एका ताटात जेवण

(अंगतपंगतची पुर्वस्थिती )

meals-in-one-dish

हा फोटो खरं तर बालपणातील खाण्याच्या पद्धतीच्या एका सुमधूर आठवणीसाठी सुद्धा आहे. एकत्र कुटुंबात वाढलेल्या किंवा अनेक भावंडांसोबत सुट्टी घालवलेल्यांनां जेवणाची ही पद्धत नक्कीच आठवत असेल ..

त्याचं झालं असं की काल रात्री मी मुलांना आमच्या लहानपणीच्या आठवणी सांगत होते. त्यात आम्ही लहानपणी सुट्ट्यांमध्ये बहिणभाऊ, चुलत- आते सगळे मिळून आमच्या गावी जाऊन कसे धम्माल करत असू.. नदीवर जात असू.. मोठ्या वाड्यातून लपंडाव खेळत असू.. आणि जो भाऊ किंवा बहिण लाडकी असेल तिच्या सोबत एका ताटात जेवण करत असू.. वगैरे सांगत होते. मुलांनां खूप गंमत वाटत होती.. आई बाबांच्या लहानपणीच्या गोष्टी ऐकायला त्यांनां खूप मजा येते…

आज सुट्टी असल्यामुळे उशिरा उठून ब्रंच चा plan ठरला तशी मुलं लगेच म्हणाली, “आई, आज आम्ही एका ताटात जेवणार” क्षणभर मला समजलंच नाही. तसे “युवराज” म्हणाले “तुम्ही नाही का लहानपणी…” आई, that story you told last night.. ” इति आमची इंग्रजाळेली राजकुमारी..!! आणि मग सगळा प्रकार मला लक्षात आला !

स्वयंपाक करताना मन अलगद गावी गेलं..मराठवाडय़ातील परळी वैजनाथ ज्योतिर्लिंगा जवळचं, चोहोबाजूंनी सह्याद्री नी वेढलेलं आणि गोदावरीने मिठी मारलेलं छोटंसं, देखणं पोहनेर हे आमचं गाव. भावंडांनीं भरलेलं घर ..मोठा चौसोपी वाडा, शहाबादी फरशांचं अंगण, गाई म्हंशींच्या हंबरण्याने संपन्न गोठा, परस, गारेगार लादणी, पानाचा मोठा पितळी अष्टकोनी डबा इकडून तिकडे फिरत गावातल्या विविध प्रश्नांवर चर्चा घडणारी बैठक, बायकांची वर्दळ आणि विविध प्रकारचे सुवास दरवळणारं मोठं स्वयंपाकघर, त्याला लागून मोठी देवाची खोली, आणि स्वयंपाकघराच्या उजव्या हाताला एक बाळंतिणीची खोली! आम्हा मुलांनां ही खोली भारी आवडत असे. छान उबदार वाटत असे तिथे. रचना अशी होती की संपूर्णपणे प्रायव्हेट असलेल्या या खोलीत वरून एक झरोका होता त्यातून सकाळची कोवळी उन्हं बाजेवर पडत आणि दुपारी मात्र सावली आणि हलकीशी झुळूक येत असे. पण या खोलीत सतत कुणीतरी बाळंतीण असल्यामुळे आम्हा पोरासोरांनां इथून पिटाळलं जाई!..

गच्चीवर मात्र आमचा संपूर्ण मालकी हक्क होता. तिकडे आमचंच राज्य असे..

सकाळी लवकर उठून चूलीसमोर जाऊन बसायचं.. ही चूल म्हणजे तेव्हांचा गिझर! बाहेरून चूल आणि आत बाथरूममधून त्याच चुलीवर पाणी तापवण्याचा मोठा तांब्याचा हंडा.. त्या चुलीवर तापलेल्या तांब्याच्या हंड्यातलं पाणी तांब्याच्याच मोठ्या घंगाळ्यात घ्यायचं.. वाफा येणाऱ्या पाण्याला एक विशिष्ट सुंगध यायचा .. बाथरूमला लागूनच आतून बाहेरून दोन्हीही बांजूंनीं वापरता येतील असे थंड पाण्याचे दोन हौद होते.. या सगळ्याची आम्हाला खूप गंमत वाटत असे. खेड्यात रहात असूनही आमच्या घरात अनेक सोयी सुविधा होत्या. माझ्या आजीने जातीने लक्ष घालून त्या करवून घेतल्या होत्या.

नंतर उबदार स्वयंपाकघरात आमची पलटण ठाण मांडून बसे. धारोष्ण ताजं ताजं दुध किंवा चहा घेऊन आम्ही नदीवर /गंगेवर पोहायला जाण्याच्या तयारीला लागायचो.. आपापले कपडे टॉवेल मध्ये गुंडाळून प्रत्येकाची एक टॉवेलची छोटी वळकटी तयार होत असे. पण मुख्य असायची ती न्याहारीची शिदोरी.. तक्कू, लोणचं, दाण्याची, जवसाची किंवा कारळाची अशा खलबत्त्यात केलेल्या चटण्या आणि तेल.. सोबत पोळी किंवा भाकरी.. आम्ही खूष… मनसोक्त डुंबून झाल्यावर ही साधी न्याहारी करून मन तृप्त व्हायचं..

दुपारी जेवणाच्या लांबलचक पंगती बसत. पाटपाणी, रांगोळी सगळं कसं शिस्तीत आणि तितक्याच सहजतेने होत असे. “वदनी कवळ घेता” च्या घोषात जेवणास सुरूवात होत असे. रस किंवा पुरणपोळी किंवा श्रीखंड आणि दोन भाज्या, चटण्या, कोशिंबीरी पापड, लोणचं, कुरडया.. असं साग्रसंगीत जेवण असायचं. जेवणानंतर आम्ही गुपचूप बैठकीत जाऊन पानाच्या डब्यातून बारीक सुपारी आणि खडीसाखर तोंडात टाकत असू. एरवी मोठ्यांसमोर तिकडे जायची टाप नव्हती कुणाची! नंतर आम्हाला गच्चीवर हाकललं जाई आणि आम्हालाही तेच हवं असे…

शेणाने सारवलेली एक मातीची गच्ची (त्याला माळवद म्हणत) आणि दुसरी सिमेंटची… शेतमाल ठेवण्यासाठी दोन मोठ्या आयताकृती खोल्या होत्या. एकीत शेतातील कापूस आणि एकीत शेंगा.. या खोल्यांच्या खिडक्यांना रंगीबेरंगी काचा होत्या त्यामुळे अगदी हवेलीत असल्यासारखं वाटे…..दुपारच्या वेळी सगळी भावंडं इथेच पडीक असू.. पुस्तकं, पत्ते, सापशिडी, भुतांच्या गोष्टी, बाहुला बाहुलीचं लग्न आणि भातुकलीच्या पंगती सारं काही इथेच… शाळेत वर्षभरात मिळायचं नाही ते शिक्षण इथे मिळायचं..कट्टी इथेच आणि बट्टीही इथेच! आमचं सुटीतलं बालपण याच खोल्यांनीं समृद्ध केलं होतं..

कधी खूपच गरम होत असेल तर आम्ही आमचा मुक्काम लादणी मध्ये हलवायचो. या लादणीचीही मोठी गंमतशीर आठवण आहे. वाचनाची आवड असलेल्या माझ्या भावाने गावातल्या मुलांसाठी आपण एक लायब्ररी सुरू करू अशी टुम काढली. त्याची आज्ञा शिरसावंद्य मानून आम्ही सर्वजण त्या सुटीत आपापल्या घरची पुस्तकं घेऊन आलो. तिथल्या मुलांसाठी ही संकल्पना नवीन होती. सुरुवातीला छान प्रतिसाद मिळाला. पण हळूहळू लक्षात यायला लागलं की एकदा नेलेली पुस्तकं परत येतच नाहीत. आणि मग महिनाअखेर हिशोब केला तर केवळ चार पुस्तकं शिल्लक राहिली होती. तेलही गेलं आणि तूपही गेलं होतं!

मग संध्याकाळी गावात फेरफटका, शेतावर जाणे, गावातल्या सगळ्या देवळात जाणे… आमचे कौटुंबिक गुरूजी त्र्यंबक गुरुंकडे जाणं हा एक दिनक्रमातला एक अविभाज्य भाग होता कारण ते सुरस गोष्टी सांगत.. पुलं च्या हरीतात्यां सारखं प्रत्येक प्रसंगं स्वतःच जणू तिथे आहोत असं सांगत. ते नेत्रहिन होते पण आमच्या डोळ्यांसमोर अख्खं रामायण, महाभारत उभं करीत… आणि मग घरी येऊन देवासमोर किंवा अंगणात तुळशीसमोर शुभंकरोती, रामरक्षा असं म्हणायचं.. तिथेही पाठांतराच्या स्पर्धा लागत..


रात्री पिठलं भात, खिचडी कढी, वरणफळं, तक्कू धिरडी, यापैकी काहीतरी मेनू असे.. आणि मग आम्ही भावंडं आपापल्या आवडत्या बहिण किंवा भावासोबत “एका ताटात” जेवायला बसत असू. ही केवळ एक पद्धत नव्हती तर अतिरिक्त ताटं वाचवण्यासाठी बायकांनीं काढलेली एक क्लृप्ती होती. पण त्या ही पलिकडे जाऊन आमच्यासाठी कधी कधी भावंडांत आपापसांत चालणाऱ्या भांडणातली ती एक “कृष्ण नीती ” होती. आपल्या बाजूने कोण कोण आहे हे ‘शत्रुपक्षाला’ दर्शविण्यासाठी ती एक “ताटनिती” होती.. विशेषतः मोठी ताई आपल्या सोबत एका ताटात जेवायला बसली की मग आपली बाजू आता भक्कम आहे असा विश्वास वाटत असे… पण हे सगळं तेवढ्यापुरतंच.. पुन्हा सकाळी गंगेवर जायला आमची गॅंग मोठ्या ताई आणि दादाच्या मार्गदर्शनाखाली एकत्र सज्ज!!… किती सुरेख दिवस होते ते..

आज भावंडांच्या भेटीगाठी पुर्वीइतक्या होत नाहीत. पण “एका ताटाने” जोडलेल्या नाळेने अजूनही एकमेकांना बांधून ठेवलंय. एकत्र जमलो की त्या आठवणी काढतो. हसूही येतं आणि रडूही…

सध्याच्या दारबंद संस्कृतीमध्ये घरात दोन माणसं जेवायला आली तरी किती दडपण येतं आणि आमच्या आई काकू आणि वहिन्यांनीं ते सगळं किती लीलया पार पाडलं….

एका साध्या जेवण पद्धतीवरून आठवणींचीं ही सुंदर साखळी तयार होत गेली… “दिल ढूंढता है फिर वही फुरसत के रात दिन..” असं म्हणत मी भानावर आले.

तसा मेनू साधाच बनवला होता.. पण आज बालपणीच्या आठवणींचीं सोनेरी झालर त्याला जोडली गेली होती.. मुगाची धिरडी, कमी तिखटाचा, गोड कैरीचा तक्कू, सोबत दह्याचा सट, आणि लहानपणीच आम्हाला मिळायची तशी दाणे गुळाची वाटी… मुलांनीं यम्मी यम्मी करत खाल्लं.. पण मी तृप्त होते ते त्यांनी माझ्या बालपणाच्या आठवणींना उजाळा दिला म्हणून आणि आईच्या बालपणीचा अनुभव हसण्यावारी न नेता तो स्वतः अनुभवण्याची इच्छा व्यक्त केली म्हणून !!

डॉ शरयू देशपांडे