जादू अशी घडे या दोन लोचनांची

विलक्षण अस्वस्थ मनाने मिलिंद हॉस्पीटलच्या पायऱ्या झपाझप चढून धावतपळत लिफ्टपाशी पोहोचला देखील! काही मिनीटातच तो त्याच्या लाडक्या मेघनेच्या बेडपाशी जाऊन पोहचला. अर्धवट ग्लानीत असलेल्या डोक्याला बँडेज गुंडाळलेल्या मेघनेच्या चेहऱ्याकडे पाहत त्याचे डोळे अश्रुंनी भरून आले तेवढयात मेघनेच्या रूममध्ये आलेल्या डॉक्टरांना आपल्या डोळयातील अश्रूंना महत्प्रयासाने बांध घालीत त्याने विचारले, ‘डॉक्टर, माझी मेघना ठीक होईल ना?’

‘सारं काही ठीक होईल मिस्टर देशमुख, Have a patience please! तुमची मन:स्थिती मी समजु शकतो.. पेशंटची स्थितीही एकदम नाजूक आहे. त्यांना पूर्ण विश्रांतीची गरज आहे म्हणून सांगतो… तुम्ही एकदम शांत रहा बरं…!’

डॉक्टर काही आवश्यक त्या सुचना नर्सेसना करुन गेल्यानंतर मेघनेपाशी असलेल्या एका चेअरवर तो विसावला. मेघनेच्या मेंदूचे एक छोटेसे ऑपरेशन करावे लागले होते. आज ऑपरेशनचा दुसरा दिवस होता. मिलींदच्या मनावरही झालेल्या घटनेचा विलक्षण ताण पडला होताच… गेल्या काही महिन्याचा चित्रपटच मिलिंदच्या मिटलेल्या डोळयासमोरून सरकू लागला. त्यांच्या पहिल्या भेटीच्या क्षणापासून ते या क्षणापर्यंत घडलेल्या साऱ्या गोष्टी मिलिंदच्या नजरेसमोर साकारू लागल्या.

मेघना अन् मिलिंद दोघेही संगीतप्रेमी जीव! कॉलेजचे शिक्षण घेता घेता कॉलेजच्या आंतरमहाविद्यालयीन गायनाच्या स्पर्धेत दोघांनीही द्वंदगीत गाऊन कॉलेजला बक्षीस मिळवून देले होते.

‘पहिलीच भेट झाली अन् ओढ ही युगाची
जादू अशी घडे या दोन लोचनांची’

दोघांनीही गायलेल्या द्वंदगीतातील गाण्याच्या बोलाप्रमाणेच सारे काही घडत गेले. नजरेच्या पहिल्याच भेटीत ते एकमेकांचे कधी झाले ते त्यांना कळलेसुध्दा नव्हते. मेघनेच्या सोनपाऊलांनी देखण्या मिलिंदच्या आयुष्यात प्रवेश केला अन् पाहता पाहता मिलींद आपल्या क्षेत्रात यशाच्या शिखरावर जाऊन पोहचला. लक्ष्मी आणि सरस्वती या दोन्ही देवता आज या घडीला जणुकाही त्याच्यासमोर हात जोडून उभ्या होत्या पण मनाने अन् वृत्तीने निर्गर्वी असलेल्या मिलिंद मेघनेचा स्वभाव पूर्वी एवढाच निर्लेप वृत्तीचा राहीला होता.

लग्नापूर्वीच्या त्यांच्या भेटीत एकत्र कुटुंबात राहण्याचा हट्ट करणारी मेघना पाहून त्याला स्वत:च्या भाग्याचा हेवा वाटला होता. उक्तीप्रमाणे कृतीही मेघनेने तेवढयाच आत्मविश्वासाने करून दाखविली होती. त्याच्या आईवडिलांना जणू लेकीची मायाच सुनेच्या रुपाने मिळाली होती. अवखळ अन् अल्लड नंणदेला तिचे हट्ट पुरवणारी लाडकी प्रेमळ वहिनी मिळाली होती. दोघांच्या संसारवेलीवर अमृता नि अखिलेश सारखी दोन सुंदर फुलेही उमलली होती. दोघेही तृप्त होती. आनंदात होती. मनाप्रमाणे पत्नी मिळाल्याच्या असीम समाधानात मिलिंद होता पण त्याला मेघनेच्या स्वभावातील एकच गोष्ट एकसारखी खटकत असे ती म्हणजे कुटुंबातील सर्वांचे स्वत: धावुन सारं काही करण्याचा तिचा हट्ट काही औरच होता. अन् त्यात तिला एक विलक्षण आत्मिक असं समाधान लाभत असे.

पतिपत्नींच्या वादाचा मुद्दा हाच होता की अमृता, अखिलेशच्या जन्मानंतर तरी मेघनाने काही कामे नोकरांवर सोपवावी असा मिलिंदचा हट्ट होता पण मेघना त्याचे जाम ऐकायलाच तयार नव्हती. माझ्या मुलांचे संगोपन मीच करणार कारण त्यांना आईच्या ममतेचा स्पर्श हा व्हायलाच हवा, तुमच्या आईवडिलांचीही सेवा मीच करणार कारण त्यांना माझे आर्इाडिलच मानत असल्याने माझ्या मनाला वेगळेच समाधन मिळत राहते अन् माझ्या लाडक्या नणदेचे हट्टही मीच पुरवणार अशी तिची दुराग्रही भूमिका पाहून मिलिंद चुपच बसत असे. नोकरचाकर का मायेने आपल्या माणसांचे करणार आहेत? असा तिचा बिनतोड सवाल मिलींदला असे.

परिणामी मिलिंदचे ऑफिसर मित्र त्यांच्या पत्नीसह घरी कधी आले तर स्वत:चा जामानिमा आटोपायपर्यंत सुध्दा मेघनेला वेळ मिळत नसे. कशीतरी तयार होऊन ती पाहुण्यांचे आगतस्वागत करीत असे त्यांचा पाहुणचारही व्यवस्थित करत असे पण हा उसना उत्साह पाहुणे असेपर्यंत टिकत असे ते निघून गेल्यानंतर मात्र ती विलक्षण थकून जात असे.

पण हे सारं चाललं होतं तिच्या मनस्वी हट्टापायी! आज तर लग्नाचा पाचवा वाढदिवस होता आदल्या दिवशीच तिने मिलिंदला वारंवार बजावून ठेवले होते की उद्याचा पूर्ण दिवस तुम्ही आम्हाला पाहिजे बरं नाहीतर सांगल काहीतरी कारण! उद्या मला कसलीही सबब चालणार नाही असं तिनं सांगताच लग्नाच्या वाढदिवसाची त्यालाही आठवण झालीच. त्याच्या मिस्कील स्वभावानुसार त्याने तिला पहिल्याच नजरेची पहिल्याच भेटीची आठवण करून दिली होती अन् अवखळपणे ‘जादू अशी घडे या दोन लोचनांची’ म्हणत म्हणत तिला चिडवून बेजार केले होते. अन् तीही पहिल्याच भेटीप्रमाणे लाजून चूर झाली होती.

लग्नाच्या वाढदिवसाला मिलिंदसाठी त्याच्या आवडत्या रंगाचे सूटिंग शर्टिंग खरेदी करण्यासाठी, तिच्या चिमुकल्यांसाठी खाऊ, खेळणी आणण्यासाठी, आईबाबांच्या आवडीप्रमाणे त्यांना ज्ञानेश्वरी आणून देण्यासाठी मेघना सकाळीच बाहेर पडली मिलिंदला वारंवार बजावून सांगत – आता अर्ध्या पाऊण तासात येते मी असं म्हणत तिने कारच्या चाव्या हातात घेतल्या, अन् अग, ‘अग किती धावपळ करशील तु? माझं काही ऐकणार आहेस की नाही?’ – या मिलिंदच्या रागवण्याला न जुमानता खळाळणाऱ्या निर्झराप्रमाणे हसत हसत ती पोर्चच्या पायऱ्या उतरून कारपर्यंत पोहचली देखील! मी येईपर्यंत आपल्या या दोन्ही बछडयांकडे लक्ष ठेवा बरं का..! असं मिलिंदला म्हणत म्हणत तिने कार सुरू देखील केली. लग्नाचा वाढदिवस, आईबाबांचे वाढदिवस, मिलींदसह लाडक्या नणदेचा वाढदिवस अन् आपल्या अमृता अखिलेशचे वाढदिवस आनंदाने साजरे करण्याचा मेघनेच्या स्वभावाचा स्थायी भावच होता.

एक मिलिंदचा थोडा कुरकुरा स्वभाव सोडला तर ती कमालीची सुखी होतीच पण आपल्याच माणसाचे गुणदोष सारख्याच ममतेने पेलण्याची तिची तितकीच जिद्द मोठी होती. मनात येणाऱ्या विचारांच्या तरंगाबरोबर आज घरी लवकर जायला पाहिजे या ध्यासाने तिने आपली कार खेरेदी झाल्यानंतर भन्नाट वेगाने सोडली होती. मिलिंदवर तिने आपल्या छोटया बाळाला अखिलेशला कधीही सोपवले नव्हते. अमृता, अखिलेशचे निरागस चेहरे एकसारखे तिच्या नजरेसमोर येत होते… लवकर ये हं मुली ..आईबाबांच्या प्रेमाच्या बोलण्याने तिला आतल्या आत गहिवरून आले होते. आता बस्! काही मिनीटातच ती आपल्या घरी पोहचणार होती. मेघनाने विचारांच्या भाऊगर्दीत ऍक्सिलेटरवर पाय देऊन कारचा वेग आणखीनच वाढवला तोच तिच्या कारसमोरून रस्ता क्रॉस करू पहाणाऱ्या 9-10 वर्षाच्या लहान मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात तिची कार तिचा तोल गेल्यामुळे फूटपाथवरील एका छोटयाशा पुस्तकांच्या दुकानावर जाऊन आदळली.

क्षणार्धात तिचे भान हरपले होते. नेमके काय होते आहे हे न कळताच ती बेशुध्द झाली होती. जोरात कार आदळयाने तिच्या मेंदूला जबरदस्त मार लागला होता. पहाता पहाता तिथे लोकांची गर्दी जमली. गर्दीत जमलेल्या मिलिंदच्या दोघा मित्रांनीच त्यांची वहिनी मेघनाला हॉस्पीटलमध्ये तात्काळ ऍडमीट केले अन् मिलिंदला फोनवरून अपघाताचे वृत्त सांगितले…

क्षणभर हे सारं एकताक्षणीच मिलिंदच्या डोळयासमोर अंधेरीच आली काही वेळापूर्वीच मेघना आपला निरोप घेते काय अन् हा अपघात होतो काय? स्वत:ला सावरून धरत, आईबाबांना धीर देऊन अमृता, अखिलेशला बहिणीच्या हवाली करून ताबडतोब मिलिंद हॉस्पीटलमध्ये पोहचला देखील! तेव्हा डॉक्टरांनी त्वरीत उपचार सुरू केले होतेच पण मेघनाचे मेंदूचे छोटेसे ऑपरेशन करावे लागणार हे कळताच त्याच्या पायातील शक्तीच गेली, तो अक्षरश: हतबध्दच झाला पण त्याही परिस्थितीत स्वत:च्या मनावर ताबा ठेवून त्याने ऑपरेशनसाठी सही केली ती त्याच्या थरारणाऱ्या हातनेच.

परमेश्वर कृपेने ऑपरेशन यशस्वीरीत्या पार पडले. आज ऑपरेशनचा दुसरा दिवस होता अजुनही ती ग्लानीतच होती. विचारांच्या आवर्तनामध्ये असतांनाच मिलिंदच्या कानावर असफुटशी हाक एकू आली, ताबडतोब तो मेघनेपाशी धावलाच हळुहळु शुध्दीवर येणाऱ्या मेघनेला पाहून त्याला परमेश्वराचे किती आभार मानू अन् किती नाही असे झाले.

मेघनेला एकसारखं बोलण्यापेक्षा आईबाबंचे करण्यात आपल्या चिमुकल्यांचे संगोपन करण्यात आपणही तिच्याच बरोबरीने हातभार लावला तर? या विचारसरशी त्याच्या मनावरचा विलक्षण ताण कमी झाला अन् सर्नस्वसमर्पणा बरोबरच त्याच्या कुटुंबियांसाठी अहोरात्र आनंदाने राबणाऱ्या मेघनेच्या निरागस चेहऱ्याकडे तो कौतुकाने पहात राहिला. जणु काही परमेश्वराने या प्रसंगातून तिच्याकडे पाहण्याची त्याला नवी दृष्टीच दिली होती.

आपल्या आईवडिलांवर प्रेमाचा वर्षाव करताना ही धन्यता कां मानते? आपल्या चिमण्या बाळांच्या ओठावरचं लडिवाळ हसु आणण्यासाठी जिवाचं रान का करत असते? आपल्यासाठी तर जणु प्राणांची कुरवंडी करण्यासाठी कोणत्याही क्षणी ती तयार असते? आपल्या लहान बहिनीवर ममतेचा वर्षाव कशी करत रहाते? या साऱ्या प्रश्नांची उत्तरे मिलिंदला तिच्या डोळयातील समर्पणाच्या उत्कट भावनेनेच दिली होती. आनंदाश्रूंनी भरलेल्या त्याच्या डोळयासमोर गाण्यातल्या ओळी दिसु लागल्या

‘पहिलीच भेट झाली जडली अपूर्व बाधा
स्वप्नांत दंग झाली जागेपणात राधी
माझी न राहीले मी किमया अशी कुणांची?
जादू अशी घडे ही या दोन लोचनांची’

– सौ शोभना मांडवगणे