बार्बी बाहूली आपल्याकडे असावी असं अगदी तीन वर्षा पासून ते तेरा वर्षाच्या मुलीपर्यंत सर्वांना वाटतं. खरोखरच वेगवेगळ्या वेशात आणि कपडयात असणारी बार्बी सर्व देशांत लोकप्रिय आहे. बार्बी १९५९ साली, मॅटेल ह्या कंपनीने अमेरिकेत प्रथम आणली. बार्बीचे जनक आहेत अमेरिकन उद्योगपती रुथ हॅन्डलर. असे म्हणतात बार्बीचे डिझाईन बिल्ड लिली ह्या जर्मन बाहूली वरुन घेण्यात आले आहे. बार्बीची कहाणी मोठी रंजक आहे. रुथ हॅन्डलरची मुलगी बार्बरा बाहुल्यांशी खेळतांना कायम मोठयांचे कपडे त्यांना घालायची. तिच्या आईने ही गोष्ट रुथच्या निदर्शनास आणून दिली.
त्यानंतर जर्मनीला गेले असतांना ह्या कुटूंबाला अशीच छोटयांची ‘मोठी’ बाहूली लिली दिसली. ह्या बाहूली वरुन रुथ हॅन्डलर ह्यांनी स्वतःच्या मॅटेल ह्या कंपनीत अशीच बाहूली बार्बी नावाने आणली. आज पन्नास वर्षांनंतरही बार्बीची लोकप्रियता कायम आहे.
आतातर कार्टून नेटवर्कवर बार्बीचे कार्टून आणि सिनेमेही लागतात. बार्बीच्या ह्या वेगवेगळ्या गोष्टी लहान मुलांना खूपच आवडतात. खरे वाटणारे डोळे, केस आणि आर्कषक कपडे हे बार्बीचे वैशिष्टय आहे. बार्बीच्या साईट्स ही खूप आहेत. त्यावर वेगवेगळे खेळ खेळता येतात. जरुर पहा http://barbie.everythinggirl.com, www.barbiecollector.com, www.barbiegirls.com
निक चॅनलवरचे बॅट फिंक कधी तयार केले गेले माहिती आहे का ? दोस्तांनो चक्क १९६७ साली. न्यूयॉर्क मधल्या हाल सीगर कंपनीने प्रसिध्द बॅटमॅनच्या सिनेमा वरुन बॅट फिंकची निर्मिती केली. बॅट फिंकचे जवळजवळ शंभर भाग आहेत. बॅट फिंक हा बॅट म्हणजेच वटवाघूळ आहे. पण हा काही साधा बॅट नव्हे त्याच्याकडे सुपर सॉनिक सोनार रडारच्या सुपर पॉवर्स आहेत आणि त्याचे पंखही स्टीलचे आहेत. बॅट फिंकचा साथीदार कराटे हा हुशार नाही पण शक्तीमान जरुर आहे. चिफ हा बॅट फिंकचा सल्लागार आहे जो शहरात घडलेल्या गुन्ह्यांची माहिती बॅट फिंकला देत असतो. हुगो मात्र ह्या सिरीयल मधला व्हीलन आहे जो नेहमी वाईट कृत्य करत असतो आणि बॅट फिंकला हरवायचा प्रयत्न करत असतो.
आज जो तुम्ही ऍंन्डीपॅन्डीचा कार्टून शो बघता तो किती जुना आहे माहितीये का ? चक्क पन्नास वर्ष जुना. ११ जुलै १९५० साली प्रथम बीबीसीवर दाखवला गेला. ऍंन्डी हे पात्र पिकनीक बास्केट मध्ये राहणारं. त्याचे आणखीन दोन मित्र आहेत पॅन्डीटेडी आणि लूबीलू. हे तिघेही जण पिकनीक बास्केट मध्येच राहतात. ऍंन्डीपॅन्डी जेव्हा आसपास नसतात तेव्हा लूबीलू प्रेक्षकांशी मस्ती करायला येतो. ह्या कार्टूनची लेखिका ब्रिटनची आहे, तिचे नाव आहे मारिया बर्ड, पपेट बनवणारे आहेत ऑड्री आणि मॉली गिबसन. १९७० साला पर्यंत २६ भाग वरचेवर दाखवले जायचे. पण २००२ मध्ये ऍंन्डीपॅन्डी नव्या वेशात, नव्या ढंगात आणि नव्या गोष्टी घेऊन बालगोपालांना हसवायला आले. त्या तिघांबरोबर कुत्रा, साप आणि पिवळा बॉलही राहायला आले. आता ऍंन्डीपॅन्डी बास्केट मध्ये राहत नसून एका छानश्या गावात राहतात. बागेत धमाल करत खूप गाणी म्हणतात. त्यांच्या काही वेबसाईटसही जरुर बघा. http://www.screenonline.org.uk/tv/id/443679/index.html
आपल्याला मिकी माऊस हे उंदराचे कार्टून माहितीच आहे तसेच ऐंजलिना बॅलरिना ही कार्टून उंदरीही अत्यंत लोकप्रिय आहे. ऐंजलिना बॅलरिना ही अत्यंत सुदंर, छान छान कपडे घालणारी उंदरी २००२ साली लंडनच्या टि.व्ही वर पहिल्यांदा दाखवली गेली. ऐंजलिना बॅलरिना हे पात्र तयार केले आहे हेलेन क्रेग ह्यांनी तर ऐंजलिनाच्या गोष्टी लिहील्या आहेत कॅथरीन होलाबर्डने. कॅथरीने लिहीलेली ऐंजलिनाची एकूण वीस पुस्तके प्रथम प्रकाशित झाली.
विलीयम, ऐलिस, सॅली, प्रिसीलिया, हेंरी, आजी-आजोबा हे सारी पात्र आपल्या सर्वांना भेटणारी. ऐंजलिना एके दिवशी खूप मोठी बॅले डान्सर होण्याचे स्वप्न पाहात असते त्यामुळे ती सतत नाच करतांना आपल्याला दिसते. ऐलिस ऐंजलिनाची खास मैत्रिण असते.त्या दोघींना एकमेकींचे प्रत्येक गुपित ठाऊक असते. ऐंजलिनाची स्वतंत्र वेबसाईट नाही आहे तिच्या विषयीची माहिती तुम्ही http://www.nickjr.com वर वाचू शकता आणि हो टिव्हीवर निकज्यूनिअर चॅनलला भेट द्यायला विसरु नका.