जगवा महाराष्ट्र अपुला….

राजकीयदृष्टया महाराष्ट्र या भाषिक राज्याची स्थापना १ मे, १९६० रोजी झाली असली तरी, अनेक दिव्य परंपरा असलेला, महाराष्ट्र हा मराठी भाषिक भौगोलिक प्रदेश गेली कित्येक शतके नांदत आहे. वारकरी पंथामुळे मराठी संस्कृती ही भक्तिमय व सत्त्वगुणी झाली आहे. श्री समर्थ रामदास व श्री छत्रपती शिवाजी महाराज या दोन महान विभुतींच्या शिकवणुकीमुळे महाराष्ट्रावर परकीय राजवटी विरुघ्द लढण्याचे, आणि प्रखर स्वातंत्र्याकांक्षेचे संस्कार झाले. शिवप्रभुंसारख्या समर्थ राज्यकर्त्याने ‘स्त्रीत्वाचा’ सदैव सन्मान करण्याच्या उदात्त मूल्यांचे प्रत्यक्ष आचरण करुन आदर्श निर्माण केला. पंढरीच्या वारीला श्रध्देने जाणारे वारकरी आणि राष्ट्राच्या रक्षणार्थ हाती शस्त्र धरणारे धारकरी ही महाराष्ट्राची शक्तिस्थाने आहेत.

ज्ञानेश्वर, चक्रधर, एकनाथ, नामदेव, तुकाराम हया प्रतिभाशाली संत कवींनी मराठी भाषेची जडणघडण केली आणि समाजाला अध्यात्मिक, राष्ट्रीय व सामाजिक विचारांचा उदात्त वारसा दिला. श्री शिवछत्रपतींनी उन्मत्त परकीय राजवट धुळीस मिळवून हिंदवी स्वराज्याचा जरीपटका उभारला तर नंतरच्या काळात थोरले बाजीराव, नानासाहेब आणि माधवराव पेशव्यांनी हिंदवी स्वराज्याचा ध्वज अटकेपार फडकविला. आम्हा मराठी जनांच्या भावविश्वात हा सर्व इतिहास अद्याप ताजा आहे. म्हणूनच पानिपतावरील सदाशिवरावभाऊ व विश्वासरावांचे बलिदान आणि पानिपतच्या रणभूमिवरील तो पराजय यांच्या आठवणींनी आजही आम्ही खंतावतो तर अटकेपार झेंडे फडकाविण्याच्या प्रसंगाच्या स्मृतीने आजही रोमांचित होतो.

१९ व्या व २० व्या शतकांत, अव्वल इंग्रजी अमदानींत सामाजिक समतेची ध्वजा उंच धरणाऱ्या महात्मा फुले, राजर्षी शाहू छत्रपती, सुधारकाग्रणी आगरकर, महर्षी कर्वे, डॉ. आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या समरसतावादी विचारवैभवाने हा महाराष्ट्र समृध्द झालेला आहे. तर लोकमान्य टिळकांच्या प्रखर स्वातंत्र्यप्रीतीमुळे येथे राष्ट्रवादाचे निखारे धगधगत आहेत.. अशी ही महाराष्ट्राची भव्यदिव्य परंपरा.

एका प्रदीर्घ राजकीय संघर्षानंतर, १ मे १९६० रोजी महाराष्ट्र या भाषिक राज्याची स्थापना झाली. त्याआधी आजच्या महाराष्ट्रातील जवळ-जवळ सर्व भाग व गुजरात मिळून द्विभाषिक मुंबई राज्य अस्तित्वात होते. मराठी जनतेला ‘महाराष्ट्र’ हे भाषिक राज्य मिळविण्यासाठी अत्यंत प्रदीर्घ संघर्ष करावा लागला. तत्कालीन केंद्र सरकार ‘महाराष्ट्र’ हे राज्य देण्याच्या विरुध्द तर होतेच पण त्याहीपेक्षा त्यांचा जास्त विरोध मुंबई महाराष्ट्राला देण्यास होता. मुंबई केंद्रशासित ठेवण्याची त्यांची इच्छा होती. तत्कालीन केंद्रसरकारमधील एक बडे नेते म्हणत, ‘जोपर्यंत चंद्र-सूर्य तळपत आहेत, तोपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही. ‘गर्जा संयुक्त महाराष्ट्र भारती’ या गीताच्या ओळी म्हणजे या लढयाचे ‘वंदे मातरम्’ बनले होते. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी सतत पाच वर्षे अभूतपूर्व असे आंदोलन झाले. द्विभाषिक मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री कै. मोरारजी देसाई यांच्या कारकीर्दीत संयुक्त महाराष्ट्र समितीच्या १०५ कार्यकर्त्यांनी हौतात्म्य पत्करले. अखेर लोकेच्छेपुढे केंद्र सरकार नमले आणि १ मे, १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाला. मात्र सध्याच्या कर्नाटकातील बेळगाव, कारवार, धारवाड, निपाणी आणि गुजरातमधील डांग, उंबरगाव इत्यादी भाग संयुक्त महाराष्ट्रात येऊ शकले नाहीत. ही खंत आजही मराठी जनतेला सतावत आहे. आता तर काही राजकीय शक्ती वेगळया विदर्भ राज्याची मागणी करीत आहेत. आज मराठी जनतेने ठामपणे मराठी भाषिक राज्याचे विभाजन थांबविले पाहिजे.

महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीचा हा इतिहास आठवतांना संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाच्या काही दिग्गज नेत्यांची आठवण या ठिकाणी येते आणि डोळे पाणावतात. त्याकाळी थोर मराठी साहित्यिक आणि धुरंधर पत्रकार आचार्य अत्रे यांनी ‘नवयुग’ व ‘मराठा’ या आपल्या वृत्तपत्रांमधून आणि आपल्या तुफानी वक्तृत्वाने मराठी अस्मिता चेतविली होती. प्रबोधनकार ठाकरे, समाजवादी नेते एस.एम. जोशी, साम्यवादी नेते कै. एस.ए. डांगे अशा लोकनेत्यांची मांदियाळी या आंदोलनाचे नेतृत्तव करीत होती. मुंबईतील आता लुप्तप्राय झालेला गिरणी कामगार मुंबई वाचविण्यासाठी प्राणांची बाजी लावून या लढयांत उतरला होता.

मात्र संयुक्त महाराष्ट्रवादी नेत्यांनी महाराष्ट्र राज्य निर्माण व्हावे म्हणून उग्र जनआंदोलन छेडले असले तरी या नेत्यांचे ‘राष्ट्रीयत्वाचे’ भान कधीही सुटले नाही. भारताची एकात्मता व अखंडता यांच्यावर त्यांची अढळ निष्ठा होती. तामिळनाडूमध्ये ६० च्या दशकात जी हिंदी विरोधी आंदोलने झाली त्यांत भारतीय राज्यघटनेचा अवमान झाला होता. तसे येथे घडले नाही. कारण महाराष्ट्रधर्म हा शिवकाळापासूनच संकुचित नसून तो एक विशाल राष्ट्रधर्मच आहे. म्हणूनच महाराष्ट्राच्या विचारवंत नेत्यांनी महाराष्ट्र हा भारताचा एक खंबीर आधार या स्वरुपातच महाराष्ट्राला पाहिले आहे. येथे स्वतंत्र, फुटीर राष्ट्राची मागणी अस्तित्वात येऊ शकली नाही, कधीही येणार नाही. स्वा. सावरकर म्हणत, ‘महाराष्ट्र हा राष्ट्राचा खड्गहस्त आहे’, तर सेनापती बापट आपल्या काव्यात म्हणतात,

‘महाराष्ट्र मेला, तर राष्ट्र मेले,
मराठयाविना राष्ट्रगाडा न चाले,
खरा वीर वैरी, पराधीनतेचा,
महाराष्ट्र आधार या भारताचा !’

आपण महाराष्ट्र राज्य प्रखर संघर्षातून मिळविले ते मराठी भाषेचे आणि संस्कृतीचे संरक्षण व संवर्धन व्हावे म्हणून. पण या बाबतींत आज काय स्थिती आहे? राज्यकारभाराची भाषा म्हणून मराठी फक्त कनिष्ठ अधिकारी, ह्यांच्या स्तरावरच वापरली जाते. मंत्रालयात सचिवांच्या स्तरावर अजूनही इंग्रजीचाच वरचष्मा आहे. महाराष्ट्रातील न्यायालयीन कारभार अजूनही इंग्रजीतूनच चालतो.

पण राज्यकारभाराची बाब बाजूस ठेवली तरीही दुसरे भयावह संकट आहे ते म्हणजे मराठीच्या वाचकवर्गात झपाटयाने होत असलेली घट !. गेल्या सुमारे पंचवीस वर्षात शिक्षणात इंग्रजी माध्यमाचे प्रस्थ सातत्याने वाढत गेले आहे. आज तर खेडयापाडयातही इंग्रजी माध्यमाच्या शाळा उपलब्ध आहेत. शहरी उच्चभ्रु वर्गाप्रमाणेच ग्रामीण बहुजन समाजांतील नवमध्यम वर्ग व नवश्रीमंत वर्ग आपल्या पाल्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालू लागला आहे. तसे पाहता स्वातंत्र्ययोत्तर काळात जो शिक्षणाचा प्रसार झाला त्यामुळे मराठी ग्रंथ व नियतकालिकांना एक व्यापक असा वाचकवर्ग लाभला होता. पण इंग्रजी माध्यमाच्या वाढत्या विस्तारामुळे हा वाचकवर्ग हळूहळू कमी होण्याच्या मार्गावर आहे.

आजच्या जागतिकीकरणाच्या युगात आंतरराष्ट्रीय व्यापारात इंग्रजीचे महत्त्व निश्चितच आहे. इंग्रजी माध्यमातून शिक्षण अपरिहार्य वाटत असेल तर ते स्विकारुनही मराठी भाषा व संस्कृती यांच्याबद्दलची आस्था टिकवून ठेवली पाहिजे. हे करण्यासाठी इंग्रजी माध्यमाचा त्याग करणे आवश्यक वाटले तर तेही केले पाहिजे. इंग्रजी भाषेवर प्रभुत्त्व अवश्य हवे पण त्यासाठी इंग्रजी माध्यमातून शिक्षण घ्यावे लागते हा विचार भ्रामक नाही का ?

मराठी भाषेप्रमाणेच मराठी संस्कृतीचाही .हास होत आहे. आज आपल्या घरांमध्ये वडिलांना पप्पा#डॅडी आणि आईला मम्मी म्हणणे हे अगदी सार्वजनिक झाले आहे. हा परधार्जिणेपणा आम्ही का स्विकारतो ? आई-बाबा हे मराठीतील सुंदर शब्द आहेत. खोटया साहेबी डामडौलाच्या आहारी जाणे हा आपला भाषिक करंटेपणाच आहे. मराठीमधील आई हा एक सुंदर काव्यमय शब्द आहे.

‘आई म्हणोनी कोणी, आईस हाक मारी
स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी’

अशा सुंदर काव्यपंक्ती आपल्या मराठीत आई या शब्दाभोवती गुंफल्या गेल्या आहेत. म्हणून आमच्या मराठी घरांतून पुन्हा आई-बाबा या शब्दांचे आगमन झाले पाहिजे.

स्वभाषेशी असलेली नाळ तोडून टाकणारा समाज हा भौतिकदृष्टया कितीही प्रगत झाला तरी तो आपली ओळख, आपले आत्मभान हरवून बसेल. असा समाज हा मानसिकदृष्टया भ्रमिष्ट समाज म्हणूनच ओळखला जाईल. म्हणून स्वभाषा व स्वसंस्कृती यांचे संरक्षण करण्यासाठी आपण कार्यरत व्हायला हवे.

आज महाराष्ट्रात अन्य प्रांतीयांची संख्या मोठया प्रमाणात वाढते आहे. हा समाजधुरीणांच्या चिंतेचा विषय आहे. अर्थातच आपल्या राज्यघटनेनुसार त्यांना महाराष्ट्रात येण्याचा व व्यवसाय-धंदे उभारण्याचा हक्क आहेच. मात्र त्यामुळे येथील लोकसंख्येचा आकृतीबंधच बदलून जात असेल आणि येथील सामाजिक स्वास्थाला ते बाधक ठरत असेल तर त्यावर काही उपाययोजना करणे भाग आहे. मराठी नेत्यांनी केंद्रसरकारकडे घटनादुरुस्ती करुन असा कायदा करण्याची मागणी करावी की कोणत्याही राज्यात किंवा प्रांतात अन्य प्रांतीयांची लोकसंख्या २० टक्के झाली की त्यापुढे अन्य प्रांतीयांचे आगमन थांबविण्याचे कायदे करण्याचा अधिकार संबंधित राज्यास राहील. अशी घटनादुरुस्ती झाल्यास सर्वच राज्यांना त्याचा लाभ होईल. भूमिपुत्र व अन्य प्रांतीय यांच्यातील हिंसक संघर्ष व सामाजिक तणाव टाळता येतील. शिवाय मागासलेल्या व अविकसित राज्यांतील राजकीय नेत्यांना आपापले राज्य विकसित करुन अन्य प्रांतात जाणारे लोकांचे लोंढे थांबविण्यासाठी रोजगार निर्मिती करणे भाग पडेल.

त्याचबरोबर मराठी तरुणांनी उद्योजकता व श्रमप्रतिष्ठा अंगी बाणविणे अत्यावश्यक आहे. अन्य प्रांततून येणारी मंडळी फुटपाथवर चणे विकण्यासारख्या ग्राहकोपयोगी सेवा करुन रोजगाराच्या क्षेत्रात स्थान मिळवितात. अत्यंत काटकसरीने परप्रांतात टिकून राहतात. हे आमच्या मराठी तरुणाला का जमू नये? येथे येऊन अन्य प्रांतीय मंडळी जे हलके मानले जाणारे काम करुन रोजगार कमावतात, तेच काम जर मराठी तरुणांनी केले तर आपोआपच अन्य प्रांतीयांच्या लोंढंयाना आळा बसेल.

थोडक्यात म्हणजे मराठी भाषा, संस्कृती यांचे संरक्षण व संवर्धन आणि जागतिकीकरणाला सामोरे जाणारे समर्थ मराठी अर्थकारण करण्याचा दृढ संकल्प आजच्या महाराष्ट्रदिनी आपण करायला हवा !

जय महाराष्ट्र !
– श्रीराम परांजपे
पोस्ट-पडघे, ता-भिवंडी