तेच ओरडू लागतो.)
तरुण २ : अरे काय बोंबाबोंब चाललीय तुझी? कशाला बोंबलतोयस एवढा ?
तरुण १ : ह्याला बोंबाबोंब म्हणत नाहीत!
तरुण २ : मग काय म्हणतात ?
तरुण १ : ह्याला दवंडी असं म्हणतात.
तरुण २ : दवंडी ? ती काय भानगड असते ?
तरुण १ : तुला दवंडी माहीत नाय ?
तरुण २ : नाही
तरुण १ : अ रे रे रे…. अरे, म्हणजे जनतेला जाहीरपणे माहिती देण्यासाठी दवंडीचा वापर केला जातो…
तरुण २ : म्हणजे तू जनतेला माहिती देण्यासाठी आलायस का?
तरुण १ : अगदी बरोबर.
तरुण २ : तू माहिती खात्यात कामाला आहेस का?
तरुण १ : लेका लेका लेका… हितं माहिती खात्याचा काय संबंध? सरकारनं आता माहितीचा कायदा पास केलाय त्यामुळं कोणताही माणूस आपल्याला हवी ती माहिती हवी तेव्हा मिळवू शकतो.
तरुण २ : असं का ? व्हेरी गूड – व्हेरी गूड… मग तू कोणती माहिती देणार आहेस आता?
तरुण १ : (पुन्हा पहिल्या प्रमाणे) ऐका हो ऐका sss
तरुण २ : अरे, तुझं ‘ऐका हो ऐका’ फार झालं. आता पटकन मुद्यावर ये नाहीतर मला गुद्यावर यावं लागेल. (ढोलकीची थाप. मागील रांगेतील तरुण हसतात)
तरुण १ : तर मंडळी आज मी तुम्हाला एक छोटं नाटक करुन दाखवणार हाय.
तरुण २ : अरे पण तू आताच म्हणालास ना की ‘माहिती देणार हाय’ म्हणून?
तरुण १ : अरे येडा का खुळा तू ? नुस्ती कोरडी माहिती देत राह्यलो, तर लोक पळून जातील का नाही आपापल्या घरला ?
तरुण २ : ते बी खरं हाय. (बुचकळयात पडतो)
तरुण १ : म्हणून ही माहिती मी नाटकाच्या रुपानं देणार हाय.
तरुण २ : असं होय ? व्हेरी गूड. नाटकाचं नाव काय ?
तरुण १ : बाई कशाला पायजे ? (ढोलकीची थाप)
तरुण २ : काय – काय – काय ?
तरुण १ : बाई कशाला पायजे ? (पुन्हा ढोलकी)
तरुण २ : अरेरे… अरेरे…
तरुण १ : काय झालं ?
तरुण २ : ‘बाई कशाला पायजे’ हे जर नाटकाचं नाव असेल तर ते नाटक फ्लॉप झालं म्हणून समज…
तरुण १ : का – की – का ?
तरुण २ : अरे बाई कशाला पायजे म्हणजे एकादशीला खिचडी कशाला पायजे असं म्हणण्यासारखंच आहे…
तरुण ३ : बाई नाही म्हणजे सुपारीशिवाय पान !
तरुण ४ : बाई नाही म्हणजे मिठाशिवाय आमटी
तरुण ५ : बाई नाही म्हणजे छत्रीशिवाय पाऊस
तरुण ६ : बाई नाही म्हणजे नालाशिवाय घोडा…
तरुण ३ : बाई नसली तर पाणी कोण भरणार ?
तरुण ४ : भांडी कोण घासणार ?
तरुण ५ : पोरं कोण सांभाळणार ?
तरुण ६ : जेवण कोण करणार ?
तरुण ३ : पाय कोण चेपणार ?
तरुण ४ : आम्हाला तुझं नाटक बघायचं नाही. आम्ही चाललो. म्हणे, ‘बाई कशाला पायजे?’
तरुण १ : अरे पण मला एक चान्स देऊन तर बघा… असं नाटक तुम्हाला पुन्हा बघायला मिळणार नाही.
तरुण ३ : बरं बरं बघू या काय सांगतोय ते? देऊ एक चान्स… हा, कर सुरु…
तरुण १ : (गातो. त्याला इतर साथ देतात) ‘बाई नसती जगामधी तर कसे जन्मला असता? तुम्ही कसे जन्मला असता? आई नसती घरामधी तर कसे वाढला असता? तुम्ही कसे वाढला असता?’
तरुण ३ : बाई जर नसती तर आपण जन्माला आलो असतो का ?
तरुण २ : न्हाय बॉ.
तरुण ३ : असे घोडयासारखे वाढलो असतो का ?
तरुण २ : न्हाय बॉ.
(एक दारु प्यायलेला माणूस प्रेक्षकातून पुढे येतो. त्याला नशा चांगली चढलेली…)
दारुडया : ए बाबांनो काय बोरिंग नाटक चाललंय तुमचं हे! तुमची बडबड बंद करा आणि आधी बाईला बोलवा.
तरुण १ : पण नाटक अजून सुरुच झालं नाही.
दारुडया : मग मघाशी ढोलकी वाजली ती?
तरुण १ : पब्लिक जमायला पायजे म्हणून ढोलकी वाजवली आम्ही.
दारुडया : ते काय नाय ढोलकी वाजली म्हंजे नाटक सुरु झालंच पायंजे!? आणि नाटक सुरु झालं की आधी बाई आलीच पायजे. नाटकाची सुरुवातच जर जोरदार नसेल तर काय उपयोग? नाटक कसं पायजे?
तरुण १ : कसं?
दारुडया : रंगदार, ढंगदार s s s
तरुण १ : अरे म्हणजे नेमकं कसं ?
दारुडया : स्टार्टिंगलाच बाई नाचली पायजे….(ढोलकी)
तरुण १ : शाब्बास ! पण आमच्या नाटकात बाई न्हाय.
दारुडया : बाई न्हाय?
तरुण १ : अजिबात नाय.
दारुडया : तुमच्या नाटकाचं नाव काय?
तरुण १ : बाई कशाला पायजे ? (ढोलकी)
दारुडया : ते बदला आधी
तरुण १ : आणि काय ठेवू?
दारुडया : बाई नाचलीच पायजे! (ढोलकी)
तरुण १ : अरे पण नाटकात बाई नाय तर आणू कुठनं?
दारुडया : नाटकात बाई नाय?
तरुण १ : नाय.
दारुडया : (चप्पल काढून हातात घेत) ही वहाण घ्या आन् हाना आपल्या तोंडात… पार चव गेली बघा तोंडाची. नशाबी उतरली समदी. आधी ढोलकी वाजली तवा वाटलं आता बाई नाचनार… रंग भरनार… पन तुमी एकदम इस्कोट केला बघा…
तरुण १ : अरे पण बाई नसली एखाद्या नाटकात तर काय बिघडलं? बाई पायजे कशाला प्रत्येक ठिकाणी?
दारुडया : नाचायला !
तरुण १ : पण नाचायला बाई शिल्लक नाय, तेच सांगतोय मी तुम्हाला.
दारुडया : जगातल्या सगळया बायका कुठं गेल्या?
तरुण १ : कामाला गेल्या.
दारुडया : कामाला? कंच्या कामाला? नाचगाणं टाकून दुसरं कंचं काम करत्यात बाया?
तरुण १ : राष्ट्र उभारणीचं!
दारुडया : कसलं?
तरुण १ : राष्ट्र उभारणीचं…
दारुडया : (खिशातून बाटली काढून पित) तुमचं मराठी ऐकून सगळी नशा पार उतरुन गेली. म्हणे, राष्ट्र उभारणीच्या कामाला बाया गेल्याती…
तरुण १ : खरं सांगतो, बायांनी आता नाचायचं सोडून दिलंय आणि आता त्या राष्ट्र उभारणीच्या कामाला लागल्यात.
दारुडया : म्हजी कसं म्हनता?
तरुण १ : दिल्लीत शीला दिक्षित, उत्तर प्रदेशात उमा भारती, राजस्थानात वसुंधरा राजे शिंदे गादीवर नाही का बसल्या? शिवाय राबडी देवी आणि मायावती आहेतच. पटतंय का नाय तुला? (गात) ऐक! ‘बाई म्हणजे शक्ती अपुली माता राष्ट्राची। बाई म्हणजे शक्ती अपुली नवीन निर्माणाची।’ (सर्वजण साथ देतात)
दारुडया : हे बघा, तुमी शहरातली मंडळी हिकडं खेडयात येऊन आमा अडानी मानसांना नको नको ती स्वप्नं दाखवता, डोस्की फिरवता. आमी दमून भागून घरी येतो ते कशासाठी? बिनबाईचं नाटक बघण्यासाठी? ते काय नाय. आताच्या आता बाई आणा नाही तर आम्ही चाललो… चला मंडळी.
तरुण १ : अहो असं काय करताय? थांबा जरा…
दारुडया : थांबून काय करु? तुमाला जर बाई मिळत नसंल तर आमच्या गावातली बाई बोलवा एखादी…
तरुण २ : तुमच्या गावातल्या बाया पण कामाला लागल्यात…
दारुडया : कामाला लागल्यात?
तरुण १ : हो की.
दारुडया : काय थापा मारता साहेब, ती शेलारांची कमळी कुठं गेली?
तरुण १ : ती गेली आंगणवाडी सेविका म्हणून. तिला दरमहा १४०० रुपये पगार मिळतो.
दारुडया : पवारांची जानकी?
तरुण १ : तिनं कामधेनू योजना सुरु केली
दारुडया : कामधेनू योजना?
तरुण १ : जेवणाचे डबे पाठवते ती ऑफिसात, महिन्याला पाच हजार रुपये कमवते.
दारुडया : साळुंख्याची जनी?
तरुण १ : ती महिला बचत गटात गेली. तिनं शिवलेले मुलांचे कपडे मुंबई-पुण्याच्या बाजारात जातात आता. हायेस कुठं तू? म्हैन्याला पाच धा हजार रुपये मिळवते ती…
दारुडया : त्ये कसं काय?
तरुण १ : कसं काय म्हणजे? म.वि.म. मदत करते तिला.
दारुडया : म.वि.म.?
तरुण १ : महिला आर्थिक विकास महामंडळ.
दारुडया : आसं व्हय? मग सावंताच्या पुष्पाला बोलवा…
तरुण १ : ती गेली कॉलेजात शिकायला?
दारुडया : कॉलेजात कशी काय जाईल? तिच्या घरची गरिबी हाय. खायाला अन्न न्हाय घरात तिच्या…
तरुण १ : मुलींच्या प्रियदर्शनी वसतीगृहात सोय झालेय तिची. तिथं मोफत खाणं पिण, रहाणं, शिक्षण सगळं, मिळतं मुलीना…
दारुडया : काय म्हणता काय?
तरुण १ : तर काय खोटं बोलतो? मुलींनी शिकावं म्हणून त्यांना उपस्थिती भत्ता मिळतो आता. मोफत प्रवास, सैनिकी शाळेत प्रवेश, व्यवसाय प्रशिक्षण, महिलांसाठी खास विद्यापीठ, तंत्रनिकेतनात प्रवेश, पाहिजे ते प्रशिक्षण… तू नुसतं नाव घे… योजना हात जोडून समोर उभी हाय बघ…
दारुडया : असं व्हय मग त्या अनाथाश्रमातली मुलगी नाय का ती… हांडयाची प्रमिला तिला घेऊन या…
तरुण १ : प्रमिलाचं लग्न झालं
दारुडया : आतिच्या, ते कसं काय? पैका कुठनं आला तिच्याकडं?
तरुण १ : माहेर योजनेतनं १५ हजार रुपये मिळाले तिला. दणक्यात लग्न लावून दिलं सरकारनं. सोन्याचं मंगळसूत्र आणि भांडीकुंडी दिली…
दारुडया : अरंरं… आता लग्न पन लावून द्याया लागलं सरकार. सरकारचं डोकं काय ठिकानावर दिसत न्हाय… (दारु पितो) बरं असं करा…
तरुण १ : काय?
दारुडया : त्या आन्सुयेला तरी बोलवा…
तरुण १ : कोन आन्सुया?
दारुडया : देवदासी ती…
तरुण १ : म्हणजे, देवदासी प्रथा बंद करण्यासाठी कायदा होतोय ते तुला माहीत नाय ? आन्सुया आता सन्मानानं आपलं नवं जीवन जगायला लागलीय.
दारुडया : पर तिचं रोजच चालतं कसं मग?
तरुण १ : महिन्याला ३०० रुपये निर्वाह अनुदान मिळतं तिला सरकारकडनं. सर्वच देवदासींच्या मुलींना पाटी-पुस्तकं मोफत मिळतात आता. शिवाय मुलीच्या लग्नासाठी दहा हजार रुपये देतं सरकार.
दारुडया : असं व्हय, विपरीतच झालं म्हणायचं.
तरुण १ : बाई म्हातारी असो निराधार असो, अपंग असो, टाकून दिलेली असो नाय तर बलात्कार झालेली असो. तिला सरकारचं संरक्षण हाय, आधार हाय, मदत हाय…
दारुडया : देवदासी प्रथा बंद झाली? मग आमी जगायचं कसं? ह्या सरकारचं नक्कीच डोकं फिरलंय (पुन्हा पितो)
तरुण १ : महिला आता पुरुषांच्या खांद्यास खांदा लावून पुढं येताहेत. त्यांच्या विकासासाठी सरकार हजारो योजना राबवतंय रोजगार हमी योजनेवर मजूर म्हणून काम करणाऱ्या बाईला बाळंतपणासाठी भरपगारी पंधरा दिवसाची रजा मिळतीय हे माहीत हाय का तुला?
दारुडया : ऑं? बाळंतपनासाठी भरपगारी रजा?
तरुण १ : मातृत्व अनुदान योजना म्हणू नको, शिक्षण म्हणू नको, आरोग्य म्हणून नको, रोजगार म्हणू नको, उद्योग धंदे म्हणू नको जिकडं तिकडं महिलांचं राज्य…
दारुडया : ते खरं हाय पन तुम्ही कायतरी मार्ग काढा आन् एकतरी बाई… बाईला बोलवा. बाईशिवाय सगळं कसं मिळमिळीत वाटतंय बघा… बाई नाचली की मात्र जीवाला सुख वाटतंय…
तरुण १ : बाई कशी नाचती म्हायती हाय का?
दारुडया : म्हायीत हाय? आता मिशी फुटायच्या आधीपासनं तमाशा बघतो का नाय मी? तुमी बाईचं फक्त नाव घ्या सुरेखा पुणेकर, माया जाधव, मधु कांबीकर, झालीच तर…
तरुण १ : मग तुला नाचतापण येत असेल?
दारुडया : येत असेल म्हणजे काय?
तरुण १ : बरं मग नाचून दाखव बरं, सुरेखा पुणेकरसारखं…
दारुडया : हा.. तसं लगेच नाचता येतं व्हय?
तरुण १ : मग?
दारुडया : लावणी म्हणायची आन् ढोलकी वाजवायची … त्या शिवाय भूमिकेत शिरता येईल का मला?
तरूण १ : बरं बरं (ढोलकी वाजते. घुंगराचा आवाज. लावणी) ‘या रावजी बसा भावजी कशी मी राखू तुमची महरजी S S S?’ (दारुडया अगदी सुंदर नृत्य करुन दाखवतो सर्वजण टाळया शिट्टया वाजवतात. टोप्या उडवतात)
तरुण १ : वा वा इतका सुंदर नाचलास तू… तू जर आमच्या नाटक कंपनीत आलास तर आम्हाला बाईची काहीच गरज नाही ‘बाई कशाला पायजे’? हे नाटक एकदम ख-याअर्थानं रंगतदार होईल बघ…
दारुडया : तुम्ही फसवताय मला. दारु उतरली माझी समदी. (बाटली काढून पितो त्याला चढते.) हां… आत्ता या असे मैदानात. बाई नाय म्हण्ता काय? मी इकडंची दुनिया तिकडं झाली तरी चालंल पन बाई पायजे म्हणजे पायजे.
तरुण १ : एक बाई हाय.
दारुडया : हां… आत्ता कसं वळणावर आलास. बोला… कुठाय बाई? बोलवा तिला लवकर…
तरुण १ : पण ती भारी पडेल तुमाला
दारुडया : काय बोलतो भादरा? बाई कधी पुरुषाला भारी पडंल का? घेऊन ये तिला
तरुण १ : बघा, विचार करा…
दारुडया : काय बी इचार करायची गरज न्हाय… आली अंगावर तर अशी घेईन शिंगावर… (ढोलकी वाजते)
तरुण १ : ती अशी तशी बाई न्हाय.
दारुडया : कशी बी असू दे… आना तिला…
तरुण १ : स्वयंसिध्दा गटातली आहे ती.
दारुडया : सोयंसिध्दा! काय भानगड हाय ही?
तरुण १ : गोरगरीब महिलांना स्वत:च्या संरक्षणासाठी तयार करायचं अशी योजना हाय सरकारची …
दारुडया : (मोठयाने हसतो) अशा योजना तयार करुन बाया समर्थ झाल्या असल्या ना तर… जग बदललं नसतं? सरकारला आक्कल न्हाय हेच खरं… बोलवा तिला…
तरुण १ : (गात) ‘नव्या युगाची नवीन नारी समर्थ आमुची शक्ती नारी। तिच्या स्वागतासाठी आता सज्ज आमुची दुनिया सारी।’
सर्व : नव्या युगातील नवी नारी s s s (तरुणांच्या मागून एक सुंदर तरुणी पुढे येते. पांढरीशुभ्र निळया काठाची साडी. तेजस्वी डोळे, हसतमुख. ती हसत हसत पुढे येते सर्व तरुण तिला नमस्कार करतात. ‘या मॅडम’. तीही सर्वांना नमस्कार करते.)
तरुणी : नमस्कार मंडळी! कशासाठी बोलावलं मला?
तरुण : याला बाई पाह्यजे होती…
तरुणी : असं होय? (त्याच्या जवळ जात) काय पाव्हणं पसंत हाय का?
दारुडया : काय म्हणाला?
तरुणी : पसंत हाय का?
दारुडया : आता हे काय इचारनं झालं? (तो पागल होत) ‘फड सांभाळ तु-याला गं आलाS S S i तुझ्या उसाला लागंल कोल्हा…’ (तिच्या जवळ जातो व गालावरुन हात फिरवतो. त्या बरोबर ती तरुणी कराटे चे पवित्रे घेत त्याला लोळवते. एकदा दोनदा तिनदां. मग तो हात जोडून)
दारुडया : बस करा बाईसाहेब, बस करा…
तरुणी : काय बस करा?
दारुडया : डोळे उघडले आमचे, दारु पार उतरली.
तरुणी : ते कसे काय?
दारुडया : बाईच्या जागी आई दिसायला लागली.
तरुणी : कशी?
दारूडया : (हात जोडत)- ‘अशीच अमुची आई असती सुंदर रुपवती । आम्हीही सुंदर झालो असतो, वदले छत्रपती ॥ …’
तरुण : वा वा खरंच उतरली म्हणायचं तुमची !!!
तरुणी : बाई ही केवळ उपभोगाची वस्तू नाही तर राष्ट्राच्या निर्माणामध्ये भाग घेणारी मोठी शक्ती आहे हे लक्षात घ्या… जिजाबाईसारखी माता नसती तर शिवबा जन्माला आला नसता आन् सावित्री बाई फुले जन्माला आली नसती तर देशातली पहिली मुलींची शाळा पुण्यात निघाली नसती…
तरुण : वा वा. व्हेरी गूड.
तरुणी : गावकरी बंधूनो महिला आता आपल्या खांद्याला खांदा लावून पुढं येताहेत. रेल्वे चालवताहेत, विमानं उडवताहेत, लढाईवर जाताहेत,राजकारण, समाजकारण, शिक्षण सर्वच क्षेत्रात पुढं येताहेत. आपण त्यांना समजून घेतलं पाहिजे. आजपर्यंत आपण त्यांच्यावर अन्याय करत आलो पण आता त्यांना आपण सन्मानानं वागवायला शिकलं पाहिजे. आपल्या महाराष्ट्रात पुरुषांइतकीच महिलांचीही संख्या आहे. आपण त्यांना सत्तेत अर्धा वाटा दिला पाह्यजे. काय?
सर्व : हो हो बरोबर!
तरुणी : स्त्री आणि पुरुष ही संसाराची दोन्ही चाकं आहेत. ती बरोबर चालली तरच आपल्या संसाराचा आणि राज्याचा गाडा प्रगतीच्या
पथावरुन पुढे जाईल काय?
सर्व : अगदी बरोबर!
तरुणी : त्यासाठी सरकार करत असलेले प्रयत्न आपण समजून घेतले पायजेत आणि त्यांना दाद दिली पाहिजे, काय?
सर्व : बरोबर.
तरुणी : मग आजपासनं स्त्री आणि पुरुष यांची आपण आघाडी करुया. ठरलं?
सर्व : ठरलं!
तरुणी : या नव्या आघाडीचा s s s
सर्व : विजय असो s s s
(सर्व जण गातात)
नव्या युगाची नवीन नारी
समर्थ आमुची शक्ती नारी
तिच्या स्वागतासाठी आता
सज्ज आमुची दुनिया सारी

– प्रल्हाद जाधव