मराठी रसिकांनी पाठवलेल्या ‘कविता’

गंधित माती

भय टाकून नाही कधी
रात्र पांघरलेली
नाही कधी मंत्रून
प्रभात अंथरलेली
अंगणात विखुरली…
नक्षत्रांची लुक-लुकणारी फुले
त्या पल्याड डोकावती
अंधाराची पिले…
जोमाने नभी उडाले
फुलपाखरांचे थवे
धैर्याने रोवून पाय
राहीले भूवरी उभे
अळूच्या पानावरचे
जल मोती जेसे चित्त
दूर कोंदणी, कुठे अजाणी
दडली अपार गुपितं
बोध घेतले, शोध लावले
आले नाही काहीच हाती
हळुच उमगले, उचलून धरले
होती किंचित गंधित माती

मकरंद मनगोळी

खंत

फुलले निखारे जरी मनी
नातीगोती जपताना
गेले निसटुन क्षण काही
पापणीत ओल्या लपताना
करूणा कंठात दाटली
मागता न चुकता क्षमा
गेलो विसरून ‘माझे मी’
वज्र संयमी वागताना
अभावित मी कर जोडी
शून्यशा नभा बघताना
आर्तपणे स्वर पुटपुटती
शिर भूवरी झुकताना
कोण कुणाचे काय कधी
अर्थ वाहिले जपताना
अधिक-उणे राहून जाई
जीव भाबडा जगताना

मकरंद मनगोळी

विषण्ण सांगाडे

विभक्त नात्यांचे सशक्त कावे
पिंगा घालती हेवे-दावे
धगधग जळतंय प्रत्येक ऊर
अपशब्दांचा मोकाट धूर
कोणास नाही, कोणाची पत्रास
मर्मांवर घाव हाच एक ध्यास
निक्षुण्ण राखेची ओकत गरळ
भयाण चिता पेटत्येय सरळ
अंतर्विधी अनिवार्य उच्चार
शाब्दिक आत्मिक साराच संहार
फैलावले म्होरके दिशांना चार
हैराण पोरके आभाळ निराधार
पसरली स्मशान शांतता
बोथटली शब्दांची धार
विषण्ण रिकाम्या सांगडयांत
नात्यांचा फक्त व्यवहार

मकरंद मनगोळी

मन

जग धावताना ,
जग नाही भावलं
म्हणून मन माझं,
आणखी वेगाने धावलं.
मरत चालली इथे
संवेदना वेडया मनांची,
मग हीच ठरते खूण
कमावलेल्या शहाणेपणाची.

मकरंद मनगोळी