अन्नक्षेत्रातील ऑडिटर विदुषी

औद्योगिक क्षेत्रात विविध कंपन्‍यांमध्ये उत्‍पादन जेव्हा होतं, तेव्‍हा ते उत्‍पादन निर्मिती होण्यापर्यंत एक प्रवास असतो, विशिष्ट प्रक्रियेतूनच ती निर्मिती होत असते. एक जरी पायरी चुकली तरी ते उत्‍पादन, चांगल्‍या प्रतीचं असेलच असं सांगता येत नाही. त्यासाठीच ‘‘ऑडिटर’’ हे पद जन्माला आलं. पुरुषांनी काबीज केलेल्‍या या क्षेत्रात स्त्रीया आजही कमी दिसून येतात. अन्नक्षेत्रामध्ये ऑडिटर म्हणून सर्वेसर्वा ओळखली जाणारी अशीच एक विदुषी ‘‘चिन्‍मयी देऊळगावकर’’ ‘‘हॉटिकल्‍चर’’ मध्ये अकोला येथील विद्यापीठातून पदवी प्राप्‍त करुन अन्नप्रक्रियेमध्ये राज्यामध्ये दुसरा क्रमांक मिळविणाऱ्या चिन्मयी देऊळगावकरांनी आपलं संशोधन माटुंगा येथील प्राध्यापिका पुष्पा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न विज्ञानख तंत्रज्ञान या विषयांमध्ये केलं. ‘‘जोपर्यंत माणूस आहे तोपर्यंत त्याला अन्न खायला लागणार आणि तोपर्यंत अन्न क्षेत्रातील माणसांना काम उपलब्ध असणार असा विचार करुन अन्न क्षेत्रामध्ये प्रवेश घेतला आणि मला ते आवडायला सुद्धा लागलं.’’ असं चिन्मयी म्‍हणतात, ‘‘शिक्षण पूर्ण झाल्‍यावर एका आंतरराष्ट्रीय कंपनीमधून आणि मॉन्जिनीज मधून नोकरीच्‍या ऑफर्स आल्‍या. पण माझ्या काकांच्‍या सल्ल्‍यानुसार, ‘‘शिकायचं असेल तर छोट्या कंपनीत काम कर. त्यामुळे खूप अनुभव मिळतील.’’ मी मॉन्जिनीज मध्ये कामाला लागले आणि खरंच खूप मोठा अनुभव पदरी पडला. तीन वर्षांमध्ये मी खूप काही शिकले कारण माझ्या पुढच्या करियरचा तो पाया होता. मॉन्जिनीज मध्ये मला क्वालिटी अॅश्युरन्‍स (गुणवत्ता हमी) संशोधन आणि विकास, तपासणी, मटेरियल नियोजन, अन्न सुरक्षा अशा विविध विभागांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. कंपनीच्‍या व्यवस्‍थापकीय संचालकांचा मला पूर्ण पाठिंबा मिळाला. ठराविक सेकंदामध्ये केक कापून झाला पाहिजे. ठराविक सेकंदांमध्ये डेकोरेशन, १५ सेकंदांमध्ये केकचा तुकडा बाहेर आला पाहिजे ह्या सगळ्या प्रक्रिया मला शिकायला मिळाल्या. मी शॉप फ्लोअर वर असल्यामुळे तिथे काम करणाऱ्या कामगारांची मानसिकता शिकायला मिळाली. क्वालिटी अॅशुरन्स मॅनेजरकडून चुकीची बॅच नाकारावीच लागते, हा प्रामाणिकपणा शिकायला मिळाला.

नंतर मला ‘‘पॅराडाइम’’ या कंसल्‍टन्‍सी कंपनीमध्ये कन्‍सल्टंट म्हणून अनुभव गाठिशी आला. या कंपनीचे पंचवीस प्रकल्‍प माझ्याकडे होते ज्यांची निर्यात होणार होती. अन्न सुरक्षा प्रक्रिया मध्ये हे प्रकल्‍प होते आणि त्यांची अंमलबजावणी करायची होती. १९९९ सालापासून अन्न सुरक्षाचे कायदे सुरु झाले. मग मी ‘‘फिश (मासे) उद्योगांमधील मार्गदर्शन तत्वांचा वापर करायला सुरुवात केली. ह्या कन्सल्टन्सीचा फायदा मला डीएनव्ही कंपनीमध्ये झाला. २००३ ते २०१८, पंधरा वर्षे म्हणजे माझ्या आयुष्यातील सुवर्णकाळच होता!’’ चिन्मयी देऊळगावकर पुढे माहिती देतात, ‘‘डीएनव्हीला अपेडाने (अॅग्रीकल्चर आणि प्रोसेस्ड फूड प्रोडक्टस एक्स्पोर्ट) (कृषी आणि प्रसंस्कृत खाद्य उत्पादन निर्यात) अन्न क्षेत्रातील तज्ञांची नियुक्ती करण्यासाठी सांगितलं. मला त्यावेळी अन्नप्रक्रिया क्षेत्रात तसेच कन्सल्टन्सीचा अनुभव गाठीशी असल्यामुळे डीएनव्ही मध्ये माझी नियुक्ती झाली. २००३ सालामध्ये विविध क्षेत्रांमध्ये बँकींग, इन्शुरन्स अशा अनेक ठिकाणी ऑडिटर म्हणून फिरले. खूप मोठा अनुभव होता तो ! ऑडिटरची कामाची शैली सगळीकडे सारखीच असते का विचारल असताना चिन्मयी म्हणाल्या, ‘‘मूलभूत तर्कशास्त्र जर आपलं व्यवस्थित असेल तर टार्गेटस साध्य करण्यासाठी काय योजना आहेत, त्यासाठी काय संसाधने आहेत, काय क्षमता आहेत, योग्य तज्ञांची नियुक्ती केलेली आहे ना, कसे मूल्यमापन केलं जातं, प्रक्रिया कार्यक्षमता कशी आहे, परिणामकारकता कशी आहे या सगळ्यांचा साचा सारखाच असतो. त्यामुळे मग तो उद्योग अन्नशास्त्र, केमिकल, दागिन्यांचा असो, ऑडिटरची भूमिका सगळीकडे सारखीच असते. अन्न विज्ञानामध्ये जरी अनुभव असला तरी, मत्स्य उद्योग किंवा दुग्ध उद्योग यांचं काम करण्याची पद्धत वेगळी आहे. मग त्या-त्या उद्योगाच्या उत्पादनाचं ऑडिट करताना मत्स्य उद्योग किंवा दुग्ध उद्योग यांसारख्या क्षेत्रामधलाच तज्ञ पाहिजे. दुग्ध उद्योगामधील ऑडिटर चिकन उद्योगासाठी चालणार नाही.’’ सर्वसाधारण माणसांची अशी समजूत असते की एफएसएसएआय (फूड सेफ्टी आणि स्टँडर्डस ऑथोरिटी ऑफ इंडिया) चां शिक्का असला की तेच प्रमाणपत्र ! चिन्मयी सांगता, ‘‘एफएसएसएआय हा परवाना आहे. एफएसएसएआय हे राष्ट्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाच्या अधिपत्याखाली येतं. एफएसएसएआय या संस्थेकडे अन्न सुरक्षा नियमानाचे सर्वोच्च अधिकार आहेत. आमंच ऑडिटींग जेव्हा चालू होतं, तेव्हा तिथे कायदे येतात आणि तिथेच पुढे अन्न सुरक्षा व्यवस्थापन प्रणाली सुरु होते. मग इथे एचएसीसीपी (हझार्ड विश्लेषण आणि क्लिष्ट नियंत्रण गुणशैली पद्धत) म्हणजेच पद्धतशीर प्रतिबंनात्मक दृष्टीकोनाची सुरुवात होते. अन्न उत्पादनाच्या उत्पादकामध्ये कोणतेही जैव, रासायनिक, आणि भौतिक धोके असतील ज्यामुळे अन्न सुरक्षित होणार असेल, तर एचएसीसीपी चा दृष्टीकोन अन्न असुरक्षित होण्याचा धोका कमी करतो. प्रत्येक देशाचं एचएसीसीपी आहे, आणि देशांनी त्यामध्ये गुंतवणूक केली आहे. आपल्या देशात एफएसएसएआय ने ‘‘स्केड्यूल ४’’ आणलय. या स्केड्यूल ४ मध्ये अन्न उद्योगामध्ये ‘‘चांगल्या (योग्य) उत्पादन पद्धती’’ आणि योग्य स्वच्छता पद्धती’’ यांचा प्रामुख्याने समावेश आहे. या दोन्ही पद्धती अ‌न्न उद्योगाच्या उत्पादनामध्ये अनुसरीत केल्याच पाहिजेत. एचएसीसीपी ही ४०/४५ वर्ष जुनी पद्धत आहे. या पद्धतीमध्ये माझ्याकडचे नियंत्रक (कन्ट्रोल्स) कसे काम करतात याचं मूल्यमापन होतं. तेव्हा, आपल्या भारतातील अन्न क्षेत्रातील उद्योजकाला निर्यात करायची असेल त्या त्या देशातील ऑडिट पद्धती अवलंबायला लागायची आणि ऑडिटची मोठी किंमत मोजावी लागायची. मग जीएफएसआय (ग्लोबल फूड सेफ्टी इनिशिएटीव्ह) या खाजगी संस्थेने स्वत:ची मार्गदर्शक तत्वे तयार केली, ‘‘तुमचे अन्न पुरवठादार यांची प्रक्रिया असते, तपासणी कशी असते, प्रक्रिया अटी (प्रोसेसिंग कंडिशन्स) कशा असतात वगैरे सगळ्यांच्या ‘‘बेंचमार्क मानके’’ घालून दिल्या आहेत. म्हणजे प्रामुख्याने दोन मुख्य गोष्टींवर भर दिला जातो, एक म्हणजे पायाभूत सुविधा (इन्फ्रास्ट्रक्चर) आणि प्रक्रियेच्या गरजा. ‘‘पायाभूत सुविधामध्ये’’ दार, भिंत कसे पाहिजेत, वायुवीजन (वेंटीलेशन) कसे पाहिजे. उदाहरणार्थ, पाईपलाईन दुषित असता कामा नये, सीवेज आणि पाण्याच्या लाईन मध्ये उभं किंवा आडवं ६ फूटाचं अंतर असलं पाहिजे वगैरे. ‘प्रक्रिया गरजांमध्ये’ उद्योगक्षेत्राच्या प्रमाणे मार्गदर्शक तत्वं आहेत. अन्न सुरक्षा व्यवस्थेमध्ये पॅकेजिंगला महत्व दिलं आहे. उदाहरणार्थ गव्हाच्या पीठामध्ये १५ घटकांचं विश्लेषण करायचं आहे. एखाद्याच्या प्रयोग शाळेमध्ये ७ घटक विश्लेषण करण्याची क्षमता आहे आणि उरलेले ८ घटक पुरवठादारावर अवलंबून असेल, तर आम्हाला त्या पुरवठादाऱ्याची मापनदंड करण्याची क्षमता तपासून बघावी लागते.

चिन्मयी देऊळगावकर यांना असं विचारलं की कोणत्याही अन्न उत्पादनांमध्ये भेसळ आढळून असताना त्या कंपनीला कसं सिद्ध करावं लागतं, तर त्यांनी असं सांगितलं की तेव्हाच प्रक्रिया प्रणाली उपयोगी पडते (प्रोसेस सिस्टीम) ‘‘पाणी’’ ही अन्नक्षेत्राची मूलभूत गरज आहे हे सांगताना चिन्मयी म्हणाल्या की आम्ही पाण्याची गुणवत्ता बघतो, आम्हांला बऱ्याच वेळा सांगितलं जातं की आमच्याकडे जलशुद्धीकरण प्रकल्प आहे. मग आम्ही अशावेळी पाणी कुठून येतं, भूजल आहे, भूतलावरील पाणी हे की म्युनिसिपल पाणी आहे. पैकी म्युनिसिपल पाणी जरा बऱ्या प्रतीचं असतं. भूतलावरील पाण्यामध्ये बॅक्टेरीया, शेवाळ, विषाणू असतात. विषाणू युव्हीने मारले जातात. आमच्या ऑडिट मध्ये हेच बघितलं जातं की खरोखरच जे धोके प्रक्रियेमध्ये आहेत ते नियंत्रित केले जातात की नाही. एखादी भेसळ जेव्हा उत्पादनामध्ये आढळून येते तेव्हा त्या कंपनीला आम्हाला दाखवावं लागतं की त्यांची प्रक्रिया प्रणाली किती मजबूत आहे !

चिन्मयी देऊळकरांच्या मार्गदर्शनाखाली ४० जणांची टीम डीएनव्ही कंपनीमध्ये होती. त्यांनीच पहिला आयएसओ-२२०००, हा आयआरसीए मंजूर लिड ऑडिटरचा ट्रेनिंग कोर्स सुरु केला. त्यांच्याकडे कोकसारखा महत्वाचा ग्राहक होता. कंपनीचा ३५टक्के रेवेन्यू कोककडूनच येत होता. जवळजवळ २७ प्रमाण पत्र कोर्सेसची जबाबदारी त्यांच्यावर होती. अनेक कोर्सेस त्यांनीच भारतात चालू केले आणि उत्तम ट्रेनर म्हणून चिन्मयी प्रचालित आहेत.

सध्या चिन्मयी देऊळगावकर ‘‘फूडचेन आयडी’’ नावाच्या (यूएसए) कंपनीमध्ये व्यवस्थापकीय संचालक आहेत. ह्या कंपनीच्या भारतातल्या व्यवसायाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. महिला ऑडिटरला योग्य ठिकाणीच पाठवतात कारण ऑडिटर हे क्षेत्र खूप कठीण आहे. काही ग्राहकांना त्यांच्या कंपनीसाठी प्रमाणपत्र हवंच असतं, मग अशा वेळी खूप कौशल्याने परिस्थिती हाताळावी लागते. कोणत्या ऑडिटरमध्ये कोणत्या सकारात्मक गोष्टी आहेत ते ठरवूनच त्यांच्यासाठी योग्य ग्राहक दिला जातो. प्रत्येक दिवस त्यांच्यासाठी वेगळा असतो ! त्यांना १० वर्षांची मुलगी आहे. कामानिमित्त ३० दिवसांमधले १८ दिवस त्यांना घराबाहेर राहावं लागतं आणि यशाचं सगळं श्रेय त्या त्यांच्या पती, स्वरुप देऊळगावकर तसंच ७६ वर्षांच्या सासूबाईंना देतात.

चिन्मयी देऊळगावकर उत्तम ऑडिटर, उत्तम ट्रेनर, उत्तम व्यवसाय विकास व्यवस्थापक म्हणून आहेतच पण अतिशय हसरं, नम्र व्यक्तिमत्व, आपल्या सहकाऱ्यांशी मुक्तपणे संवाद साधणाऱ्या म्हणूनसुद्धा ओळखल्या जातात. अन्नक्षेत्रामध्ये जर अशा प्रामाणिक, हुशार महिला ऑडिटर असल्या तर भेसळरहित, सुरक्षित अन्न आपल्याला नक्कीच खायला मिळेल !

-पूर्णिमा पारखी