संगणकीय संस्कार शिबीर 2

शासकीय अभिक्षण गृहातील (रिमांड होम) मुलांसाठी राबविलेला एक उपक्रम….
remand-homeशिबीराच्या पहिल्या वीस दिवसात आम्ही मुलांचा अभ्यास केला. त्यांच्या आवडीचा विषय, गाण्याची आवड, त्यांच्या सवयी यांचा बारकाईनं अभ्यास केला. त्यांची अभ्यासाची आवड जाणून घेतली, आणि आमच्या लक्षात आलं….

काही मुलं छान गातात, चित्रे काढतात, काहींना अभ्यासाची गोडी आहे. दुसरी बाब सर्वांच्याच बाबतीत लक्षात आली ती ही की मुलांना नीट वाचता येत नाही, लिहिता येत नाही लिहिण्याचा कंटाळा येतो वगैरे.

आणि आम्ही सुरूवात केली शिकवायला अगदी पहिलीच्या धडयापासून. वेगवेगळे शब्द, त्यांचा उच्चार वारंवार करून घेतला. त्यासाठी सुध्दा संगणकाची खूप मदत घेतली. छोटे छोटे वाक्य वाचायला दिलेत. जवळजवळ दहा ते पंधरा दिवसात मुलांना बऱ्यापैकी वाचायला येवू लागलं. दररोजचं शुध्दलेखन हा नित्यनेम बनला. पुढे माहिती वाचायला देवून तीच माहिती लिहून आणायला सांगितली. ती संकलीत माहिती नागपूरच्या दैनिक तरूण भारतच्या ‘स्पंदन’ पुरवणीला पाठविली. मुख्य म्हणजे त्यातील बऱ्याच जणांची माहिती पुरवणीतून प्रकाशीत झाली. मुलांना त्यांनी संकलीत केलेली माहिती त्यांच्या नावासह वृत्तपत्रात बघून खूप आनंद झाला आणि सुरू झाली चढाओढ. प्रत्येकजण दररोज कुठलीतरी माहिती लिहून आणायला लागला. पुस्तकांची मागणी वाढू लागली. आमचाही उत्साह वाढला. शैक्षणिक माहिती सोबतच सामान्य ज्ञान मुलांना देण्यात येवू लागलं. मुलांना सुरवातीला आम्ही चित्रे काढून दिलीत, ती त्यांना रंगवून आणायला सांगितली. मुलांनी चित्रें चांगली रंगविलीत. पुढे मुलांनीच चित्रे काढायची आणि रंगवायची असा उपक्रम सुरू झाला. मुलं आता कात्रणं जमावायला लागलीत. नुकतच एका विद्यार्थ्याला त्याने लिहिलेल्या लेखाचं मानधन प्राप्त झालं. त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. आम्हाला सुध्दा खूप बरं वाटलं.

एव्हाना दोन महिने संपत आले होते. संगणकाच्या विविध अवयवांची माहिती, त्यांचे उपयोग व कार्ये, संगणकाचा उपयोग मुलांना कळला होता. मुलांमधील परीवर्तन आम्हाला दिसायला लागलं होतं.

मध्येच एकदा विचार आला, आम्हीच आम्ही मुलांना शिकविण्यासोबत समाजातील इतरांशी या मुलांची ओळख झाली तर…? आणि नविन उपक्रम सुचला ‘गप्पा टप्पा’ या मुलांसोबत गप्पा मारण्यासाठी कुणालातरी बोलवायचं असं ठरविलं आणि या उपक्रमात गृहिणी, अधिकारी, वृत्तपत्राचे प्रतिनिधी, शिक्षक, डॉक्टर्स अशा विविध क्षेत्रातल्या मान्यवरांसोबत मुलांना गप्पा मारायला मिळाल्यात. ‘सर, आपल्याला किती मुलं आहेत?’ या प्रश्नापासून ते ‘आपल्या आयुष्यातील अविस्मरणीय प्रसंग कोणता?’ असे प्रश्न विचारतांना मान्यवरांनीही आनंद लुटला. कुणाच्या पूर्वस्मृतींना उजाळा मिळाला.

येणा-या मान्यवराचं स्वागत ही मूलं स्वागत गीतानं करतात. स्वत: फूलं, फांद्या यांपासून गुलदस्ता तयार करून अतिथींना देतात. शिबीर संपायला दहा बारा दिवस उरले असतांना मुलांना जाणवणारी

समारोपीय कार्यक्रमात उत्तम संचलन करणारा शिबीरार्थी शिवशंकर वरखडे वर्ग 9 वा.
हुरहुर आमच्या लक्षात आली. शेवटच्या दिवशी कार्यक्रमात सादर करण्यासाठी एक गाणं निवडलं.तो होता सवाल-जवाबाबातून प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न केला. मुलांची तयारी चांगली झाली. संगणकाची माहिती देतांना एकेका मलास संगणकाचा अवयव संबोधून त्या अवयवाची माहिती सांगण्याचा अभिनव कार्यक्रम तयार झाला. मुलांचा उत्साह दांडगा म्हणून कार्यक्रमात विविधता आली.

दि. 29 डिसेंबरला शासकीय अभिक्षण गृहातील हॉलमध्ये समारोपाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचं उत्तम संचलन शिबीरार्थी शिवशंकर वरखडे यानं केलं. या प्रसंगी काहींनी उत्स्फूर्तपणे आपलं मनोगत व्यक्त केलं. मुलांनी सादर केलेला सवाल-जवाब भाव खावून गेला. मुलांनी काढलेली चित्रे सर्वांना आकर्शीत करीत होती. या प्रसंगी मनोहर भाई पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. बी. आगलावे यांनी मुलांचं कौतुक केलं तसंच त्यांचं समयोचीत मार्गदर्शन लाभलं. मुलांनी गायीलेल्या गोड आवाजातील पसायदानाने हा कार्यक्रम संपन्न झाला.

या शिबीरातील आमचा उद्देष ब-याच प्रमाणात पूर्ण झाला. संगणक केवळ शिकण्यासाठीच वापरायचा ही संकल्पना दूर सारून त्याचा शिक्षणात कसा वापर करता येईल हे आज फार महत्त्वाचं झालं आहे. शैक्षणिक साहित्य म्हणून त्याचा वापर झाल्यास न समजणारा भाग मुलांना विश्लेषीत करून सांगता येतो व त्याचा प्रभाव अधिक पडतो हे आम्ही अनुभवलं.

– श्रीकांत तिजारे

  • श्रीकांत भास्कर तिजारे विज्ञान पदविधर असून नागपूर विद्यापिठाचा संगणकातील एक वर्षाचा संगणकाचा पदविका अभ्यासक्रम 1990 ला पूर्ण केला आहे. नागपूर आकाशवाणीवर बालविहार, गोकूळ, किलबील या कार्यक्रमातून मुलांसाठी कथा, नाटयछटा लिहून सादर केलेल्या आहेत.
  • सौ. माधुरी श्रीकांत तिजारे ही मराठी वाङ्मय पारंगत (M.A.) असून गृहिणी आहे. मुलांमध्ये रमणं फार आवडते. मुलांसाठी काहीतरी वेगळं करण्याचा व त्यांचेवर चांगले संस्कार करण्याचा सदैव प्रयत्न करीत असते.