मराठी रसिकांनी पाठवलेल्या ‘कविता’

‘भन्नाट’ नि ‘सॉलिड’

आजकाल सारेच असते ‘भन्नाट’ नि ‘सॉलिड’
‘भन्नाट’ पडतो पाऊस ‘भन्नाट’ लागते भेळ
शब्दांचा नि अर्थाचा बसत नाही मेळ
‘मस्त’च असतो जेवणाचा बेत
अन् ‘मस्त’च दिसते पोरगी
‘सॉलिड’ येतो कंटाळा
अभ्यासाला दांडी
‘आई शपथ’ काय रस्ते झालेत
ट्रॅफिकची जाम कोंडी
‘जाम’च वैताग, टिव्हीवर पण
चालल्येय रडारडी
गणिताचा पिरियड ‘सॉलिड’ बोअर
देऊन त्याला बुट्टी
मॅटिनीला जावे तर,
तिकिटाला रांग मोठी
गटवला एकाला मारून बाता
प्रॉमिस केले आईस्क्रीम
पिक्चरची थीम बरी, पण
हिरो ‘टुक्कार’ ‘भंकस’ हिरॉईन
‘भन्नाट’, ‘भंकस’, ‘जाम’, ‘सॉलिड’
धरती फेर सारे
डोके भणकले मेंदू शिणून
आले भिंरभिरें…

माधवी मनोहर रानडे

खेळ

पळापळी खेळता खेळता
लपंडाव सुरू होतात
व्यवहाराला सांभाळण्यात
नाती सर्व दूर होतात
तू आधी का मी आधी
खुर्ची पकडायला धावत असतो
संगीत खुर्ची खेळता खेळता
पाय मात्र ओढत असतो
एकमेकांना मात करण्यात
माणूसकी विसरून जातो
जीवनाच्या बुध्दीबळपटावर
आपण बाकी उणे राहतो
जन्माच्या मागे मृत्यु धावत असतो
हुतुतु हुतुतु करता करता
तोच फक्त जिंकत असतो
खेळ असा सुरू असतो…
जन्माचा मृत्युशी
व्यवहाराचा नात्याशी
माणसाचा माणूसकीशी
खेळ असा सुरू असतो…

आरती जोशी

अस्तित्व

माझ्यातील मी पणा मी नेहमी जागवत होते
मी पणा करता करता मी बाकी उरत होते
माझ्यातील मी शोधता शोधता
माझी मी हरवत होते
भावनिक अंतर्गत नात्यामध्ये
माझी मी गुंतत होते
स्वत:चं अस्तित्व शोधत शोधत
स्वप्नांच्या मागे धावत होते
धावता धावता ठेच मात्र लागत होती
अस्तित्व शोधायच्या नादात सर्व काही टाळत होते
आपलं अस्तित्व आपल्यामध्ये शोधायचं असतं
हे मात्र विसरत होते
स्वप्नांच्या मागे स्वत:च अस्तित्व गमवत होते

आरती जोशी

धूळपाटी

त्यांचे जीवन शीलालेख
आमची नुसतीच धूळपाटी
सहजच जाणारी पुसून
खूणच नाही अस्तित्त्वाची
मुंगीलाही मिळाले पान
पैलतीराला जाण्यासाठी
आमचे नुसतेच गटांगळया खाणे
पैलतीराच्या कशाला गोष्टी?

माधवी मनोहर रानडे