ब्रिटनमधल्या स्टीम रेल्वेज

steam इंग्लंडमध्ये १८२५ साली स्टॉक्टन ते डार्लिग्टन या मार्गावर पहिली, कोळशाच्या इंजिनावर चालणारी प्रवासी रेल्वे सुरू झाली. त्यानंतर आपल्या भारतामध्येही १६ Steam Railway एप्रिल १८५३ रोजी बोरीबंदर ते ठाणे अशी प्रवासी रेल्वे सुरू झाली. आणि मग दोन्ही देशांत संन्याशाच्या दाढीसारखी रेल्वे वाहतूक चौफेर वाढत गेली. दोन्ही देशांत गाडया कोळशाच्या इंजिनांवर चालत असत. पण कालामानाप्रमाणे नवीन नवीन शोध लागत गेले आणि पहिल्यांदा विद्युतशक्ती आणि नंतर डिझेलवर चालणारी इंजिन निघाली. चालवायला महाग, गतीने हळू व पोल्युशन अधिक या कारणांखाली, हळू हळू कोळशाची इंजिने मागे पडत गेली. एक काळ असा होता की ब्रिटनमधून कोळशाची इंजिने तर सोडाच पण सर्व रेल्वेजच नष्ट होतात की काय अशी भिती निर्माण झाली होती.

पण सुदैवाने दोन्ही देशांत रेल्वे टिकून राहिल्या. पण हे साम्य इथेच संपतं. कारण भारतांत रेल्वेची प्रगती होत राहिली, ब्रिटनमध्ये जी काय प्रगती झाली असेल ती अगदी मंद गतीने झाली (आणि होत आहे) आणि अवास्तव खर्चाची झाली. पण आणखी एक महत्वाचा फरक म्हणजे, आपल्याकडची कोळशाची इंजिने, दिल्लीच्या रेल ट्रान्सपोर्ट म्युझियम मध्ये जपून ठेवलेले थोडेफार अपवाद सोडून, मोडीत निघाली. ब्रिटनमध्ये आज देशाच्या अगदी कानाकोप-यांत स्टीम रेल्वेज चालत आहेत. फरक इतकाच आहे की त्यांचा ब्रिटिश रेल्वेशी काही एक संबंध नाही. त्या सर्व खाजगी मालकीच्या आहेत.

एखादी गोष्ट जितकी जुनी तितकी ती ब्रिटिशांना जास्ती प्रिय ही बात आता जगजाहीर आहे. आपल्या आवडीची कोळशाची इंजिन आता मोडीत निघण्याची शक्यता आहे हे लक्षांत येताच काही हरहुन्नर लोक एकत्र आले आणि त्यांनी स्वखर्चाने इंजिने, गाडयांचे डबे, स्टेशन ब्रिटिश रेल्वेजकडून विकत घेतलं आणि स्वत:च्या मालकीच्या रेल्वे कंपन्या तयार केल्या. ब्रिटिश रेल्वे आणि या खाजगी रेल्वे यांतला सर्वात मोठा फरक म्हणजे या खाजगी रेल्वेतले ९५ % अधिक कर्मचारी केवळ हौसेखातर म्हणून विनावेतन काम करतात. या हौसेपोटी हे स्वयंसेवक आपला सर्व मोकळा वेळ, या रेल्वेच्या तैनातीत खर्च करतात. त्यांत इंजिन चालवण्यापासून ते प्लॅटफॉर्म स्वच्छ ठेवण्यापर्यंत सर्व काही काम येतात. सुरुवातीला या लोकांनी चक्क मोडीत निघालेली इंजिने विकत घेतली. त्याच्यावर अविश्रांत मेहनत करून ती सर्व चालती केली आणि मग गाडयांना जोडून रेल्वे चालू केली. आज तुम्ही देशाच्या कुठल्याही भागांत असा, तुमच्या जवळपास एखादी तरी स्टीम रेल्वे असणारच. इंग्लंडच्या दक्षिणेला, आयल ऑफ वाइट म्हणून एक अगदी छोटसं बेट आहे. पण तिथेही एक स्टीम रेल्वे आहे. सृष्टीसौंदर्याच्या बाबतीत ब्रिटन फार झकास देश आहे, या एकूण एक रेल्वेज देशाच्या निसर्गरम्य भागांतून जातात. अशांपैकीच एक रेल्वे आहे, सेव्हर्न व्हॅली रेल्वे. काही काही रेल्वे एका टोकापासून दुस-या टोकापर्यंत दहा मिनिटांत पोहोचतात. सेव्हर्न व्हॅली रेल्वे किडरमिन्स्टर या गावापासून निघते ती ब्रिजनॉर्थ या तिच्या दुस-या टोकापर्यंत पोहोचायला एका तासाहून जास्ती वेळ घेते. त्यामुळे माझ्या भारतीय मनाला तिकीटाचे पैसे वसूल झाल्याचं समाधान मिळतं! या रेल्वेवर मी आत्तापर्यंत अनेक वेळा प्रवास केला. उन्हाळ्यांत केला तसाच नाताळच्या वेळी कडाक्याच्या थंडीतही केला. पण केव्हाही प्रवास केला तरी गाडीच्या खिडकीबाहेर पाहिल्यावर डोळे सुखावले नाहीत असं कधीच झालं नाही.पहिली गोष्ट म्हणजे, जवळ जवळ सर्व प्रवास गाडी सेव्हर्न नदीच्या काठाला बिलगून करते. या नदीचं पात्र आटलेलं मी आत्तापर्यंत कधीही पाहिलेलं नाही. पण काठ सोडून वर आलेलंही कधी दिसलं नाही. नदी आणि गाडी दोघी अगदी संथपणे वाहतात. उन्हाळ्यांत नदीच्या काठावर अधून मधून पाण्यांत गळ टाकून बसलेला एखादा माणूस (आणि पुष्कळ वेळा त्याची लहान मुलेसुध्दा) दिसतो. गाडीच्या दोन्ही बाजूला हिरवीगार शेत आहेत. शेतांत मेंढरांचे कळप सुस्तावून पडलेले असतात. मध्येच एखाद्या कुरणांत दोन चार घोडे चरतांना दिसतात. हिवाळ्यांत हे घोडे पेन्शनरलोकांसारखे स्वेटर घालून फिरतात. काही कल्पना नसतांना मध्येच एखादं खेडं उगवतं आणि त्यातली रंगीबेरंगी घरं पूर्णपणे डोळ्याखालून जायच्या आंतच मागे पडतं.

गाडीचं इंजिन वाफांच्या धापा टाकत आणि अधून मधून शिट्टी घालीत वाटचाल करीत असतं. किडरमिन्स्टर स्टेशन सोडल्यावर लगेचच गाडी एका मोठा बोगद्यांतून जाते. आणि थोडाच वेळांत येतं ब्यूडली हे स्टेशन. या स्टेशनवर साईडींगला अगदी जुन्या पध्दतीचे मालगाडीचे डबे उभे करून ठेवलेले आहेत. हे स्टेशन पाहिलं की मला आपल्या कल्याण स्टेशनची आठवण होते. पण तुलनेने आपलं कल्याण भलतंच अस्ताव्यस्त आहे. त्यामानाने ब्यूडली म्हणजे आपल्याकडचं लहावीट किंवा अंकाई बरोबरचं ठरेल. खरं सांगायचं म्हणजे किडरमिन्स्टर ते ब्रिजनॉर्थ हा प्रवास करताना मला आपल्या मुंबई ते नाशिक प्रवासाची आठवण होते. आता मध्ये कुठे घाट किंवा पर्वत नाहीत हे खरं आहे. पण वाटेत छोटया छोटया टेकडया आहेत.

उन्हाळ्यांत त्या अगदी हिरव्यागार झालेल्या असतात आणि पाऊस पडत असेल तर छोटे छोटे धबधबेही खिडकीबाहेर कोसळताना दिसतात. मुंबई नाशिक प्रवासाची आठवण करून द्यायला मला तेव्हढं निमित्त पुरतं. किडरमिन्स्टर पासून ते ब्रिजनॉर्थपर्यंतच्या सगळ्या स्टेशनांचे प्लॅटफॉर्म अगदी पूर्वी होते तसेच ठेवण्यांत आलेले आहेत. प्लॅटफॉर्मवर, बाजारातून कधीच नाहीशा झालेल्या वस्तूंच्या जाहिराती दिसतात. आपल्याकडल्या एखाद्या स्टेशनवर ‘डॉक्टर वामन गोपाळ यांचा सार्सापरिला’ किंवा ‘चंचला टूथ पावडर’ ची जाहीरात आज दिसली तर कसं वाटेल तसंच या जाहीराती पाहिल्यावर वाटतं. सिग्नलदेखील पूर्वीसारखे वर, खाली होणा-या लाल फळकुटांचे आहेत.

इथे युध्दपूर्व किंवा युध्दकाळांतली गाडी एखाद्या सिनेमांत दाखवायची असेल तर एखाद्या जुन्या सिनेमांतील फिल्मची कॉपी काढून ती नवीन फिल्ममध्ये चिकटवावी लागत नाही. ज्या प्रकारचं इंजिन आणि डबे हवे असतील ते इथल्या कुठल्या ना कुठल्या रेल्वेकडे तयारच असतात. फक्त प्लॅटफॉर्मवरच्या नांवाच्या पाटया बदलल्या की काम झालं. या सेव्हर्न व्हॅली रेल्वेचं आणखी एक खास आकर्षण आहे. किडरमिन्स्टर स्टेशन सोडल्यानतर काही वेळांतच गाडी चक्क एका सफारी पार्कमधून जाते. आत्तापर्यंत अनेक वेळा मी पार्कमधले जिराफ आणि इतर प्राणी गाडीकडे कुतुहलाने पहातांना आणि गाडींतले प्राणी तितक्याच उत्साहाने त्या प्राण्यांकडे पहातांना पाहिलं आहे. पण गेल्या महिन्यांत ब्रिजनॉर्थहून परत येताना, हत्तींचा एक कळपच्या कळप गाडीच्या शेजारून धावताना पाहिला. आपल्या लोकांना वाफेवर चालणा-या इंजिनांचं आकर्षण नाही अशातला मुळीच भाग नाही. मध्यंतरी भारतांत रेल्वे सुरु होऊन १५० वर्ष होऊन गेल्याबद्दलच्या समारंभात बोरीवली ते मुंबई सेन्ट्रल वाफेच्या इंजिनाची एक प्रदर्शनीय गाडी सोडण्यांत आली होती. त्यावेळी ती गाडी बघण्यासाठी जमलेली तुफान गर्दी इथल्या टी.व्ही. वर सुध्दा दाखवली होती. मला वाटतं ज्या कारणांसाठी वाफेची इंजिन सेवानिवृत्त करण्यांत आली, ती योग्यच आहेत. पण समजा महिन्यांतून एखादी अशी गाडी चालवली तर काय असं मोठं नुकसान होणार आहे? समजा मुंबई ते अमृतसर अशी गाडी महिन्यातून एकदा चालवली आणि तिचं भाडं जरी नेहमीच्या दुप्पट ठेवलं तरी गाडी हाऊसफुल्ल जाईल. ज्यांना आपल्या इष्टस्थळी पोहोचण्याची घाई आहे, त्यांच्यासाठी इतर गाडया आहेतच की.

– मनोहर राखे, लंडन