व्यवस्थापकीय जबाबदारी म्हणजे काय, त्याचा मुख्य हेतू किंवा गाभा काय – असा प्रश्न काही तुम्हाला नवीन नाही. तुम्ही या व्यावसायिक वर्तुळातले असाल किंवा व्यवस्थापनाचा अभ्यासक्रम केला असेल तर या प्रश्नाची बरीच, चांगली उत्तरं तुमच्या कानावरुन गेली असतील.
माझ्या मते या व अशा प्रश्नांच एकच मध्यवर्ती उत्तर आहे. व्यवस्थापकीय जबाबदारीचं मुख्य उत्तरदायित्व आहे – प्रागतिक बदल घडवून आणणे किंवा गुणवृध्दी करणे. तुमच्यामुळे – तुमच्या प्रयत्नांमुळे जर गोष्टी वेगळया व चांगल्या होत असतील तर तुमच्याकडून गुणवृध्दी झाली असं म्हणता येईल. याउलट जर तुमच्यासकट वा तुमच्या शिवाय गोष्टी आहेत तशाच राहिल्या तर तुम्ही काहीच गुणवृध्दी केली नाही…. अशा परिस्थितीत मग तुमची गरजचं काय ?
आजच्या युगात परिस्थिती ‘जैसे थे’ ठेवणा-या माणसांची किंवा व्यवस्थापकांची गरज कंपन्यांना भासत नाही. ज्या सरळसोट गोष्टींना मानवी हस्तक्षेपाची गरज नसते किंवा ज्या चालवायला कौशल्याची गरज नसते त्या सहजपणे मशीनसुपूर्द करता येतात. जे काही बदल घडवू शकतात – इच्छितात गोष्टींना पुढे नेऊ शकतात.- गोष्टींची दिशा, दशा यांच्यावर योग्य तो परिणाम करु शकतात अशा व्यवस्थापकांची आज आपल्याला गरज आहे. असा बदल जर तुम्ही घडवू शकत नसलात तर तुम्ही कंपनीच्या खिजगणतीत असणार नाही. आज तुमचं अस्तित्व तुम्ही काय बदल घडवून आणता वा काय गुणवृध्दी करता यावर अवलंबून आहे. गुणवृध्दी करणे हा एक सर्वसमावेशक विचार आहे. मानवी आयुष्याचा असा पैलू क्वचितच असेल जिथे याची गरज भासत नाही मग तो पदार्थ असो वा सेवा – आपल्या संपर्कात येणा-या कुठल्याही गोष्टीला अशी गुणवृध्दी करु शकणे- हा एक प्रकारचा परीसस्पर्श आहे.
ती गुणवृध्दी आपण माणसात (त्याचं ज्ञान, कौशल्य वाढवून) करु शकतो. प्रक्रियेत (सोपी, स्वस्त, हितकाल करुन) करु शकतो. काम किंवा वैयक्तिक संबंधातल्या नाते संबंधात करु शकतो. या व अशा अनेक गोष्टींनी एक, चांगला व्यवस्थापक इतरांपेक्षा उठून दिसतो – लक्षात येतो. ही गुणवृध्दी आपोआप होत नसते – त्यासाठी लागतं – दृढ निर्धार, मनाची तयारी, संयम, वेळ नि श्रम ! एवढचं नव्हे तर मनाची तळमळ, गुणात्मक बदल घडवून आणण्याच्या आपल्या कर्तृत्वावर विश्वास व बदल घडवण्याच्या आपल्या उत्तरदायित्वाविषयी दृढ बांधिलकीही लागते.
आजच्या कंपन्यांना नुसतच टिकून रहायचं नसतं तर गुणवत्तेच्या स्पर्धेत पुढे मुसंडी मारायची असते. म्हणूनच गुणवृध्दी करू शकणे ही एक निकडीची गरज बनली आहे
यतीन सामंत
यतीन सामंत ह्यांचा व्यवस्थापनातील अनुभव साधारण २० वर्षाहून जास्त आहे. त्यांनी विविध प्रतिष्ठीत औद्योगिक समुहात मार्केटिंग, सेल्स आणि व्यवसाय व्यवस्थापन विभागांमध्ये काम पाहिले आहे. त्यांना भारतीय तसेच परदेशी कंपन्यांमध्ये काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते बंगलोर येथे ऍलर्गन इंडिया येथे व्यवस्थापक (मॅनेजींग डायरेक्टर) हा पदभार सांभाळतात. सामंत यांना वाचन व लेखनाची अत्यंत आवड आहे. मराठीवर्ल्ड.कॉम साठी सामंत यांनी सतत दोन वर्षांपासून लेखन केले आहे. त्यांचे ४०हून अधिक लेख दिवाळी अंक, महाराष्ट्र मंडळांचे अंक तसेच मराठीवर्ल्डवर प्रसिध्द झाले आहेत. सामंतांच्या ९० हून अधिक कविता तसेच मनोगित काव्य संग्रह प्रकाशित झाला आहे. ह्या व्यतिरिक्त त्यांना खेळ, प्रवास, नवीन शिकणे, लोकांना भेटणे आवडते.