वर्षानंतर गणपती आले आणि इथल्या महाराष्ट्र मंडळाने नव्या जोमाने कामाला सुरूवात केली. गेल्या मंगळवारी श्री गणेशाची प्रतिष्ठापना मोठया उत्साहात आणि बहुसंख्येने उपस्थित लोकांच्या साक्षीने पार पडली. वर्ष भर काही ना काही कारणाने न भेटू शकणारे सगळेजण या वेळी मात्र आवर्जून येतात आणि लो. टिळकांनी लोकांना एकत्र करण्याच्या ज्या उद्देशाने हा उत्सव चालू केला तो काही अंशी तरी सफल होतो असं म्हणावयास हरकत नाही…. तरी मी पोहोचलो तेव्हापर्यंत लोकांची खूप गर्दी झाली होती.
मंडळाने सभागृह खच्चून भरले होते. १५० ते १७५ लोकांची बसायची क्षमता असणाऱ्या त्या सभागृहात सुमारे ३५० ते ४०० लोक आले होते. अर्थातच गर्दीत होणारी गडबड गोंधळ इथेही होताच… अगदी पुण्या मुंबईत एखाद्या कार्यालयात गेल्यासारखे वाटत होते. प्रचंड गर्दीत दर्शन आणि प्रसाद घेउन मी तेथून निघालो. या राणीच्या राज्यात इतके मराठी लोक एकत्र आलेले पाहून कसे बरे वाटले. काल आणि परवाच म्हणजे शुक्रवार आणि शनिवारी विविधी मनोरंजनाचे कार्यक्रम होते. यातील सर्व कलाकार हे स्थानिक होते. शुक्रवारी मंडळात शुभदा परांजपे यांच्या सुरेल गायनाचा कार्यक्रम होता. कोणताही गायनप्रकर समर्थपणे हाताळण्याच्या शुभदाच्या हातोटीमुळे कार्यक्रम छान झाला. याच दिवशी लहान मुलांचे सुध्दा कार्यक्रम होते…. ते सुध्दा चांगले झाले. एवढयाशा चिमुरडयांनी सुध्दा प्रेक्षकाना खिळवून ठेवले होते. शनिवारच्या कार्यक्रमांमध्ये समावेश होता तो एक वगनाटय, प्रसाद शिरगावकर यांची विडंबने समीर शिरवाडकर यांचाच एकपात्री प्रयोग आणि मिलिंद आगरकर व प्रसाद शिरगावकर यांची एकांकिका यांचा. काल ध्वनी व्यवस्था नेहमी इतकी चांगली नसल्याने पहिल्या वगनाटयातील कलाकारांचा आवाज प्रेक्षकांपर्यंत नीट पोहोचत नव्हता आणि याचा परिणाम व्हायचा तोच झाला आणि बरेचसे प्रेक्षक कार्यक्रम न पाहताच निघून गेले. पण यामुळे ते एका अविस्मरणिय अनुभवाला मुकले असे म्हणता येइल…. इथल्या लोकांना विडंबने ऐकण्याची फारशी सवय नसावी. त्यामुळे प्रसादने पहिल्याच ओळीला जी दाद घेतली ती शेवटपर्यंत कायम राहिली. प्रसादच्या विडंबनांच्या कार्यक्रमानंतर वेळ होती ती समीरच्या, मावशीची. समीरने मोरूची मावशी ही व्यक्तीरेखा त्याच्या १५ मिनिटांच्या कार्यक्रमात सुरेख रंगविली. त्याची वेशभूषा सुध्दा साजेलशी होती. त्याची वेशभुषा किती उत्तम होती हे दाखवणारा एक किस्सा सांगतो…. तो backstage ला उभा होता आणि साडी नीट करत होता. तिकडून एक सद्गृहस्थ आले आणि त्याला (तिला) तसे करतांना पाहून आशाळवाणे झाले. चक्क शेररट म्हणून निघून गेले…. छानच झाला त्याचा तो प्रवेश….
रविवारी श्री गणपती अथर्वशीर्षाचे सहस्त्रावर्तन होते. मोठया प्रमाणावर उपस्थित होती. स्त्रीवृंद यात आघाडीवर होता. लंडन मध्ये स्व. श्रीमती आजीबाद्द बनारसे यांचा मानाचा गणपती प्रसिध्द आहे. ५० वर्षापूर्वी आजीबाद्दंनी जी परंपरा चालू केली ती आजतागायत अविरतपणे चालू ठेवली आहे ती त्यांची जावद्द श्री. जिरापूरे यांनी. श्री. गजाननाच्या दर्शनाला पु.ल. स्व. श्रीमती इंदिरा गांधी कै. यशवंतराव चव्हाण इत्यादी मान्यवर येऊन गेले आहेत. अजून पाच दिवस हा उत्सव चालू राहणार आहे. त्या निमित्ताने परत एकदा nostalgia काय असतो याची प्रकर्षाने जाणीव होते आहे….. एक गोष्ट खेदाने नमूद करण्याचा मोह आवरत नाहीये. सध्या मंडळाच्या इमारतीचे बांधकाम चालू आहे. आतापर्यंत इतके मराठी लोक इथे येउन गेले. जर प्रत्येकाने थोडीशी मदत मंडळाला केली तर हे बांधकाम लवकर पूर्ण होऊ शकेल. पण दिखाव्यासाठी, आपला समाजच, आपली संस्कृतीचा टाहो फोडतांना असे लोक सढळ हाताने मदत मात्र करत नाहीत.. इथले गुजराथी काय किंवा पंजाबी काय… या बाबतीत आपल्याहून खूप पुढे आहेत. हे अंतर भरून काढण्याची श्री गणेश सर्वांना सुबुध्दी देवो हीच प्रार्थना…
– मिलिंद आगरकर