राजापूर हे रत्नागिरी जिल्ह्यातील एक तालुक्याचं गाव. या राजापूरची गंगा प्रसिद्ध. दर तीन वर्षांनी इतर वेळी कोरडी असलेली ही चौदा कुंड अचानक भरून वाहू लागतात आणि राजापूरची गंगा आली म्हणतात. प्रत्येक कुंडातील पाण्याचं तापमान वेगवेगळं असतं. जवळपासच्या गावातूनच नव्हे तर दूरवरून भाविक ह्या गंगेत स्नान करण्यासाठी येतात. तिथे त्या वेळी जत्रा भरते. निसर्गाचा हा एक चमत्कारच आहे.
येथील पंचायत समितीच्या गोडावून च्या मागून एक घाटी भटाळीत उतरते.( भटाळी हा राजापूरचा एक भाग आहे.) या घाटीने उतरत गेलं की डाव्या बाजूला उतारावरच गच्च झाडीमध्ये एक कौलारू घर आहे. राजापूरच्या दवाखान्यात हर्डीकर म्हणून प्रसिद्ध कंपौंडर होते. त्यांचं हे घर. या घरात आम्ही दहा बारा वर्ष भाड्याने रहात होतो. हर्डीकरांचे नातलग काका ठाकूरदेसाईंचं कुटुंब तिथे राहायचं आणि देखरेखही करायचं. या घराच्या आणि आवाराच्या सानिध्यातच माझं लहानपण अतिशय आनंदात गेलं.
घर उतारावर बांधलेलं होतं. आजूबाजूचं आवार बऱ्यापैकी मोठं होतं. त्यात माड, फणस यांची झाडं होती. मागच्या बाजूने उताराला सुरुवात व्हायची. उतारावरच एक मोठं जांभळीचं झाड होतं. तिथून खाली आलं कि मागचं अंगण. मग घर. घराच्या पुढच्या अंगणापासून पुन्हा उतार सुरु व्हायचा.तो पार भटाळीतल्या रस्त्यापर्यंत. घराच्या मागे, वरच्या बाजूला बापू म्हादये चं घर होतं.
घराच्या समोर अंगणाच्या पुढे एक पडकी विहीर होती. ती चाळीस हात खोदूनही पाणी मिळालं नाही. मग ती न बुजवता तशीच सोडून दिली होती. तिच्या चारही बाजूनी तिला कठडा वगैरे नव्हता त्यामुळे खूप धोकादायक होती. आमचे क्रिकेटचे कितीतरी बॉल त्या विहिरीत गेले होते. घराच्या उजव्या कोपऱ्यात एक मोठा उंच माड होता. पावसाळ्यात सोसाट्याचा वारा सुटला कि तो वेडावाकडा हलायचा. खूप भीती वाटायची. नारळाचं झाड कधी घरावर पडत नाही असं कुणीतरी सांगितलं, मग ती भीती थोडी कमी झाली.
घराचे दोन भाग होते. एका बाजूच्या तीन खोल्यांच्या भागात आम्ही राहायचो. दुसऱ्या मोठ्या भागात काका काकू राहायचे. त्यांच्या माजघरात झोपाळा होता. आमच्या खोलीच्या समोरचं प्राजक्ताचं झाड होतं. अंगणात सकाळी मस्त ताज्या फुलांचा सडा पडायचा. बाकी घराच्या बाजूला फुलझाडं आणि इतर झाडं होतीच.
काकांना दम्याचा त्रास होता. त्या त्रासाने ते इतक्या जोरात ओरडायचे की ते ऐकवत नसे. एकेकदा त्यांना खोकला लागला की कितीतरी वेळ थांबतच नसे. काकूंचं नाव शालिनी होतं. काकूंना ते शाले म्हणायचे. अतिशय कृश शरीर, केस पिकलेले त्वचा सुरकुतलेली गालफडं बसलेली असे ते दिसायचे. त्यांना पूर्वी बिडी पिण्याचं व्यसन होतं. मग दम्याचा त्रास सुरू झाला तेव्हा बिडी सोडावी लागली. क्रिकेटचा त्यांना भारी शौक होता आपल्या घरातून मोठ्याने ओरडून बाबांना स्कोर विचारायचे. “ बाबा, किती झाले हो ? कर्मानीच्या किती ? वगैरे . काकू आणि त्यांचा मुलगा दादा, दोघांवर सारखे चिडायचे. सुरुवातीला त्यांची तब्येत बरी होती तेव्हा कधीतरी लेंगा शर्ट घालून बाजारात जायचे पण येताना ती घाटी त्यांना चढवत नसे. मग रस्त्यावरूनच काकूंना जोरात हाका मारायचे. कधीतरी आम्ही त्यांच्या हातातली पिशवी घ्यायला धावायचो. पान खाण्याचं त्यांना वेड होतं त्यामुळे बाबांशी त्यांचं चांगलं जमायचं. क्रिकेट कॉमेंट्री ऐकताना विकेट पडली की दोघांचं पान खाणं व्हायचंच. विकेट पडत नसली तरी व्हायचं मग बाबा त्यांना म्हणायचे “ काका आता विकेट पडणार”
मला चौथीला स्कॉलरशिप मिळाल्याचं त्यांनीच वर्तमानपत्रात बघितलं.एके दिवशी बाजारातून येताना रस्त्यातूनच त्यांनी आईला हाक मारली आणि म्हणाले “वहिनी आधी साखर आणा संतूला स्कॉलरशिप मिळाली.”
काका मला कायम आजारी असलेलेचं आठवतात. त्यांना दोन्ही घरात वडीलधारे म्हणून मान होता. आम्ही परीक्षेला वगैरे चाललो तरी त्यांना आणि काकूंना नमस्कार करून जायचो. परकेपणा असा नव्हता. एकदा घाटी चढून येताना वाटेत पडले तेव्हापासून त्यांचं बाहेर जाणं बंद झालं.
काकू या सगळ्याच्या उलट होत्या. उंच, सडपातळ, नऊवारी लुगडं नेसलेल्या. तोंडाचं बोळकं झालेल्या. कधीतरी कवळी लावायच्या. बोलायच्या अगदी वरच्या पट्टीत. सारख्या काम करत असायच्या. काका जेवढे भडक तेवढ्या या शांत.त्यांच्या सहनशीलतेची कमाल होती. काका त्यांना वाट्टेल तसं बोलायचे. पण त्या निमूट ऐकून घ्यायच्या. काकांचा दमा सुरू झाला की त्यांना औषधे दे, त्यांची पाठ चेपून दे अशी अतोनात सेवा करायच्या. त्यांची सहन करण्याची वृत्ती घेण्यासारखी होती. काकांचं आजारपण, आर्थिक ओढाताण या बरोबरचं त्यांचं स्वतःचं पोटही अधून मधून दुखायचं पण त्या कधीही परिस्थितीचं रडगाणं गायल्या नाहीत. काकांच्या नोकरीनिमित्ताने त्या अनेक ठिकाणी राहिलेल्या होत्या त्यामुळे त्यांना सगळीकडच्या चालीरीती, स्वयंपाकाचे प्रकार, माणसांचे स्वभाव यांची चांगली जाण होती. मी कधीही त्यांना उदास होऊन बसल्याचं पाहिलं नाही. सगळं निमूटपणे सहन करीत असायच्या.
त्या घराची आणि आवाराची जबाबदारी म्हणून असेल, आमच्या एकेका उचापतींवर त्यांचा बारीक डोळा असायचा. आम्ही पातेरा गोळा करून एखाद्या झाडाखाली पेटवला की बरोबर तिथे यायच्या. आम्ही पाण्यात खेळत असलो तरी त्यांचं बारीक लक्ष असायचं. तरी आम्ही त्यांचं लक्ष चुकवून दारातल्या आंब्याचे आंबे काढायचो.
त्या काळात शाळा आणि घर हेच आमचं विश्व होतं. अभ्यास सांभाळून उचापती करायला परवानगी होती. त्या आवारात वावरताना सुरुवातीला भीती वाटायची. पुढे मोठं होता होता त्या घराचं आवार हळू हळू उलगडत गेलं. त्या घराची आणि आवाराची अनेक रुप मला आठवतात. पायरीवर पडलेले खड्डे, अंगणाच्या बाजूचे वेडेवाकडे दगड, आमच्या बाजूची पडवी, तिची उखळलेली जमीन,आमची शाळेत जाण्याची वाट, बांबूची बेटं, कुंपणावरची बोगन वेल,माड, पोफळी, सगळं सगळं अगदी डोळ्यासमोर आहे. पावसाळ्यात या आवाराचं एक वेगळं ओलं रूप असायचं. सगळीकडे हिरवळ माजलेली. जमिनीवरून वाहणारे पाणी, कोसळणारा पाऊस, पावसाचा तो भरून राहिलेला आवाज, दाटलेला काळोख, झाडांची सळसळ असं सगळं आठवतं.
या दरम्याने वाचनाचं वेड लागलं. हाताला मिळेल ते वाचायचो. कुठल्याशा अंकात वाचून एक फुकट गेलेला बल्ब शोधला. त्याच्या आतली फिलामेंट वगैरे काढून टाकली. वरचं झाकण बसवलं त्यामध्ये वात टाकली आणि त्याचा दिवा बनवला. त्यात रॉकेल भरलं आणि तो स्वयंपाकघरात एका स्टॅण्डवर ठेऊन दिला. कालांतराने मी ते विसरून गेलो.
त्यावेळी आई वाटुळ या गावात राहून शिक्षिकेची नोकरी करायची. इतर दिवशी मी, मोठाभाऊ आणि बाबा असें तिघेजण घरी स्वयंपाक बनवायचो. शनिवारी आई राजापूरला आली की दोन दिवस चांगलं जेवण असायचं. एके दिवशी दुपारी आईने स्वयंपाक बनवला. सगळ्यांना भूक लागली होती.पहिला घास घेतला आणि कुणीतरी म्हणालं ‘ रॉकेलचा वास येतोय.’
मग लक्षात आलं. प्रत्येक पदार्थालाच रॉकेलचा वास येत होता. कुणालाच काही कळेना. तेवढ्यात माझं लक्ष स्टॅण्डवर मी ठेवलेल्या दिव्याकडे गेलं.तो बल्ब लीक झाला होता.त्याच्या खाली मिठाची बरणी ठेवली होती. मीठ प्रत्येक पदार्थात असल्याने सगळ्यालाच रॉकेलचा वास येत होता. मी भरपूर बोलणी खाल्ली. त्यादिवशी आईने पूर्ण स्वयंपाक पुन्हा बनवला.
सुदेश हा माझा हरहुन्नरी मित्र. त्याचा मला लहानपणी खूप हेवा वाटायचं. याचं कारण म्हणजे त्याला शिवणकाम सुतारकाम, शेती, बागकाम,झाडावर चढणं,पक्षी पकडण्यासाठी फासे बनवणं, लाकडाची होडी बनवणं असं सगळं स्वतःला करता यायचं. एक दिवस माझ्याकडे आला. मी त्यावेळी झाडावरची खार कशी पकडता येईल या विचारात होतो. त्याने मला एक सापळा बनवून दिला. पाण्याच्या हौदाजवळ झाडांवर, जमिनीवर खारी फिरत असायच्या. पण थोडीशी चाहूल लागली की पळून जात. त्या हौदाजवळ, झाडांच्या मुळाशी छत्रीच्या तारेचं एक टोक त्याने जमिनीत घट्ट बसवलं. दुसरं टोक तार वाकवून दोन लाकडी काठ्यांच्या मध्ये एका दोरीने जखडून ठेवलं. योजना अशी होती की खार काही खाण्यासाठी आली आणि चुकून सापळ्याच्या आडव्या काठीवर बसली की वाकलेली तार स्प्रिंग सारखी सरळ होणार आणि खारीचा पाय त्या दोरीत अडकणार आणि आम्ही खार पकडणार. दररोज सकाळी मी मोठ्या आशेने हौदाकडे जायचो आणि खार पकडली का ते बघायचो. आठ दहा दिवसात काही दिसलं नाही आणि मग मी तो नाद सोडून दिला.
बाबा दररोज स्वयंपाक बनवून झाला की हौदावर जाऊन अंघोळ करायचे, जेवायचे आणि कोर्टात जायचे.एक दिवशी आंघोळीला गेले असता माझ्यावर ओरडतच घरी आले. त्यांना कोर्टात जायला उशीर होत होता. आम्ही लावलेल्या सापळ्यात एक कावळा अडकला होता.आणि तो पिसाळला होता. तो कुणालाच जवळपास येऊ देत नव्हता. लांबून त्याला दगड मारले तरी तो सापळ्यातून काही सुटेना. थोड्या वेळाने तो त्या सापळ्यासकट उडून गेला. मी मात्र बाबांची मजबूत बोलणी खाल्ली.
एकदा शाळेतून घरी आलो. दरवाजा उघडला समोर बघतो तर लांब शेपटीचा वानर मधल्या खोलीच्या आडव्या बारवर बसलेला होता. माझी भीतीने गाळण उडाली. तसाच दार बंद करून बापू म्हाद्येच्या घरी गेलो. सुदैवाने तो घरी होता. त्याने येऊन त्या वानराला घराबाहेर पिटाळलं. मग हायसं वाटलं. एकदा मागच्या अंगणाच्या वरच्या भागातून एका सापाने मारलेली सळसळती उडी आठवते. सापाचं चापल्य काय असतं ते मला त्यादिवशी कळलं. या सगळ्याची त्यावेळी भीती वाटायची. मन कावरंबावरं व्हायचं.
पाटाचं किंवा पावसाचं पाणी बांध घालून अडवणे. त्या बांधामध्ये पाइप टाकणे आणि पाणी त्या पाइपमधून जाऊ देणे हा तर अगदी वर्षभर चालणारा उद्योग होता. आवारातून कुठून कुठून मी पाईपचे सरळ, वक्राकार वेगवेगळ्या साईझचे तुकडे गोळा करून ते या बांधांसाठी वापरीत असे. आमच्या मागच्या अंगणात साठणारं पावसाचं पाणी वाहून जाण्यासाठी एक छोटा पाट बनवला होता. एक दिवशी मी त्यात उदबत्तीच्या पुड्याचे मेटलचे दोन तीन पाइप बसवून चांगला मजबूत बांध घातला. मागच्या बाजूला असलेल्या झाकणाला दोरा बांधला आणि त्याचं दुसरं टोक आमच्या स्वयंपाकघरातल्या खिडकीला आणून बांधलं. आता मी भरपूर पाऊस पडायची वाट बघू लागलो. मोठा पाऊस पडताच मी ते धरणाचे दरवाजे दोरा ओढून घरातूनच उघडणार होतो.
एक दिवशी रात्री बाबा दचकून उठले. त्यांच्या अंथरुणापर्यंत पाणी आलं होतं. बाहेर मुसळधार पाऊस पडत होता. मागचं अंगण पाण्याने भरून गेलं होतं. आणि ते पाणी घरात आलं होतं. बाबा खूप चिडले होते. त्यांनी मला उठवलं. मला अचानक माझं धरण आठवलं. मी खिडकीतून दोरा ओढून धरणाचे दरवाजे उघडण्याचा प्रयत्न केला. पण ते जमेना. बाबा खूप ओरडले. शेवटी त्या पावसात बाहेर जाऊन तो बांध फोडून घातला तेव्हा घरात सगळ्यांना झोपणं शक्य झालं.
बापू म्हाद्याची कोंबडी सतत त्या आवारात फिरत असायची. सगळीकडे शिटून ठेवायची. त्याची घाण वाटायची. एक दिवशी संध्याकाळी शाळेतून घरी आलो. शाळेत काहीतरी बिनसलं होतं.घरी कुणी नव्हतं. आजूबाजूलाही कुणी नव्हतं. बापूची काळी कोंबडी मोठ्या ऐटीत पायरीवर उभी होती. मला काय सणक आली कुणास ठाऊक, एक मोठा दगड घेतला आणि जोरात कोंबडीवर भिरकावला. कोंबडी पायरीच्याखाली मातीत पडली. जिवाच्या आकांताने फडफडत होती. धूळ उडवीत होती. मी समजलो, आता काही खरं नाही. तसाच वेगात मागे फिरलो.घराला कुलूप घातलं आणि जीव खाऊन सुदेशच्या घरी पळत सुटलो.
काळोख पडला. घरी परत येताना म्हटलं काय झालंय बघावं म्हणून मुद्दाम बापूच्या घराकडून आलो. तिथे सगळीजणं जमली होती. दगड कोंबडीच्या मानेवर लागला होता. आणि ती निपचित पडली होती. बापूची बायको बडबडत होती. मी थोडा वेळ तिथे थांबलो आणि मग हळहळत घरी आलो. काही दिवसांनी ती कोंबडी मेली.
एकदा आईने वाटुळ हून येताना पोपटाचं एक छोटं पिल्लू आणलं. ते आम्ही वाढवलं. मस्त पोपट होता. त्याचा पिंजरा साफ करणं, त्याला खाऊ घालणं वगैरे उद्योग सुरु झाले. एक दिवशी तो पिंजरा बाहेर अंगणात टांगून ठेवला असता तो पोपट पळून गेला. एकदा गणपतीच्या सुट्टीत आई घरी येताना गणपतीची माती घेऊन आली. त्या मातीचा मस्त उंदीर बनवला होता.
तिथे वानरांचा त्रास खूप होता. वानर आले कि टोळीने यायचे. झाडांवरून उंच उड्या मारत जे काही हाताला मिळेल ते ओरबाडून घेऊन जायचे. वानर मारे ही बंदूक घेऊन यायचे.एकदा माझ्या पुढ्यात एक वानर माऱ्याने धावता धावता एका वानराला गोळी घातली. धावणारा वानर तत्क्षणी खाली कोसळला. मग त्याने त्याची शेपटी कापून स्वतःकडे ठेवली आणि वानर ओढीत नदीकडे घेऊन गेला. त्या लोकांना म्हणे एक शेपटी दाखवली की नगरपालिकेकडून ठराविक पैसे मिळायचे. पण वानरं एवढी हुशार होती की बऱ्याचदा वासावरूनच त्यांची चाहूल घ्यायची. आम्ही दिवाळीत घेतलेले ऑटॉमबॉम्ब ठेऊन द्यायचो आणि वानरं आली की ते पेटवायचो.
एके दिवशी बाबांच्या कोर्टातील एक शिपाई दुपारी घरी आला होता. दिवस पावसाळ्याचे होते. तो परत जात होता. मी अंगणात उभा होतो. तो घाटीच्या पायऱ्यां पर्यंत पोचला आणि बाजूचं पिंपळाचं प्रचंड झाड मुळापासून उखडलं आणि स्लो मोशन सारखं अलगद तो गेलेल्या वाटेवर पडलं. त्या झाडाचा घेर जवळजवळ पंधरा फूट होता. तो शिपाई त्यादिवशी नशिबानेच वाचला.
असे अनेक प्रसंग मनावर आठवणीच्या रूपात कोरले गेले आहेत. ते घर जुनं होतं, लहान होतं. आजूबाजूला सपाट भाग नव्हता. यायला जायला धड रस्ता नव्हता. पण तिथलं वास्तव्य आठवलं की अजूनही मन भरून येतं. एक आनंदी, बिनधास्त बालपण तिथे अनुभवता आलं.एक मुक्त निर्मळ भावविश्व त्या घरासोबत आकाराला आलं.
काही वर्षांपूर्वी सुदेश बरोबर त्या घराच्या आवारात गेलो. घराची पार रया गेली होती. मध्यंतरी काका वारले. काकूंनी रत्नागिरीला बिऱ्हाड केलं. आता सगळं आवार उजाड झालं आहे. त्या घराची अवस्था एखाद्या पडक्या घरासारखी झाली आहे. मला कसंतरी वाटलं. कारण माझ्या मनात मात्र ते अजूनही पवित्र देवालयासारखं उभं आहे. रेशमी वस्त्रात जुनी पोथी सांभाळून ठेवावी तेवढ्या अलगदपणे मी ते मनात जतन करून ठेवलं आहे.
– नारायण काकतकर