कारकीर्दीय उन्नती

नोकरी किंवा कारकीर्दीतील प्रगती म्हटलं की आपल्या डोळयांसमोर बढती, वरची ग्रेड, पगारवृध्दी मान/दर्जा अशा अनेक मनोविभोर कल्पना फेर धरायला लागतात. सध्याच्या भौतिक चंगळवादाच्या युगात असा विचार साहजिक आहे.

परंतु सारासार विचार केला तर नोकरीतील बढती हा आपल्या कारकीर्दीतील विकासाचा महत्त्वाचा टप्पा असला तरी केवळ एक छोटासाच भाग आहे हे आपल्या लक्षात येईल. बढती हा आपल्या एकंदरीत विकास प्रक्रियेच्या अंतर्भूत (Intrinsic) परिणामांपैकी एक आहे. पण केवळ बढती हे आपल्या क्षमतेच्या विकासाचं एक निव्वळ किंवा निखळ परिणाम नाही. बढती दिल्याने कुणाच्या कर्तृत्वात वाढ होत नसून, कर्तुत्वात झालेल्या / होणा-या वाढीला बढती ही एक दाद आहे.

सध्याच्या युगात जिथे पैसा म्हणजे प्रगती असं समीकरण बनलं आहे तिथे आपल्या आशा अपेक्षा ‘त्वरीत पैसा’ (Fast money) मिळवून देणा-या माध्यमांशी निगडीत झाल्या आहेत. त्यामुळे नोकरीतील प्रगती (सामान्यजनांसाठी – ‘बढती’) विषयक अपेक्षाचा वारू त्याला आपल्या कर्तृत्वगुणांच्या वाढीचा चारा घालून, विकासाच्या मार्गावरून दौडविण्यापेक्षा केवळ जलद भौतिक प्रगती साधण्याच्या हव्यासापोटी आपल्या (नसलेल्या) क्षमतेविषयीच्या भ्रमाचा वारा प्यायला लावून, मिळेल त्या रस्त्याने दामटवण्यावर आपला जास्त भर असतो. साहजिकच असा दिशाहीन उधळलेला वारु, लवकरच त्यातला भ्रमाचा वारा, निघून जाऊन आचके देण्याचा व आपला साग्रसंगीत भ्रमनिरास होण्याचा संभव जास्त असतो.

अशी केवळ वैयक्तिक अत्यंतिक हावेपोठी किंवा ‘अमुकतमुकची झाली मग माझी का नाही’ असं म्हणून पदोन्नती होत नसते हे आपल्याला समजलं तर भ्रमनिरासेपोटी वैफल्य वा दुस-याच्या प्रगतीबद्दल असूया अशा दृष्टीकोनाने कुणाचा फायदा तर होत नाहीच, उलट ध्येयापासून विचलित झाल्याने आपण आपल्या हाताने आपल्याच पायावर धोंडा मारुन घेतो.

आपल्या कारकीर्दीच्या भरभराटीसाठी लागणारा कर्तृत्त्व गुणांचा विकास (या विकासप्रक्रियेचा, पदोन्नती, हा केवळ एक हिस्सा आहे) कसा व्हावा हा जास्त महत्त्वाचा मुद्दा आहे ; पण पदोन्नती हा जनसामान्यांच्या जास्त जिव्हाळयाचा विषय असल्याने प्रथम पदोन्नतीविषयीचा योग्य दृष्टीकोण समजून घेऊ. कंपनी आपल्या एखाद्या कर्मचा-यांच्या बढतीचा निर्णय तेव्हा घेते – जेव्हा कंपनीला वाटतं की त्या व्यक्तीमध्ये त्याच्या सध्याच्या कामाच्या वरच्या दर्जाचं काम करण्याची क्षमता आहे (capability) किंवा विकसित होण्याची दाट शक्यता (potential) आहे नि असा वरचा पदभार दिल्याने कंपनीचा निश्चित फायदा (gain) होण्याची शक्यता दिसत असेल तर जेव्हा अशी (वरच्या पदभाराची) संधी उपलब्ध होते तेव्हा कंपनी त्या व्यक्तीचा त्या जागेसाठी इतर उपलब्ध पर्यायांबरोबर (अंतर्गत किंवा बाह्य उमेदवार) तौलनिकदृष्टया विचार करते. या तौलनिक परीक्षणात (cost / benefit) त्या व्यक्तीची उमेदवारी जिंकली तर त्या व्यक्तीच्या बढतीच्या निर्णयावर शिक्कामोर्तब होतं.

ही बढतीमागची प्रक्रिया तुम्हाला समजली तर बढत्या खिरापत वा बक्षीशी म्हणून वाटल्या जात नाहीत किंवा निव्वळ ज्येष्ठतेवर (seniority) ठरत नाहीत हे तुम्हाला उमगेल. बढती चांगल्या कामाचं पारितोषिक ही (performance reward) नाही. बढती व पारितोषिक यांमध्ये एक मूलभूत फरक असा पारितोषिक भूतकाळातील कामाची दाद आहे तर बढती भविष्यकाळातील काम करण्याच्या तुमच्या क्षमतेची नोंद (Assessment) आहे.

आता आपण (कार्य किंवा व्यक्तिमत्त्वाच्या) ख-या विकासाकडे वळू या. कुठल्याही प्रगतीचा पाया असलेला क्षमतेचा विकास – म्हणजे आपल्या क्षमतेत, गुणवत्तेत, मानसिक दृढतेत, वैचारिक बैठकीत, गुणात्मक वाढ घडवून आणणं आहे. आयुष्यातील आव्हानांना यशस्वीरीत्या व जबाबदारीने तोंड देण्याची क्षमता वाढवणे आहे. अखेर अशा कोणत्याही प्रक्रियेने आपलं आयुष्य गुणात्मक व मानसिक पातळीवर संपन्न होण्यातच त्या प्रक्रियेच सार्थक आहे.

ही गुणात्मक समृध्दी आपल्या बढतीकडे बघण्याच्या आशाळभूत किंवा असुरक्षिततापूर्ण दृष्टीकोणात मूलभूत बदल घडवून आणून त्यात एक आश्वासक निर्भयपणा (confidence) आणते. मग तुम्हाला संधीचे दार ठोठावायची गरज लागत नाही-तुमचं वाढलेलं कर्तृत्त्वच अशा संधीना तुमच्या दारासमोर आणून उभी करेल. गुणवृध्दी जर तुमच्या कंपनीच्या लक्षात आली नाही किंवा त्यांच्याकडे तेव्हा तशी संधी नसेल तर दुसरी योग्य कंपनी तुम्हाला तशी संधी द्यायला तत्पर असेल याची पूर्ण खात्री बाळगा !

स्वत:ची गुणवृध्दी करणे हे ‘Share investment’ प्रमाणे आहे. तुम्ही जेव्हा तुमच्या ‘Stock value’ मध्ये वृध्दी घडवून आणता तेव्हा तुमच्या कंपनीकडे त्याच्या ‘encashment’ ची सोय नसेल तर- जर तुमचा ‘stock’ चांगला असेल तर तुम्ही तो बाजारामध्ये कधीही, कुठेही ‘encash’ करु शकता म्हणूनच इतर कुठल्याही मुद्यापेक्षा तुमच्या विचारांच्या नि परिश्रमांच्या केंद्रस्थानी ‘स्वत:ची गुणवृध्दी कशी करता येईल’ हा मुद्दा असणं जास्त जरुरी आहे.

गुणवृध्दीने बढतीचा / इतर प्रगतीचा मार्ग खुला होऊ शकतो याउलट केवळ बढती देऊन गुणवृध्दी आपोआप होत नसते. कपडयांचच उदाहरण बघाना – शरीराची वाढ होत असतांना वाढत्या अंगाचे कपडे घ्यावेच लागतात पण ज्यांची वाढ झाली असेल/होत नसेल त्यांनी केवळ मोठया आकाराचे कपडे घातले म्हणून काही त्यांची शारीरिक वाढ होणार नाही. इथे सुध्दा तुमच्या तुमच्या चित्तवृत्ती ‘मला मोठे कपडे कधी मिळतील’ या विचारापेक्षा ‘माझी निकोप शारीरिक वाढ कधी होईल’ या मुद्दावर केंद्रित असणं जास्त योग्य आहे

म्हणूनच आयुष्यातील ध्येयाचं (Quest) केंद्रस्थान स्वत:ची अधिकाधिक व तत्पर गुणात्मक वृध्दी करुन घेण्यावर असणं जरुरी आहे. अशा विचारांनी आयुष्याला एक योग्य व निश्चित दिशा मिळते व स्वत:च्या क्षमतेविषयीच्या अयोग्य भ्रमाची जळमट डोक्यावरुन नाहीशी होऊन आशेच्या किरणांनी प्रकाशलेला प्रगतीचा मार्ग दिसू लागतो इतरांविषयीच्या असूयेची जागा आपल्या मनात, एकलव्याच्या ध्येयपूर्तीच्या दृढ निश्चयाने घेतली जाते व स्वत:कडे नि जीवनाकडे पहाण्याचा एक निकोप व सुदृढ दृष्टिकोन लाभतो.

एकलव्यासारखीच आपली प्रगती आपल्यालाच साधावी लागते. इतरांचे मार्गदर्शन मिळू शकतं पण पूर्णत्वास न्यायला लागणारं इंधन स्वत:लाच पुरवायला लागतं सगळयांचं या प्रक्रियेचं तंत्र एकच असण्याची गरज नाही, तरी काही दावे माझ्या अनुभवानुसार असे

  • प्रथम पुढील ३-५ वर्षात आपल्याला काय साधायच आहे, काय करायला आवडेल हे चाचपून पहा.
  • स्वत:च परखड परीक्षण करुन आपल्या सध्याच्या क्षमतेच्या तुलनेत, आपल्या ध्येयपूर्तीसाठी लागणा-या क्षमतेचे मापन करुन आपण कुठे, किती कमी पडतो याची नोंद करा. ही परीक्षण प्रक्रिया ठराविक काळानी नियमित करा.
  • वरील कमतरता भरुन यायला काय करायला पाहिजे याचा plan करा व तो अंमलात आणा.
  • क्षमतावृध्दी व कमतरता याचं नियमित परीक्षण करत रहा.
  • तुम्हाला (लाज वाटणार नसेल व) फायदा होणार असेल तर योग्य.

शुभस्ते पंथान सन्तु !

यतीन सामंत