खरेदीचं जेवणावर ताव मारण्यासारखंच आहे. दुस-याला येथेच्छ हात मारतांना पाहून आपल्याला मारे आश्चर्य वाटतं, पण आपण पंगतीवर बसलो की, आपलंही ‘आव देखा न ताव’ असंच होतं. जेवणासारखंच खरेदीचही! एकदा तुडुंब पोट भरून थोडा काळ गेला की पुन्हा लागते भूक… मग तो परिक्रमच होऊन बसतो. दुस-यांना हातात गलेलठ्ठ पिशव्या घेऊन धावताना पाहून वाटतं – ‘काय एवढं खरेदी करण्यासारखं आहे.’ पण एकदा आपल्याला हा खरेदीचा ज्वर चढला की मग किती घेऊ नि किती नको असं होऊन जातं आणि मग क्रेडिट कार्डच्या साक्षीने इसापनितीमध्ये न झेपणारी प्रत्येक बेडकी इथे बैलाचं रूप धारण करते (नाहीतरी, कारण नसताना काहीतरी खरेदी करणा-यांना बैलोबाचंच रूपक शोभून दिसतं) आता आपल्या देशातही सा-या गोष्टी मिळत असल्याने पूर्वीएवढं अप्रुप राहीलं नसलं तरी नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने सिंगापूर-हाँगकाँगसारख्या शॉपिंगच्या नंदनवनात निवास असला की डोळयांबरोबर मनही भिरभिरतं नि खरेदीची सवय लोण्यातून फिरणा-या सुरीसारखी आपल्या खिशाला कशी कापत जाते ते कळतच नाही.
तसं बघायला गेलं, तर खरेदी इथल्या हवेतच आहे. ‘दिसामाजी (म्हणजे मला जे दिसेल ते) काही तरी ते खरीदावे…’ अशा नियमितपणे काही ,खरेदी नाही केलं तर त्या दिवशी मोकळा श्वास घेतल्यासारखं वाटत नाही. खरेदीला इकडची मंडळी ‘नॅशनल फेस्टिवल’ म्हणतात. मी तर म्हणेन, ‘इटस् मोर ऑफ अ लाईफ स्टाईल हियर’ इतर अनेक गोष्टींप्रमाणे खरीददारी हा इथल्या दिनचर्येचाच एक भाग आहे. उगीचच नाही इथे शेकडयांनी आपल्याकडे नाक्यावर पानवाला असावा तसे अनेक मजली ‘शॉपिंग मॉल्स’ आहेत. प्रत्येक मॉल्समध्ये विविध ‘मालां’नी भरलेली अनेक दुकानं असतात आणि मुख्य म्हणजे तुमच्या-आमच्या सारख्यांची वाट चुकू नये म्हणून (म्हणजे चुकून मॉल्सच्या बाहेरचा रस्ता लवकर सापडू नये म्हणून) प्रत्येक मजल्यावर डायरेक्टरि मॉल्स असतात. प्रत्येक ‘मॉल’ मध्ये आपल्या पचननलिकेच्या दोन्ही तोंडांची सोय होईल अशी व्यवस्था असते. एकतर सिंगापूरात ‘उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म’ असा भक्तिभाव असतो. म्हणून या सा-या भक्तांना वारंवार उदरकुडांत उदार आहुती देण्यासाठी जागोजागी फूड कोर्टस् असतात. जिथे माफक दरात- कुठल्याही देशाच्या- ‘समिधा’ मिळतात. एकूण काय खरेदीला आलेल्या भाविकांना खरेदीपूजा संपायच्या (व खिशावर बसणा-या फटक्यांचा प्रसाद मिळायच्या) आधी बाहेर पडण्यास निमित्त होऊ नये! अर्थात सिंगापूर-हाँगकाँगसारख्या देशांसाठी शॉपिंगचं एवढं स्तोम साहजिकच आहे. कारण टुरिझम आणि शॉपिंग हे त्यांचे महत्त्वाचे उद्योगधंदे आहेत. शॉपिंग मॉल्सच्या खांदयांवर त्यांच्या इकॉनॉमीचा तंबू भल्याबु-या परिस्थितीच्या वादळवा-यात तग धरून असतो.
शॉपिंग मॉल्सचे विविध प्रकार आहेत. काही बैठे तर काही एक – दोन मजली तर काहींची मजल (मजले) याहून अधिक आहे. काही खास उत्पादनांसाठी कॉम्प्यूटर, इलेक्ट्रॉनिक्स असतात तर बरेचसे ‘डिपार्टमेंटल’ म्हणजे विविध प्रकारांसाठी असतात. काहीमध्ये सर्वसामान्यांच्या खिशांना परवडणारी दुकानं असतात. तर काही इतकी महागडी असतात की त्यांच्या आजूबाजूला असताना, आपल्याला कुणी पाहात तर नाही ना असं बघत आपण अंग चोरत पसार होतो. एकेका मॉलमध्ये विविध दुकानं असतात. काही स्वतंत्र दुकाने असतात तर काही ब्रॅण्डेड चेन आऊटलेटस् असतात. जशी ‘अकाई’, ‘कोटस्’सारखी घरगुती वापराच्या वस्तूंची दुकाने, ‘फोर्टेस्’सारखी इलेक्ट्रॉनिक्स, ‘वेलकम’, पर्रयुम शॉप, कोल्ड स्टोरेजसारखी शिधासामग्रीची सुपर मार्केटस् काही ‘जायंट’, ‘मुस्ताफा’, ‘केअर फोर’ किंवा हाँगकाँगमधल्या हायपर मार्केट- जिथे कपडे, खाणं, इलेक्ट्रॉनिक्स, स्पोर्टस्-वस्तू, दुचाक्या, नाना प्रकारची खेळणी, सगळं काही एका छपराखाली मिळतं. ‘मुस्तफा’मध्ये तर सोनं नाणंही मिळतं. मॉल्समधल्या या टोकापासून त्या टोकापर्यतच्या सा-या दुकांनाची जंत्री जरी करायची झाली तर पुरा दिवसही पुरणार नाही आणि त्यातही कुठल्या मॉलमधल्या दुकानामध्ये कधी सेल चालू आहे याचा अचूक हिशेब ठेवायचा म्हटल तर कदाचित पुरा जन्मही पुरणार नाही.
देशाच्या आर्थिक उलाढालीमध्ये या खरेदीतून मिळणा-या रकमेला महत्त्वाचं स्थान असल्याने जास्तीत जास्त लोकांनी शॉपिंग करायला उद्युक्त व्हावं म्हणून सगळयांचे प्रयत्न असतात. सारे शॉपिंग मॉल, वारंवार चढणारा खरेदी ज्वर जाणवू नये म्हणून असेल कदाचित- अथपासून इतिपर्यंत वातानुकूल असतात. वरती खालती जायला सरकते जिने उदवाहक असतात. सर्व ठिकाणी स्वच्छता असते नि ती दिवसभर सांभाळणारा ताफा असतो. मजल्या मजल्यावर मॅप डायरेक्टरी व तरीही चुकलात तर ग्राहक माहिती केंद्रे असतात. पार्किंग एरियाज् (अर्थात फुकट नाही) असतात. या सा-या गोष्टी आपल्याला शॉपिंग प्रवण करणारी, वातावरण निर्मिती करतं……… जसं बळी देण्याआधी बोकडाला सजवून खाऊ पिऊ घालतात.यातच क्रेडीट कार्डस् नी तर सयंमाचा उरलासुरला बांध तोडून टाकला आहे. आपल्या खिशाच्या मापाहून मोठा वाटणारा सामर्थ्याचा (पोकळ) आभास आपल्या डोळयांसमोर उभा करून मग अधिकच चेव येऊन आपण खरेदीसाठी तुटून पडतो…
या सा-या वातावरण निर्मितीमुळे शॉपिंग हे एक अटळ कर्तव्य किंवा कंटाळवाणी कटकट न होता एक घेण्याजोगा अनुभव होतो. एका व्यावहारिक गरजेच्यापलीकडे जाऊन मनाच्या विविध पातळीवर भिडणारी जाणीव बनते. मग या आनंदयात्रेत आपण न कुरकुरता, न पश्चाताप होता खरेदी करतो. हे कुणी आपल्याला फसवून गळयात बांधलं नाही हे कळण्याइतपत आपण शुध्दीवर असतो. फक्त आपण घेतलेल्या गोष्टीपैकी अर्ध्या आपण घेतल्या नसत्या तरी काही फरक पडला नसता हे आपलयाला कधीच कळत नाही. एकतर या प्रदेशांच्या हवेत, पाण्यात असं काही आहे जे आपल्याला ‘शॉपिंगमय’ करून टाकतं. मग आपण वारा प्यायल्यागत शॉपिंगसाठी बेफाम होतो. यामघ्ये वातावरण निर्मितीचा जेवढा भाग असतो तेवढाच भाग असतो दुकानातल्या आपल्या चंचल मनाला खुणावणा-या वैविध्यपूर्ण नवनवीन गोष्टींचा. खिशात खुळखुळणारे (नि खुळया मनाचा खुळखुळा करणारे) पैसे असो की खडखडणारी क्रेडीट कार्डस्- सा-याच गोष्टी याला हातभार लावतात. पण या सा-यांवर वरताण करतात त्या ‘सेलिंग स्कीम्स्’. आम्ही जेव्हा पहिल्यांदा देशाबाहेर रहायला गेलो तेव्हा सुरवातीला मोकाट सुटलेल्या गुराने चरावं तसं खरेदी करत होतो. मग भानावर येऊन खरेदीवर नियंत्रण ठेवावं ठरवलं तेव्हा विविध ‘सेल्स स्किम’रूपी मेनकांनी आमचा विश्वामित्र केलाच! …..तेव्हापासून जे आम्ही शॉपिगच्या ‘विश्वाचे मित्र’ झालो ते आजतागायत. याबाबतीत हाँगकाँगचा हात कुणी धरणार नाही. इथे कुठे ना कुठे, कशा ना कशावर तरी ‘सेल’ नाही असा एकही दिवस जात नाही. पुन्हा चिनी नववर्ष असो, की लॅन्टर्न फेस्टिव्हल असो, नाताळ असो की वार्षिक स्टॉक संपविण्याचा सेल असो… विविध गोष्टी, विविध वेळी विविध खिशांच्या मापात उपलब्ध असतात. पुन्हा ऋतु बदलताना नव्या योजना! हाँगका गमध्ये ज्याला हिवाळा म्हणता येईल असा खराखुरा हिवाळा असतो. हाँगका ग ‘के टिव्ही’ अद्ययावत फॅशनबाबत जागरूक असणारे लोक गेल्या मोसमाचे कपडे या मोसमात वापरत नसल्याने ऑफ सिझनला ‘सेल’ असतो. (इकडच्या बायका, इतक्या वर्षांच्या ‘सिझन्ड’ नव-याला या सिझनपासून त्या सिझनपर्यंत कसे काय सहन करतात कळत नाही) असो.
एकदा तर गंमतच झाली. आम्ही थंडीचं एकाच प्रकारचं जॅकेट १५०/ पासून ५०/ पर्यंत वेगवेगळया वेळी, वेगवेगळया किमंतीत विकत घेतले आहे. अर्थात यामुळे आम्ही प्रत्येकी अनावश्यक होतील इतके जॅकेट खरेदी केले ही गोष्ट अलाहिदा. पण मग, ज्या गोष्टी आपल्याला अन्यथा एवढया जरूरीच्या नव्हत्या त्या हसत हसत पुन्हा पुन्हा विकत घ्यायला लावणं हे या शॉपिंग पॅराडाईज् चं कर्तृत्वच नाही का? यातही गंमत अशी की या प्रकारात, विकणारा नि विकत घेणारा, असं दोघांनाही आपला फायदा झाल्यासारखं वाटत. या अर्थाने, खरेदी विक्रीच्या प्रक्रियेचा सुवर्णमय साधण्यात हाँगका ग यशस्वी झालं आहे.
हाँगका गमधल्या या शॉपिंगची आणखी एक गंमत म्हणचे / १० ची दुकाने! जिथे सर्व किंवा बऱ्याचशा गोष्टी / १० ला मिळतात. ….मग त्यात काय मिळत नाही……शॉपिंग बॅग्ज, पर्सेस, सपाता, शोभेची फुलं, शोपिसेस, गजराची घडयाळं, खेळणी, कॉफी मग्ज, ग्लासेस, स्टेशनरी, खाण्याचे पदार्थ, कपडे, हातोडी,……… दुकानांच्या आकारानुसार……. अक्षरश: विविध गोष्टी मिळतात. या दुकानातून फेरी मारली नाही तर आपल्या लक्षातही येणार नाही आपले / १० काय काय खरेदी करू शकतात. या साऱ्या गोष्टी तुलनात्मक दृष्टया स्वस्त असतात. मग आमच्यासारख्या सामान्य लोकांच्या इवल्याशा मुठीला कुबेराच्या कोठाराचं सामर्थ्य प्राप्त करून देतात. इतर महागडया दुकानांच्या आजूबाजूला फिरकतांनाही बिचकणाऱ्या आपल्याला मग नवा हुरूप येऊन छाती पुढे काढून, उजळमाथ्याने आपण काही महत्त्वाच्या व्यावसायिक उलाढाल्या करण्याच्या रूबाबात दिसेल त्या (बहुतांशी नको असलेल्या) गोष्टीवर झडप घालून खरेदी करतो.
आपल्या चोरबाजाराची आठवण करून देणारी स्ट्रीट मार्केट (नाईट शॉपिंग), ही हाडाच्या खरेदीदाराला एक पर्वणीच असते. सिंगापूरमधलं चायना टाऊन काय की, लिटील इंडिज् काय किंवा हाँगकाँगमधली टेंप्मल स्ट्रीट, लेडिज् मार्केट अशी ठिकाणं. उन्हं निवळतानापासून सुरू होऊन थेट मध्यरात्रीपर्यंत हा बाजार फुललेला असतो. यावेळेत हे रस्ते, गल्ल्या रहदारीला बंद असतात.मग फूटपाथवर आणि फूटपाथलगत दोन्ही बाजूलगत दोन्ही बाजूला टपरीवजा दुकानं/स्टॉल्स लागतात नि छोटया-मोठया अक्षरश: विविध रंगीबेरंगी, आकर्षक वस्तूची तेथे जत्रा लागते. घडयाळं, चामडयाच्या वस्तूंपासून सूटकेसेस पर्यंत, जुन्या खास वस्तूंपासून इलेक्ट्रॉनिक वस्तूंपर्यंत केसाला लावायच्या पिनांपासून, केसांचे टोप, वस्त्र आभूषणांपर्यंत साऱ्या गोष्टी दुकानातल्या किंमंतीपेक्षा अर्थात स्वस्त मिळतात. ज्यांना गोष्टी पाहून, निवडून घासाघीस करून विकत घेण्याची हौस आहे त्यांच्यासाठी तर हे नंदनवनच आहे. पण ज्यांना अशा खरेदीत फारसा उत्साह नसतो त्यांनासुध्दा नुसता फेरफटका मारून दरवेळेला नवनवीन गंमतीदार वस्तू पहाण्याचा नेत्रसोहळा ही आनंददायक असतो. अर्थात विकत घेतलेली प्रत्येक गोष्ट चालेलच (किंवा किती चालेल) हा ज्याच्या त्याच्या नशिबाचा भाग. त्यातही पुन्हा भारतीय अस्मितेला स्मरून न चालणारी गोष्ट परत करायला आलातच तर जिथून विकत घेतलात तो ‘स्टॉल’ त्या जागेवर तेव्हा असेलच याचीही काही खात्री नाही. वेळी अवेळी, कधीही, देशाची आर्थिक घडी स्थिर वा विस्कटलेली असो- शॉपिंग मॉल्समधली, स्ट्रीट मार्केटमधली झुबंड पाहून कधी कधी वाटतं की या देशातली अर्धी अधिक जनता घराऐवजी शॉपिंग मॉल्समध्येच राहात असावी. आधी आधी ही अखंड खरेदीयात्रा पाहून मला वाटायचं की ही मंडळी या साऱ्या गोष्टी ठेवतात तरी कुठे….. हाँगका गसारख्या देशात तर घरं मुबंईसारखी छोटी छोटी, काडेपेटी सारखी त्यात माणसं स्वत: रहाणार कुठे नि गोष्टी ठेवणार कुठे ? मग हळू हळू ध्यानात आलं ही संस्कृती नवनवीन गोष्टी वापरण्याची आहे. संग्राहकाची नाही. एकदा ‘सिझन’ संपला की टाकले कपडे – म्हणजे मग सांभाळायला नको म्हणजे मन पुन्हा आपले खरेदी करायला मोकळे …………. मग का नाही रहाणार यांच्या ‘इकॉनॉमि’चं चक्र गरगरत!
इकडे (हाँगका ग) आल्यानंतर सुरूवातीला आमची मनस्थिती द्विधा ….. एकीकडे इकडच्या हवेतून मिळलेला खरेदीचा फंड आणि नुकतेच देशावरून आल्यामुळे कुठल्याही गोष्टी (फाटल्या तरी) टाकायला जीवावर यायचं मग यामधून आमचा जीव टांगणीला लागून पुढची खरेदी कात्रीत सापडू नये म्हणून आमच्या बिचाऱ्या मनाने विविध कल्पक उपाय शोधून काढून आमची सुटका केली. ……..कधी आम्ही आमच्या नावाने तर कधी शेजाऱ्यांसाठी म्हणून तर कधी नांतेवाईकांना भेट म्हणून तर कधी देशाला भेट देतांना रिकाम्या हाताने जाऊ नये म्हणून अशी विविध गटांमध्ये विभागलेली खरेदी करू लागलो. असं केली की आपल्यासाठी फार काही खरेदी केल्यासारखं वाटत नाही किंवा अनावश्यकही वाटत नाही……. इकडे इतकी शॉपिंग मॉल्स आहेत की ती सगळी पाहिजे तशी पालथी घालायची ठरवली तर हिंदू धर्मातल्या साऱ्या पुर्न:जन्मांना पुरून उरतील.
मग आम्ही केवळ ज्ञानसंपादनाच्या लालसेपोटी, नि- ‘या विविध जागी विविध दुकाने आहेत तरी कशी?’- या औत्सुक्यापोटी नियमित फेरी मारायला लागलो. पण मग इथल्या हवेतच खरेदीज्वराचे विषाणू असल्याने, आम्ही नुसंत दुकान बघायला जरी गेलो तरी ते आम्हाला कडकडून चावायचे नि आम्हालाही ज्वर भरायचा. मग दुकानातून घरी परत जातांना रिकाम्या हाताने जाऊ नये म्हणून एखाद दुसरी टुकार शॉपिंग बॅग हातात असायची. पण आम्ही ती आमच्या ज्ञानसंपादनाची किमंत म्हणून स्वीकारायला लागलो तर कधी काय व्हायचं – एखादा थंडीचा कोट गरज म्हणून घेतला तर पुढच्या ज्ञानसंवर्धनाच्या फेरीत जर तसाच, दुसऱ्या रगांचा कोट दिसला तर हा रगं आपल्याकडे नाही म्हणून घ्यायचा.
मग पुन्हा तिसऱ्या रगांचा कोट आमच्याकडे नसल्यामुळे, केवळ गरजेपोटी घेतला जायचा. मग अशा आमच्या रंगीत तालमी बऱ्याच चालायच्या. कधी कधी काय व्हायचं की एकदा एखादी गोष्ट खरेदी केल्यावर नंतर दुकानावर अचानक ‘सेल’ ची पाटी झळकायची. मग कुतुहलापोटी दुकानात डोकावल्यावर तीच गोष्ट कमी किमंतीत दिसायची. मग आधीच्या किमंतीत खरेदी केल्याची घाई केल्याबद्ल इतकी हळहळ वाटायची की ते दु:ख हलकं व्हावं म्हणून कमी झालेल्या किमंतीत पुन्हा एकदा तीच गोष्ट खरेदी करून, दु:खांबरोबरच खरेदीची सरासरी किंमत कमी करून घ्यायचो. पण काय व्हायचं, काही दिवसांनी पुन्हा एकदा किमंती चंद्रकलेप्रमाणे कमी व्हायच्या मग पुन्हा आमची पंचाईत! या पंचायतीतून बाहेर पडायचा पुन्हा तोच उपाय- पुन्हा एकदा तीच गोष्ट आणखी एकदा खरेदी करून सरासरी किंमत कमी करून घ्यायचा यत्न करायचो. मग ‘सिझन’ संपेपर्यंत आम्ही या आर्किमिडीयन सर्कल मधून बाहेर पडायची सोयच नाही.
सुरूवातीला देशातून नुकतंच आल्यामुळे काहीही खरेदी करताना, किमंती रूपयांत रूपांतरित करून पडताळून पहात असू. मग उगीचच छातीवर दडपण यायचं. मग आमची तगमग जाणून, एका जाणत्या हितचिंतकाने तिथल्या ‘करन्सी’लाच रूपये म्हणण्याचा सल्ला दिला. तेंव्हापासून आम्हाला किंमती कमी वाटायला लागल्या व बिचकणं कमी होऊन आमची भीड चेपली व आम्ही अधिक चेव येऊन नियमितपणे शॉपिंग मॉल्समधील भीड (गर्दी) चेपू लागलो. एकूण काय, आमचं ज्ञानसत्र अखंड चालूच राहिलं. पण इथल्या हवेतच खरेदी असल्याने आम्हाला पैसे जाण्याचं दु:ख होण्यापेक्षा खरेदीनंतर उत्तरोत्तर आनंद होत गेला व आम्ही ‘लोकल्स’ बनलो.
– यतीन सामंत