कर्मचारी मूल्यविधान

आपल्या आयुष्यातील नेमकं स्थान काय ? आपण नोकरी कशासाठी करतो ?…. जगण्याचं साधन म्हणून (पगार मिळतो ना!) की आयुष्यात दुसरं काही करता येण्यासारखं नसल्याने वेळ घालवण्यासाठी, की कुठलेही इमाने इतबारे चिकटवून घेऊन आयुष्यभराची चिंता सोडवण्याचं साधन म्हणून की आजच्या ‘Instant’ युगात पुढची अधिक चांगली (म्हणजे कमी श्रमात अधिक पैसा देणारी) नोकरी मिळेपर्यंत बूड टेकायची जागा ?

स्पर्धात्मक युगामध्ये नोकरी मिळणे व त्यानंतर राखणे यासाठी निष्ठा/ज्येष्ठता/हाजी हाजी करणे असे इतर निकष नाहीसे होऊन केवळ गुणात्मक क्षमता (competence) हाच एक सक्षम निकष लागणार असेल तर योग्य ती गुणवत्ता शोधणं व आपल्याकडे दीर्घकाळ राखणं यासाठी कंपन्यांनाही आपण आपल्या सहयोगी/कर्मचा-यांसाठी काय करतो, ते आपल्याकडे अधिक वर्षे काम करण्यात उत्सुक राहतील याचा विचार करणं अत्यंतिक जरूरीचे आहे.

म्हणून काम/कामाची जागा (place of work) ही कर्मचा-यांना कामाच्या तासात कचेरीत डांबून ठेवायची किंवा त्यांच्यावर ‘नजर’ ठेवण्याची जागा नाही. कर्मचा-यांसाठीसुध्दा कचेरीत जावसं बिलकूल वाटत नाही, पण पैशासाठी जाणं भाग आहे किंवा (पूर्वीच्या भाषेत) ‘पाटया टाकण्याचं’ ठिकाण नसलं पाहिजे. दिवसाअखेरीस पळून जाण्यासाठी दिवसभर घडयाळावर नजर ठेवण्याची जागा न होता-workplace हे ”कधी दिवस उजाडतो, मी officeला जातो नि दिवसभरात मनासारखं (with satisfaction) काम उरकून घेतो असं मनाला चेतना व उत्स्फुर्त तजेला देणारं स्त्रोत झालं पाहिजे.

हे सारं व्हायचं असेल तर कंपनीने आपल्या कर्मचा-यांसाठी एक वातावरणनिर्मिती – एक मूल्यनिर्मिती (value) करणं जरूरी आहे. आयुष्यामध्ये पैशाचं स्थान अढळ आहे आणि पुढे येणा-या काळामध्येही कदाचित असंच राहिल, पण कर्मचा-यांना आपल्याकडे ओढण्यासाठी (Attract) व आनंदाने उपयुक्त योगदान करण्यासाठी उद्युक्त ठेवण्यासाठी केवळ पैसा असं एकमेव साधन म्हणून फार तोकडा पडतो. म्हणूनच सातत्याने ओढ टिकवून ठेवण्यासाठी कंपन्यांना पैशापलीकडे जाणारं एक “ओढ-नातं” आपल्या कर्मचा-यांसाठी विकसित करायला व जोपासायचं दायित्व स्विकारणं जरूरी आहे.

हे ‘ओढ-नातं’ हे मूल्यविधान कंपनीच्या अस्तित्वाचा, व्यक्तिमत्वाचा (charactor) एक महत्त्वाचा भाग आहे. हे विधान ध्येयाची ध्यासनिर्मिती आहे. ध्येयपूर्तीसाठी एकत्रित काम करण्याची चेतना आहे. कंपनी कर्मचारी यांच्यातलं एक परस्पर भावबंध आहे.
पैशाची आयुष्यातली गरज नजरेआड न करता ‘या कंपनीसाठी काम करावं’ हा पैशापलीकडे जाणारा कर्मचा-यांच्या आयुष्यातला आनंद अनुभूत ध्यास व्हावा अशा वातावरणनिर्मितीची कळकळ – या मूल्यविधानाच्या पाठची प्रेरणा असते. (असली पाहिजे)

एक सक्षम (potent) मूल्यविधान असणं हे कंपनीच्या आपल्या कर्मचा-यांसमवेत दूरगामी घनिष्ठ बंध निर्माण करण्याच्या क्षमतेचं द्योतक आहे. त्यात कंपनीची दिशा,ध्येयधोरण,मूल्यव्यवस्था (valu system) नीतीमत्ता, कर्मचा-यांच्या आशाआकांक्षा या सा-यांच प्रतिबिंब उमटलं पाहिजे.

हे मूल्यविधान थोडेफार लग्न जुळण्याच्या प्रक्रियेसारखं आहे. प्रस्तावित जीवनसाथीकडून आपल्या अनेकविध अपेक्षा असतात. आपली निवड आपण कुणा एकाच पैलूवर, एकाच निकषावर जोखत नसतो. जेव्हा निवड ठरते तेव्हा काही निकषांवर आपल्याला कमी काहींवर जास्त मिळतं. पण overal गुणावगुणांच जे संयुक्त गाठोडं आपल्या हाती लागतं ते आपल्याला जीवनभरच्या प्रवासासाठी सहचारी म्हणून मान्य असतं. तद् वत कंपनीचं मूल्यविधान केवळ एक (पैसा) खांबी तंबू नसतो. ते विविध परिमाणांवर कर्मचा-यांसाठी असलेल्या नफानुकसानीची एक गोळाबेरीज असते. हे मूल्यविधान प्रत्येक कंपनीच (काहींचं stated काहींचं unstated) आपलं असं एक वेगळं व वैशिष्टयपूर्ण असतं. त्यात काय असावं हे त्या कंपनीच्या धोरणांवर, क्षमतेवर व तिच्या कर्मचा-यांच्या आशा-अपेक्षांवर अवलंबून असतं. तरीही साधारणपणे तुम्हा आम्हा कर्मचा-यांना पैशापलीकडे अप्रुप वाटणा-या गोष्टी अशा – जॉब सॅटीसफॅक्शन वैचारिक व काम करण्याचं स्वातंत्र्य, चांगल्या कामाची/कर्तबगारीची दाद, योग्य परवळ, लाँगटर्म बेनिफीट्स, गुणी क्षमतेच्या विकासाची संधी, पदोन्नती, कामाच्या जागीचे वातावरण, वरिष्ठ व सहचाऱ्यांची वर्तणूक, परस्पर आदर, सोयीसुविधा, मूल्ये, नीतीची चाड, कंपनीबद्दल वाटणारा अभिमान या सा-यांची गोळाबेरीज काय होते-आपल्याला त्यापासून काय मिळते याचा विचार करून कर्मचारी त्यानुसार पैशाच्याबाबतीत तौलानिक तडजोड स्विकारायला तयार असतात. याउलट पैसा सोडून कर्मचा-यांना कंपनीकडून इतर कुठली मूल्यप्राप्ती होत असेल तर अशी कमतरता कितीही पैसा गुणवान कर्मचा-यांसाठी जगात कुठेही भरून काढू शकत नाही व अशा कंपनीशी त्याचं दूरगामी नातं जुळू शकत नाही.

एक सक्षम, कसदार मूल्यविधानच अखेरीस एक चांगल्या व एक सुमार कंपनीतला फरक अधोरेखित करते. ते जितकं सुदृढ, जोमदार (strong) असेल तितकंच स्पर्धक कंपनीला, त्या कंपनीच्या कर्मचा-यांना आपल्याकडे ओढणं कठीण करतं. अगदी जास्त पैसा दिला तरीही.

यतीन सामंत