थ्री इडियट्स आणि बॅकवॉटर्स वरील वैऱ्याची रात्र

भुत्याचं त्यावेळी सुटलेलं पोट आत घेण्यासाठी हातभार म्हणून डोंगरात भटकंतीला जायचा बेत आखला. भल्या पहाटे मी, भुत्या (प्रणव) आणि महेश (कालिया) भुत्याच्या गाडीनं बोरिवलीहून निघालो. पाऊस आषाढ आणि श्रावणाच्या उंबरठ्यावर असला तरी त्याचा जोर चांगलाच होता. निघालो आणि अर्ध्या तासातंच माशी शिंकली. 

घोडबंदर रोडवर हा थोरला ट्राफिक. अर्धा-पाऊण तास गाडी जागच्या जागी ठप्प..!! म्हटलं काय पनवती लागलीय राव..!! गाडीत लावलेला भैरवाचा खर्ज षड्ज, आणि भुत्याच्या ट्रॅफिकवरील शिव्यांचा ‘भिन्न’ षड्ज एकाच वेळी घुमू लागले..!!..आणि भुत्याच्या अंगात जणू भूतंच संचारलं. त्याने सरळ एक कट मारला आणि विरुद्ध दिशेच्या लेनमध्ये गाडी घातली आणि रपारप नेली. निदान त्यामुळे ट्रॅफिकची तरी पिडा टळली.

शहापूर ओलांडलं. डावीकडे धुक्याच्या दुलईत लपलेली माहुली दिसायला लागली आणि ट्रेक ला निघाल्याचा फील आला. श्री दत्त स्नॅक्स मध्ये वडा पाव आणि पोहे हाणले, आणि सुटलो. वातावरण मस्त कुंद होतं. आसमंतात पसरलेली ढगांची चादर सूर्यकिरणं जमिनीवर पडू देत नव्हती. पाऊस आणि वारा आळीपाळीनं वातावरणात मृदगंधाची शिंपण करीत होते. कसारा घाटातला डावीकडचा जव्हार फाटा ओलांडला आणि घाटाच्या बाजूनी खाली उतरणाऱ्या ढगांनी पार लपेटून टाकलं. मधेच डावीकडून घाटातनं धडधडत जाणारी ट्रेन घाटातल्या रेल्वे लाईनची जाणीव करून देत होती. हेड लाईटच्या प्रकाशात धुकं कापत कापत इगतपुरीस पोचलो. एरवी इगतपुरी गाठली की अगदी प्रतिक्षिप्त क्रियेसारखी नजर अलंग-मदन-कुलंग या दुर्गरत्नांकडे खिळली जाते. तशी ती खिळलीच. पण पावसाळ्यामुळे आज त्या दुर्गाराजांचं दर्शन धुक्यानं आमच्यापासून हिरावलं होतं. पण तरी काय झालं? त्यांचं अस्तित्व हृदयात तर आहेच की..!!! त्यांना मनोमन साद घालून घोटी ओलांडली.

बारीत गोरख खराडेच्या अंगणात गाडी लावली आणि तडक निघालो. शेताच्या बांधांवरुन उसळ्या मारून जाणाऱ्या पाण्यातून वाट काढत मार्गक्रमण सुरु झाले. कळसुबाई धुक्याचा पदर डोक्यावर घेऊन बसली होती. तिच्या अजस्र पहाडावरून स्वतःला झोकून देणाऱ्या धबधब्यांची पंगत धुक्यातून मधूनंच मोहक दर्शन देत होती. सोसाट्याचा घोंगावणारा वारा, ओढ्यांचा खळखळाट, पानांची सळसळ, पक्ष्यांचा किलबिलाट, आणि पावसाचं गाणं असा निसर्गदेवतेनं वाद्यवृंद मांडलेला. त्याला दाद देत नखशिखांत ओले होत कळसुबाई शिखरावर पोचलो तेव्हा साधारण दुपारचा एक वाजला असेल. चहू बाजूस नुसतं धुकं, धुकं आणि धुकंच..!!! …आणि भराट वारा इतका की एकट्यानं आधाराविना सुटं उभं राहणं देखील मुश्किल होत होतं. त्यात अंगावर संपूर्ण भिजलेले कपडे अंगात थंडी भरत होते. कळसू देवीचं दर्शन घेऊन परतीस लागलो. बेभान वारा अंगावर घेत धुक्यात हरवलेल्या शिडीच्या पायऱ्या अंदाजानं उतरत शिखराजवळच असलेल्या विहिरीजवळच्या झापात आलो. तिथे गावकऱ्यानं पेटवलेल्या चुलीच्या धगीवर ओलंचिंब झालेलं अंग शेकून घेतलं. अंगात उब आली आणि दातांची तडतड बंद झाली. जेऊन घेतलं आणि तसंच परत पाऊस अंगावर घेत उतरणीस लागलो. बारीत पावेतो साडेचार वाजलेले. भराभर चहा मारून आमच्या पुढील गंतव्य स्थानाकडे म्हणजेच साम्रदकडे निघालो. 

भंडारदरा बॅकवॉटर्सचा एक भला मोठा हात साम्रदला येतो. साम्रद हे घाटमाथ्यावरचं एक मस्त गाव. एकीकडे रतनगड, त्याचा खुट्टा, आजोबा, कात्राबाई, शिपनुर यासारखे महाकाय डोंगर, तर दुसरीकडे करोली घाट, देवी घाट, चोंढे घाट, साकुर्ली घाट अशा अनगड घाटवाटा. एकीकडे विस्तीर्ण पसरलेलं पठार, तर दुसरीकडे भंडारदऱ्याचं हातपाय ताणून पसरलेलं प्रचंड बॅकवॉटर्स. त्यातलाच एक भला थोरला हात साम्रदी येऊन मिळतो. त्याच्या काठावर तंबू ठोकून कॅम्पिंग करण्याचा आमचा बेत होता.

पावसाळ्यामुळे बारी साम्रद या रस्त्याची पार वाट लागलेली. पावसाची ये-जा अविरत चालूच होती. बॅकवॉटर्सच्या कडेकडेने जाणारा, डोंगरांना विळखे घालणारा, आणि असंख्य धबधब्यांनी नटलेला तो रस्ता पार करून साम्रदला पोचेस्तोवर जवळजवळ साडेसहा वाजले. साम्रदला पोचतानाच बॅकवॉटर्सच्या कुठल्या हाताच्या काठावर टेन्ट पीच करायचा हे गाडीतूनच ठरवून घेतलं. कारण वेळ हातातून निसटून जात होता. काळोख पडायच्या आत आणि पाऊस यायच्या आत टेन्ट पीच करायचा होता. साम्रदच्या हापशीजवळ गाडी लावली. त्वरित टेन्ट काढून पिचिंग च्या जागी जायला अक्षरशः पळत सुटलो. पाण्यापासून सुरक्षित अंतर ठेऊन टेन्ट पीच करायला सुरुवात केली. सुदैवानं पावसानं थोड्यावेळ मेहेरबानी केली. पण वाऱ्याचा जोर भयानक होता. त्यामुळे टेन्टच्या भिंती स्थिर राहून उभ्या राहायला मागत नव्हत्या. निसर्ग घेत असलेल्या आमच्या परीक्षेस रीतसर सुरुवात झालेली. पेग्स मारून, मोठ्या मुश्कीलीने त्यात टेन्टच्या दोऱ्या ताणून बसवून कसाबसा टेन्ट पीच केला. तरी भणाणत्या वाऱ्यात हा टेन्ट टिकाव धरील का, ही धागधुग होतीच. एक जास्तीचा आधार म्हणून माझी मोठी छत्री अर्धी जमिनीत ठोकली आणि तिच्या जमिनीवरील अंगाला आऊटरची मेन दोरी आणि टेन्टच्या दोन दोऱ्या बांधून ठेवल्या. 

सूर्य अस्तास जाऊन काळोखायला लागलं. मधूनच एखादं चुकार पाखरू वेगवान वाऱ्यात आपल्या पंखांना सावरत कसंबसं आपल्या घरट्याकडे जाताना दिसत होतं. वातावरणात निर्मनुष्य शांतता आणि पाऊस-वाऱ्याचा गोंगाट असं एक अजब रसायन तयार झालं. लगेच जाऊन गाडीतनं सॅक्स आणल्या. टेन्टच्या आऊटर खाली त्या ठेवल्या आणि भराभर कपडे बदलून घेतले. जेमतेम सात-सव्वासात वाजले असतील आणि पावसाने परत दमदार हजेरी लावली. आम्ही पटकन रात्रीच्या जेवणाचं सामान आणि स्टोव्ह सॅक मधून काढून टेन्ट मध्ये घुसलो.

पाऊसाने संपूर्ण आसमंताला आता झोडपून काढायला सुरुवात केली. आजूबाजूचा कीर्र अंधार धुक्यामुळे अधिकच भयावह वाटत होता. पाण्यात उभी असलेली झाडं टेन्टच्या खिडकीतून धुक्यामुळे भुतासारखी दिसत होती. पण आता मागे फिरणं किंवा गावात जाऊन राहाणं देखील शक्य नव्हतं. भुकेने आता पोटात डोकं वर काढायला सुरुवात केली. पोर्टेबल स्टोव्ह टेंटमध्ये पेटवला आणि खिचडी शिजत ठेवली. पण टेन्टच्या आत हे उपदव्याप करत असल्याने स्टोव्हमध्ये केरोसीन न वापरता सुरक्षिततेच्या दृष्टीने फ्लेमच्या गोळ्या ठेवल्या, जेणेकरून फ्लेम छोटीच राहील. पण त्यामुळे खिचडी शिजायला बराच वेळ लागत होता. करणार काय? आमच्यात खाज अशा अडनिड्या ठिकाणी भर पावसात कॅम्पिंग करण्याची…मग हे सगळं ओघानं आलंच…!! तासाभराने खिचडी तयार झाली. खिचडी आणि स्वीट डिश म्हणून बरोबर आणलेले बेसनाचे लाडू असा झकास मेनू जमला. त्यावर ताव मारला आणि गप्पा मारत बसलो. 

झोपाळलेलं शरीर स्लीपिंग बॅगमध्ये कोंबलं आणि पाठ टेकली. मागल्या अहुपे कॅंपिंगच्या अनुभवावरून यावेळी टेन्टच्या सगळ्या शिवणींना मेण लावून आणलं होतं. त्यामुळे पाणी आत येणार नाही अशी आमची निरागस समजूत होती. त्या भरोशावर डोळे मिटले. पण ती समजूत सपशेल फोल ठरलीय, हे काही वेळातच कळलं. बाहेर वारा आणि पाऊस दोघेही भयानक पिसाटलेले होते. आऊटर आणि टेन्टची भिंत यामधून वारा आणि पाऊस टेन्टवर आदळत होते. पाऊस टेन्टच्या चेन, बंद खिडक्या, जमिनीपर्यंत खेचून घेतलेलं आऊटर या सगळ्या गोष्टींना न जुमानता टेन्ट मध्ये घुसत होता आणि स्लीपिंग बॅग भिजवत होता. टेन्टच्या कापडाची आणि आऊटरची मधमाशीच्या पंखांप्रमाणे अविरत फडफड चालू होती. मधेच अंगात आल्याप्रमाणे वाऱ्याचा जोर वाढी, आणि त्याबरोबर आलेला पाऊस टेन्टवर ताशे वाजवी. बऱ्याच वेळा बाहेरून बुडबुड बुडबुड असा पाण्याचा आवाज येई. जरी पाण्यापासून सुरक्षित अंतर ठेवून आम्ही टेन्ट लावला होता, तरी या आवाजानं धडकी भरायची. कारण पावसाचा जोर इतका होता, की  वाटायचं, पाणी फुगून टेन्ट पर्यंत आलं की काय? टेन्टसकट आम्ही पाण्यात तरंगायला लागलो की काय? त्यामुळे दर अर्ध्या तासाने आम्ही टेन्टची खिडकी उघडून बाहेरच्या परिस्थितीचा अंदाज घ्यायला सुरुवात केली. बाकीच्या वेळेत टेंटमध्ये गपचूप बसून राहण्याखेरीज काही उपाय नव्हता. इतक्या भयाण परिस्थितीत देखील कालियाच्या कालियाच्या श्वासांना खर्ज सापडला होता. 

रात्री दीड-दोन चा सुमार असेल. पावसाचा थयथयाट आणि भणाणत्या वाऱ्याचा गोंगाट चालूच होता. एवढ्यात भुत्याचा आवाज कानावर आला, “सौ, माझं अंग बघ रे, तापासारखं वाटतंय…”.  बघितलं तर भुत्याच्या अंगात एकच्या वर ताप… भुत्या फणफणला होता, कुडकुडत होता.. म्हटलं आता काय करायचं? अंगावर काही घालायला काही कोरडं नव्हतं. स्लीपिंग बॅग ओली झालेली. निसर्गाने आमची चांगलीच परीक्षा घेण्याचं ठरवलेलं होतं. रात्र वैऱ्याची आहे हे आता समजून चुकलं, पण धीर सोडून चालणार नव्हतं. कसबसं टेन्ट ची चेन उघडून माझ्या सॅक मधला मेडिकल किट, टेन्टमध्ये बसूनंच काढण्याचं दिव्य पार पाडलं. उरलेल्या फ्लेमच्या गोळीवर स्टोव्ह पेटवून थोडं पाणी गरम केलं आणि त्या गरम पाण्याबरोबर भुत्याला क्रोसिन दिली. छातीवर व्हिक्स चोपडलं, आणि झोपवून ठेवलं. भुत्या रशियातून डॉक्टरी करून नुकताच परतलेला होता, तरी मी डॉक्टर आणि तो पेशंट होता..!! अधून मधून त्याला गरम पाणी देणं चालू ठेवलं. त्यामुळे भुत्याच्या अंगात जरा उब आली आणि तापही थोडा कमी झाला. काही वेळानं भुत्याचं “xxxxxx सौ, कुठे कुठे आणतोस….” असं वाक्य कानावर पडलं, आणि त्यातल्या सुरुवातीच्या xxxxxx या शिवीवरून भुत्याच्या तब्येतीत सुधार पडलाय, अशी खात्री झाली…!!!

पाखरांची टिवटिव ऐकू यायला लागली, तेव्हा जीवात जीव आला, कारण ते उजाडू लागल्याचं लक्षण होतं. टेन्टची चेन उघडून जरा बाहेर डोकावून बघितलं. बऱ्यापैकी फटफटलं होतं. पावसाचा जोर आता कमी झालेला, वारा बेफाट होता. बाहेर आलो. रात्रभराच्या पावसानं झोडपून काढलेला आसमंत बघितला. हिरवागार माळ, त्यावरले डवरलेले भलेथोरले रुख, लांबवर दिसत असलेली साम्रदची घरटी, टेन्टच्या मागल्या अंगास पसरलेलं पाणी, आणि तोंडावर हलक्याशा पावसानं उडत असलेले नाजूक शिंतोडे…वातावरणात आता एक विलक्षण चैतन्य जाणवत होतं. रात्रभर तांडव मांडलेल्या रौद्र निसर्गानं आता भलतंच सोजवळ रूपटं धरलेलं. सहज लक्ष टेन्ट आणि आऊटरच्या दोऱ्या बांधलेल्या माझ्या छत्रीकडे गेलं. तिचं जमिनीवरचं अंग काटकोनात वाकलेलं दिसलं तेव्हा त्या छत्रीनं रात्रभर प्राण पणाला लावून आमच्या टेन्टला धरून ठेवण्यात अखेर स्वतःची कुर्बानी दिली आहे, हे लक्षात आलं..!! कालिया आणि भुत्याला हा प्रकार दाखवला आणि तिघांनी मिळून तिला श्रद्धांजली वाहिली.

रात्रीची भांडी पाण्यावर घासून टेन्ट वाइंड अप केला, सॅक्स भरल्या आणि साम्रद गावात आलो. रामदास बांडे च्या पडवीत आलो. पूर्वी खुट्याच्या खिंडीतून तीन-चार वेळा रतनगडी जाताना डेरा रामदासकडेच टाकला असल्याने तो चांगलाच ओळखीचा. त्याच्याकडे बकरीच्या दुधाचा, साखरेऐवजी गूळ घातलेला चहा घेतला. त्याला कालपासूनचा आमचा कार्यक्रम सांगितला, कसे राहिलो ते सांगितलं. ते ऐकून त्याने कपाळाला हात मारला. 

इतकं सगळं होऊन देखील आमच्यातली खाज अजून कमी होत नव्हती. रामदासला म्हटलं सांदणच्या अलिकडल्या पठारावर घेऊन चल आणि उलटा धबधबा दाखव. तो ही तयार झाला. अर्धा-पाऊण तास धुक्यातली हिरव्यागार माळावरची वाट तुडवत करोली घाटाच्या माथ्यावरल्या पठारावर आलो. डावीकडे सांदण दरी, पलीकडे लपलेला रतनगड, समोर करोली घाटातनं संथपणे वर चढणारे कृष्णमेघ, आजूबाजूला अवखळ ओढ्यांचा खळखळाट, धुक्याच्या दुलईतून मधूनच दर्शन देणाऱ्या सह्याद्रीच्या अजस्र भिंती, त्यावरून दरीत झेपावणारे असंख्य प्रपात, ऊर बडवून काढणारा बेभान वारा, आणि अंग नखशिखांत भिजवणारे पावसाचे टप्पोरे थेंब….सारंच संमोहित करणारं…!! जणूकाही रात्रभर जो त्रास सहन करावा लागला, त्यावर निसर्गानं आता अद्वितीय चैतन्याची फुंकर घातली होती. 

इथेच उजवीकडे एक मोठा ओढा धबधब्याचं रूप घेऊन दरीत पडतो, आणि खालून वर येणाऱ्या भन्नाट वाऱ्यामुळे पूर्ण खाली न पडता मधेच चक्क यू मारून परत माथ्यावर येतो. हाच तो उलटा धबधबा. निसर्गाची एक अचाट किमया आहे ती. सह्याद्रीचं ते एकमेवाद्वितीय रूप डोळे भरून न्याहाळलं आणि परतीची वाट धरली. 

सह्याद्री मोठा अजब आहे. कधी त्याचं निरागस लोभसवाणं रूप दाखवूंन देहभान विसरायला लावेल, तर कधी त्याचा रौद्रावतार दाखवून उरात धडकी भरवेल…कधी उन्हातान्हातून फिरवून शरीर रापवून काढेल, तर कधी त्याच रापलेल्या शरीरावरून थंडगार वाऱ्याने फुंकर मारील….कधी पाण्याविना कोसकोस चालवेल, तर कधी बेधुंद पावसाच्या तुषारांची अंगावर पखरण करील….कधी काट्याकुट्यातून चालताना ओरबाडेल, तर कधी गर्द रानराईतून अल्लड मुलीप्रमाणे बागडणाऱ्या मळवाटांवरून अलगद चालवेल….कधी तापलेल्या कभिन्न कातळाचे चटके देईल, तर कधी मखमली माळावर झोपवून अंगावर शुभ्र चांदण्याची शिंपण करेल. आपण आपली शरीराची कुडी घेऊन फक्त त्याच्याकडे जायचं, तो दाखवेल त्या नजाऱ्यानं डोळे भरून घ्यायचे, ऐकवेल त्या संगीतानं कान तृप्त करायचे, ऊन, थंडी, पाऊसवाऱ्यानं शरीरातल्या धमन्या पुनरुज्जीवित करायच्या, नतमस्तक व्हायचं आणि परतायचं…. परत त्याच्याच कुशीत जाण्यासाठी…!!!

– सौरभ जोशी