श्रम म्हणजे श्रीमंती

१९९६ साल. जपानमध्ये काम करत असताना एके दिवशी एक मोठा ट्रक कंपनीत आला. तशी ट्रक ची ये जा चालूच असायची. तो रिव्हर्स पार्क करून त्याची ड्राइवर, जी एक तरुण मुलगी होती ती खाली उतरली. ती सडपातळ आणि मध्यम उंचीची होती. झटपट तिने हातात ग्लोव्हस घातले. ऍप्रॉन घातला आणि ट्रकमध्येच व्यवस्थित लावून ठेवलेले वायररोप,आय बोल्ट, शकल्स असं सगळं साहित्य काढून घेतलं. कंपनीची मोठी ओव्हरहेड क्रेन स्वतःच ऑपरेट करून ट्रकमधली सगळी कास्टिंग तिने व्यवस्थित उतरवून ठेवली. तिच्या कामाचा वेग, त्यातली चपळाई कामाची पद्धत, सर्वकाही एकट्यानेच करण्याची तयारी, सगळंच बघण्यासारखं होतं. जणू काही ते काम कमीतकमी वेळात,अतिशय चांगल्या पद्धतीने करण्याची स्पर्धा, तिने स्वतःशीच लावली होती.

आपल्याकडे ड्राइव्हर ट्रक घेऊन आला आणि त्याने गाडी हवी तिथे लावून दिली की तो मोकळा. मग दुसरा कुणीतरी क्रेन घेऊन येणार, मदतनीसांसाठी थांबणार, सामग्रीची शोधाशोध करणार आणि मग हळू हळू तो ट्रक खाली करणार. काही अपवाद वगळता सर्वसाधारणपणे इतरत्र असं दृश्य दिसतं. जे काम आपल्याकडे कमीतकमी दोन माणसांनी दीड दोन तासात केलं असतं, तेच काम तिने अतिशय शिताफीने पूर्ण केलं. पुन्हा सगळी सामग्री ट्रक मध्ये जाग्यावर व्यवस्थित ठेवली. ऍप्रॉन उतरवला आणि अर्ध्या पाऊण तासात ती ट्रक घेऊन निघून गेली.

लक्षात राहिला तो तिच्या कामाचा वेग आणि काम करण्याची पद्धत. जपानी लोकांची उत्पादन क्षमता आणि कठोर परिश्रम यांनी त्या देशाला मोठं केलं आहे. श्रमप्रतिष्ठा हे मूल्य त्या लोकांनी त्यांच्या संस्कृतीमध्ये रुजवलं आहे. तिथे शारीरिक श्रम करणाऱ्या कुणाही माणसाला महत्व दिलं जातं. पायी किंवा सायकलवरून जाणाऱ्या माणसाला कार वाला थांबून रस्ता ओलांडू देतो.

आपल्याकडे ब्रिटिशांनी जे दीडशे वर्ष राज्य केलं त्यात त्यांनी आपल्या लोकांना फक्त राबवून घेतलं. आपल्या सत्तेचे बुरुज टिकवण्यासाठी उत्तम अभियंते, कुशल तंत्रज्ञ निर्माण होऊ न देता फक्त कारकून निर्माण केले.आणि ब्लु कॉलर आणि व्हाइट कॉलर ही विभागणी पक्की करून टाकली. पण कुठे मशीन बंद पडलं तर गोरा अधिकारी कोट उतरवून ते दुरुस्त करायला कमीपणा मानत नव्हता. आपण त्यांचा हा गुण न घेता,ती विभागणी मात्र कायम ठेवली. कित्येक वर्ष व्यवस्थापन आणि कामगार युनियन यांचा एकमेकांवर कुरघोडी करण्याचा खेळ चालू होता. जीवघेणी जागतिक स्पर्धा आल्यानंतर हा खेळ आपणाला आता परवडणारा नाही हे दोघांच्याही लक्षात आलं आणि मग त्याचं प्रमाण कमी झालं. खरंतर आपल्याकडच्या अमर्याद लोकसंख्येमुळे, हाताने काम करणाऱ्या माणसांची श्रमप्रतिष्ठा समाजात कधी रुजलीच नाही. स्टोअर मध्ये नोंदी ठेवणारा, शॉपफ्लोरवर प्रत्यक्ष काम करणाऱ्या माणसापेक्षा महत्वाचा झाला. भाजीपाल्याचा व्यापार करणारा एजंट, उन्हातान्हात राबून भाजी पिकवणाऱ्या शेतकऱ्यापेक्षा मोठा झाला. सुटाबुटात वावरणारा सफाई कामगारांचा कॉन्ट्रॅक्टर, त्या प्रत्यक्ष सफाई करणाऱ्या माणसाला किरकोळ मानू लागला. हॉटेलमध्ये एका वेळी तीनचार हजार रुपये खर्च करणाऱ्या माणसाकडून ओझी उचलणारा हमाल, धुणी भांडी करणारी मोलकरीण यांचा अत्यल्प मोबदला उपकार केल्यासारखा दिला जाऊ लागला.

दरम्याने तंत्रज्ञान झपाट्याने बदलत गेलं. जे रस्ते बांधायला, पूल बांधायला, कंपनीतील कामाला प्रचंड मनुष्यबळ लागायचं, ते काम आधुनिक मशीन्सनी काही तासात करायला सुरुवात केली आणि राबणाऱ्या हाताचं महत्व अजून कमी होत गेलं.

समाज हा मानवी देहाप्रमाणे आहे. फक्त मेंदू किंवा फक्त हात राबले तर होणाऱ्या कार्याला मर्यादा येतात. पण हाच मेंदू आणि हातांच्या सहयोगातून अद्भुत गोष्टी उभ्या राहू शकतात. आपण आय टी क्षेत्रात जगात खूप मोठी भरारी घेतली पण त्या भरारीला कुशल हातांची जोड पाहिजे त्या प्रमाणात आपण देऊ शकलो नाही. त्याची उदाहरणं पावलोपावली दिसतात. उत्तम काम करणारे प्लंबर, गवंडी, इलेकट्रिशिअन, वेल्डर यांची संख्या झपाट्याने कमी होते आहे.

तंत्रज्ञानाने होणारे बदल आणि त्यांचे परिणाम अटळ आहेत. पण कामगारांच्या कौशल्याकडे आपण दुर्लक्ष केलं. जागतिक पातळीवर दरवर्षी स्कील कॉम्पिटिशन होतात. जगभरातले कसबी कारागीर आपलं कौशल्य सिद्ध करायला त्यात भाग घेतात. जागतिक दर्जाचे वेल्डर, प्लंबर त्यातून निवडले जातात. या स्पर्धाना प्रेक्षकांचा भरपूर प्रतिसाद मिळतो. शालेय मुलंसुद्धा या स्पर्धाना भेटी देतात. कौशल्याचं महत्व आणि त्यातली आव्हानं याची त्यांना लहानपणापासूनच जाणीव होते. एकदा या गोष्टींना महत्व आलं की त्यातून कौशल्य विकास वाढीला लागतो.

काम सगळेच करतात. पण उत्कृष्टतेचा ध्यास हा कामाच्या पद्धतीमध्ये असतो. उत्कृष्ट वेटर म्हणजे काय तर तो तत्परतेने, ह्सत मुखाने सेवा देतो.ग्राहकाला काय हवं आहे हे ओळखून काम करतो,ग्राहकांचे ठरलेले ब्रँड आणि त्याची आवड निवड लक्ष्यात ठेवतो. असे आनंदाने काम करणारे वेटर असतात. पानवाले असतात, नर्सेस असतात.

आपण कौशल्य भारत अभियान अलीकडेच सुरु केलं. आपल्या कुशल आणि अकुशल कामगारांच्या व्याख्या मुळात अतिशय ढोबळ आहेत. त्या स्पष्ट करायला हव्यात. देशांतर्गत पातळीवर कौशल्य स्पर्धांचं मोठ्या प्रमाणावर आयोजन करणे. त्यांना प्रसिद्धी देणे, त्यातल्या विजेत्यांना जागतिक स्पर्धेसाठी तयार करणे, कुशल कामगारांना योग्य मोबदला आणि सोई सुविधा देणे, ह्या गोष्टी करणं महत्वाचं आहे. प्रसार माध्यमांची भूमिका यात खूप महत्वाची आहे.

‘श्रम म्हणजे श्रीमंती, श्रम माणसाच्या हाती,धरतीच्या लेकरार, श्रम म्हणजे श्रीमंती’ असं गदिमांचं एक गाणं आहे.श्रमातूनच संपत्ती निर्माण होते आणि श्रम करण्याची वृत्ती हीच एक संपत्ती असते. व्यायामाने स्नायू तयार होतात तर शारीरिक श्रमाने नसा तयार होतात असं विनोबांनी सांगितलं आहे.आळसासारख्या शत्रूवर मात करण्याचा श्रम हा उत्तम उपाय आहे. काहीतरी निर्माण करण्यासाठी कठोर परिश्रमाला पर्याय नाही. त्यातून शारीरिक तंदुरुस्ती साधता येते आणि ताणतणाव कमी करण्यासाठीही शारीरिक श्रम खूप महत्वाची भूमिका बजावतात.

नजीकच्या भविष्यकाळात आधुनिक तंत्रज्ञान, मनुष्य बळाचा अभाव आणि आर्थिक क्षमता यामुळे ऑटोमेशन, रोबो, विना चालक कार अशा गोष्टी मोठ्या प्रमाणावर येत आहेत. या सर्वांमुळे जीवनाच्या सर्वच क्षेत्रात शारीरिक श्रम कमी होणार आहेत. पुढारलेल्या देशांना ते आवश्यक असू शकतं. पण एकशे तीस कोटी लोकसंख्येच्या या तरुण देशात मात्र सर्वाधिक गरज आहे ती श्रमप्रतिष्ठा रुजण्याची आणि फुलण्याची. बुद्दिजीवी लोकांनी थोडासा आपला दृष्टिकोन बदलला, बंधुत्वाची भावना जोपासली आणि कोणतंही काम हे काम असतं त्यात वरच्या आणि खालच्या दर्जाचं असं काही नसतं. त्याचा प्रतिष्ठेशी काही संबंध नसतो. ते काम कोणत्या पद्धतीनं केलं जातं त्याला महत्व असतं हे समजून घेतलं तर ही श्रमप्रतिष्ठा रुजायला वेळ लागणार नाही.

जीवनाच्या सर्वच क्षेत्रात बौद्धिक श्रमांना आणि क्षमतांना अनन्यसाधारण महत्व आहेच. आपल्या बुद्धीच्या आणि हिमतीच्या जोरावर व्यवस्थापनामध्ये वरच्या जागांवर काम करणाऱ्या लोकांना समाजात प्रतिष्ठा आणि मानमरातब मिळणं यात काहीच गैर नाही. आजकाल कंपन्या कुशल कामगारांसाठी काही प्रकल्प राबवितही आहेत. मुख्य प्रश्न त्यांच्या कौशल्याला ओळख आणि प्रतिष्ठा मिळण्याचा आहे.

एखाद्या समारंभात एखाद्या जनरल मॅनेजर च्या बाजूला जागतिक दर्जाचा वेल्डर बसेल आणि त्याचंही सर्वांकडून मनापासून स्वागत आणि स्वीकार होईल, सभा समारंभात अन्नदात्या शेतकऱ्याला मानाचं स्थान मिळेल, सफाई कामगारांना सन्मान आणि योग्य मोबदला मिळेल, कुठल्याही पद्धतीने शारीरिक श्रम करणाऱ्या, प्रत्यक्ष काम करणाऱ्या माणसाला समाजात आदराचं स्थान मिळेल त्या वेळी ते महासत्तेच्या दिशेने टाकलेलं एक महत्वाचं पाऊल असेल. देखणे ते हात, ज्यांना निर्मितीचे डोहाळे असं कविवर्य बोरकरांनी म्हटलं आहे. काळ काम वेगाशी स्पर्धा करणारी ती जपानी मुलगी त्याचंच प्रतीक होती.

नारायण काकतकर