फळांचा राजा आंबा

meals-in-one-dish

बा अदब, बा मुलाहिजा, होशियारऽऽऽऽ अल्फांजो कुलोत्पन्न, जगज्जेता, भारतभूषण, कोकण शिरोमणी, देवगडरत्न, फलाधिराज, शहेनशाह – ए – आंबा पधार रहे हैऽऽऽऽ

प्रिय,  पत्राला एव्हढ्या तातडीनं उत्तर देशील असं अजिबात वाटलं नाही. पण दखल घेऊन, धावत आलास भक्तांसाठी.. अगदी खरंच वाजतगाजत, आकाशातल्या हत्तीवरून! .. थोडासाच भाव खात. 

मला बापडीला उगीच वाटायचं मंडईतून जाताना तू दिसशील म्हणून..पण तू राजा बाबा. असा बरा राजरोसपणे बाजारात मिरवशील? तू शाही पदार्पण करणार!  काय सांगू तुला.. रोज एकेकाच्या “भिंतीवर” तुझे फोटो…आणि वर “कोकणचा राजा दारात” किंवा “आला गं बाई आला गं ” अशी मेसेजेसची तोरणं! अस्सा जळफळाट व्हायचा म्हणून सांगू.. जाऊदे, आपण त्यांचं घर उन्हात बांधू …

किती प्रतीक्षा करायला लावलीस? पण नेहमीसारखाच इतका देखणा आणि राजबिंडा दिसतोयस ना की तुला हजार गुन्हे माफ! आधी दृष्ट काढू दे…

meals-in-one-dish

बरं, दरवर्षीप्रमाणे यंदाही, तुझ्यासाठी त्रिस्तरीय सिंहासन केलंय बघ. आता विराजमान हो पाहू आणि ‘जनतेच्या’ उन्हाळी प्रश्नांकडे लक्ष दे. अर्थात इतर आंबेही आहेत रे बाजारात. तेही आणतोच… .पण महाराष्ट्रात मिळतात तितकी विविधता नाही रे मिळत इकडे रायवळ, पायरी, दशहरी, केसर हे सहजी नाही मिळत … इथे चोखून खाण्यासाठी चिन्न रसालू, कापून खाण्यासाठी बेगनपल्ली /बेनिशान /बदामी आणि बाकी हिमायत, पिली मैना यासारखे काही प्रकार मे मध्यावर येतात… फार काही पदार्थ बनवता येत नाहीत त्यांच्यापासून … पण तुझा फायदा असा की तू सर्वव्यापी आहेस. अनेकांशी तुझी सोयरीक जुळवता येते. ज्या “पदार्थात” पडतोस त्याला आपलंस करतोस म्हणून तू खास! तुझं बोट धरून उन्हाळ्याची ही दोन महिन्यांचीं ही शुष्क वहिवाट आम्हा आई वर्गाला अगदी हिरवळीसमान भासते बघ. तेव्हा माझ्यासारख्या “आई ” या उपेक्षित घटकाचे अंतरंग जाणून घेऊन आमच्या कल्याणाचा विचार कर.

meals-in-one-dish

आमरस, शिरा, केक, सांदण, वडी, बर्फी, आईस्क्रीम, मिल्कशेक, कुल्फी, आंबापोळी, असे अनेक गोड प्रश्न तुला धसास लावायचे आहेत. आता तुला सुत्रं हातात घ्यायलाच हवीत . उणेपुरे दोन अडीच महिनेच आहेत तुझ्याकडे…  असो, तर ते होतच राहील यथावकाश. पण आधी तुझ्या मुळ रूपात मला आस्वाद घेऊ देत तुझा. तसा तर तू कशाबरोबरही आणि कशाशिवायही अतुलनीयच आहेस रे! स्वबळावर निवडणूक लढवू शकतोस तू दरवर्षी.! पण अनेक पक्षांनां सोबत घेऊन जाण्याचं धोरण तुझं. युतीचं सरकारच बनवतोस तू. कारण ‘सबका साथ सबका विकास’ हे ध्येय तुझं. अगदी पुरणपोळी सारख्या सबल पक्षापासून भातासारख्या दुर्बल घटकालाही सोबत घेऊन चालतोस…

आता हेच बघ ना. तुझी आणि कुरडई, पापड्यांची युती. अर्थात त्यांचां आपला असा एक खास मतदार वर्ग आहेच खरा पण तुझ्यासोबत येऊन त्यांनां खऱ्या अर्थानं मानमरातब मिळतो. तुझी गोल टम्म फुगलेल्या पुरी सोबतची युती जगप्रसिद्ध आहेच पण मला स्वतःला, तू पापड्या, कुरडयांसोबत अधिक खूलून येतोस असं वाटतं. ती कुरकुरीत गव्हाची कुरडई हलकेच हातात धरायची आणि तुझ्या थोड्याश्या गुठळ्या रसात बुडवायची आणि तशीच उचलून, सुवर्णथेंब शक्यतो सांडू न देता तोंडात. अहाहा!! स्वर्ग! निव्वळ स्वर्ग!.. तसंच पापडीचं. आता मुलंही तरबेज झालीत या कसरतीत. रस केल्यावर “आई कुरडया नाही तळल्यास आज? ” म्हणून लगेच गलका घरात…

meals-in-one-dish

तुझ्यावर एव्हढा जीव का आहे म्हणून विचारतोस? .. अरे मुलांनां शाळेला सुट्या! घराचा पार art studio cum wrestling ground cum summer camp झालेला! मग अशावेळी तुझा किती आधार वाटतो म्हणून सांगू. आंबा या विषयावर सगळी” दिलजमाई” घडून येते. तू म्हणजे माझं bribing bait आहेस. पौष्टिक तुष्टीकरण!! तुझं अमिष दाखवून मुलांनां शिस्त लावता येते मला. (जो खोली आवरेल त्याला एक वाटी रस जास्त !) तू हाताशी असलास बाटलीतल्या जिनी सारखा, की उन्हाळा खूप सुसह्य होतो बघ.. आता करूदे मुलांनां घराचं कुरूक्षेत्र! तुझ्यासारखं ब्रम्हास्त्र हातात असताना दोघांच्या कौरवसेनेला घाबरायची नाही मी आता!!

म्हणून तर म्हणतेय..  “याचसाठी केला होता बा अट्टाहास।  रोजचा दिस गोड व्हावा।”

तुझी कृपाभिलाषी 
शरयू ~~~~

डॉ शरयू देशपांडे, हैद्राबाद