आमचा भोंडला

मी आसावरी पाटील, आम्ही भोंडला कसा साजरा केला ते, मी तुम्हाला सांगते. आमच्या नवीनच वसलेल्या शुभारंभ कॉम्प्लेक्स मधील सर्वच रहिवासी नवीन असल्यामुळे येथला प्रत्येकच सण आमच्यासाठी नवा होता. सर्व रहिवाश्यांचा उत्साह देखील दांडगा होता. सोसायटीत झालेल्या नवरात्री उत्सवात महिलांचा सहभाग फार कमी असल्याने, आम्ही महिलांनी भोंडला साजरा करायचे ठरविले. त्या प्रमाणे प्रत्येकीने नऊवारी साडी, नाकात नथ, कानात कुडी, केसांचा खोपा किंवा एक वेणी घातली. प्रत्येकीने वीस वीस रूपये वर्गणी दिली. त्या पैशातून भोंडल्याची खिरापत आणली. एका पाटावर हत्तीचे चित्र काढून त्याच्या भोवती खेळण्यातले सात लाकडी हत्ती उभे केले. सर्वजणांनी भोंडल्याची पूजा केली. खव्याच्या लाडवाचा नैवेद्य दाखविला.

भोंडल्याची गाणी म्हटली. ऐलमा पैलमा पासून अगं अगं सुने, काय म्हणता सासूबाई पर्यंत सर्व गाणी तालासुरात गोल फेर धरून म्हणून झाल्यावर ‘आमचा भोंडला संपला’ हे गाणे गाऊन भोंडला संपल्याची सूचना केली.
खिरापत ओळखायच्या वेळी खूप धमाल आली. एक एक जण तोंडाला पाणी सुटेल अशा पदार्थांची नावे घेऊ लागले. शेवटी मीच खिरापत विकत आणली असल्यामुळे मुलींचा जास्त अंत न बघता खिरापत बटाटा वेफर्स ची आहे हे जाहीर केले. मुलींच्या घोळक्यातून, ‘अय्या, बस काय, हीच का खिरापत’ इत्यादी उद्गार हळहळत बाहेर पडले. नंतर फक्त बायकांचाच असा गर्बा नृत्याचा कार्यक्रम झाला. रात्री दोन अडीच वाजेपर्यंत मस्त मजेत वेळ गेला. पुढल्या वर्षी यापेक्षा थाटात भोंडला साजरा करायचे ठरवून सर्वजणी आपापल्या घरी गेल्या.

मी पाठविलेली भोंडल्याची गंमत वाचून तुम्हाला आवडल्यास आम्हाला जरूर कळवा.

– आसावरी पाटील