मराठी रसिकांनी पाठवलेल्या ‘कविता’

आठवण

प्रिय आदितीस, तुझ्या अभिजीतकडून…

हेलावून सोडतंय
मनाच्या वाळवंटाला
आठवणींचं वादळ
आधीच तप्त वाळवंट
प्रखरतेनं आठवणींच्या
अजून तप्त होतंय
या असल्याच वाळवंटावर
चालत आलोय
चालणारही आहे
जगत आलोय
जगणारही आहे
ह्या स्वप्रकाशी आठवणी
अंधारही करतात कधी
भूतकाळावर प्रकाशच प्रकाश
वर्तमानावर मात्र गडद सावली
हेच अवघं भावजीणं
भावलंय्…
भोवलंही आहे

अभिजीत अनिल

वीज

कोण म्हणतं आभाळात
मेघ गडगडले?
ते तर तुफानाचे
काळीज धडधडले ॥1॥

कोणी आळवली
पावसाची चीज?
ओलीचिंब भिजून
झाली वीज ॥2॥

तुफानाचा तोल मग
गेला सुटून
वीजेला घेतले
बाहूत वेढून ॥3॥

लाजली, गरजली
कडकडली वीज
निसटून अलगद
तडतडली वीज ॥4॥

बिपीनचंद्र नेवे,
जळगाव

सजणासाठी…

एक अलबेली नार
केला सोळा शृंगार
नववधूचा साज ती ल्याली
आज काय असे खास?
असे विचारता ती बोले
‘माझ्या सजणासाठी मी सजली’

काळेभोर तिचे डोळे
मुखमंडल ते भोळे
नाजुक ती ओठांमध्ये हसली
आज काय असे खास?
असे विचारता ती बोले
‘माझ्या सजणासाठी मी सजली’

मेघमयी तिचे केस
झाले मर्यादेची वेस
काया चांदण्यात
पाहा तिची न्हाली
आज काय असे खास?
असे विचारता ती बोले
‘माझ्या सजणासाठी मी सजली’

ल्याली आकाशाची शाल
सूर्य चुंबी तिचे भाल
श्रावणातल्या अवनीसारखी सजली
आज काय असे खास?
असे विचारता ती बोले
‘माझ्या सजणासाठी मी सजली’

अंकुश चव्हाण

दु:ख

एक दु:ख,
संवेदनांच्या अंतापर्यंत उतरलेले,
कमालीचे अगतिक, असहाय्य करणारे,
अन मनाला येऊ बघणारे, सारे अंकुर करपवून टाकणारे !

एक दु:ख,
काळसर्पाच्या दंशापेक्षाही जीवघेणे,
अस्तिवाच्या सगळया जाणीवा बोथट करणारे,
अन एकाएकी अंधत्व यावे तसे अथांग काळोखात लोटणारे !

एक दु:ख,
जिव्हारी रुतुन बसलेले,
अन ‘सुतपुत्र’ म्हणून अवहेलण्यात आलेल्या,
‘सुर्यपुत्राच्या’ वेदनेचे, सारे मर्म सांगणारे !

जयंत खानझोडे