वेग

आज आपण अतिशय वेगवान युगात वावरत आहोत असे म्हटले तर वावगे होणार नाही. प्रत्येक क्रिया ही जास्तीत जास्त वेगवान होत चालली आहे. माझ्या लहानपणी गावी फोन करायचा तर ट्रंक कॉल बुक करावा लागे आणि मग काही वेळानं टेलिफोन एक्सेंजमधून आवश्यक ते सोपस्कार पूर्ण होऊन आपण फोनवर बोलू शकत असू. अगदी १९७८ पर्यंत ही परिस्थिती होती. शिवाय फोनसुध्दा अगदी कधीतरी फारच महत्वाचा निरोप वगैरे द्यायचा असेल तर केला जाई १५/- पैशाला मिळणारे पोस्टकार्ड हेच प्रमुख साधन होते. जरा विस्तृत माहिती असेल तर ‘इनलँड लेटर’.

आता ई-मेल आणि मोबाईलमुळे परस्पर संपर्काचा वेग कधी नव्हे इतका वाढला आहे. इतर गोष्टींचे देखील तसेच आहे. एखादी वस्तू क्रेडिट कार्डने विकत घेतली तर विक्रेते ‘होम डिलीव्हरी’ द्यायला सुध्दा तयार असतात. म्हणजे आपल्याला काय विकत घ्यायचे आहे ते माहीत असले तर बसल्या जागी व्यवहार पूर्ण होतो.

हा वेग खरोखरीच भयंकर आहे. आपण या वेगाशी जुळवून घेऊ शकलो तर ठीक, अन्यथा आपण मागासलेले होऊन जाऊ. आपल्या मराठी लोकांपुरते बोलायचे झाले तर हा वेग मराठी मनाला मुळीच पटलेला नाहीये.

जे लोक प्रोग्रॅमिंगसंबंधी नोकरी करीत असतील त्यांना किंवा जे लोक मिनीट अन् मिनीटाचा उपयोग करून काम करीत असतील त्यांना माझे म्हणणे चटकन् लक्षात येईल. प्रोग्रॅमिंगच्या व्यवसायात ग्राहकाला चटकन् प्रोग्रॅम करून हवा असतो. तुम्ही तासभर काम करा किंवा दिवसरात्र काम करा, एका विशिष्ट तारखेच्या आत हा प्रोग्रॅम तयार व्हायलाच पाहिजे अशी अटीतटीची लढाई असते.

अशा प्रचंड वेगापायीच जास्त वेगाने काम करणारा सर्व्हर किंवा जास्त वेगाने कनेक्ट होणारे इंटरनेट कनेक्शन ही फारच महत्वाची बाब ठरू शकते.

आपल्या सर्वांच्या अनुभवाला येईल अशी साधी गोष्ट. पूर्वी काही महत्वाचे पेपर्स ऑफिसमधून पाठवायचे असले तर ते पेपर्स घेऊन माणूस जायचा. आता बहुतेक वेळा इंटरनेटवरून ‘वर्ड’ किंवा ‘एक्सेल’ची संबंधित फाईल पाठवली जाते. व त्यामध्ये आवश्यक त्या सुधारणा होऊन परत ती आपल्योकडे येते.

मला वाटते या वेगाशी सर्वात उत्तमरित्या जुळवून घेतले आहे दाक्षिणात्य लोकांनी. बऱ्यापैकी काळे, कपाळी कुंकवासारखा गंधाचा टिळा लावणारे, चटपटीत आणि वागण्याबोलण्यात साधे असे हे लाक या वेगवान युगाशी जुळवून घेण्यात यशस्वी झाले आहेत.

आज व्यावसायिक जगामध्ये काय बरे चित्र आहे? जो वेगवान सर्व्हीस देईल तोच प्रगती करेल. जो आजूबाजेच्या लोकांशी समजुतीने घेऊन काम करू शकेल, तोच यशस्वी होईल. तुम्ही ज्या सेवा पुरविणार आहात त्याविषयी तुमचे ज्ञान अद्ययावतच पाहिजे आणि नवनवीन ज्ञानाचा प्रत्यक्ष वापर करणे ही प्रगतीच्या दृष्टिने लक्षणीय बाब ठरते. इंग्रजीमध्ये ज्याला ‘ऍप्लीकेशन ऑफ नॉलेज’ म्हणतात, ते सर्वात महत्वाचं. या ‘ऍप्लीकेशन ऑफ नॉलेज’साठी मन प्रसन्न पाहिजे. निर्भय पाहिजे. उत्साहाने युक्त आणि एकाग्र पाहिजे. आपण रोजच्या धावपळीत असे राहू शकतो का? काय केल्याने आपण रोजच्या धावपळीमध्येही उत्साही, प्रसन्न आणि निर्भय राहू शकू? अर्थात याची उत्तरे प्रत्येकजण आपापल्या स्वभावाप्रमाणे शोधतोच आहे. कोणी ट्रेकिंगला जाऊन ताजेतवाने होतात तर कोणी नामस्मरणाचा किंवा योग, ध्यानधारणेचा आश्रय घेतात, तर कोणी मस्त झोप काढतात; आणि टिव्हीसमोर पडून राहतात.

व्यवसाय करणाऱ्यांना रोज नवनवीन गोष्टी शिकाव्या लागत आहेत. आणि त्यामुळे ते वैतागल्यासारखे दिसतात. पंचावन्न#साठ वयामध्ये नव्याने शिकणे कित्येकांना नकोसे वाटते. या नव्याने शिकण्याच्या भागामध्ये कॉम्प्यूटर व त्या अनुषंगाने घडून आलेले बदल यांचाच प्रभाव जाणवतो. उदा. बँकांमधून मोठया प्रमाणात स्वेच्छा निवृत्ती घेतल्यामुळे कर्मचारीवर्ग अत्यंत मर्यादित स्वरूपाचा उरला, आता या लोकांना जास्तीत जास्त कार्यक्षम व अचूक काम करणारे व्हावे लागेल. आणि त्यासाठी कॉम्प्यूटर उत्तम प्रकारे हाताळता येणे ही प्राथमिक गोष्ट बनली आहे. वर्षानुवर्षे एकाच प्रकारचे काम केल्याने व अतिशय सुरक्षित अशा वातावरणात काम केल्याने बदलाचा हा धक्का अनेकांना त्रासदायक ठरत आहे.

एखादे पारंपरिक शिक्षण घेऊन व्यवसायाला प्रारंभ केला तरी सतत नवनवे तंत्र शिकावे लागत आहे. आणि हे तंत्रज्ञान कॉम्प्यूटरशी संबंधित असल्यामुळे कॉम्प्यूटर उत्तम प्रकारे वापरता येणे ही प्राथमिक पायरी ठरली आहे. ही पायरी आपण मराठी माणसांनी ओलांडलीच पाहिजे. त्याशिवाय आपल्याला प्रगती करता येणार नाही. तुम्ही कोणत्याही व्यवसायामध्ये असा, तुम्हाला संगणकाविषयक साध्या साध्या गोष्टींचे ज्ञान असलेच पाहिजे व ते ज्ञान तुम्ही वापरू शकला पाहिजेत म्हणजेच- ‘ऍप्लीकेशन ऑफ नॉलेज’ पाहीजे.

आज कित्येक घरांमध्ये कॉम्प्यूटरचा उपयोग फक्त MP3 गाणी साठवून ठेवण्यासाठी, गाणी ऐकण्यासाठी, व गेम्स खेळण्यासाठी होतो. ठीक आहे. पण एवढयावरच थांबू नका. आज अतिशय उत्तम अशी कम्प्यूटर शिकविणारी पुस्तके उपलब्ध आहेत. ती इंग्रजीमधून असली तरी अतिशय सोप्या प्रकारे कम्प्यूटर शिकवितात. त्यांचा लाभ घ्या. आणि कमीत कमी कॉम्प्यूटर उत्तम प्रकारे ऑपरेट करता येईल एवढी तयारी करा. म्हणजे आपसूकच आपल्या प्रगतीच्या काळ-काम-वेगाचं त्रैराशिक नियतीला मांडता येईल. ‘सदैव सैनिका पुढेच जायचे’ या भावनेनं व्यावसायिक क्षेत्रात काम केल्यास यश हे हमखास आपलंच असेल!!

– मंदार करमरकर