एक असाही अनुभव

२६ डिंसेबंर रोजी काळरात्री सुनामी लाटांनी जे काही तांडव केले आणि त्यामुळे जे जे काही घडले ते सर्वांना माहिती आहेच. रोज वर्तमानपत्र, टेलिव्हिजनवरील बातम्या यांमध्ये ते सर्व पाहून मन इतके हेलावून जात होते की बस. त्यातच सर्वांना मदतीचे आवाहन केले जात होते. वेगवेगळया स्थरातून मदतीचा ओघ चालूच होता, तरीसुध्दा परिस्थिती इतकी भयानक होती की त्यावर विचारच करवत नव्हता. अनाथ झालेली मुले, उध्वस्त झालेले संसार, आपल्या माण्सांच्या शोधातील नातेवाईक, प्रेताचे ढीगच्या ढीग, चार घास अन्न मिळावे म्हणून प्रतीक्षा करणारे सुनामी पिडीत. हे सर्व दृष्य इतके भयानक दिसत होते की इतक्या दूर असूनही हे सर्व पाहुन अश्रू आवरता येत नव्हते. प्रत्येकजण आपआपल्या परिने मदत करण्याचा प्रयत्न करत होते. थोडक्यात दगडालाही पाझर फुटावा अशीच ती परिस्थिती होती.

त्याच काळात एका गुरुवारी ऑफिसमधून घरी आल्यावर मला मार्गर्शिष महिन्यातील गुरुवारच्या महालक्ष्मी व्रताचे उद्यापन करायचे होते आणि त्यासाठी बायकांना हळदीकुंकवाला बोलवायचे होते. ह्या सर्व परिस्थितीत मूड तर नव्हताच, पण करनेही आवश्यक होते. तेव्हा मनात एक विचार आला की ह्या व्रताच्या दिवशी जर माझ्याहातून एखादे चांगले समाजकार्य घडले तर खरोखरीच हे व्रत सफल होईल. हा विचार जसा मनात आला तसे विचारचक्र सुरु झाले. सक्रांतीचा सण आलेलाच होता तेव्हा मनात विचार आला की सर्व बायका संक्रातीला ए कमेकींना हळदीकुंकवाला बोलावतात वाण लुटतात मग ह्या कार्यक्रमासाठी होणारा खर्च जर सर्वांनी मिळून एकत्र जमा केला आणि मंदिरात जमून फक्त हळदीकुंकू व तिळगुळ देऊन जमा झालेली रक्कम सुनामीग्रस्तासाठी दिली तर किती बरे होईल? पण हा माझा विचार होता आणि तो त्या दिवशी माझ्याकडे हळदीकुंकवाला येणा-या बायकांना मला पटवायचा होता. मनात अनेक शंका होत्या, कोणाला हे पटेल का? कोणी तयारी नाही दाखवली तर? पैसे जमा करताना बायका कितपत विश्वास दाखवतील? पण दुसरे मन म्हण्त होते प्रयत्न करुन बघायला काय हरकत आहे? आणि बस मग काहीही होवो आपला विचार तर मांडायचा हे नक्की केले.

संध्याकाळी घरी आलेल्या प्रत्येकी पुढे मी माझी कल्पना मांडली आणि काय आश्चर्य! सर्व जणींनी त्याला चक्क जास्त विचार न करता झटकन अनुमोदनच दिले, झाले मनातील सर्व शंका कुशंकाना थाराच राहीला नाही कुठे. मग एक रविवारी ठरवुन सर्व जणी सोसायटीतील गणेशमंदिरात जमलो. ठरल्याप्रमाणे हळदीकुंकू व तिळगुळाचा कार्यक्रम यथासांग पार पडला. मग प्रत्येकीने यथाशक्ती सुनामीग्रस्तांसाठी मदत दिली. त्या दिवशी खरोखरीच मला इतके बरे वाटले, कारण कुणीही कुठल्याही प्रकारे आढेवेढ़े न घेता हे सर्व केले आणि त्यातूनच माणसातील माणूसकीचे योग्य दर्शन घडवून दिले.

आमची जी रक्कम जमली होती ती काही फार मोठी नव्हती, पण स्वत:ची हौस बाजूला ठेवून, आपल्या पतीच्या दिर्घायुष्यासाठी ही जी सक्रांतीचे वाण लुटण्याची प्रथा आहे ती सुध्दा थोडी बाजूला ठेवून जी मदत केली ती नक्कीच कुणातरी सुनामीग्रस्त स्त्रिच्या कुंकवाच्या धन्याला उपयोगी पडली असेल आणि त्यानी जे आशिर्वाद दिले असतील ते आमच्यासाठी किती लाख मोलाचे आहेत. मी तर म्हणेल देवाने तस्थातू म्हणून दिलेल्या वरदानापेक्षा कितीतरी मोलाचे आहेत कारण देव हा माणसातच आहे हे तेवढ़ेच सत्य आहे.

त्यादिवशी मला माझे महालक्ष्मीव्रत सफल झाल्याचाही आनंद झाला आणि इतक्या भयानक परिस्थितीत लागणा-या मदतीसाठी मी व माझ्या सोसायटीतील बायकांनी जो खारीचा वाटा उचलला याचा खरोखरीच आनंद वाटला. आणि हा अनुभव ही आम्हा सर्वांसाठी खरोखरीच अदभूत होता.

– सौ. मनिषा नवले