मराठी रसिकांनी पाठवलेल्या ‘कविता’

फरक

कधी जमंतच नाही का रे तुम्हांला
असं रोमारोमातून फुलून येणं
सारं सारं काही आपलं
कुणा दुज्याचं होणं ..

तुमची मिती ठरलेलीच बहुदा
नड शारीरिक सहवासाची
फार तर मैत्री मुक्त गप्पांची ..

पण त्या पल्याडही असतं रे खुपसं
काही काही खूप खोलसं ..

तुमच्या मनांना सांभाळणारं हवं असतं कोणी ,
आहे कबूल
पण तिलाही असते गरज,
तिचे रागरंग संभाळणाऱ्या कुणाची ,
फक्त ती गरज कायमच मुग्ध नि अबोल ,
तिची अपेक्षा .. तिची अपेक्षा
कोणी न सांगताही समजून घेण्याची ..

कितीही काम रगाड्यात ,
तिच्या सोबत जाणीव तुझ्या अस्तित्वाची ,
आणि तुम्हांला पुरेशी सबब ,
कामात अडकल्याची ..

कधीतरी एकदा उतरून बघ मनात दोघांच्याही ..
तुझ्या मनात सापडेल ,
एखादा कोपरा तिच्या नावाचा ,
आणि तिच्या मनात ..
तिच्या मनात ..
भरून उरलेला सागर तुझ्या अस्तित्वाचा ..
भरून उरलेला सागर तुझ्या अस्तित्वाचा ..

– सौ.मधुरा महेश ताम्हनकर

विभ्रम

विभ्रम असे हे तुझे भोवताली
जरी रिक्त झोळी , मी तरी रेणिवेत
असे निशिदीन विरहात जाती
जरी आठवांचे गंध हे कवेत

जरी काही बोल शलाका जहाल्या
तरी अमृताची स्मरे बरसात

अन तापलेली जरी क्षिती आज सारी
तरी श्वास माझा अजुनी श्रावणात
तरी श्वास माझा अजुनी श्रावणात

– सौ. मधुरा महेश ताम्हनकर

मी

अहंकार अन् भौतिक सुखाच्या मागे धावून प्रेमाची माणसं तोडत , शेवटी एकटं रहावं लागतं तेंव्हा काय वाटत असेल त्या लोकांना ह्यावरती हि कविता ..

मी अलकेचा मोह धरला
नि निसटले हातामधले काही
क्षितीजावरचे पहाता पहाता
काही करांत उरले नाही

ध्रुवपदाचा मोह तो मजला
केली तपस्या मोठ्ठी
पण ,अढळपणाचे हे सिंहासन
म्हणजे काटेरी शय्या होती

मी अगस्तीच्या वंशात जाऊनी
म्हंटले पिईन समुद्र सारा
परी ओंजळीत न उरला ,थेंब मायेचा
आता फिरतो सैरावैरा

दाही दिशांना माझ्या पताका
फडफडती गगनी
बस सेवक उरले आणि मी राजा
न उरले दुजे कोणी

दुमदुमले कैसे नाव जगती
मी माझाच अभिमानी
परी का उगा दाटते सदैव आता
डोळ्यांमधे पाणी ?

सहज तुडविले पायदळी मी
प्रेम – माया , संस्कार
मोठेपणाची वाट बिकट हि
आणि काटेरी फार

मीच कोणी , मीच मोठ्ठा
मी मानत आलो तेंव्हा
झिडकारत आलो किती जणांना
तुच्छ मानोनी तेंव्हा

दिसले न मजला कोणामध्ये
कधी कोणतेच गुण
आता कळले चष्मा माझाच खोटा
पाहिले जो लावून

आता वाटते
उतरवूनी टाकावा
हा कर्तुत्वाचा शेला
आसुसलो मिळाया मायेची भाकर
आणि स्नेहाचा प्याला !

– सौ. मधुरा महेश ताम्हनकर

मोगरा

ऊन ऊन चढताना
चढे तारूण्याचा साज
आणि एकेक ते पान
कसे लाजे रे ..

कोवळ्या देहावर
चढे गडदसा रंग
रंग गहिरासा गुढ
उगा भासे रे
ऊन ऊन चढताना ..

उलगडले गुपित
होते मनामध्ये काही
अंगभर कळ्यांनी
झाड सजले रे
ऊन ऊन चढताना..

आणि प्रसवांची गाणी
कोणा सांगू नका कोणी
परिमळ तो फिरोनी
काही सांगे रे
ऊन ऊन चढताना ..

आणि फुलला मोगरा ,
आणि फुलला मोगरा
बहर धवल साजिरा
वाऱ्यासवे अंगणात कसा नाचे रे
ऊन ऊन चढताना ..

– सौ. मधुरा महेश ताम्हनकर