एका फासेपारध्याच्या जाळयात एक कवडा सापडला. त्याला पकडून न्यायला तो जेंव्हा जवळ आला, तेंव्हा तो पक्षी अगदी गयावया करून म्हणाला, ‘पारधीदादा जाऊ द्या मला. मी वचन देतो की, तुम्ही मला सोडलात तर दुस-या कवडयांना जाळयात पकडून देईन मी.’
पारधी त्याच्यावर ओरडला, ‘छे, मग तर मुळीच नाही सोडत तुला. तुझ्यासारख्या विश्वासघातक्याला कशाला सोडायचं? जो आपल्या निरूपद्रवी मित्रांचा विश्वासघात करू इच्छितो, तो साक्षात मृत्युपेक्षाही भयंकर!’
तात्पर्य – विश्वासघातासारखा जगात दुसरा भयंकर गुन्हा नाही
वादळी नि वाईट हवेमुळे एक शेतकरी आपल्या घरीच कित्येक दिवस अडकून पडला होता. बाहेर जाता येत नाही, अन्न आणता येत नाही, हे पाहून शेवटी त्याने आपली मेंढरे मारून खायला सुरवात केली.आणखी काही दिवस गेल्यावर त्याने आपल्या बक-यांचा फन्ना उडवला. आणखी काही दिवसांनी तर त्याने आपल्या बैलांवरही हात टाकला व आपली भूक भागवली.
हे सारे पाहून त्याचे कुत्रे एकमेकांत कुजबुजू लागले की, ‘पाहिलंत ना सारं, काय केलंन आपल्या धन्यानं आतापर्यंत? अजून काही विपरित घडलं नाही, तोवरच शहाणपणानं आपली तोंडं काळी करूया आपण! अरे, जो धनी आपल्याबरोबर श्रम करणा-या बैलांनाही शिल्लक ठेवण्यास तयार नाही, तो भुकेने पिसाळल्यावर अखेर आपल्यावर देखील हात टाकणार नाही, याची शाश्वती कोणी सांगावी? चला, आताच पळा!’
तात्पर्य – जे आपल्या मित्रावरही हात टाकायला नि त्याचा दुरूपयोग करायला कचरत नाहीत, त्यांच्यापासून सावध राहून नेहमी चार हात दूर असणे बरे! त्यांची ती वरवरची दिखाऊ नीती नि प्रतिष्ठा संशयास्पद व धोकेबाज समजणे शहाणपणाचे होय!
शेतात काम करता करता एका शेतक-याचे फावडे हरवले. त्याला वाटले, मजुरांपैकी कोणी ते चोरले असावे. त्याने कसून चौकशी केली, पण कोणीही कबूल होईना. कोणीही काही त्याबाबत माहीत असल्याचेही सांगेना. तेंव्हा त्या शेतक-याने सा-या मजुरांना घेऊन जवळच्या गावातील मोठया देवळात जाऊन शपथ घ्यायला लावायचे, असे ठरविले.
ठरल्याप्रमाणे सर्व मजूरांना घेऊन तो शेतकरी त्या जागृत देवस्थानी गेला. देवळाच्या दारातच दवंडीवाला दवंडी पिटत होता. थाळी पिटून तो मोठमोठयाने म्हणत होता की, ‘लोक हो, ऐका. आपल्या या जागृत देवस्थानातील देवांचे दागिने चोरीला गेले आहेत. चोरीची किंवा चोराची पुराव्यासह जो बित्तंबातमी देईल त्याला कोतवालसाहेब माठे बक्षिस देतील. ऐका हो, ऐका…’
ती बातमी ऐकून, शेतक-याला मोठा अचंबा वाटला, आणि तो स्वत:शीच म्हणाला, ‘चला, आल्या पावली घरी परत गेलेलेच बरे. इथल्या देवाला प्रत्यक्ष त्याच्याच देवळातल्या मौल्यवान वस्तू कोणी चोरल्या ते शोधून काढता येत नाही, तर माझं फावडं चोरणारा चोर, देव कसा काय शोधून काढेल?
तात्पर्य – देवच दुबळे ठरले तर त्यांच्यावर भरीभार का टाका? आपल्या प्रयत्नाइतका सामर्थ्यशाली देव दुसरा कोणी नाही.
आपल्या छानदार खोगिराची एका घोडयाला घमेंड वाटत होती. हमरस्त्याने एक ओझे लादलेला गाढव चालला होता. तो त्या घोडयाला वाट करून द्यायला जरा बाजूला झाला. पण आपल्याच तो-यात घोडा उतावीळपणे त्याला म्हणाला, ‘ए, जा रे, हट्. चल लवकर हो बाजूला. नाहीतर एखादी लाथच खाशील.’
बिचारे गाढव गप्पच राहीले. पण घोडयाचे ते उध्दटासारखे वागणे त्याच्या मनात राहीले. काही दिवसांनी तो घोडा म्हातारा व निकामी झालेला पाहून त्याच्या मालकाने तो एका शेतकऱ्याला विकला. आता त्या शेतक-याच्या शेतखणाची गाडी ओढून नेण्याचे काम त्याला करावे लागत होते.
थकला भागला तो घोडा असाच एकदा रस्त्यावरून जात असताना पूर्वीचे ते गाढव त्याला भेटले.
त्याला पाहताच खोचकपणे गाढवाने त्याला विचारले, ‘ओऽहो, कुठे निघाली स्वारी? नि हे काय? तुमचं ते पूर्वीचं छानदार खोगिर नाही दिसत कुठे? काय हो अश्वराज, त्या वेळच्या त्या घमेंडीत कधी अशी पाळी येईल, असं वाटलं होतं का तुम्हाला?…’
तात्पर्य – जीवनात चढ-उतार दोन्ही असतात, हे सदैव ध्यानी बाळगावे.
कोंबडयांवरून जुंपलेल्या भांडणामध्ये एक कोंबडा खूप जखमी होऊन पराभूत झाला होता. बिचा-याने लाजेने चूर होऊन एका अडगळीमध्ये तोंड लपविले.
विजयी झालेला दुसरा कोंबडा एका उंच भिंतीवर दिमाखाने चढला व अगदी उच्च स्वरात त्याने आपण जिंकल्याच्या आनंदात त्याने एक ललकारी मारली.
त्याला पाहाताच, एका गरूडाने त्याच्यावर झेप टाकली व त्याला उचलून तो आकाशात उंच उडाला.
पराभूत झालेला कोंबडा तोंड लपवनू बसलेला असल्यामुळेच बचावला नि अखेर कोणी प्रतिस्पर्धी न उरल्यामुळे निश्चिंतपणाने त्या कोंबडयांमध्ये खेळूबागडू लागला.
तात्पर्य – गर्वाचे घर नेहमी खालीच असते. घमेंडीत वावरणा-यांचा सदैव नाश होतो.