क्षितिजे विस्तारणारी एक दर्जेदार ‘साहित्य कार्यशाळा’

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना राज्यस्तरीय व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने ‘प्रतिभासंगम’ हा तीन दिवसीय साहित्यिक भेटीचा सोहळा गेली आठ वर्षे सुरू ठेवला आहे. या संमेलनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना साहित्यिकांची थेट भेट घेता यावी, एक मुक्त संवाद व संपर्क शक्य व्हावा आणि विद्यार्थी दशेमध्येच साहित्यिक विचारधारांचे भान यावे, आपल्या लेखणीला धार लावणे किती जरूरी आहे, हे नवोदित लेखकाला समजून यावे, याकरिता, ‘प्रतिभासंगम’ हे एक मुक्त व्यासपीठ आहे. दिनांक १२ डिसेंबर २००३ ते १४ डिसेंबर २००३ या दरम्यान अण्णाभाऊ साठे नगर येथील चेंबूर हायस्कूलमध्ये मुंबईत हे संमेलन संपन्न झाले.

सुप्रसिध्द कन्नड साहित्यिक डॉ. एस्. एल्. भैरप्पा हे संमेलनाचे उद्धाटक होते. उद्धाटनपर भाषणामध्ये श्री. भैरप्पा यांनी भारतीय तसेच युरोपिय शिक्षणपध्दतीची मीमांसा केली. आजच्या तरूण पिढीत अस्सल लेखन करण्याची सवय लोप पावली आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

प्रतिभासंगम, उद्धाटन सोहळा- उद्धाटक डॉ. एस्. एल्. भैरप्पा दीप प्रज्वलन करताना

चुकीच्या शैक्षणिक धोरणावर सडेतोड टीक करून श्री. भैरप्पा म्हणाले की, आज बाजारू नोटस् वापरण्याकडे विद्यार्थ्यांचा कल आहे. ‘युरोपिय राष्ट्रांमध्ये विद्यार्थ्यांना संदर्भ पुस्तकांची यादी दिली जाते. त्यातूनच त्यांना आपले टिपण तयार करावयाचे असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या वैचारिक लेखनाला आपोआपच चालना मिळते.’ श्री. भैरप्पा यांनी परकीय तत्त्वज्ञानाच्या होत असलेल्या आक्रमणाला देखील शैक्षणिक व्यवस्थाच जबाबदार असल्याचे सांगितले.

आपल्या देशाला लाभलेला साहित्य आणि तत्त्वाज्ञानाचा ऐतिहासिक वारसा विद्यार्थ्यानी जाणून घेतला पाहीजे, आत्मसात केला पाहीजे, असे श्री. भैरप्पा यांनी सांगितले.- ‘आपले लिहीणे, वाचणे हे अस्सल
असायला हवे.’ असे सांगून ‘आत्मशोध’ व वाचनाच्या महत्त्वाचा श्री. भैरप्पा यांनी पुनरूच्चार केला.

विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव भाषण करता श्री. मंगेश पाडगावकर म्हणाले, ‘आपल्या भारतातील विविध प्रांतांमधील दर्जेदार साहित्यिक आपल्याला माहीत होत नाहीत, कारण परदेशातील साहित्यिक काय लिहीतात, याचीच आपल्याला ओढ असते.’ वाहिन्यांच्या आक्रमणामुळे वाचनाची पुरी वाट लागली आहे, असेही श्री. पाडगावकर म्हणाले.

या संमेलनाच्या व्यासपीठावरून मान्यवर साहित्यिक आपले चिंतन विद्यार्थ्यांसमोर ठेवतात. निखळ वाङ्मय प्रेम व गुणवान युवकांचा सहभाग हा ‘प्रतिभासंगम’चा विशेष पैलू होय. या वर्षी, सुप्रसिध्द साहित्यिक डॉ. आनंद यादव यांची प्रकट मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये डॉ. आनंद यादव यांनी मननीय विचार व्यक्त केले. ‘प्रत्येक लेखनकृती ही कलाकृती नसते. कलाकृतीला वाङ्मय-मूल्य प्राप्त होण्यासाठी कलावंताच्या प्रतिभेवर संस्कार व्हावे लागतात. त्याशिवाय परिपूर्ण कलाकृती निर्माण होऊ शकत नाही.’- असे विचार डॉ आनंद यादव यांनी व्यक्त केले. ते पुढे असेही म्हणाले की, ‘समाजात आपल्या आजूबाजूला सतत काहीतरी घडत असते. त्यातूनच अनुभव मिळत असतो. साहित्याचे सर्व प्रकार हाताळले पाहिजेत. आपण लिहीलेल्या साहित्यावर आपण पुन्हा परिक्षण व संस्कार केले पाहिजेत. अनुभवाची प्रक्रिया ही एक मुक्त प्रक्रिया आहे.’ असे सांगून डॉ. यादव यांनी आपल्या जीवनात पु. ल. देशपांडे व सुनीता बाई यांनी वेळीच मार्गदर्शन, तसेच त्यांच्या दीड हजार अप्रकाशित कविता यांचा उल्लेख केला. धडपडीशिवाय उत्तम साहित्यनिर्मिती शक्य नाही, हे यादवांनी स्पष्ट केले.

गटश: चर्चा हे प्रतिभासंगमचे खास वैशिष्टय आहे. ही एक साहित्यिक कार्यशाळा असते. साधारणपणे वीस-पंचवीस विद्यार्थ्यांचा एक गट व त्यांच्यासोबत एक नामवंत साहित्यिक असे गट पाडल्यानंतर पहिल्या सत्रामध्ये विद्यार्थी साहित्याचे वाचन करतात व साहित्यिक ते ऐकतो. मूळात उभरते व अनुभवी साहित्यिक यांना एकत्र आणणे ही गोष्ट मौलिक आहे. त्यामुळे विचारांची देव-घेव, कलात्मक व साहित्यिक घुसळण शक्य होते. विद्यार्थ्यांमध्ये थेट साहित्यिक लेखनाचं बीज रूजविलं जातं.

कवितेची चर्चा करणारे एकंदर १५ गट असून १५ नामवंत कवींचे मार्गदर्शन ‘प्रतिभासंगम’च्या निमित्ताने शिबिरार्थींना लाभले. विद्यार्थ्यांनी आपली कथा, कविता सादर केल्यानंतर गटाचे प्रमुख साहित्यिक चर्चा करतात, साहित्य कसं असावं, शब्दाचं सामर्थ्य काय, इत्यादि बाबींचा उहापोह गटवार चर्चेमध्ये होतो. मंगेश पाडगावकरांसारख्या कवींच्या संपर्कात नव्या कवींना दिवसभर राहता येते. उमेदवारीच्या काळातील ही उपलब्धी म्हणजे मोठी गोष्टच म्हणावी लागेल. केवळ साहित्यिकच नाहीत तर नाटककार, दिग्दर्शक इथे उपस्थित राहतात हेही नमूद केले पाहीजे. यावेळच्या प्रतिभासंगममध्ये प्रतिमा कुलकर्णी यांनी एकांकिका गट चालविला. कथा लेखनाच्या गटचर्चेचे काम विख्यात कथालेखिका अंबिका सरकार यांनी पाहिले. साहित्यप्रकारांच्या चर्चेप्रमाणेच वैचारिक गटाची देखील चर्चा घडते.

संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी वाचन संस्कृती या विषयावर व्याख्यान देताना डॉ. चंद्रकांत बांदिवडेकर यांनी आपले विचार मांडले. ते म्हणाले, भारतीयांनी स्वत:मध्ये न्यूनगंड निर्माण करून घेतला आहे. परकीय भाषेतून बोलणारा माणूस हा विद्वान असतो, असा चूकीचा समज आपल्या समाजामध्ये पसरला आहे. याबद्दल खंत व्यक्त करताना, अद्यापही वाचन संस्कृती लोकाभिमुख झालेली नाही अशी नोंद त्यांनी घेतली. काही मूठभरांच्या कुटील कारस्थानामुळे मातृभाषेपासून मुले दूर ठेवली जातात, असेही ते म्हणाले.

राजहंस प्रकाशनचे संपादक आनंद हडर्कीर हे समारोप सोहळयाचे प्रमुख वक्ते होते. जागतिक स्तरावरील माहितीचा स्त्रोत जाणून घेण्याचे महत्त्व पटवून देताना, श्री. हर्डीकर यांनी ३० जून च्या ‘टाईम’ या अंकातील एका लेखामध्ये ख्रिश्चन मिशनऱ्यांनी धर्मप्रसारासाठी बनविलेल्या ८३ मिनिटांच्या ध्वनीफितीचा ८३० भाषांमध्ये अनुवाद केला गेल्याची माहिती दिली. धक्कादायक म्हणजे ही चित्रफित इतर धर्मियांना दाखवून त्यांना आपल्या धर्माकडे आकर्षित केले जात आहे. माहितीच्या स्फोटाचा योग्य वापर व योग्य कृती यावर त्यांनी भर दिला. सजगता हा आजचा युगधर्म झाला पाहिजे, ही त्यांची कळकळ दिसून येत होती. चित्रपट दिग्दर्शक राजदत्त म्हणाले, साहित्यातील प्रचंड ताकद ओळखता आली पाहिजे. समाजासाठी आपण साहित्याचा काय उपयोग करू शकतो, याचा विचार साहित्य लेखन करताना सतत जागता ठेवला पाहिजे.
८ वे राज्यस्तरीय विद्यार्थी साहित्य संमेलन- ‘प्रतिभासंगम’
डावीकडून- प्रा. भूषण भावे संचालन करताना
प्रा. चंद्रकांत शंदे निमंत्रक
प्रवीण घुगे- प्रदेश मंत्री
ज्योर्तिभास्कर जयंत साळगावकर- स्वागताध्यक्ष
डॉ. एस्. एल्. भैरप्पा- उद्धाटक
प्रा. शेखर चंद्रात्रे- प्रदेश अध्यक्ष
मंगेश पाडगावकर- कवी
शरदमणी मराठे- स्वागत सचिव
समारोपाच्या दिवशी विद्यार्थी व वैचारिक यांच्यातील परिसंवादासाठी दिलेला विषय होता, ‘जागतिकीकरणाचा समाज, संस्कृती आणि साहित्य यावर होणारा परिणाम आणि आव्हाने’. या परिसंवादामध्ये सुश्री निळू दामले, प्रा. विष्णू मगरे, श्री. विनय सहस्त्रबुध्दे व अर्थातच विद्यार्थी सहभागी झाले होते. आपली मते मांडताना श्री. विनय सहस्त्रबुध्दे यांनी सांगितले की, ‘आपली संवेदनशीलता प्रवाहाच्या विरोधात तीक्ष्ण ठेवून ती टिकवून ठेवता यायला हवी. प्रवाहात टिकून राहण्यासाठी समाज अस्मितेचा मार्ग निवडतो.’

समारोपाच्या दिवशी मुक्त संवाद साधताना वीणा गवाणकर म्हणाल्या की, चरित्र लेखन कांदबरीपेक्षा अद्भूत असून ते अधिक परिणामकारक ठरते. माणसांचा वेगळेपणा मला नेहमीच भुरळ पाडतो. स्वत:ला कार्यात झोकून देण्याऱ्या व्यक्तींचे विविध पैलू पकडणे हे माझें आग्रहाचे काम आहे, आवडीचे काम आहे. ‘एक होता कार्व्हर’ ही साहित्यकृती यामुळेच माझ्या हातून घडली.

गोवा विद्यापीठाचे ८३ विद्यार्थी अ. भा. वि. प. ने आयोजित केलेल्या ह्या संमेलनामध्ये सहभागी झाले होते. विदर्भ, मराठवाडा, खानदेश, उत्तर व पश्चिम महाराष्ट्र असे, सर्व राज्यभरातून एकंदर ४१४ विद्यार्थी उपस्थित होते. ही उपस्थिती लक्षणीय होती. यातून ‘प्रतिभासंगम’ सारख्या उपक्रमांची गरज अधोरेखित होते. वैचारिकतेकडे झुकलेल्या युवा वर्गाचे उपस्थित विचारवंतांनी कौतुक केले. उद्याच्या आशांचे किरण या संमेलनामुळे पाहता आल्याचे समाधान उपस्थित बुजुर्गांना लाभले.