एका दिवसांत अष्टविनायकाची यात्रा – आयर्लंडमध्ये!

विश्वास ठेवा किंवा ठेवू नका. पण गोष्ट अगदी १०० टक्के खरी आहे. परदेशगमन करणार्‍या हिंदूनी आपल्याबरोबर आपल्या देवदेवतांही नेल्या. त्यामुळे आज सर्व जगभर हिंदू देवदेवतांची देवळे बघावयास मिळतात. पण मी जे म्हणतो ते देऊळ अगदी वेगळयाच प्रकारचे आहे. पहिली गोष्ट म्हणजे हे देऊळच नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या गणपतीच्या आठ मूर्ती कोण्या हिंदू माणसाने आयर्लंडला नेलेल्या नाहीत. म्हणजेच त्याचं काय आहे की गेल्या वर्षी मी एका मराठी वर्तमानपत्रांत वाचलं होतं की आयर्लंडमधल्या एका बागेत गणपतीचे भले मोठे पुतळे बघयला मिळतात. खुद्द वर्तमानपत्रांत यापेक्षा जास्ती माहिती काही मिळू शकली नाही. म्हणून मग इंटरनेटवरून माहिती शोधून काढली आणि एका भल्या पहाटे डब्लीनकडे रवाना झालो.

डब्लीनच्या दक्षिणेला विकलो काऊंटीमध्ये राऊंडवूड म्हणून एक छोटसं खेड आहे. त्या खेडयापासून मैल दीड मैल अंतरावर Mullinaveigue (नक्की उच्चार काय आहे ते मलाही माहित नाही) नांवाचं, राऊंडवूडपेक्षाही छोटं खेड आहे. डब्लीनून राऊंडवूडला जायला दिवसाला एक बस आहे. पण राऊंडवूडपासून Mullinaveigue ला एक तर चालत जावं लागतं, नाही तर टॅक्सी! माझ्या माहितीप्रमाणे सगळया गावात एकच टॅक्सी आहे. या Mullinaveigue मध्ये व्हिक्टोरिआज वे नावाचं एक शेत आहे. हो, चक्क शेत. २२ एकरांचा विस्तार असलेलं आणि गवताखेरीज इतर काही न उगवणार हे एक शेत आहे. आणि या शेतांत गणपतीच्या या मूर्ती उभ्या केलेल्या आहेत. बसून ग्रंथ वाचन करणारा एक गणपती सोडला तर बाकीचे सर्व गणपती एक तर नाच तरी करीत आहेत किंवा वेगवेगळी वाद्ये वाजवीत आहेत. सर्व मूर्ती साधारणपणे ८ ते १० फूट उंचीच्या आहेत. काळ्या ग्रॅनिट दगडापासून घडवलेल्या या मूर्तीचे वजन प्रत्येकी ४ टनांपेक्षा जास्ती आहेत. एकूण आठ मूर्ती आहेत. गणपतीखेरीज, शंकर, दुर्गादेवी, उपाशी बुध्द आणि फणा काढलेल्या नाग अशाही मूर्ती आहेत. याखेरीज आणखीही काही मूर्ती आहेत. पण त्या ग्रॅनिटपासून घडविलेल्या नाहीत. ग्रॅनिटच्या सर्व मूर्ती महाबळीपुरम या चेन्नईजवळच्या गावात सूप्रसिध्द शिल्पकार श्री. टी. भास्करन यांनी घडविलेल्या आहेत. हे शेत आणि त्यांतला सर्व मूर्ती यांचा मालक आहे, व्हिक्टर लॅगेल्ङ या हिक्टरची हकीकत ऐकण्यासारखी आहे.

त्याचा जन्म १९४० साली बर्लिनमध्ये झाला. आईआणि वडील दोघेही ज्यू होते. दुसरं महायुध्द सुरू होण्यापूर्वी त्याचे वडील इग्लंडला आले आणि त्यांनी स्वत:चा धंदा सुरू केला. पण व्हिक्टर आणि त्याची आई जर्मनीमध्येच अडकून पडले होते. युध्द पेटल्यावर दोघेही ड्रेस्डनला गेले. ड्रेस्डनवर झालेल्या बॉम्बहल्यातून दोघेही बचावले. युध्द सुरू झाल्यावर व्हिक्टरच्या वडिलांना ते जर्मन असल्याकारणाने ब्रिटीश सरकारने तुरूंगांत टाकलं (ते ज्यू असूनसुध्दा). युध्द संपल्यानंतर लॅगेल्ड कुटूंब पुन्हा एकत्र झालं. त्यांच्या वडिलांनी आयर्लंडमध्ये नवीन धंदा सुरू केला आणि पुन्हा नव्याने जम बसवला. व्हिक्टरचं प्राथमिक शिक्षण आयर्लंडमध्ये सुरू झालं. वयाच्या १४ व्या वर्षी त्याने ठरवून टाकलं की काय वाटेल ते झालं तरी भारतात जायचं आणि साधू व्हायचं. वयाची पंचविशी गाठायच्या आतच तो भारतात येऊन पोहोचला आणि पुढची २५ वर्षे त्याने भारतात काढली. पॉंडीच्चेरीच्या अरोबिन्दो आश्रमापासून ते उत्तर – दक्षिणेकडे असलेल्या अनेक आश्रमांत राहून त्याने हिंदू धर्म, वेद, उपनिषद, बौध्द धर्म अशा वेगवेगळया विषयांचा अभ्यास केला (आणि अजूनही करतो आहे) आणि मग परत आला. त्यानंतर दोन वर्षे त्याने म्युनिक विश्वविद्यालयांत अर्थशास्त्राचा अभ्यास केला. पण त्यात मन न लागल्याने तो नाद सोडून दिला आणि पुन्हा एकदा आयर्लंडमध्ये येऊन स्थायिक झाला.

इतकी वर्षे वेद आणि उपनिषदां सारख्या गहन विषयांचा अभ्यास करूनही त्याची विनोदबुद्धी कमी झालेली नाही. आपल्या भारतीयांचे क्रिकेटवेड लक्षात घेऊन, गणपतीपुढच्या एका उंदराला त्याने क्रिकेटची टोपी घालून त्याच्या गळयात एक ट्रान्सिस्टर अडकवला आहे. आता त्याचं ”गणपती पार्क” बंद असेल तेव्हा (नोंव्हेबर ते एप्रिल) त्याला शक्य असेल तर भारताची एखादी फेरी करून येतो.

सांगायची गोष्ट अशी की अष्टविनायकाची यात्रा एका दिवसांत करता येणं शक्य आहे, खास करून लंडनवासियांना. इंग्लंडमध्ये अन्यत्र ठिकाणी किंवा यूरोपमध्ये राहणार्‍यांना फार तर दोन दिवस लागतील एवढंच.

– मनोहर राखे, लंडन