परोपकारी नजर

खुप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एका संध्याकाळी एक वृध्द मनुष्य नदीच्या काठी थंडीत कुडकुडत बसला होता. त्याला नदी पार करायची होती तेवढयात त्याला घोडयांच्या टापांचा आवाज आला. उत्कंठतेने त्याने पाहिले तर, वळणारून अनेक घोडेस्वार येतांना दिसले. घोडेस्वार नदी जवळ आले. एकएक कारून सर्वजण नदी पार करू लागले. वृध्द गृहस्थ हे पहात होता. एका घोडेस्वाराचे त्याच्याकडे लक्ष गेले. घोडेस्वार आपल्या दिशेने चालत येत आहे हे पाहून वृध्द त्याला म्हणाला, राजा मला नदी पार करायची आहे, मला तुझ्या घोडयावरून नेतोस का? हो नेतो ना असे म्हणून घोडेस्वाराने त्या वृध्दास उचलून आपल्या घोडयावर चढवले. दोघांनी सुखरुप नदी पार केली. त्या वृध्दाला घोडेस्वाराने नदी पलिकडील झोपडी पर्यंत नेले. घोडयावरून खाली उतरताना घोडेस्वार वृध्दाला म्हणाला, बाबा एवढया कडाक्याच्या थंडीत नदी कडेला तुम्ही किती वेळ बसला होतात, माझ्या आधी बरेच घोडेस्वार येऊन गेले त्यांना सांगून तुम्ही नदी पार का केली नाही?

तो वृध्द हळूच घोडयावरून खाली उतरला आणि डोळे किलकिले करून म्हणाला, बाळ मी जग पाहिले आहे. अरे तुझ्या आधी जे येऊन गेले त्यातल्या कोणीही माझ्याकडे पाहिले नाही की, थंडीत का इथे बसलात म्हणून विचारले नाही. त्या उलट तु माझ्या जवळ आलास, तुझ्या डोळयात मला दयाळूपणा सहानुभूती दिसली. हेच मी जाणले आणि तुला विनंती केली.

या ह्रदयस्पर्शी बोलण्याने घोडेस्वाराला भरून आले. तो वृध्दाला म्हणाला, या तुमच्या मताबद्दल मी आभारी आहे. हे परमेश्वरा,मला माझ्या कामात इतका व्यग्र कधीच करू नकोस की मला दुस-यांबद्दल सहानुभूती वाटू नये,दुस-यांच्या मी सदैव उपयोगी पडो असा मला अशिर्वाद दे. असं बोलून घोडेस्वाराने घोडयाला टाच् मारली…..

भाषांतर : सौ. मधुरा कार्लेकर

झ-याचा स्वर

एक होता स्वर. सुरूवातीला तो खुप सुंदर गाणे गायचा. नंतर तो गाऊन गाऊन दमला. एका झ-याच्या जवळ आला. तो झरा खूप निर्मळ होता. त्याचे पाणी स्वच्छ आणि अमृतासरखे होते. त्या झर्‍यामुळे सर्वसृष्टी बहरल्यागत दिसत होती. तहान भागेपर्यंत त्या स्वराने खूप खूप पाणी प्यायले. ते पाणी पिल्या नंतर स्वराचा आवाज पहिल्यापेक्षा मधूर झाला.

तो आपल्या मधूर आवाजात गाऊ लागला. त्याच्या आवाजाने त्या सृष्टीत जणू एक एक व्याक्तीत्व उतरले असावेत. तिकडे सर्वजणं गात होते. तो झरा… ती पाने-फुले… ते पक्षी… मग झ-याने त्या स्वराला सांगितले, ‘हे स्वरा, तू जेव्हा जेव्हा माझ्याजवळ येशील तेव्हा तेव्हा तुला एक उत्सफूर्तता येईल गाणे गायला. आणि तुझ्या माधुर्याच्या रसात सर्वजणं न्हाऊन निघतील. माझ्यातलं अमृत तुला पावन करेल. ते जीवन आहे सर्वांच आणि हया सर्वांचं.

एके दिवशी स्वराच्या माधुर्याची किर्ती एका राजाला कळली. त्याने त्याला आपल्या राजमहालात ‘राज कवी’चा दर्जा दिला. राजवाडयाच्या मोहात तो आपल्या झऱ्याला आणि सृष्टिला विसरून गेला होता. आणि मग तो त्या राजवाडयात मोठया दिमाखाने राहू लागला.

तिकडे झरा, झाडे, पाने-फुले, पक्षी शांत झाले त्यांच्यातले सौंदर्यच जणू निघून गेले, झ-याचे पाणीच संपले, पाने-फुले वाळली, सर्वत्र उदास भकास वातावरण होते. इकडे दिवसेन दिवस स्वराचा आवाज खराब होऊ लागला.

मग अचानक स्वराला स्वप्न पडले की, त्याचा झरा पार सुकून गेला.. आणि त्याला वाचवण्यासाठी स्वराला तिकडे असणं गरजेचं आहे. तो चटकन उठला आपल्या राजमहालाला सोडून तो आपल्या झ-याजवळ आला….. आणि त्या झ-याचे विशिण्ण रूप पाहून झ-याला खूप रडू येऊ लागले. त्या अश्रूंचे थेंब त्या झ-यात पडले. आणि झरा थोडा सावरला, मग स्वर आपल्या स्वरात आपण केलेल्या चूक सावरून आपल्या झ-याकडे आल्याचे एक मधूर गाणे गाऊ लागला. त्याचा तो मधूर आवाज पाने-फुले, झडे, पक्षी यांना स्पर्शून गेला. आणि सर्वजणं जागी झाली. ती पण त्याचं सांत्वन करू लागली. मग आनंदाच्या अश्रूंचा पूर आला..

आणि तो झरा, तो स्वर, ती सृष्टी आजही तिकडे अशीच आहेत. निरंतर सर्वांना सुख देतात… कारण स्वराचे अस्तित्व झ-यात आहे आणि झ-याचे अस्तित्व स्वरात आहे….

शेवटी झ-याशिवाय स्वर नाही आणि स्वराशिवाय झरा नाही…..

– वैशाली गिते

सुई आणि वाघ

एक सुई चालली असते वाघाचा बदला घ्यायला. वाटते तिला शेण भेटते शेण म्हाणते, ‘सुई ताई कुठे चाललीस? मी येऊ?’

सुई म्हणते, ‘हटकलेस का मला. मी चालले वाघाचा बदला घ्यायला. चल पुढे सुई व शेण यांचा विंचु भेटतो. विंचू दोघांना विचारतो. ‘सुई ताई व शेणा कुठे चाललात ? आम्ही येऊ कां ?

विंचवाला सुई म्हणते… ‘हटकलेस का मला. आम्ही चाललो वाघाचा बदला घ्यायला. चल पुढे ह्या तिघांना एक काठी भेटते. ती ही विचारते.

‘सुईताई, शेणा, विंचवा.. कुठे चाललात? मी येऊ का?

सुई म्हणते ‘हटकलेस का आम्हाला. आम्ही चाललो वाघाचा बदला घ्यायला. चल.

सर्वजण वाघांच्या घरात येतात. शेण दारातच बसते. सुई कपाटात बसते. काठी बाथरूम मध्ये बसते, व विंचु तेलाच्या बाटलीत. असे सर्व बसतात.

थोडयावेळाने वाघ येतो. दारात शेणावर आपटतो. त्याचे कपडे मळतात. ते धुण्यासाठी बाथरूम मध्ये येतो. तेथे सपासप काठीचा मार बसतो. कपडे पार फाटून जातात. ते व्यवस्थित ठेवण्यासाठी वाघ कपाटाचे दार उघडतो. तेथे सुई वाघाला टोचतच रहाते. सर्व अंग रक्ताने भरलेले असते. म्हणून तेलाच्या बाटलीत वाघोबा आपली शेपूट घालतात. तर विंचू शेपटीला कचाकच चावतो. वाघ मरून जातो.

शेण-काठी-विंचू-सुई सर्व आनंदी होतात. वाघाचा बदला घेतात.

– सुमित कुलकर्णी

← आजीच्या गोष्टी मुख्यपान