दैनंदिन जीवनामध्ये स्वयंचलित तंत्रज्ञानाचा वापर वाढल्यापासून शारीरीक हालचाली कमी होत आहेत, कार्यालयांमधून सुद्धा बैठ्या कामाचं प्रमाण वाढत चाललंय आणि या जीवघेण्या स्पर्धेच्या युगामध्ये तणावाची कारणं मोजावी तेवढी कमीच ! व्यायामाच्या अनेक प्रकारांमध्ये ‘धावणं !‘ हल्ली लोकांमध्ये जास्त बघितला जातंय. धावणाऱ्या लोकांच्या लहान कम्युनिटीज तयार होताना दिसत आहेत. यांमध्ये महिलांचा वाढणारा सहभाग कौतुकास्पद आहे.
‘जागतिक महिला दिन’’ च्या निमित्ताने ‘‘हर्षा लेले’’ ह्या स्त्री-व्यक्तिमत्वाची कामगिरी वाखाणण्याजोगी आहे. अमेरिकेतून एमबीए शिक्षण घेऊन काही वर्ष अमेरिकेमध्ये नोकरी करुन ३९ वर्षांच्या हर्षा लेले सध्या मुंबईमध्ये ‘‘अॅक्सेंचर’’ ह्या परदेशी कंपनीमध्ये व्यवस्थापकीय संचालिका आहेतच पण जागतिक पातळीवर नेतृत्व करत आहेत. ७ ते ९ फेब्रुवारी २०२०, बंगलोर येथे झालेल्या ‘‘ऑक्स्फॅम ट्रेलवॉकर चॅलेंज’’ मध्ये त्या १०० किमी अंतर २१ तासांमध्ये धावल्या!
धावण्याची सुरुवात कशी झाली हे विचारल्यावर हर्षा सांगतात, ‘‘वयाच्या ३४ व्या वर्षापासून मी धावायला सुरुवात केली. आयुष्य हेच मॅरेथॉन आहे. इथे आपली आपल्याशीच स्पर्धा चालू असते. हेच आयुष्य जरा मजेत घालवायचं असेल तर शारीरीकदृष्टया सक्रीय असणं गरजेचं आहे, कारण कॉर्पोरेट आयुष्यात तेवढी हालचाल होत नाही. व्यवसायाच्या निमित्ताने खूप प्रवास करावा लागत असल्यामुळे बाहेरचं खायला लागतं, कामाचा तणावसुद्धा प्रचंड असतो. एक क्षण माझ्या आयुष्यात असा आला की माझी तब्येत माझ्या हातातून निसटत चालली आहे की काय अशी भीती वाटू लागली. मग मी आमच्या घराजवळ थोड्या अंतरावर धावायला सुरुवात केली. ‘ट्रेलब्लेझर अॅकॅडेमी’ मध्ये मी सामील झाले. आमचा कोच जीतू ऋषी हा राष्ट्रीय धावपटू आहे. सकाळच्या बॅचमध्ये आम्ही २० ते २५ जण असतो. आम्ही वेगवान धावण्यासाठी, आमची चपळता वाढण्यासाठी काही खास व्यायाम प्रकार आमच्याकडून करुन घेतले जातात. मी जीममध्ये सुद्धा जाते. अशा प्रकारे सकाळी ६ ते ७ वाजता आमची दिवसाची सुरुवात चांगलीच होते.’’
धावल्यामुळे आयुष्यात कसा बदल झाला हे विचारलं असताना हर्षा सांगतात, ‘‘धावण्याचे नक्कीच फायदे आहेत. फक्त वजनच कमी होत नाही, तर तुम्ही चांगलेसुद्धा दिसता. एक सकारात्मक मानसिकतेची जडणघडणसुद्धा चांगलीच होते. माझ्यासाठी हा नक्कीच एक चांगला प्रवास आहे. हर्षा पुढे सांगतात, ‘‘मी टाटा मॅरेथॉनमध्ये जानेवारी २०२० ला १० किमी टाटा डिसअॅबिलिटी रन’’ मध्ये एका आंधळया मुलीचा हातात हात घेवून धावले. हल्ली भरपूर सामाजिक संस्था तसेच कंपन्या ‘‘धावण्याचा’’ सामाजिक कार्यासाठी उपयाग करतात. माझ्याबरोबर धावणारी आंधळी मुलगी तिच्या शिक्षणासाठी मॅरेथॉनमध्ये धावली. जून महिन्यामध्ये मला ४० वर्ष पूर्ण होणार आहेत म्हणून मी काहीतरी वेगळं करण्याचं ठरवलं. भारतातलं सगळयात मोठं १०० किमी धावण्याचं ‘‘ऑक्स्फॅम ट्रेलवॉकर’’ हे आव्हान स्विकारण्याचं ठरवलं. चॅलेंजमध्ये भाग घेतला. आम्ही १०० किमी अंतर २१ तासांमध्ये पूर्ण केलं. पहिले ५० किमी अंतर साडे आठ तासांमध्ये धावून पूर्ण केलं. दुपारी बंगलोरमध्ये खूप ऊन असतं. इथे नुसतंच वेगवान धावणं नसतं, तर ‘‘टीम बिल्डिगपण’’ असतं. आम्ही कोणालाही मागे टाकत नाही ना हे बघावं लागत. खूप मजा आली आणि ठरल्याप्रमाणे आव्हान पूर्ण केल्याचा आनंदच आगळा ! आहार-सेवनाच्या सवयीबद्दल बोलताना हर्षा सांगतात, ‘‘शरीराला ऊर्जा मिळेल असाच आहार घ्यावा लागतो. खाण्यावरही तेवढंच लक्ष द्यावं लागतं. माझी एक ग्लासभर पाण्याने सकाळची सुरुवात होते. सकाळी मी बदाम, खजूर, अक्रोड यांपैकी काही खाते. खजूरामध्ये तर लोहाचं प्रमाण जास्त असतं. न्याहारी करणं खूप गरजेचं आहे. काही लोकं बारीक व्हायचंय म्हणून न्याहारीच करत नाहीत जे अत्यंत चुकीचं आहे. न्याहारीमध्ये मी अंडी, इडली, उपमा, पोहे यांपैकी काही पण अर्थातच प्रमाणामध्ये खाते. सकाळी अकरा वाजता एक फळ, दुपारी जेवणामध्ये पोळी, भाजी, तूप, कोशिंबीर असतं. परत संध्याकाळी एखादं फळ आणि रात्री शक्यतो लवकर जेवते. झोपायच्या आधी दोनतास तरी खाल्लेलं अन्न पचन पाहिजे. मी जंकफूड, गोड सुद्धा खाते पण तेवढ्या कॅलरीज जळतील याची काळजीसुद्धा येते.
हल्ली कॉर्पोरेटमध्ये ‘‘काम आणि आयुष्य’’ याचं संतुलन पाळलं जातं का हे विचारलं असताना हर्षा म्हणतात ‘‘नक्कीच! तुमचं जैविक (बायलॉजिकल) घड्याळ आणि करियरचं घड्याळ यामध्ये एक स्पर्धा असते. नोकरी करताना एखाद्या स्त्रीचं लग्न होतं. पुढे २-३ वर्षांनी तिला मुलं होतात. प्रमोशनची जेव्हा संधी येते तेव्हा करीयर की कुटुंब यामध्येच स्त्रीची तारेवरची कसरत चालू होते. त्यामुळे हल्ली बऱ्याचशा कॉर्पोरेटमध्ये कळायला लागलं आहे की, इथे महिला कर्मचाऱ्यांना जर साथ मिळाली तर त्या आपल्या करीयरमध्ये खूप पुढे जाऊ शकतात.
हर्षा लेले यांना आठ वर्षांचा ‘‘आरव’’ नावाचा मुलगा आहे. घर आणि करियर ह्याचा समतोल- राखायलाच लागतो. त्या पुढे म्हणतात. ‘‘मला जर माझ्या कुटूंबाची काळजी घ्यायची तर सर्वात प्रथम मला माझी काळजी घ्यावी लागेल’’. पती निलेश लेले (केमिकल- इंजिनीअर, तंत्रज्ञ, तसेच एक्झेलॉन फूड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक, सावर्डे वॅली फूड फाऊंडेशनचे संचालक) यांना त्यांच्या पत्नी हर्षा लेले यांच्याबद्दल विचारलं असताना ते म्हणतात, ‘‘खूप मेहनती, फोकस व्यक्तिमत्वाची तसेच ध्येयवादी हर्षाचं करियर उत्तम झालंच आहे, पण हर्षा ही पत्नी, आई, मुलगी आणि सून ह्या सगळ्या भूमिका निष्ठेने पार पाडते.
हर्षा लेले यांच्या सासूबाई, प्रा. डॉ. स्मिता लेले (रसायन तंत्रज्ञान संस्था, मराठवाडा उपकेंद्र जालनाच्या पहिल्या महिला संचालिका) हर्षा बद्दल सांगतात, आत्ताच्या पिढीच्या हर्षाचं खूप कौतुक वाटतं. लहान वयात परदेशी कंपनीमध्ये मोठ्या जबाबदारीचं काम अत्यंत हुषारीने सांभाळत आहे. तिचे पाय जमिनीवर आहेत हे बघून खूप अभिमान सुद्धा वाटतो. तिला एकत्र कुटुंबाची आवड आहे. आपले आई-वडिल, सासू-सासरे सगळे एकत्र राहू असा विचार तिच्या डोक्यात कायम घोळत असतो. मी तिला DIL (Daughter-In-Law) आणि ती मला MIL (Mother-In-Law) म्हणते. मग गंमतीने आम्ही दिल (DIL) मिल (MIL) गया असं म्हणतो.
‘‘हर्षा लेले’’ चं व्यक्तिमत्व बघताना जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने असं म्हणता येईल, की स्त्री म्हणजे नुसती सुंदरता, बुद्धीमत्ता, करियर, गृहिणी नसून ह्या सगळ्यांचा योग्य समतोल साधणारी एक शक्तीच आहे. त्यासाठी स्त्रीने स्वतःचा दृष्टीकोन आणि विचारसरणी सकारात्मक ठेवायला हवेत.
-पूर्णिमा पारखी