एकमेकां साह्य करु (Power of Collaboration)

समूहाने रहाणं हा मानवी मनाच्या जडणघडणीचा भाग आहे. याच्या अनुषंगाने असं म्हणता येईल की आपल्या आयुष्यास एकत्रितपणात इतिकर्तव्यता आहे, साफल्य आहे – एकटेपणात एक आपसूक अपूर्णता आहे. याचा अर्थ असा की एखाद्या गोष्टीत आपल्या एकत्रित प्रयत्नांची ताकद, वैयक्तिक प्रयत्नांच्या बेरजेहून अधिक असते. आपली कुटुंबव्यवस्था ही या तत्वाचं एक ठळक प्रगटीकरण आहे.

सहकार्याने काम करणं हे आपलं स्वभावमूलक कर्तव्य असल्याने करणं भाग आहे असे मला वाटत नाही – ते ज्याला त्यातल्या फायद्याचं महत्त्व कळून येतं त्यानं म्हणून करणं जास्त संयुक्तिक आहे आजीबाईच्या गोष्टींमध्ये आपण एका सूज्ञ वयस्काची व त्याच्या भांडणा-या पाच मुलांची कथा ऐकली असेल. आपले आता फारसे दिवस उरले नाहीत हे त्या वयस्काच्या लक्षात आलं नि आपल्यापाठी या मुलांच कसं होणार या काळजीने ग्रासलेल्या त्याने मुलांना एकत्र भेटायला बोलावलं – सोबत लाकडाच्या काडया घेऊन. त्याने प्रत्येकाला एकेक काडी मोडून पहायला सांगितली प्रत्येकाला त्यात अर्थातच यश आलं मग त्याने त्यांना ५ काडयांची मोळी बांधायला सांगितली व मोडून पहायला सांगितल – कुणालाच जमलं नाही. न सांगताच मग मुलांना एकत्रित रहायचं महत्त्व कळलं नि मग त्यांनी एकमेकांशी कधीच ‘काडी मोड’ घेतला नाही. एकटयाने काम करणं नि सहकार्याने – एकत्रित काम करणं यात प्रत्येकाचे फायदे तोटे आहेत. खर तर काही वेळा वैयक्तिकरीत्या काम करणं हे परिस्थितीनुरुप असतं – पण तरीही ‘विना सहकार नाही उध्दार’ हे तत्त्व ब-याच वेळी बहुमूल्य ठरते असा माझा अनुभव आहे.

आज ज्ञानाच्या कक्षा नि क्षेत्र इतकी रुंदावली आहेत की जन्मभर तपस्या करुनही कुणाला सगळया क्षेत्रात प्रावीण्य मिळवणं अशक्य आहे. म्हणून आजचं युंग हे व्यासंगाचं (specialisation) आहे ज्यामध्ये वेगवेगळया व्यक्ती वेगवेगळया क्षेत्रात प्रावीण्य मिळवतात म्हणूनच एका महत्त्वाच्या योजनेच्या (Project) साफल्यासाठी त्या योजनेशी संलग्न अशा विविध पैलूंवर वैयक्त्तिक प्रावीण्य मिळवलेल्या विविध व्यक्ती एकत्रित येणं नैसर्गिक आहे. हे एकत्रित सहकार्य उत्तम प्रावीण्य, प्रयत्न यांच एकत्रीकरण करुन कामाच्या वेळेची बचत करतेच पण केवळ संख्यात्मक वा गुणात्मक (वा दोन्ही) रित्या उत्तम काम जुळवून आणणं एवढयातच सहकार्यचं मुल्य सीमित नाही तर त्याचा मोठा फायदा एकत्रित येणा-या व्यक्तींना त्या एकत्रित येण्याने जे एकमेकांपासून शिकायला मिळत एकमेकांना समजून घेता येतं या समृध्दीत जास्त आहे.

आजच्या जगातील घटक जाणीवपूर्वक एकमेकांवर जास्त अवलंबून आहेत. आजच्या युगात तुम्ही किती स्वयंपूर्ण आहात यावर तुमचं यश अवलंबून नसून तुमच्या सहकार्य – परिवार (Network) किती दूरवर पसरला आहे व त्यांच्याकडून तुम्ही तुमच्या कामासाठी किती समर्थ सहकार्य जोडू शकता यावर जास्त अवलंबून आहे.

सहकार्याचं महत्त्व, फायदे ब-याचजणांना माहीत असतात मग असा प्रश्न पडतो की हे ज्ञान असून निर्मळ सहकार्याने काम तडीस नेल्याची सकस उदाहरणं आपल्या आजूबाजूना का दिसत नाहीत ? -यात अडथळा कोणता आहे ?

आपल्यापैकी काही (कदाचित बरेच) लोक बुजरे भिडस्त असतात. त्यांना सहकार्याच महत्त्वही माहीत असतं, कुणाची मदत मिळाली तर हवी असते पण मागणार नाहीत – कदाचित ‘कुणी फटकन नाही म्हणालं तर’ अशी भिती असावी तर काही लोक (स्वत:ला) अतिशहाणे (समजणारे) असतात. ‘त्या अमक्या अमक्याला (माझ्यापेक्षा जास्त) काय कळतय?’ अशा धुरकटलेल्या चष्याने जगाकडे पाहिल्याने त्यांना स्वत:पलिकडे काही दिसत नाही. त्यांची स्वत:ची प्रतिमा एका रिकाम्या काचेच्या भांडयासारखी असते. कुणाच्या भांडारातून आपल्या भांडयात ज्ञानकण साठण्यापेक्षा त्या प्रतिमेची काच न तडकणे त्यांना जास्त महत्त्वाचं असतं कुणाकडे मदत मागणं त्यांना कमीमणाचं किंवा आपल्या दुबळेपणाचं लक्षण वाटत. स्वत:भोवती अशा तटबंदी उभारुन ना त्यांना काही मदत मिळते ना ही त्यांची काही प्रगती होते.

कारण काहीही असलं तरी परिणाम एकच ज्यांना काही शोधायचं नसतं त्यांना काही सापडतही नाही

‘सहकारित प्रयत्नांचा’ पाया आपली आपल्यावर व दुस-यावर असणारी श्रध्दा आहे. तुम्ही स्वत:च्या कुवतीविषयी प्रामाणिक व आश्वस्त असाल तर तुम्हाला मदत मागताना कमीपणा किंवा असुरक्षितता (Insecurity) वाटणार नाही आणि मग मदत मागितल्यावर मदतीचे किती हात पुढे येतात याची आपल्याला कल्पनाही करता येणार नाही. परस्पर सहकार्याचा एक अन्योन्य संबंध (reciprocal) आहे. ज्यांचा स्वत:वर विश्वास असतो त्यांना दुस-यांच्या कुवतीवर विश्वास टाकणं जड जात नाही तसचं ज्यांना सहकार्य मागणं – मिळवण्याचं महत्त्व माहीत असतं ते दुस-यांसाठी सहकार्याचा हात पुढे करण्यातही तत्पर असतात.

परस्पर सहकार्याची प्रक्रिया एकाअर्थाने एकमेकांना समजावून घेऊन पुढे जाण्याची आहे. या जगामध्ये ज्ञान केवळ माझ्याकडेच सीमित नसून अपरिमित पसरलेलं आहे. ही जाणीव हे परस्पर सहकार्याचा दुसरा पाया आहे. ही जाणीव, आपल्यापैकी प्रत्येकाकडे काहीतरी देण्यासारखं आहे या आदरपूर्वक विश्वासापोटी येते मग सुरु होतं सहकार्य – पर्व !

काही साशंक लोकांच्या मते आजच्या युगात – जिथे कामाचं ‘मशीनीकरणं’ (Mechanisation) किंवा ‘संगणिकीकरण होत चाललं आहे किंवा ‘Virtual office’ ची शक्यता वाढत आहे – पारंपारिक offer मध्ये एकत्रित काम करण्याची संधी फार उरणार नाही. कदाचित अशा trends असतीलही, पण माझी अशी ठाम धारणा आहे की कितीही Mechanisation झालं तरीही कुठलही काम मानवी हस्तक्षेपाविना अपूर्ण आहे. मशीनची कुवत कितीही वाढली तरी ती त्यांच्या क्षमतेच्या पलीकडे जात नाही याउलट मानवी क्षमतेत कुठलीच मर्यादा नसते.

माझ्यामते जोपर्यंत एका मानवी स्पर्शामध्ये, दुस-या मानवी मनात जागृततेची स्पंदने संक्रमित करण्याची क्षमता असेल तोपर्यंत परस्पर मानवी सहकार्याच्या नभावर सूर्य पश्चिमेला कधीच उगवणार नाही.

यतीन सामंत