‘कणखर देशा, राकट देशा, दगडाच्या देशा’ असं वर्णन असलेल्या भूमीची आपण लेकरं आहोत. दगड ही माणसाच्या जीवनातली सुध्दा सगळयात महत्त्वाची गोष्ट आहे असं जेव्हा माझ्या लक्षात आलं तेव्हा मलासुध्दा आश्चर्य वाटलं होतं.
माणूस आदम अवस्थेत होता तेव्हा त्याची अवजारे दगडांचीच होती. विस्तव करण्यासाठी गारगोटीचे दगड एकमेकांवर घासून ठिणगी उडवली जायची.
दगडांचे घर सुरक्षित वाटल्यानंतर विविध राजांच्या राजवटींचे दिवस होते. त्या काळच्या राजांचे साम्राज्य त्यांच्या ताब्यातील किल्ल्यांवरून ठरत असे. एकजात सगळे किल्ले दगडाचे म्हणूनच भक्कम असायचे. राजांची ही आवड लक्षात घेऊनच दगडांमध्ये कोरीव काम करण्याची कला विकसित झाली असावी. मोठमोठी लेणी तयार करताना दगडच उपयोगी पडले. विसर्जन करायची मूर्ती मातीची पण मंदिरातली कायमस्वरूपी मूर्ती असते ती दगडाची.
शेतीच्या बांधाला दगड आणि विहिरीचा कठडा बांधायलासुध्दा दगडच. पिकांचं संरक्षण करायला पक्ष्यांच्या अंगावर गोफणीतून भिरकावला जातो तो दगडच. गाडी पार्क केल्यावर टायरखाली लावतात तो दगड. एका दगडात दोन पक्षी मारणारा हुशार आणि व्यवहारात हुशार नसणारा दगड. नवसाला पावणा-या पुण्याच्या सुप्रसिध्द गणपती मंडळाचे नाव दगडुशेट आणि भायखळयाच्या कुप्रसिध्द चाळीचे नाव दगडी चाळ. दंगल सुरू झाल्याबरोबर सगळयात अगोदर होते ती दगडफेक.
‘तिळा तिळा दार उघड’ असं म्हटल्याबरोबर दगडाचा दरवाजा उघडला आणि अलिबाबाचं आयुष्यच बदललं. तहानेने व्याकुळ कावळयाने तळाला असणारं पाणी चोचीपर्यंत आणण्यासाठी मडक्यात दगड टाकण्याची युक्ती लढवली होती. लंकेत जाण्यापूर्वी सागर पार करण्यासाठी वानरसेनेने प्रभुरामचंद्रांना दगडांचा सेतू बांधून दिला होता. अशा गोड गोड गोष्टींनी आपल्याला व आपल्या मुलांना घडविण्याचं काम केलं हे आपल्या कधी लक्षातच आलं नाही.
सोन्यापेक्षाही अंगठीतला राशीचा ‘खडा’ जास्त महत्त्वाचा. ‘खडा न खडा’ माहिती असणा-यांचा आदर आणि नको त्याला ‘खडया’सारखं बाजूला करायचं. बर्फाचा ‘खडा’ टाकल्याशिवाय ड्रिंकही पूर्ण होत नाही आणि ‘खडा’जंगी झाल्याखेरीज राजकीय पक्षांची बैठक. इतर आजार एकवेळ परवडतील पण ‘स्टोन’चा आजार नको रे बाबा……..
‘पत्थर के सनम’, ‘गीत गाया पत्थरोंने’, ‘फुल और पत्थर’, ‘काला पत्थर’ हे नावात दगड असणारे सिनेमे सुपरहिट होतात हा निव्वळ योगायोग आहे काय? लांबच्या प्रवासात अपेक्षित ठिकाण किती लांब आहे हे रस्तांच्या कडेला असलेल्या दगडांवर लिहिलेले असते. एखाद्या क्षेत्रातील प्रतिभासंपन्न व्यक्ती आपल्या कर्तृत्वाने खूप दूर पोहोचतात. जगभरात अशा व्यक्तिमत्वांचा ‘माईलस्टोन’ अर्थात ‘मैलाचे दगड’ असा गौरव केला जातो.
रांगेत कुणी घुसला व त्याच्याकडे वेगळया नजरेने पाहिलं की, बचावासाठी हमखास वाक्य म्हणजे, ‘मी दगड ठेवला होता.’ ओशो म्हणतात, ‘लाखों करोडो रूपये खर्च करून कृत्रिम उपग्रहातून माणसाला चंद्रावर पाठवलं. आणि तिकडून तो काय घेऊन आला तर दगडच.
कोळशाची इंजिने जाऊन विजेवर चालणारी रेल्वे आली. लाकडाच्या जागी आता काँक्रीटचे स्लिपर्स आले पण रूळांखालच्या दगडांना आजही पर्याय नाही. धान्याचे पिठात रूपांतर करायला मागची पीढी जातं वापरायची आता ते काम चक्की करते करते आणि दोन्ही ठिकाणी दगडच वापरला जातो. ग्रेनाईट आणि संगमरवरी लादी हे दगडाचेच प्रकार. पण यातून आर्थिक संपन्नतेची ओळख होते. दगडाच्या उंबरठयाला घरच्या देव्हा-याइतकेच पवित्र स्थान असते.
बुध्दीमानांना उद्याची चिंतां कधीच नसते. पण दगडांचे महत्त्वसुध्दा कायम रहाणार म्हणून मलातरी आनंद झाला. तुम्हांला नाही झाला?
– राजेश मा. सावंत