तुझ्या प्रतिक्षेत

प्रिय.. …… कसा आहेस?

meals-in-one-dish

किती रे झुरायला लावतोस? कधी येणार आहेस बाबा ‘देवगड’वरून? अरे देवही कधीमधी प्रसन्न होऊन, भक्ताच्या हाकेला धावून, गडावरून खाली येऊन भक्ताची गळाभेट घेतात. तुझा मात्र भारीच शिष्टपणा हो! फार “भाव” खातोस. देव ‘भावाचा’ भुकेला आहे असं म्हणतात ते खरंच दिसतंय आता. ‘रत्नागिरी’ तला तुझा थोरला भाऊ पाठवलास तरी चालेल…पुण्यामंबईत केव्हाच येऊन थडकलास. मग आम्ही रे काय पाप केलंय? असा प्रांतभेद करणं योग्य आहे का? इतका काय तो शिष्टपणा म्हणते मी! …. पण ये बाबा आता. सहनशक्तीचा अंत पाहू नकोस.

काय म्हणालास? तुझं नाव का नाही घेतलं? छे बाई ! मी नाही घ्यायची हो! नाव घेतल्यानं आयुष्य कमी होतं असं ऐकलंय.. आधीच एव्हढ्या उशिरा उगवतोस आणि वर म्हणतोस…तुझी वाट पाहून पाहून डोळ्यांच्या खोबण्या व्हायची वेळ आलीये बघ अगदी…बरं ते जाऊदे.. 

मुद्दाम तुला पत्र लिहायचं कारण म्हणजे, तुझी, खरी तर थोरली, पण वागण्यात अगदीच अल्लड, अशी तुझी बहिण  “कैरी”  इथे अगदी धिंगाणा घालतीये. आता तू भाऊ तिचा. धाकटा असलास तरी सालस, समंजस, सर्वांनां सांभाळून घेत जबाबदारीने वागणारा, म्हणून तुला सांगतीये हो . आईवडीलांनीं सगळा कारभार आता तुझ्या हातात सोपवला आहे. तेव्हा तुलाही कल्पना असायला हवी इथल्या  सगळ्या घडामोडींचीं म्हणून हा पत्रप्रपंच! तसं तुझं संपूर्ण घराणंच संस्कारी आणि बहूगुणी! ‘बहुजन हिताय। बहुजन सुखाय। ‘ हे तुमचं ब्रीदवाक्य. ‘जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती ‘ ही उक्ती तुमच्या घराण्याला  अगदी तंतोतंत लागू पडते. आम्रमंजिरीचा सुखद परीमळ तुझ्या येण्याची गंधवार्ता देऊन गेलेला आहेच.  तुझी बहिण येताच तुझ्याही आगमनाची चाहूल लागते.

खरं तर तुझी ती ‘खट्ट्या’ळ बहिण आमचाही जीव की प्राण! एकतर ती तशी सद्गुणी आहेच शिवाय तुझ्या आगमनाची दवंडी पिटवण्याचं कामही तीच करते, म्हणून अधिकच प्रिय. तशी तिने पिटवलीच यंदाही.  पण हल्ली कित्ती उड्या मारते ती! एका जागी स्वस्थच बसत नाही! कधी साखरआंबा, कधी गुळांबा, कधी मेथांबा, कधी मुरांबा, तक्कू, सकुबद्दा, कोचकई, कायरस, पन्हं, आंबे डाळ, कैरीभात/ चित्रान्न, कैरी आमटी, चटणी आणि अबबब लोणच्यांचे सतराशे साठ प्रकार!! .. थैमान घालतीये अगदी. हिचा सगळीकडे मुक्त संचार!धुमाकूळ  नुसता ! कुलीन घराण्याची शालिन मुलगी ही. मग हे शोभतं का हे असं वागणं? कधीकधी तर अश्शी ‘तिखट मीठ’ लावून चुरूचुरू बोलते ना, की ज्याचं नाव ते! मुलीच्या जातीनं कसं सलल्ज, विनम्र, मितभाषी असावं ना? पण नाही. ऐकेल तर शप्पथ!! इतकी घोडदौड करते ना सर्वत्र. 

हल्ली तर ऐकलंय की बऱ्याच मोठ्या लोकांत ऊठबस असते तिची. Green Mango Squash , Green Mango Ice cream , Popsicles, Snow Gola एक ना दोन! नामांकित रेस्टॉरंट्समध्ये तर ‘आम पन्ना ‘ नावाखाली दिडशे रूपयांनां अस्सं पांचट पन्हं दिलं जातं म्हणून सांगू !!

आता मी पडले जुन्या मताची. मला मात्र तिची वर सांगितलेली शालीन रुपंच अधिक भावतात बघ. कधी अंगभर दागिने लेवून, तिखट, मीठ मसाल्याचा साज चढवून नखशिखांत सुंदर ‘लोणचं’  म्हणून येते तर कधी फक्त साखरेला लपेटून, सफेद कर्णफुलं आणि माळ घालून, केशरगंध लावून निरागस निर्मळ गोड ‘साखरआंबा’  म्हणत येते.  एखाद्या नववधूसारखी दागिन्यांनीं मढलेली  नाहीतर कधी लंकेची पार्वती,  ती या कुठल्याही रूपात साजरीच दिसते. 

पण हल्ली तर रोज सगळ्या ग्रुपवर ही मिरवतीये. हिच्या कारवाया आघाडीवर आहेत. आमच्यावेळी नव्हतं हो बाई तरूण मुलींनीं असं मिरवणं बिरवणं गावभर . बरं हल्ली स्त्री मुक्तीचं वारं इतकं घोंगावतंय  ना की काह्ही बोलायची सोय नाही. एकट्या कैरीला मी काही बोलले ना तर तिचे ते तिखट, मीठ, मेथी दाणे, हिरवी मिरची, लाल मिरची असे सगळे, तिचे सख्खे, हक्काचे, सहकारी असहकार पुकारतील आणि जमा होऊन माझ्याच घरावर बहिष्कार टाकतील! साखर आणि गूळ हे तर तिचे भालदार चोपदार. त्यांच्या पुढे माझा काही निभाव लागणार आहे का? जोरदार घोषणाबाजी होईल. मोर्चे निघतील. वर स्त्री मुक्ती विरोधी म्हणून माझी बदनामी होईल ती वेगळीच! नकोच बाई त्या भानगडीत पडायला. पण रहावत नाही म्हणून सांगितलं हो तुला.. नाहीतरी सुंदर मुलगी म्हणजे आईबापांच्या जिवाला घोर हो नुसता… 

बरं ती हल्लीची मुलगी म्हणावी तर तसंही नाही. इतकी ‘मुरलेली’ आहे इथल्या वातावरणात, तरी सुद्धा “मॅच्युरिटी” म्हणून नाही! थोडी तरी ‘परिपक्वता’ असावी वागण्यात, दिसण्यात. तर नाही. ही सदैव अल्लड, अवखळ, तरूण, करकरीत, हिरवीकंच ! बरं मी सांगायला गेले तर म्हणाली “लोकांना मी अशीच आवडते. हिरवीगार”.. . आणि तुला म्हणून सांगते, कुठे बोलू नकोस, पण पुरुषांपेक्षा बायकांच्याच नजरा खिळून राहीलेल्यात हिच्यावर. तर काय! येता जाता दिसेल तिथून घरी घेऊन येतात तिला! काय बोलणार सांग तू आता?..  बाबा सगळं कळतं पण चारचौघात सांगायची सोय नाही बघ. कुठल्याही ग्रुपवर जा, हिचीच चर्चा. लाज आणलीये बघ नुसती. तूच आल्यावर तिला समजावून सांग बाबा चार हिताच्या गोष्टी. माझ्या तर पार हातातून गेलीये अगदी. हिला कुठेही घेऊन जायची सोय नाही. तुला सांगणं माझं कर्तव्य होतं. आता हे सगळं कसं निस्तरायचंय हे तुझं तू बघ. मी माझं काम केलं. आता तू आल्याशिवाय ही बया काही वठणीवर यायची नाही हो . आवर बाबा हिला…. आवर… आवर…

-डॉ. शरयू देशपांडे  हैद्राबाद