परदेशातील गणेशोत्सव

सालाबादाप्रमाणे ह्या वर्षीसुध्दा ईस्ट बे मराठी मंडळाने ‘ई. बी. एम्. एम्’ आपला गणेशोत्सव रविवार दिनांक ११ सप्टेंबर २००५ रोजी व्हेटरन्स ममोरियल बिल्डींग, प्लेझंटन, कॅलिफोर्निया येथे धुमधडाक्यात साजरा केला. ईस्ट बे मधील इच्छुक मराठी भाषिकांना सामावून घेण्याच्या उद्देशाने ह्या सुमुहुर्तावर ‘ई बी एम एम’ हे नविन व्यापक नाव पूर्वाश्रमीच्या (टी व्ही एम एम) ट्राय व्हॅली मराठी मंडळाने धारण केले.

यंदाचे हे आमचे पाचवे वर्ष! कार्यक्रमांच्या आखणीला ह्या वर्षी सुरुवात जरा उशीराच झाली. याहू ग्रूपचा वापर करून कार्यकारी समिती स्थापन झाली. पहिली बैठक १३ ऑगस्टला श्री. नितीन गांधी यांच्या घरी झाली. श्री. प्रसाद देशमुख ह्यांची एकमुखाने प्रमुख म्हणून निवड झाली. सौ. अंजली व नितीन गांधी, श्री. विलास ठुसे, सौ. नेहा कुलकर्णी, सौ. वर्षा उपाध्ये, सौ. शारदा कुलकर्णी, सौ. दीपाली हर्ष, सौ. गौरी अभ्यंकर, सौ. चारूता व मिलींद वैद्य, सौ. अंजली करंदीकर, सौ. निवेदीता फडणीस, सौ. अंजली इनामदार, सौ. शिल्पा खेर, सौ. अनुपमा भोंगळे, सौ. दीपाली देशपांडे इ. उत्साही कार्यकर्त्यांच्या समुदायातून खाद्य समिति, पूजा समिती, सांस्कृतिक कार्यक्रम समिती, देणगीदार समिती, सभागृह समिती, स्मरणिका समिती अशी कामाची विभागणी झाली.
कार्यकारी समितीने अपार मेहेनत घेतली. प्रत्येकाने जणू काही आपले घरचे कार्य समजून कष्ट केले. श्री. नितिन गांधींनी वेबसाईट सुविधा उपलब्ध करून दिली. श्री. विलास ठुसे ह्यांनी दोन दिवसांत www.ebmm.org वेब साईट तयार केली.

सौ. वर्षा उपाध्ये व सौ. अश्विनी नाईक ह्या दोघींच्या कौशल्यामुळे देणगीदारांकडून देणग्यांचा एवढा वर्षाव झाला की, त्यामुळे सभासदांमध्ये एक आगळेच चैतन्य निर्माण झाले. प्लेझंटनमध्ये नव्यानेच सुरू झालेल्या बॉम्बे आईस्क्रीमच्या मालकीण श्रीमती भारती परमार ह्यांच्या औदार्याने प्रसाद भोजनाची व्यवस्था झाली. सिटी बँक एन आर आय बिझिनेसने अतिशय उदार देणगी दिली. श्री. सुनिल व सौ. प्रीती चितगोपेकर ह्यांच्या सहकार्याने व अविश्रांत कष्टांमुळे आमुची स्मरणिका वेळेत छापून तयार झाली.

कार्यक्रमाची सुरूवात सकाळी दहा वाजता सौ. दीपाली हर्षची विलोभनिय सजावट व श्री. विलास ठुसे ह्यांच्या कुशल पौरोहित्याखालील श्री. गणेशाच्या प्रतिष्ठापनेने झाली. श्री. राहूल व सौ. शारदा कुलकर्णी ह्यांच्या हस्ते पूजा झाल्यावर अथर्वशिर्षाची अकरा आवर्तने आटोपून उपस्थितांनी लज्जतदार प्रसाद भोजनाचा मोदकांसह आस्वाद घेतला.

त्यानंतर कॅलिफोर्नियातील नावाजलेले गायक श्री. अदित कुळकर्णी व त्यांच्या सुकन्या सौ. अनुजा सुर्लकर ह्यांनी सादर केलेल्या मराठी सुगम संगीताचा ‘भाव सरगम’ हा बहारदार कार्यक्रम प्रेक्षकांची मने जिंकून गेला. श्री. सतिश तारेंची तबल्याची साथ व सौ. सुरश्री. रास्तेंची कीबोर्डची जोड सर्वांची वाहवा मिळवून गेली.

सौ. वंदना चिंचणकर ह्यांचे पिता श्री. वसंराव सरदेसपांडे ह्यांच्या हस्ते भावसरगमच्या कलाकारांचा उचित सत्कार करण्यात आला. श्री. राहूल कुलकर्णी ह्यांचे पिता श्री. विश्वनाथराव ह्यांच्या हस्ते लकी ड्रॉ च्या विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली.

सौ. नेहा कुलकर्णी ह्यांच्या समयोचित खुमासदार निवेदनाने पूर्ण समारंभाला एक वेगळीच रंगत आणली. नेहेमी प्रमाणे सौ. योगिनी व रोहन पारखींनी सर्व उपस्थितांसाठी बाटलीबंद शुध्द पाण्याची चोख व्यवस्था केली.

मुलांचे विविध कार्यक्रम सौ. गौरी अभ्यंकर, सौ. शिल्पा खेर, व सौ, अंजली इनामदार ह्यांनी इतक्या कौशल्याने हहाताळले की तब्बल दोन तास चाललेल्या गाण्यांच्या कार्यक्रमांत सुमारे ३० मुले शेजारच्याच हॉलमध्ये आहेत ह्याचा त्यांच्या पालकांनासुध्दा विसर पडला.

दुपारी चार वाजता उत्तर पूजा, आरती, वाटल्या डाळीचा प्रसाद आणि गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या गजरात ह्या अत्यंत सुसुत्रबध्द आयोजित केलेल्या उत्कृष्ट गणेशोत्सवाची सांगता झाली.

ह्या वर्षी आम्हाला काही अनपेक्षीत अडचणी आल्या उदा. दोन दिवस आधी आम्हाला सूचना मिळाली की ठरलेली ध्वनी योजना, ध्वनी तंत्रज्ञ व कथाकथनाचे कलाकार उपलब्ध होणार नाहीत. परंतू श्री. नितीन गांधीचे कुशल मार्गदर्शन, श्री. विलास ठुसे ह्यांची कार्यतत्परता, कार्यकारीणीच्या सर्व सभासदांचे प्रोत्साहन, ‘भाव सरगम’ च्या कलाकारांचे बहुमोल सहकार्य आणि अर्थातच विघ्नहर्त्याचे आशिर्वाद अशा सुरेख संगमामुळे आम्ही सर्व संकटातून सहीसलामत बाहेर पडलो. श्री. विलास पाटील ह्यांनी श्री. गांधीना ध्वनी संयोजनात मोलाची मदत केली. अश्या ह्या संस्मरणीय प्रसंगाची क्षणचित्रे टिपण्याचे व चित्रिकरणाचे बहुमोल काम अंकुर ठुसे याने केले. संघभावनेचा व सहकार्याचा एक सुंदर आविष्कार श्री. गणेशाच्या साक्षीने उपस्थित सुमारे अडीचशे सभासदांना अनुभवायला मिळाला. संमारंभाची क्षणचित्रे पाहण्यासाठी

आमच्या वेबसाईटला www.ebmm.org
एकदा आवश्य भेट द्या आणि आपला अभिप्राय जरूर कळवा. मंगलमूर्ति मोरया.

– ई. बी. एम. एम कार्यकारीणी मंडळ