लंडनचा गणेशोत्सव

१८ सप्टेंबरला दुपारी साडेतीनच्या सुमारास लंडनच्या महाराष्ट्र मंडळांत मोठया थाटामाटांत श्री गणेश मूर्तीची स्थापना होऊन या वर्षीच्या गणेशोत्सवास सुरुवात झाली. त्या नंतरचे १० दिवस रोज संध्याकाळी महाराष्ट्र भवन गजबजून जात होतं. आरत्या आणि गणपतीबाप्पा मोरयाच्या ललकाऱ्या लोकांच्या कंठांतून मुक्तपणे निघत होत्या. दहांपैकी सहा दिवशी संध्याकाळी स्थानिक कलावंतांचे मनोरंजनाचे कार्यक्रम झाले आणि अनंत चतुर्दशीच्या संध्याकाळी, बाप्पा जितक्या थाटामाटाने आले तितक्याच थाटामाटाने विसर्जनासाठी रवाना झाले.

दर वर्षी या उत्सवांत एक संध्याकाळ बाल कलाकारांनी सादर केलेल्या मनोरंजनाच्या कार्यक्रमांसाठी राखून ठेवली जाते. आणि जवळ जवळ प्रत्येक वर्षी ही बाल मंडळी आपल्या मोठया बंधू भगिनी किंवा त्याहूनही मोठया वयाच्या कलाकारांवर मात करून जातात. वय वर्षे अडीच त नऊ मधले ह कलाकार या वर्षीही त्या परंपरेला जागले. इतरांचं मला माहीत नाही. पण टाळया वाजवून वाजवून शेवटी माझे हात दुखायला लागले. मला वाटतं ही परंपरा जर अशीच पुढे चालू राहीली तर बॉलीवूडच्या तोडीस तोड म्हणून इथे लॉनीवूड तयार होईल. या वेळच्या बाल कलाकारांच्या कार्यक्रमाबाबतीत एक गोष्ट मुद्दाम नमूद कराविशी वाटते. कार्यक्रमाच्या अगदी शेवटी मंडळाचे स्वत:चे खास तबलापटू श्री. मधुकरराव कोठारे यांच्या ३ शिष्यांचं तबलावादन झालं. एक गोष्ट सिध्द झाली. मंडळाला यापुढे कधीही उत्कृष्ट तबलावादकांची कमी पडणार नाही.

लंडनमध्ये महाराष्ट्र मंडळ गेली कैक वर्षे स्थापित झालेलं आहे. पण मंडळाची स्वत:ची वास्तू (महाराष्ट्र भवन) १९८९ साली झाली. १९९१ साली श्री. सुधाकरराव खुर्जेकर (मंडळाचे अध्यक्ष) आणि श्री. कुमारराव तळपदे (सेक्रेटरी) या दोघांनी मंडळांत गणपती बसविण्यास सुरुवात केली. या गणपतीचं वैशिष्टय असं की ही गणपतीची मूर्ती श्री. तळपदे स्वत: घरी बनवतात. दर दोन वर्षांनी नवीन मूर्ती बनवायची असा त्यांचा नियम आहे आणि १९९१ पासून तो त्यांनी आजपर्यंत पाळला आहे. अत्यंत नम्र स्वभावाचा हा शिल्पशात्रज्ञ, श्रावण महिन्याच्या पहिल्या आठवडयांत मूर्ती घडवण्यास सुरुवात करतो आणि गणेश चतुर्थीच्या दोन दिवस अगोदर मूर्ती मंडळांत हजर होते. तळपद्यांची हौस एव्हडयावरच भागत नाही. गणपतीचं मखर आणि मखरापुढची/मागची आरासही ते तितक्याच उत्साहाने करतात. या कामी त्यांना श्री. अरुणराव मंत्री, जैलेशराव देशपांडे, मिलिंदराव देशमुख इ. मंडळाचे उत्साही सभासद हातभार लावतात. नुकतंच मंडळाचं विस्तारकरण झालं. त्या विस्तारकरणाचे नकाशे तळपद्यांनीच काढले होते. एव्हढं सगळं करूनही त्यांचा हुरूप किंवा मंडळाविषयीची आस्था जरादेखील कमी होत नाही. कारण मंडळाचं नाटक असलं की सेट्स उभे करायला हातांत खिळे आणि हातोडी घेऊन तळपदे हजर असतात. भवनाच्या स्टेजवर नाटकाची तालीम चालू असतांना, हॉलच्या कुठल्यातरी एका कोपऱ्यात तळपदे सेटची जुळवणी करतांना दिसले नाहीत तर तालीम करणाऱ्यांनाही चुकल्याचुकल्यासारखं होतं. एव्हढी सगळी धडपड मेहेनत केल्यानंतर, कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शनासाठी मंडळाचे अध्यक्ष उभे राहीले की तळपद्यांना हॉलच्या कुठल्यातरी कोपऱ्यातून हुडकून काढून स्टेजवर आणावं लागतं.

मंडळाचा गणपती फ़क्त गेली १३/१४ वर्षे बसत आला आहे. पण लंडनमध्ये सार्वजनिक गणपती बसवायची प्रथा सुरु केली ती आजीबाई बनारसे यांनी. आजीबार्इंच्या घरी पहिल्यांदा गणपती बसला तो १९५३ साली. त्या गोष्टीला आता पन्नासहून अधिक वष होऊन गेली. पण अजूनही आजीबार्इंच्या घरी नित्यनेमाने दर वर्षी गणपती येतो. मंडळाचा गणपती सुरु होण्यापूर्वी बरीच मराठी मंडळी गणपती दर्शनासाठी आजीबार्इंच्या घरी जमत असत. अजूनही ती मंडळी, मंडळातल्या गणपतीचं दर्शन घेऊन झालं की आजीबार्इंच्या घरी जातात. काशीला गंगास्नान घडलं की सेतू दर्शनासाठी रामेश्वरला जावं त्यातलाच प्रकार. आज आजीबाई नाहीत. पण त्यांनी सुरु केलेली परंपरा त्यांचे जावई श्री. आत्मारावराव जिरापुरे चालू ठेवीत आहेत.

अलिकडे अलिकडे तर रेडींग, बर्मिगहॅम, लेस्टर अशा ठिकाणीसुध्दा सार्वजनिक गणपती बसू लागले आहेत. हे असंच चालू राहिलं तर इंग्लंडमध्येसुध्दा अष्टविनायकाची यात्रा करणं शक्य होईल! स्वातंत्र्यलढयाला चालना देण्यासाठी १८९६ साली सार्वजनिक गणपती उत्सवाची युक्ती लढवणाऱ्या बाळ गंगाधरांचा आत्मा, हे पाहून नक्कीच खूश होईल.

मंडळांत गणपती बसायला सुरुवात झाली त्यावेळी पहिल्या पहिल्यांदा जेमतेम १००/१५० लोक दर्शनासाठी येत असत. पण पुजा, आरत्या वगैरे व्यवहार अगदी शास्त्रशुध्द पध्दतीने केले जातात हे जेव्हा इतर लोकांपर्यंत पोहोचलं तसतशी गर्दी वाढू लागली. या वर्षी गणेश चतुर्थीच्या दिवशी जवळ जवळ १००० गणेशभक्त दर्शन घेऊन गेले. ही चढती भाजणी अशीच चालू राहिली तर आणखी एक दोन वर्षांनी मंडळाला केवळ गणेशोत्सवासाठी दुसरा एक मोठा हॉल भाडयाने घ्यावा लागेल! हा उत्सव सर्व दृष्टीने यशस्वी करण्यास ज्यांचा ज्यांचा हात लागला त्या सर्वांचे मन:पुर्वक आभार.

गणपतीबाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लौकर या!

– मनोहर राखे