मराठी रसिकांनी पाठवलेल्या ‘कविता’

प्राणप्रिया ये

प्राणप्रिया ये, झडकरी जिवलगा ये
तुझ्या स्वागता मी आता सिध्द आहे ॥धृ॥
नाते तुझे माझे अनादिकाळाचे
जन्म घेता ते कधी ना तुटायाचे
येथला हा पसारा, हे व्यवहार नित्याचे
हा केवळ स्वप्नीचा एक सहवास आहे ॥१॥
ह्या जीवनातील सर्व नाती गोती
जोवरी पणतीत असे तेल वाती
अतूट नाते खरे तुझ्याशीच ते
मज मुळी न साहवे, निभवी आता ते ॥२॥
आयुष्याची वाट चालता
जीवनाची शर्यत धावता
थकले शिणले रे पुरती आता
मज आता दु:ख, सुखही न साहे ॥३॥
आता नको मज मान सन्मान
नकोत प्रसंगी अपमानाचे क्षण
अपुल्या परी मी सार्थ केले जीवन
आता फक्त तुझी, तुझीच वाट पाहताहे ॥४॥
येशिल तेव्हा अकस्मात ये
कसलेही निमित्त पाहू नये
असा अल्लद उतरून जवळी ये
की माझ्या अर्धांगासही चाहूल लागू नये ॥५॥

डॉ. सौ. सुहास देव

तुझ्यामुळेच

एका अनोख्या मोडवर
आपलं भेटणं, मनं जुळणं
आपली मैत्री, आपलं प्रेम
त्यातला जिव्हाळा, रूसण व रागवणं
भरभरून बोलणं, गप्पात रंगणं,
कधी ओसंडून वाहणं
दु:खात एकमेकांना सांभाळून घेणं
आनंदाश्रूत चिंब होणं
माझ्या कवितेतील शब्दा-शब्दात
तुझ्या अंतरंगाचं भिजणं
हळव्या- हळुवार तुझ्या सहवासात
माझं समरसून जाणं
तुझ्यामुळेच गातोय मी
जीवनाचं आनंद-गाणं.

मनोहर मंडवाले

मायेचा चंद्र

करतो भ्रमण पृथ्वी भोवती
रात्रंदिवस हा चंद्र
प्रकाशास वंचित राहतो
अमावास्येचा हा चंद्र
कले कलेने मग वाढत जातो
रोज रात्री हा चंद्र
हळू हळू मग उजळू लागतो
काळाच्या अंधारात हा चंद्र
प्रतिबिंब होऊन नाचत जातो
सागरावर हा चंद्र
भरती ओहटीचा नाद छेडितो
कोळयांसाठी हा चंद्र
मेघांशी लपंडाव खेळतो
श्रावणात हा चंद्र
सावली पांढरी पिकांवर टाकितो
शेतकऱ्यासांठी हा चंद्र
मादकतेचा उन्माद पसरवितो
प्रेमिकांसाठी हा चंद्र
विवाहितांना मधुचंद्रात रमवितो
धुंद होऊनी हा चंद्र
चम चम चमकतो चांदण्या रात्री
पौर्णिमेचा हा चंद्र
दुग्ध रसाचा स्वाद चाखितो
कोजागिरीस हा चंद्र
कले कलेने मग घटत जातो
पौर्णिमेचा हा चंद्र
अमावास्येची वाट पाहतो
घेण्यास विश्रांती हा चंद्र
जीवनाची विविध रूपे दर्शवितो
हर एक मासी हा चंद्र
नकळत ह्दयास स्पर्शुनी जातो
मायेचा हा चंद्र

दीपक ल. वाईकर

अल्पायुषी

घनघोर माजलेला अंधार आणि काहीशे क्षणभंगुर काजवे
त्याच अंधारात सामावून जाणारे
अफाट आकाशगंगेत अगणित ग्रह आणि एकच सुर्य प्रत्येकास पूर्ण
प्रकाशित करण्यात असफल
असंख्य दानव पूर्वीपसून आतापर्यंतही आणि काहीशे अवतार कार्यकाळ असणारे
नंतर पुन्हा अराजक
अजुनही राज्य अन्यायाचे आणि एकच शिवाजी जाणता राजा
तोही काळाच्या ओघात सामावणारा
सर्वत्र अधर्म स्वैराचार आणि एकच स्वामी विश्वव्यापक धर्मोपदेशक आणि हे विश्वच
धर्मापासून संन्यास घेणारे
दीर्घकालीन समाजकंटक भरकटवणारे आणि काहीशे समाजसुधारक पण अल्पायुषी
ईश्वरासही त्यांची गरज असणारे
कमालीचे दारिद्रय आणि मूठभर श्रीमंती तीही स्वार्थी अप्पलपोटी
दीनदुबळयांस झिडकारणारी
आणि पुन्हा पुन्हा तीच विषमता योग्य आणि अयोग्य गोष्टींच्या आयुष्याची
त्यातही योग्य गोष्टी नेहमीच अल्पायुषी

सचिन भुजबळ